chandani ratra - 19 - last part books and stories free download online pdf in Marathi

चांदणी रात्र - 19 - अंतिम भाग

राजेशला आता सर्वकाही आठवत होतं. अलिबागची ट्रिप, ते अद्भुतरम्य जंगल, जंगलात राहणारे आदिवासी, रिवा, गरू, वाघ आणि अगदी जगदीश यादव सुद्धा. “मला माहितीये तुला वृषालीची फार आठवण येते.” रिवा राजेशला म्हणाला. एवढा वेळ जुन्या आठवणींमध्ये बुडालेला राजेश वृषालीचं नाव ऐकताच भानावर आला. तो रिवाला म्हणाला, “रिवा मला माहितीये तुझ्या कडे खूप गूढ शक्ती आहेत. काहीही कर पण माझ्या वृषालीला पुन्हा जिवंत कर. मी नाही जगु शकत तिच्या शिवाय.” राजेश अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. “माणूस एकदा मेला की परत येत नाही.” रिवा म्हणाल. “तूच असं म्हणालास तर मी काय करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी अशक्य आहेत त्या तू अगदी सहजपणे करतोस. मग मेलेली व्यक्ती परत जीवंत करणं तुला का जमणार नाही?” राजेश रिवाला म्हणाला. राजेशची अवस्था रिवाला पाहवत नव्हती. बराच वेळ विचार करून रिवा म्हणाला, “ठीक आहे. मी प्रयत्न करेन. पण हा प्रयोग यशस्वी होईलच याची मी खात्री देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व निसर्गाच्या विरुद्ध आहे त्यामुळे याचे विपरीत परीणाम होऊ शकतात. परिणामांना सामोरं जाण्याची तुझी तयारी आहे का?” “हो माझी तयारी आहे. मला फक्त माझी वृषाली हवी आहे.” एका क्षणात राजेश म्हणाला. तो आता फार उतावळा झाला होता. “ठीक आहे. मला त्यासाठी एक विधी करावा लागेल. मी आता जातो व तो विधी पूर्ण होताच परत येतो.” एवढे बोलून रिवाची आकृती तिथून गायब झाली.
वृषाली परत येणार या विचारानेच राजेशच्या मनातली उदासी नष्ट झाली. तो रोज रिवाच्या येण्याची वाट पाहत होता. एक दिवस राजेश रात्री झोपला असताना अचानक खिडकी जोराच्या वाऱ्याने उघडली. रिवा परत आला होता. राजेशला जाग आली. रिवाला समोर पाहून तो फार खुश झाला. रिवा बोलू लागला, “माझा विधी आता पूर्ण झालाय. रविवारी रात्री बारा वाजता कर्वे उद्यानात जायचं. वृषाली तुला तिथेच भेटेल.” “रिवा तुझे खरंच फार उपकार आहेत माझ्यावर.” राजेश रिवाला म्हणाला. “अरे आपण मित्र आहोत. मैत्रीत कसले उपकार. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या बद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. अगदी आई-बाबांना सुद्धा नाही. चल मी निघतो आता.” असे म्हणून रिवा तिथून गायब झाला.

राजेशला आता एक वेगळाच उत्साह वाटत होता. त्याच्या मनावरची मरगळ कुठल्या कुठे पळाली होती. कधी एकदा आपण वृषालीला भेटतो असं त्याला झालं होतं. पण रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार होती.

राजेशमध्ये गेल्या काही दिवसात झालेला सकारात्मक बदल पाहून त्याचे आई-वडीलही खुश होते. संदीपचा वाढदिवस आहे व त्याने आपल्याला पार्टीसाठी बोलावलंय असं सांगून तो पुण्याला जायला निघाला. पुण्यात पोहोचताच त्याने रवीलाही हेच कारण सांगितलं. आम्ही सगळे एका मित्राच्या घरीच नाईट आऊट करणार आहोत असही तो रवीला म्हणाला. राजेश वृषालीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आलेला पाहून रवीलाही बरं वाटलं. पण थोडं आश्चर्यही वाटलं. त्यात राजेशच्या वडिलांचा रवीला फोन आला होता. त्यांनी रवीला राजेशवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.

रात्री साडे आकरा वाजता राजेश घरातून बाहेर पडला. “मीही तुझ्या बरोबर खाली येतो. घरी बसून फार कंटाळा आला आहे अन आज जेवणही जरा जास्त झालंय. एखादा फेरफटका मारीन अन परत येईन.” रवी राजेशला म्हणाला. “मी आता निघतो. मला उशीर होतोय.” राजेश गडबडीत म्हणाला आणि पळतच खाली गेला. रवीला राजेशचं वागणं थोडं विचित्र वाटलं. तसेच राजेशच्या वडिलांनी सांगितलेलं त्याला आठवलं. तो राजेशच्या पाठोपाठ घराबाहेर पडला.

राजेश उद्यानाच्या दिशेने चालत होता. रवीही त्याच्या मागून चालू लागला. रवीचा संशय आता अजून वाढला. राजेश त्याला मित्राकडे जाणार आहे असं म्हणाला होता. आता तर राजेश उद्यानाच्या दिशेने जात होता, तेही चालत. राजेश थोड्याच वेळात उद्यानाच्या गेटपाशी पोहचला. गेटजवळ कोणी गार्ड नव्हता. गेटला कुलूप सुद्धा लावलं नव्हतं. राजेश गेटमधून आत गेला. राजेश त्याच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसला. त्याने आजूबाजूला पाहिले. उद्यानात कोणीच नव्हते. आमावसेची रात्र असल्यामुळे आकाशात चांदण्या चमकत होत्या. राजेशने हातावरच्या घड्याळात पाहिले. बरोबर बारा वाजले होते. अजूनही वृषालीचा पत्ता नव्हता. रिवाने सांगितल्याप्रमाणे वृषाली खरच येईल का अशी शंका राजेशच्या मनात आली. पण त्याने स्वतःच्या मनाला समजावलं.

रवी उद्यानाच्या गेटपाशी पोहोचला. त्याने आत पाहिले. राजेश त्याला एका बाकावर बसलेला दिसला. ‘एवढ्या रात्री हा इथे कशासाठी आलाय?’ रवीच्या मनात विचार आला. तो उद्यानात गेला व दुसऱ्या बाजूने चालत राजेश जिथे बसला होता त्या बाकाच्या मागे एका झाडामागे लपला.
बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. अजूनही वृषाली आली नव्हती. आता मात्र राजेशचा धीर संपला. त्याला एका जागी बसवेना. तो बाकावरून उठला व उद्यानाच्या गेटपाशी गेला. त्याने डाव्याबाजूला पाहिले. ज्या रस्त्याने वृषाली नेहमी उद्यानात यायची तिथे कोणीच दिसत नव्हते. पूर्ण रस्ता रिकामा होता. राजेश तिथून जाणार तेवढ्यात त्याला खूप लांबून एक आकृती येताना दिसली. राजेशने ओळखले, ती वृषालीच होती. राजेशने जेव्हा तिला टेकडीवर प्रपोज केलं होतं तेव्हा तिने जो ड्रेस घातला होता तोच ड्रेस तिने आज घातला होता. पांढऱ्या रंगाच्या जांभळ्या फुलांची नक्षी असलेल्या त्या ड्रेस मध्ये वृषाली फारच सुंदर दिसायची.

राजेश परत बाकावर जाऊन बसला. थोड्यावेळाने वृषाली उद्यानात पोहोचली व राजेश जिथे बसला होता तिथे आली. तिने संपूर्ण शरीर झाकलं होतं. चेहेऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. पायतही शूज होते. राजेशला थोडं विचित्र वाटलं, कारण वृषाली कधीच असा स्वतःचा चेहेरा झाकत नसे. “बस” राजेश वृषालीला म्हणाला. वृषाली बाकावर बसली पण काहीच बोलली नाही. “स्कार्फ का गुंडाळलायस चेहेऱ्याभोवती? काढ ना तो स्कार्फ.” राजेश उतावीळपणे म्हणाला. वृषालीने आजूबाजूला पाहिले व कोणी नाही याची खात्री करून चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. वृषालीचा सुंदर चेहेरा पुन्हा एकदा पाहून राजेश खुश झाला. तो एवढा खुश झाला की आनंदाने त्याचे डोळे पाणावले. आता राजेशला राहवलं नाही. तो बाकावरून उठला. त्याने वृषालीचा हात धरला व तिला उभं केलं. बराच वेळ दोघे एकमेकांकडे नुसते पाहत होते.

रवी झाडाआड लपून पाहत होता. ‘कोण आहे ही मुलगी?’ रवीला प्रश्न पडला. अजुन त्याला तिचा चेहेरा दिसला नव्हता. राजेश आणि वृषाली बराचवेळ काहीच न बोलता फक्त एकमेकांकडे पाहत उभे होते. अचानक राजेशने वृषालीला आपल्या मिठीत घेतलं. आता मात्र रवीला राहवलं नाही. तो हळूच चालत पलीकडे गेला. रवीने त्या मुलीच्या चेहेऱ्याकडे पाहिले व तो अर्धवट जळालेला चेहरा पाहून रवीची बोबडीच वळाली व एक क्षणही तिथे न थांबता तो धावत सुटला.

X X X X X X

जोशींकाकांनी पेपरवाल्याने दारात टाकलेला पेपर उचलला व ते घरात येऊन सोफ्यावर बसले. वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावरील एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं – “कर्वे उद्यानात आढळला एका युवकाचा मृतदेह. रोज कर्वे उद्यानात जॉगिंग साठी जाणाऱ्या डॉक्टर शिंदेंना जॉगिंग ट्रॅकजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे अठरा ते वीस वर्षे असावे. पोलिसांच्या अहवालानुसार मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे.”
जोशींकाकांनी बातमी नेहमीप्रमाणे काकूंना वाचून दाखवली व ते बोलू लागले, “काय आजची पिढी. हे काय वय आहे का हृदयविकाराने मरायचं. खावा, अजून पिझ्झा, बर्गर खावा. दिवसभर मोबाईलवर बोलायचं, रात्री जागरण करायचं, कसलं ताळ तंत्रच नाही या मुलांना.” जोशींकाकांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “हु. माहितीये तुम्ही किती फिट आहात ते. भाजी संपली आहे. जरा बाजूच्या दुकानात जाऊन भाजी घेऊन या. आणि कांदे जरा बघून आणा. मागच्या वेळी त्याने फार जून कांदे दिले होते.” जोशींकाकूंनी नेहमी प्रमाणे काकांची बोलतीच बंद केली व काका हातात पिशवी घेऊन निघाले.

X X X X X X X X X X X X X X X X X X X X X X X X X

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED