सावर रे...! Ishwar Trimbak Agam द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावर रे...!

सावर रे ...!
आतातरी बदलायला हवं..!

काल पेपरमध्ये एक बातमी वाचली, इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या. दररोज पेपर मध्ये आपण हे वाचत असतोच. पण, जेव्हा अशी घटना आपल्या जवळ, आसपास घडते तेव्हा त्यातलं गांभीर्य आपल्याला कळतं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मनात विचार येतो, नवरा बायकोची भांडणं. दर वेळी आत्महत्येचं कारण हेच असेल, नाही सांगता येत. कर्ज किंवा पैशांचा प्रोब्लेम हे ही असू शकतं किंवा आणखी काहीही कारणं असू शकतात. कारणं काही का असेना, पण त्यावर आत्महत्त्या हे सोल्युशन नाही असू शकत.

दोघेही सुशिक्षित कमवते. एखादं दुसरी मुलं असे आंनदी कुटुंब. आपल्या गावापासून, शहरापासून कोसो दूर येऊन नौकरी करत असतं. आईबाप दोघेही कामावर, मुलं शाळेत किंवा डे केयर ला. भांडी, स्वच्छता आणि स्वयंपाकासाठी बाई. घरी दमून भागून आल्यावर जेवण बनवले तर ठीक नाहीतर हॉटेल आहेच. आज काल सर्रास सगळीकडे अशीच कुटुंब पाहायला मिळतात. घरी चर्चा किंवा काही बोलायचे असेल तर फक्त दोघेच, वडीलधारी माणसं नाहीतच. मग, नको ते निर्णय घेतले जातात. अनुभवी माणसांशी चर्चा होतंच नाही. बऱ्याच वेळी नवरा-बायकोचे वाद होतात. वाद विकोपाला जातात. अन मग टोकाचे निर्णय. त्यातून मग पूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा प्रकरण डायवोर्स पर्यंत जाते तर कधी आत्महत्येला कारणीभूत होतं. आपल्या मुलांवर संस्कार करायचं दूर राहिलं, दोघांना एकमेकांच्या इगोचं पडलेलं असतं. आजकाल संवाद तरी कुठे राहिलाय...! ते हातातलं इलेक्ट्रॉनिक खेळणंच आपलं विश्व झालंय. त्यामुळे संवादच हरवत चाललाय. आपलं दुःख, आपल्या समस्या, प्रश्न आपण मित्रांशी, आपल्या जवळच्या माणसांशी शेयर करायचं विसरून गेलोय. मनातल्या मनात त्यांचं ओझं घेऊन वाहत असतो. कुढत असतो. हे कुठंतरी मोकळं झालं पाहिजे. त्याचा निचरा झाला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये वडीलधारी माणसं हवीतच हवी. बोलणं होतं. संवाद होतो. चर्चा होतात. यातूनच बऱ्याच वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. त्यांच्या धाकात नवरा बायको यांच्यातील वाद विवाद, भांडणं यांवर एक प्रकारची मर्यादा येते. वाद विकोपाला जात नाहीत. घरात मोठी माणसं असल्यामुळे, घरात शांततेचं वातावरण असतं, भांडणांवर मर्यादा येतात, चर्चेतून मार्ग निघतात आणि प्रश्न सुटतातही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात. वाडिधाऱ्यांशी चर्चा केल्याने त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होतो. आपण पैशांच्या कितीही अडचणीतून जात का असेना, पण हीच माणसं आपल्याला आधार देतात. पाठबळ देतात. टोकाच्या निर्णयांपासून आपल्याला परावृत्त करतात. आपल्या मुलांशी खेळा, त्यांना मैदानावर, बागेत घेऊन जा, त्यांच्याशी बोला. तुम्हीच जर मोबाईल नाही वापरला तर मुलं कशाला मोबाईलचा हट्ट करतील.

रागाच्या भरात मेंदू काम देत नाही तेव्हा नको ते विचार मनात येतात आणि नको ते होऊन बसतं. आणि एकदा झालं की पुन्हा पश्चात्ताप करण्यात काहीही अर्थ नसतो. घटना घडून गेलेली असते. रिवर्स गियर पुन्हा नसतो. जेव्हा जेव्हा राग येईल आणि काहीतरी करायला आपण सरसावू, तेव्हा तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रागाच्या भरात एखादी गोष्ट करताना, स्वतःला म्हणा, "आत्ता नको यार. उद्या करू."
थोडंस मनाला समजवायचं की, हेआज नको करायला. पण उद्या नक्की करू.
रागाच्या त्या प्रसंगी काहीही करण्यापेक्षा मंदिरात जाऊन बसा. बागेत जाऊन बसा. एखादं पुस्तक समोर धरून बसा. डोळे मिटून शांत खुर्चीवर बसा. एखादा मंत्र म्हणा. आवडतं गाणं म्हणा. आकडे म्हणा. देव्हाऱ्या समोर जाऊन बसा, बाहेर कुठेतरी शांत ठिकाणी निघून जा. तेवढी वेळ मारून न्या. तो जो वेळ असतो ना तेवढा फक्त मॅनेज करा. काहीही करण्या अगोदर या गोष्टी नक्की करा. उद्याचा दिवस जेव्हा उजडेल ना, तेव्हा तुम्ही स्वतःवरच हसाल. की यार, च्यायला किती क्षुल्लक गोष्ट होती कालची आपण उगाच त्याचा बाऊ केला. उगाच राईचा पर्वत केला.
मन पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागेल, हे नक्की. उगाच आपली मोठी माणसं आपल्याला शांत राहण्यासाठी नाही सांगत.

रागाच्या भरात आत्महत्या करणे म्हणजे काही आपल्या समस्यांवरील उपाय नाही. कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या. संकटे येऊ द्या. पैशांची कितीही कमतरता असू द्या. कर्ज असू द्या. काही काळ लोटू द्या. संयम बाळगा. संकट येतात की, मोठं मोठी संकटं येतात. संकटे, अडचणी, प्रश्न यांच्याशिवाय तर जीवन नाही. संकटे आली नसती तर त्यावर मात करून यश संपादन करता आलं नसतं. अडचणी नसत्या तर मार्ग निघाले नसते. आणि प्रश्नच पडत नसते तर उत्तर मिळाली नसती. पण मग त्यावर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. जिवा पेक्षा संकट मोठं नाही, पैसा मोठा नाही. एक वर्षे दोन वर्षे तीन वर्षे जरा कष्टाची, हालाखीची जातील. पण येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच सुधारणा होईल. व्यायाम करा, चाला, पळा, योगा करा, चांगली पुस्तके वाचा, आरोग्य सांभाळा. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी घाई करू नका. सगळ्याच गोष्टी पटापट नाहीत होत. जिद्द कायम मनात असली पाहिजे. काहीही झालं, कितीही संकटं आली, पैशांचा प्रॉब्लेम आला तरी मी त्याचा सामना करिन. हा आत्मविश्वास असायला हवा.

इतिहासातील एक छोटंसं उदाहरण. जेव्हा अफजल खान तीस हजारांची फौज, शेकडो हत्ती, उंट, तोफा घेऊन स्वराज्यावर संकट म्हणून उभा ठाकला होता. स्वराज्य बुडवायला निघाला होता. तेव्हा शिवाजी महाराजांकडे किती सेना होती? अगदी दहा हजारही खूप झाली. त्यातली बरीचशी तर किल्ल्यावरच असायची. मग एव्हढ्या फौजेनिशी त्यांनी खानाचा सामना केलाच ना! की पळून गेले? की आत्महत्या केली! नाही ना! जिजाऊ माँसाहेब होत्याच ना त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या! प्रेरणा द्यायला! उभारी द्यायला!

राजे म्हणतात,
"जिथे विजय शक्य नाही, तिथे काही काळापुरती माघार घ्या. जीव वाचवा."

सर सलामत तो पगडी पचास.

पुन्हा कष्ट करा, मेहनत करा. नवी उमेद, नवी जिद्द आणि आत्मविश्वास असू द्या. जेव्हा मिर्झा राजा लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यात धुमाकूळ घालत होता, जाळपोळ करत होता, गावेच्या गावे उध्वस्त करत होता. राजांनी त्याच्याशी लढा दिलाच की. निकराने लढा दिला. पण नंतर जेव्हा राजांना कळलं कि , यांच्याशी जर लढलो तर जनता आणि आपणही नष्ट होऊन जाऊ. मग या निरर्थक लढण्याचा काहीच उपयोग होणार नाही. पैश्याचा अपव्यय, जनतेची लूट आणि सैन्याचा बळी. स्वराज्य आणि सामान्य जनतेला वाचवायचे असेल, तर ही लढाई सामंजस्यपणाने घेतली पाहिजे. तेव्हा त्यांनी माघार घेतलीच ना! स्वराज्यातील जवळ जवळ वीस बावीस किल्ले मुघलांना द्यावे लागले. बराचसा प्रदेश मुघलांच्या ताब्यात गेला. संधी करावी लागली. पण स्वराज्य जिवंत ठेवलं. ती ठिणगी विझू दिली नाही. मग पुन्हा फिरून संघर्ष केला, शत्रूंवर मात केलीच ना! ते थांबले नाहीत की "Quite" केलं नाही. काही काळ जाऊ दिला, कष्ट केले, मेहनत घेतली, मोठी फौज उभी केली. अन मग सह्याद्रीच्या माथ्यावर रायगड ही राजधानी आणि बत्तीस मण सोन्याचं सुवर्णसिंहासन उभं राहिलं.

अहो हा सह्याद्री आपल्यासाठी अजूनही उभा आहे. हे सह्याद्रीचे औतप्रोत भरून वाहणारे निसर्ग सौंदर्य, उंचच उंच शिखरे, भरभरून वाहणाऱ्या नद्या, झुळझुळणारे शांत शीतल झरे, आणि हिरवा शालू ल्यायलेली झाडे, वेली, फुले, पाने आपलं स्वागत करण्यासाठी सदा सर्वकाळ तयार आहेत. जेव्हा जेव्हा मन निराश होईल. आत्महत्येचे विचार मनात डोकावतील. तेव्हा तेव्हा या सह्याद्रीच्या कुशीत या. गगनाला भिडलेल्या शिखरांकडे बघा. जिद्द काय असते..! लढा काय असतो..! बलिदान काय असतं..! आणि आत्मविश्वास काय असतो..! ते कळेल. शांत वाहणाऱ्या नद्या, झरे पहा. शांतता, निर्मलता, संयम काय असतो? ते कळेल. आणि हा विलोभनीय हिरवा निसर्ग...! उत्साहं आणि पवित्रता काय असते? हे कळेल. या सह्याद्रीच्या पोटामध्ये असे कित्येक गड कोट अजूनही ताट मानेनं उभे आहेत. शतकानुशतके ऊन वारा पाऊस आणि निसर्गाशी झुंजत. प्रत्येक बुरुंज, प्रत्येक दरवाजा काहींना काही सांगत. तुम्हाला झुंजायची उर्मी, प्रेरणा आणि बळ देत. गडाचा दगड न दगड तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकवून जाईल. कधीतरी वेळ काढा. गड कोटांवर जाऊन निवांत फिरा. बसा. ती सह्याद्रीची शांतता, अभेद्यता, भव्यता अनुभवा. हे गड कोट आपल्याला सतत आत्मविश्वास आणि प्रेरणा देत असतात. मनाला उभारी देत असतात. नवी उमेद आणि जिद्द निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!

शेवटी एकच सांगावंसं वाटतं, जे जे महान लोक या भारत भूमीमध्ये होऊन गेले. त्यांचं चरित्र जरूर वाचा. आणि वाचलंच पाहिजे. वाचाल तर वाचाल. अहो, आत्महत्येचा विचारही तुम्हाला शिवणार नाही. हि १०० % ग्यारंटी.

|| जय शिवराय ||

- धन्यवाद
- ईश्वर त्रिंबकराव आगम (९७६६९६४३९८)
- (वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.)