Corona books and stories free download online pdf in Marathi

कोरोना - दुर्लक्ष नको सावधानता बाळगा...

*कोरोनागाचा विळखा*
*विनोद नाही गंभीरपणे घ्या!*

नमस्कार मित्रांनो,

सध्या सगळीकडे एकाच विषयावर चर्चा चालू आहे. तो म्हणजे कोरोना! सर्व स्थरातून या आजाराविषयी भरपूर माहिती आपल्याला सोशल नेटवर्किंग साईट्स मधून मिळालेली आहे. या विषाणू पासून आपले संरक्षण कसे करायचे? काय काय काळजी घ्यायची? नक्की हा विषाणू कसे काम करतो? याची नेमकी लक्षणे काय आहेत? अशी भरपूर माहिती आपल्याला आजतागायत मिळालेली आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या या विषाणूने जवळजवळ सगळं जग आपल्या कवेत घ्यायला सुरूवात केलेली आहे. सध्या, चीनमध्ये कोरोना सहाव्या फेज मध्ये आहे. इटली, इराण, फ्रान्स, स्पेन या देशांमध्ये चौथ्या फेज मध्ये आहे. तर भारतात तिसऱ्या फेजमध्ये पदार्पण करतोय.

१. पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती देशात आलेल्या असतात. नक्की याच विषाणूमुळे लागण झालेली आहे, हे निश्चित झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होतात. या वेळी रुग्णांची संख्या दोन तीन किंवा पाच च्या आसपास असते.
२. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे रुग्ण देशात आल्यानन्तर त्यांच्यावर उपचार करण्याआधी ते ज्यांच्या संपर्कात आलेले असतात, ते म्हणजे त्यांचे कुटुंब, शेजारी आणि मित्र किंवा सहकारी यांना त्याचे संक्रमण झालेले असते. आता विषाणूची लागण झालेली संख्या वाढून पंचवीस तीसच्या घरात गेलेली असते.
३. आता हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. स्थानिक लोकांकडून इतरांना या विषाणूची लागण व्हायला सुरुवात होते. ज्यामध्ये हा विषाणू वेगाने पसरायला सुरुवात झालेली असते.
४. या टप्प्यामध्ये विषाणूची लागण महाभयंकर साथीमध्ये झालेली असते. हजारोंच्या संख्येने लोकांना याची लागण व्हायला सुरुवात झालेली असते. आणि लोकांचे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले असते.
५. सध्या इटली पाचव्या टप्प्यात आहेत तर
६. चीन सहाव्या टप्प्यात.

कोरोना हा विषाणू इटलीमध्ये कसा काय एवढा पसरला? या मागची मुख्य कारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, प्रशासनाचे आणि नागरिकांचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरलेले आहेत. इटलीमध्ये जेव्हा या विषाणूची लागण चौथ्या टप्प्यात पोहोचली तेव्हा सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. इराण मध्येही सेम कंडिशन. सुरुवातीला जेव्हा विषाणूची लागण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होती, तरीही लोकांनी याला गंभीरपणे घेतले नाही. आपले दैनंदिन कामकाज चालूच ठेवले. फिरायला जाणे, हॉटेलिंग, समारंभ चालूच होते. पण जेव्हा चौथ्या टप्प्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना हजारोंच्या संख्येने संसर्ग झाला. लोकं शेकडोंच्या संख्येनं मरायला लागले तेव्हा कुठं सरकारने सक्तीने निर्बंध घालायला सुरुवात केली. रुग्णांची संख्याच एवढी होती की, त्यांना दवाखाने कमी पडू लागले. उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता भासू लागली. मग नवीन आलेल्या रुग्णांवर उपचार करायचा की जे खूपच गंभीर स्थितीत आहेत किंवा लास्ट स्टेज वर आहेत त्यांच्यावर उपचार करायचे. हे ठरवण्याची वेळ तिथल्या डॉक्टरांवर , सरकारवर आली. आणि त्यामुळेच मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय.

सध्या चीनने परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणली आहे. पूर्ण बंद म्हणजे बंद. सर्व दळणवळण स्थगित, सर्व दुकाने, मॉल्स, समारंभ बंद, आणि लोकांना बाहेर पडायला सुद्धा बंदी घातली आहे. सर्व शहरात आणि गावांमध्ये युद्धपातळीवर निर्जंतुकीकरण चालू आहे. तेव्हा कुठं त्यांना हे आटोक्यात ठेवायला शक्य झालं आहे.

मित्रांनो, वेळीच सावध व्हा! जर अजूनही हा विषय गमतीने घेत असाल! अजूनही गंभीर झालेला नसाल! विनाकारण बाहेर मित्रांबरोबर फिरायला जात असाल! हॉटेलला जात असाल! तर वेळीच थांबवा! असा विचार करत असाल की, आपल्याला काय होतंय? आपण धट्टेकट्टे आहोत, आणि काहीही सिरीयस नाहीये हा काय साधा फ्लू तर आहे ! तर वेळीच सावध व्हा आणि सतर्क राहा मित्रांनो!

ट्विटर वर एका इटलीतील नागरिकाचा तेथील परिस्थितीचा अनुभव खूप भयंकर आणि आपल्याला विचार करायला लावणारा आहे. त्याला आलेला अनुभव थोडक्यात सांगतो.

सध्या, इटली, स्पेन, इराण, फ्रांस या देशांमध्ये या विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. खूप लोकं दगावली आहेत आणि रोज दगावत आहेत. पूर्णपणे कर्फ्यु लागलेला आहे. परिस्थिती भयानक आणि गंभीर आहे. तरीही, इतर देशांतील लोकांना याचे गांभीर्य अजूनही आलेलं नाहीये, त्यांना असं वाटतंय की आपल्या सोबत हे घडणारच नाही.

आठवडा पहिला-
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवातीला कोरोनाची लागण झालेले फक्त ४ रुग्ण होते. लोकांची दैनंदिन काम, दळणवळण, शाळा सगळं चालू होतं. हा काय साधारण फ्लू आहे म्हणून लोकांनी दुर्लक्ष करून आपलं नेहमीचं जीवन चालू ठेवलं होतं. आठवड्याच्या शेवटी संख्या १०००च्या जवळपास जाऊन पोहोचली होती.

दुसऱ्या आठवड्यात-
म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला ही संख्या वाढून १५०० च्या पुढे गेली. बरेचसे लोक असा विचार करत होती की, आत्ता एवढेच लोक आहेत ना! मी तर त्यातला नाहीये. जास्त ओव्हररिएक्ट व्हायची गरज नाहीये. मास्क वगैरे घालायची गरज नाहीये, मी ठणठणीत आहे. मला काही करायची गरज नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या दुप्पट तिप्पट वाढत होती. ज्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या जास्त होती, त्यांमध्ये रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले. ठिकठिकाणी कर्फ्यु लावण्यात आला. बाहेरच्या शहरातील लोकांना असे वाटत होते की, हे खूप दुःखद आहे आणि शहरातले प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. आपण चिंता करण्याचं कारण नाही. शाळा, कॉलेज, कार्यालये, हॉटेल्स, मॉल्स अजूनही चालू होती. आठवड्याच्या शेवटी रुग्णांची संख्या ५००० च्या वर गेली तर ३००च्या वर लोकं दगावली सुद्धा. जी दगावली ती वृद्ध होती, आधीच आजारी होती. मीडिया टिआरपी साठी पळापळ करतायत, असं लोकांना वाटत होतं. अजूनही बरेचसे लोक आपलं दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे जगत होते. काही लोक बाहेर फिरायला, हॉटेलला जात होते.

आठवडा तिसरा -
म्हणजेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. मृत्यूचं प्रमाण वाढू लागलं होतं. चार शहरांमध्ये बंद जाहीर केला गेला. शाळा, महाविद्यालये बंद केली गेली. पण बार, हॉटेल्स आणि कार्यालये अजूनही चालू होती. बरेचसे आपलं नेहमीच काम करत होते, त्यांना अजूनही परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं नव्हतं. सगळीकडे वारंवार हात धुण्यासाठी आणि बाहेर न पडण्याची खबरदारी घेण्याबद्दल सांगण्यात येतंय. तरीही लोकांनी एवढं मनावर घेतलं नाही. या आठवड्यात मात्र लागण झालेली संख्या भयंकर होती. स्कुल, कॉलेजेस एक महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सोई साठी पावलं उचलायला सुरुवात झाली होती. हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली. आता डॉक्टर्स, नर्सची कमतरता भासू लागली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नवख्या लोकांना आता बोलावण्यात येऊ लागलं. डॉक्टर्स, नर्स यांनाही बाधा होऊ लागली आणि पर्यायानं त्यांच्या जवळच्या लोकांनाही. निमोनियाचे पेशंट वाढू लागले होते, आयसीयु अपुरे पडू लागले. हॉस्पिटलमध्ये पुरेशा जागा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णही दगावू लागले. आता कुणाला जगवयाचं आणि कुणावर उपचार करायचा हे डॉक्टरांना ठरवावं लागत होतं. जे वृद्ध आहेत, आधीच आजाराने ग्रस्त असून आता स्थिती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार बंद केले गेले. सगळ्यांसाठी पुरेशी औषधे आणि साधने यांच्या उपलब्धतेचा तुडवडा जाणवू लागला. काही रुग्णांना तर तसंच मरू देण्यात आलं. काहींना तर फक्त ऑक्सिजन देण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. ज्यांनी ज्यांनी घाईघाईने शहरे सोडली होती. त्याठिकाणी सुद्धा साथ पसरू लागली होती. जवळजवळ पूर्ण देशात विषाणू पसरला होता. इटली सरकारने पूर्ण देश बंद करण्याचे जाहीर केले. सरकारने आता एकाच उद्दिष्ट ठेवलं होतं, शक्य तेवढं विषाणूचा प्रसार रोखण्याचा. अर्थव्यवस्था बंद पडेल या कारणास्तव, लोकांना कामाला जाऊ दिलं जात होतं. किराणा, मेडिकल्स आणि व्यवसायही चालू ठेवले होते. पण विनाकारण बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला होता. बरीचशी लोकं जेव्हा मास्क आणि संसर्गरोधक कपडे घालून फिरताना दिसू लागली तेव्हा लोकांना भीती वाढू लागली. तरीही अशी काही लोकं होती की, जी अजूनही स्वतःला शहाणी समजत होती. आपल्याला काय होतंय असं समजत होती. आणि नजर चुकवून बाहेर फिरत होती, हॉटेल्स ला जात होती.

आठवड्याच्या शेवटी शेवटी विषाणूची लागण झालेली रुग्ण संख्या १५००० च्या वर पोहोचली होती तर मृतांचा आकडा १०००च्या वर पोहोचला होता. सर्व व्यवसाय, हॉटेल्स, बार, शॉपिंग सेंटर, मॉल्स बंद करण्याचे निर्णय घेण्यात आले. बाहेर फिरण्यासाठी, जाण्यासाठी सरकारी कागदपत्र असल्याशिवाय जाणं बंधनकारक केलं गेलं. सगळीकडे पोलीस तैनात केले गेले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला जबरदस्त दंड आकारण्यात येऊ लागला. प्रत्येक दिवसाला हजारोंच्या संख्येने लोकांना विषाणूची बाधा होत होती तर शेकडो लोक मृत्युमुखी पडत होती. ही स्थिती तिसरा आठवडा संपेपर्यंत होती.

विचार करा, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला ४ वरून ही संख्या महिन्याच्या शेवटी १००० वर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ५००० च्या वर तर तिसऱ्या आठवड्यात २०००० च्या घरात गेली. तर जवळजवळ १५०० च्या वर रुग्ण दगावले. आजपर्यंत हा आकडा बाधित रुग्ण ३०००० च्या वर तर मृत्यू २५०० च्यावर गेला आहे.

मित्रांनो, विनोदाचा भाग बाजूला ठेवा आणि गंभीरपणे विचार करा. हा आणि पुढचा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपण योग्य ती काळजी घेतली आणि या आठवड्यात कोरोनाचा प्रसार थांबवू शकलो तर नक्कीच या विषाणूवर मात करू शकू. पण जर दुर्लक्ष केलं तर मात्र, खूप मोठं संकट निर्माण होऊ शकतं. आणि त्याचा आपल्यालाच त्रास भोगायला लागणार आहे.

ज्याप्रमाणे चीन, इटली, इराण देशातील नागरिकांनी दुर्लक्ष केले त्याचप्रमाणे जर आपण केले तर आपले रुग्ण हजारात नाही तर लाखात असतील. विनाकारण, मला काय होतंय? त्याला काय घाबरायचंय? त्याला काय होतंय? एक दिवसानं काय होतंय? असली फालतुगिरी बंद करा. उगाच हिरोगिरी करायला जाऊ नका! घरात शांत बसा! घरच्यांबरोबर वेळ घालवा! मुलांशी खेळा! पुस्तकं वाचा! चांगले सिनेमे बगा! पण उगाच बाहेर फिरू नका! तुमच्याकडे बघून बाकीचे अनुकरण करतात.

या महिना खूप सावधान आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. शाळा बंद आहेत म्हणून कुठेही फिरायला जाऊ नका. शक्यतो हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका. सुट्ट्या काय, पुढच्या वर्षी आहेतच! पण मुलांच्या आणि वृद्धांच्या आयुष्याशी खेळू नका. लग्न, समारंभ, गाठीभेटी, अन्य कार्यक्रम, पार्ट्या हे सगळं काही दिवस नाही केलं म्हणून काहीही बिघडत नाही.

खरंच काही महत्वाची कामं असतील तर योग्य ती खबरदारी / काळजी घ्या! खबरदारी किंवा काळजी घेणं म्हणजे घाबरून जाणं नव्हे! त्यात आपल्याच कुटुंबाचं आणि पर्यायाने सर्वांच्या फायद्याचं आहे!

सगळीकडे जी स्वच्छतेविषयी जनजागृती चालू आहे, ते आपण लहानपणापासून आपल्या आई-वडील, आजी-आजोबांकडून ऐकत आलेलो आहोत.

बाहेरून घरात यायच्या आधी,
"हात पाय तोंड धुवून ये रे!"

बाहेर जाताना,
"गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको!"
"नाका तोंडाला रुमाल बांधून जा!"
"सारखं नाका तोंडाला हात लावू नको!"

काय वेगळं सांगत होते हो!
आपणच स्वतःला शहाणं समजत आलो, आणि वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलेलं कधी मनावर घेतलंच नाही! पण आता मात्र, खरंच मनावर घ्यायची आणि डोक्यात घालायची वेळ आलेली आहे.

सर्वांना, कळकळीची विनंती!
येणारे काही दिवस काळजी आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सर्वांना जागरूक, सावधान राहायला सांगा आणि एक जबाबदार नागरीक असल्याचं कर्तव्य पार पाडा!

- धन्यवाद
- ईश्वर त्रिंबकराव आगम
- वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.
- ९१ ९७६६९६४३९८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED