भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १०) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १०)

पावसाचा वेग कमी झालेला. अमोल सोडून बाकी सर्व एका जागी शांत बसून होते. अमोलचं फोटो काढणं सुरूच होतं. पुजारीने फक्त एकदाच अमोल कडे पाहिलं. नंतर या सगळ्याकडे नजर टाकली.
" पहिल्यांदा आलात वाटते तुम्ही.... इथे " ,
" हो.. तुम्हाला कसं कळलं ते ... " ...संजना
" हे महाशय ... ज्याप्रकारे फोटो काढत आहेत त्यावरून... फिरायला आलात वाटते तुम्ही... " पुजारीने चौकशी केली.
" हो... फिरायचे तर आहेच.. पण आणखी एका कामासाठी आलो आहोत.. " कोमलने सांगितलं.
" असा कोणी व्यक्ती तुम्ही बघितला आहे का... जो या सर्व गावकरी , शेतकरी पासून वेगळा वाटतो. म्हणजे इथला वाटत नाही असा.. दाढी- केस वाढलेले... जो सारखा भटकत असतो .. " कोमल...
" तुम्ही 'वेडा भटक्या' बद्दल बोलत आहात ना.. " ,
" हो ... हो , तोच " संजना.


पुजारी हसला " तो कशाला पाहिजे तुम्हाला... ",
" सहज... त्याला भेटायचं होतं आम्हाला.. " कोमल...
" त्याला भेटायला तो काय कोणी प्रसिद्ध व्यक्ती आहे का ? " पुजारी हसू लागला.
" तसं नाही, पण त्याने काही गावात खूप कामे केली आहेत ना.. म्हणून " कोमल बोलली.
" असं आहे तर.. तर मग ठीक आहे.. " ,
" तुम्ही भेटला आहात का त्याला प्रत्यक्षात " ,
" हो तर.. गावात होता ना तो , तेव्हा बहुतेक वेळेस तो, रात्रीचा या मंदिरात असायचा मुक्कामाला... केवढी मोठी दाढी... वाढलेले केस .. पहिल्यांदा आला तेव्हा तो साधूच वाटला होता मला. त्याची भाषा एवढी छान... मग विचार केला , नक्कीच हा गावातला नाही. कुठून आला माहीत नाही पण गावात छान रुळला. त्याच्याबद्दल मी ऐकलं होता आधी. ",
" ते कसं ? " कोमल
" मागच्या गावातले येतात कधी कधी या मंदिरात, एकदा अशीच दोघा-तिघांची चर्चा सुरु होती..... भटक्या वगैरे. आहे कोणी अशी. खूप छान कामे केली गावात त्याने. असंच ऐकलं होतं , बघितलं नाही कधी. इथे आला तेव्हा पाहिलं. या गावात तर देवासारखं मानतात त्याला... ",
" का .. असं काय केले त्याने.. " ,
" या गावात , दारूचा नुसता सुळसुळाट झालेला... त्या भटक्याने काय केलं माहित नाही.. तीन महिन्यात सगळं बंद करून गावाला सुधारलं. शिवाय पावसाचे पाणी ... ते कसं साठवायचं.. झाडं कशी लावायची... त्यांची काळजी घेयाची ,ते सांगितलं. या गावात घरांची डागडुजी करण्यास सुद्धा मदत केली त्याने... सांगायचं झालं तर.. आता जे गाव तुम्हाला दिसते आहे ना.. ते त्याच्यामुळे... " पुजारी भारावून सांगत होता.


" आता कुठे आहे तो.. भेटायचं होतं त्याला... " संजना पटकन बोलली. अमोल अजूनही फोटो काढण्यात दंग. त्याला तर या सगळ्या संभाषणाची कल्पनाच नाही.
" तो... त्याला भटक्या का बोलतात कळलंच नाही तुम्हाला.. थांबत नाही कुठे तो... " ,
" म्हणजे ? " इतक्या संभाषणात न बोललेली सुप्री अचानक बोलती झाली.
" गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच गेला तो... दोन महिने होतं आले आता.. कुठून आलेला आणि कुठे गेला , कोणालाच माहित नाही. " यावर ऐकणारे सर्वच हिरमुसले. संजनाला काही आठवलं. बॅगमधून आकाशचा एका फोटो तिने बाहेर काढला.
" हा बघा... असाच होता ना तो.. " पुजारी फोटो पाहू लागले.
" शक्य नाही.. तो खरचं साधू सारखा दिसतो, त्याच्या दाढी आणि केसावरून... हा फोटोतील व्यक्ती तर किती वेगळा आहे ..शिवाय तो खूप बारीक आहे.. सडपातळ म्हणा.. हा फोटो मधला जरा धडधाकट तरी वाटतो. हा तो ,भटक्या असू शकत नाही. " ,
" निदान चेहरा तरी बघा... " त्यावर पुजारी हसू लागला.
" भटक्याचा चेहरा कसा होता , तो त्यालाच माहित... ते मागचे केससुद्धा तोंडावर यायचे कधी कधी... डोळे तेवढे दिसायचे... पण सांगू का तुम्हाला... त्याच्या मागे जाऊन काही फायदा नाही... कुठे असेल ते माहित नाही. तुम्ही कुठे शोधणार त्याला... " बोलणं संपलं.
" तरी मी आधीच सांगत होते, नको यायला म्हणून.. " सुप्री हळू आवाजात बोलली.


खरंच , सुप्रीच्या बोलण्यात तथ्य होतं , जाणार तरी कुठे. पुढे कि मागे... कोमल विचार करू लागली. " तरी तुम्हाला काय वाटते... कुठे गेला असावा तो... " ग्रुप मधल्या एकाने विचारलं.
" सांगू शकत नाही ... मागे तर जाऊ शकत नाही. तिथूनच आलेला तो. तो पुढच्या गावी गेला असेल. या गावातून एक वाट जाते, एका ठिकाणी २ फाटे फुटतात, तिथून पुढे २ गावं आहेत.. एवढंच सांगू शकतो. तिथून कोणत्या गावात गेला ते सांगू शकत नाही. " ,
" ठीक आहे .. आभारी आहे.. " कोमल ...


पाऊस सुद्धा थांबला होता. सगळे निघाले. " आताच निघू नका. पावसाळा सुरु झाला आहे ना, कधी येईल सांगू शकत नाही. एक दिवस तरी आराम करा गावात. तसं छान आहे गाव. " ,
" नक्की... विचार करतो आणि थांबायचं कि नाही ते ठरवतो... "..... संजना
" पण एक गोष्ट आहे त्याची. त्याचे डोळे दिसतात आणि त्या डोळ्यातून कळते.. काहीतरी शोधतो आहे तो , एवढं नक्की... शिवाय , तो जिथे जातो ना... तिथून निघताना काही खूण मागे ठेवून जातो... गावात थांबलात ना कि कळेल आपोआप... "


----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------

" हॅलो काका .... तुम्हाला भटका ... भटक्या माहित आहे का .. कुठे असतो तो... " सईने एका वयस्कर माणसाला हाक मारली. " भटक्या व्हय... तो तीत... त्या झाडाखाली बसला हाय बगा... " त्याने एका दिशेनं बोटं केलं आणि निघून गेला. समोर वडाचं मोठ्ठ झाड. त्याच्या कितीत्या पारंब्या.. विस्तार तो किती... मोजू शकत नाही इतका. समोर कसलीशी शेतं. दूरवर पसरलेली... हिरवीगार सगळीकडे जमीन... त्यात काही शेतकऱ्यांची डोकी सुद्धा दिसत होती. झाडावर पक्ष्यांची शाळाच भरलेली होती जणू. मधेच त्यातून , त्या झाडांच्या पानांतून एक - दोन पक्षी उगाचच ओरडत बाहेर उडत होते. दूरवर एक बैलगाडी जाताना दिसत होती. आणि त्या वडाच्या खाली असलेल्या पाडावर.. एक जण , त्या शेतांकडे बघत बसलेला... पाठमोरा..


सई , तिच्यासोबत आलेल्या मित्रांना घेऊन पुढे आली. " Hi .... " सईने आवाज दिला. त्याने काही मागे वळून पाहिलं नाही. " तु भटक्या आहेस का ... " यावेळेस त्याने मागे पाहिलं. या साऱ्यांकडे एकदा नजर टाकून पुन्हा त्या शेतांकडे पाहू लागला. " Excuse me... तुमचं नावं भटक्या आहे ना... ते तुम्हीच आहात ना .. जे सारखे फिरत असतात.. " त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं. " माझं नावं भटक्या नाही.... हे गावातले बोलतात, त्या नावाने हाक मारतात. " आकाशने हसत उत्तर दिलं. वाढलेली दाढी, केस.. मळके कपडे आणि एक मोठी सॅक. त्याचा तो अवतार बघून सईचा एक मित्र तिच्या कानात पुटपुटला. " इसे देख कर लगता नही.. इसे कूच मालूम होगा traveling का.. " ," wait ... let me ask him.. " सई आकाश जवळ आली.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: