आला श्रावण मनभावन भाग ७
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते.
कथा अशी आहे
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले.
त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले.
त्यामुळे त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले.
ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे.
एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली.
तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले.
ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले.
त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले.
त्यांनी धनंजयांला रोज अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले .
त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला.
पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले.
प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये ‘ अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू‘ (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे. हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने असल्याला प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत.
ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे.
काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्र्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो.
श्रावणातीलच नव्हे, तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्र्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली. ह्याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तीन दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते.
वृक्ष आपले मित्र आहेत. वड-पिंपळ ह्यांची काष्ठे आपल्या धार्मिक कार्यात आवश्यक मानली गेली आहेत. म्हणून अश्र्वत्थ पूजेचा अंतर्भाव आपल्या धार्मिक व्रत विधींमध्ये केला गेला. मात्र केवळ पूजा करून वा प्रदक्षिणा घालून तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. हे ओळखून ह्या वृक्षांचे रोपण करून, त्यांना वाढवून त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ह्या वृक्षांची जोपासना व्हावी म्हणून आपल्या पूर्वजांनी पिंपळाची मुंज आणि त्याचे तुळशीशी लग्न लावण्याचे दोन विधीही ह्या धर्मकार्यामध्ये अंतर्भूत केले आहेत.
नृसिंह पूजन
भक्त प्रल्हाद आणि नरसिंह याची कथा अशी आहे .
हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता.
हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही.
त्यामुळे राजाला अहंकार झाला. ‘देवांपेक्षा मीच मोठा’, असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. ‘नारायण नारायण’ असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई.
काही दिवस उलटले. राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली.
प्रल्हाद ‘नारायण नारायण’ असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. ‘आता याला कोण वाचवतो’, हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला.
चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला.
राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ”बोल, कुठे आहे तुझा देव ?” प्रल्हादाने सांगितले, ”सगळीकडे आहे .” राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ”दाखव तुझा देव या खांबात.” तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला.
माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.
श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे.
त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे.
त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी फुले (ती न मिळाल्यास पिवळी फुले) वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी.
पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवावा.
प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला.
त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा करतात.
दुष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार होता .
क्रमशः