Swarajay Rakshak sambhaji books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्य रक्षक संभाजी - समीक्षा, अनुभव, आभार

।। स्वराज्य रक्षक संभाजी ।।

दिनांक २४ सप्टेंबर २०१७, छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर चालू झालेली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका काल(२९ फेब्रुवारी २०२०) संपली. याच दिवसाच्या आसपास येसूबाई महाराणी साहेब मुघलांच्या कैदेतून तब्बल तीस वर्षांनी स्वराज्यात दाखल झाल्या. (२८ फेब १७१९.) ज्यांनी ज्यांनी पहिल्यापासून मालिका पाहिली आहे, नक्कीच असा एकही माणूस नसेल की जो कालचा भाग पाहिल्यावर रडला नसेल किंवा डोळ्यांत पाणी आले नसेल!

संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात शेवटपर्यंत पाहिलेली माझ्यामते ही एकमेव मालिका असेल. ते कार्टून पोगो सोडून चिल्लीपिल्लीच काय! पण सत्तर ऐंशी वर्षांचे आजोबाही एकत्र बसून मालिका पाहत होते. लहान मुलांना खेळणी सोडून ढाल तलवारीचं वेड लावलं या मालिकेनं. लहान मुलं त्या छोटा भीमला विसरून शंभूबाळाची चाहती झाली. मालिकेचे शिर्षक गीत लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात घोळू लागलं. पुन्हा एकदा जिजाऊ माँसाहेबांचा करारी बाणा, छ. शिवरायांची जिद्द, स्वराज्याविषयीची तळमळ, मावळ्यांची स्वराज्य निष्ठा, शंभूराजांचा धीरोदात्तपणा, पराक्रम, बलिदान आणि महाराणी येसूबाईसाहेब यांची खंबीर साथ या मालिकेनं मराठी जनतेला दाखवलं, शिकवलं. पुन्हा एकदा आपल्या मातीचा इतिहास जिवंत केला आणि आपल्याला पाहण्याचं भाग्य लाभलं. अमोल कोल्हे आणि सर्व टीम ने संभाजी महाराजांचा इतिहास छोट्या पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य उचलले आणि यशस्वीपणे पूर्ण केले.

इतिहासातील काही प्रसंग त्याविषयी खुद्द इतिहासही अनभिज्ञ आहे. मालिकेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे हाताळले गेले आहेत. जसे की, भूपाळगड संग्रामावेळी खरेच ७०० मावळ्यांचे हात पाय कलम केले होते की अफवा पसरवली होती? तसेच पन्हाळ्यावर शिवराय आणि शंभूराजे यांची भेट. खरेच दिलेर खानाला शंभूराजे जाऊन कसे मिळाले? की यामागे शिवराय आणि शंभूराजे यांची काही धाडसी योजना होती? शिवरायांच्या मृत्यूनंतर पुतळाबाई सती गेल्या, असे काही इतिहासकार म्हणतात. मालिकेमध्ये हा प्रसंग अगदी यथायोग्य असा हाताळला आहे. गणोजी शिर्के यांच्यावर फितुरीचा आरोप कसा झाला, ते खरेच फितूर होते का? हे प्रेक्षकांवर सोपवलं. मालिकेतील बरेच प्रसंग कंटाळवाणे झाले, तर काही प्रसंग ओढून ताणून मोठे करण्यात आले. असो! पण असे अनेक प्रसंग आहेत की जे खरंच अप्रतिम झालेत. जसे की, स्वराज्याच्या वाटणी वेळी शिवरायांची आणि सोयराबाईंची बातचीत. पन्हाळ्यावर पितापुत्रांची भेट तर अक्षरशःडोळ्यांत पाणी आणते. त्यानंतर पुतळामतोश्रींचा सती जाण्याचा प्रसंग, जंजिऱ्याच्या मोहिमेत कोंडाजी फर्जंद यांचे शीर शंभुराजांना मिळाले तो प्रसंग. हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक यांच्या निधनाचे प्रसंग. अक्षरशःरडवलं या लोकांनी त्यांच्या अभिनयाने. त्याविषयी लिहावं आणि बोलावं तेवढं कमीच आहे.

भूमिकांविषयी बोलायचं म्हटलं तर शब्दच अपुरे पडतील अशा तोलामोलाचं काम सर्वच कलाकारांनी साकारलं आहे. अक्षरशः कलाकार एक एक पात्र जगले आहेत आणि आपल्यासाठी पडद्यावर जिवंत केली आहेत.

प्रतीक्षा लोणकर यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. राहून राहून मृणाल कुलकर्णी त्या भूमिकेत आठवतात पण प्रतीक्षा मॅडमने खरंच त्यांच्या अभिनयाने स्वतःची वेगळी छाप सोडली. छ. शिवाजी महाराजांची भूमिका करणारे शंतनू मोघे तर अप्रतिम, त्यांची देहबोली आणि संवादफेक लाजवाब. काही काही प्रसंगांमध्ये त्यांनी घोगऱ्या आवाजात बोललेले डायलॉग्ज खरंच काळजाचा ठाव घेतात. असं वाटायचं की, खरचं शिवरायच त्यांच्या तोंडून आपल्याशी बोलतायत की काय! महाराणी सोयराबाई साहेब यांची भूमिका स्नेहलता वसईकर यांनी सुद्दा जबरदस्त रंगवली आहे. आपल्या मुलासाठी त्यांची काळजी, सावत्र मुलाविषयी इतरांनी निर्माण केलेली असूया, राग, द्वेष, माया आशा कितीतरी रंगछटा त्यांनी लीलया साकारल्या आहेत. खरंच, मला त्यांची भूमिका अगदी समर्पक वाटली. पुतळाबाई मातोश्री यांची भूमिका पल्लवी वैद्य यांनी योग्य न्याय दिला आहे. शंभुराजांप्रति असलेली ममता, माया, हळवेपणा, काळजी त्यांनी उत्तम साकारली आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर सती जाण्याचा प्रसंग तर अक्षरशः डोळयांत पाणी आणतो. रानुआक्का यांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडे साजिऱ्या दिसतात. आपल्या भावाच्या पाठीशी शेवटपर्यंत उभ्या राहणाऱ्या, भावाला खंबीर साथ देणाऱ्या, प्रसंगी रागे भरणाऱ्या रानुआक्का कायम लक्षात राहतात.

विशेष कौतुक करावे ते अण्णाजी दत्तो यांची भूमिका साकारणारे महेश कोकाटे यांचं. शंभूराजांविषयी असलेली चीड, राग, द्वेष, मत्सर त्यांनी त्यांच्या देहबोलीतून अक्षरशः जिवंत केला आहे. त्यांची बोलायची लकब, चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांतील भावना खरंच प्रेक्षकांना त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण करतो. हेच तर त्यांच्या यशाचं फलित. त्यांच्या यशाची आणि कामाची पावती.

प्राजक्ता गायकवाड यांनी महाराणी येसूबाई यांची भूमिका ताकतीने रंगवली आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी किती कष्ट घेतले असतील ते त्याच जाणोत! प्रत्येक प्रसंगातील त्यांची काळजी, हळवेपणा, कणखरपणा, दुःख त्या अक्षरशः जगल्या आहेत. शिवरायांना त्याकाळी परिस्थितीनुसार आठ लग्न करावी लागली. संभाजी राजांनाही करता आली असती. शंभूराजे आपल्या पत्नीवर किती प्रेम करत होते, हेच यावरून सिद्ध होतं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची अत्यंत क्रूर आणि निर्घृण हत्या झाल्यावर धीरोदात्त भूमिका घेणाऱ्या येसूबाई अप्रतिम. आपल्या माहेरच्या लोकांवर असलेला फितुरीच्या ठपका, पाठीशी लहान मुलगा आणि त्यातच स्वराज्याच्या छत्रपतींची आपल्या पतीची झालेली निर्घृण हत्या! याउपर आभाळ कोसळणं आणि धरणी दुभंगण काय मोठं? दुसरे कुणी असते तर शोक करत दिवस कंठत बसलं असतं. पण त्यांनी अश्रू गाळत बसण्याऐवजी म्यानातून तलवार उपसली आणि जयघोष केला, "हर हर महादेव". हा शेवटचा भाग आणि मालिका इथंच संपली!

अमोल कोल्हे यांनी सर्वच स्तरावर काम करताना स्वतःला अगदी झोकून दिलेलं आहे. त्यांचे संवादफेक, हावभाव, बोलणं, वागणं, कितीतरी गोष्टी त्यांनी समरसून केलेल्या आहेत. खरेच शंभूराजे अंगा अंगात भिनले आहेत त्यांच्या. त्यांचे कष्ट, जिद्द आणि मेहनत याला सलाम! तुमच्यामुळे शंभुराजांचा वादातील (किंवा चुकीचा, खोटा लिहिला गेलेला) इतिहास सत्याची बाजू मांडत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवला. मालिकेतील काही प्रसंगांवरून आरोप प्रत्यारोप झाले, आर्थिक संकटे आली. मधेच खासदारकीचे इलेक्शन, तेव्हा तर आरोपांची खैरातच झाली. तरीही अमोल कोल्हे डगमगले नाहीत, कि माघार घेतली नाही. त्यावर मात करत मालिका पूर्ण करणे हेच ध्येय त्यांनी ठेवले. प्रसंगी त्यांनी पुण्यातले नवीन घर विकले तर कधी संभाजीराजांवर विविध शहरांत जाऊन आठवडा दोन आठवडे सलग रंगमंचावर नाटकं केली. पैसा उभा केला. काम करत राहिले. आपलं सर्वस्व त्यांनी या मालिकेसाठी वाहिलं. त्यांचं करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे किंबहुना शब्द अपुरे पडतील.

एक सांगावसं वाटतं, की ही फक्त मालिका नव्हती तर सर्व मराठी जनतेच्या हृदयात शंभूराजांच्या बलिदानाचा, पराक्रमाचा आणि शौर्याचा खरा इतिहास मांडणारी गाथा होती. शंभुराजांबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन होता. त्याला या मालिकेने खऱ्या अर्थानं पूर्णपणे बदलवून टाकलं. राजांच्या व्यक्तिमत्वाला, कर्तुत्वाला न्याय दिला. लोकांना शंभूराजांचा खरा इतिहास सांगितला, स्वतः वाचायला आणि माहिती करून घ्यायला भाग पाडले. तुमचे हे उपकार मराठी माणूस कधीही विसरणार नाही!

खरंच आपण भाग्यवान आहोत, की या मातीमध्ये आपण जन्मलो. ज्या मातीच्या रक्षणासाठी शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं. ज्यासाठी हर एक मावळ्याने आपलं रक्त सांडलं.

या मातीसाठी रक्त सांडलेल्या हर एक मावळ्याला आणि शंभूराजांच्या बलिदानाला माझा शतशः मुजरा !

डॉ अमोल कोल्हे सर आणि संपूर्ण कलावंतांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि शतशः आभार!

तुमच्या टीमच्या अतुलनीय कामगिरीला आणि अथक परिश्रमांना आमचा मनाचा मुजरा!

ईश्वर त्रिंबकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.
९१ ९७६६९६४३९८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED