Pepilon books and stories free download online pdf in Marathi

पॅपिलॉन - समीक्षा, माहिती, अनुभव

पॅपिलॉन

वरदा प्रकाशनाचे हे पुस्तक.
रवींद्र गुर्जर अनुवादित.
मूळ लेखक हेन्री शॅरिअर.
हा या कादंबरीचा, आत्मवृत्ताचा नायक..

एकाच वाक्यात पुस्तकाचं सारं सांगायचं म्हटलं तर, "प्रबळ आत्मविश्वास, अफाट जिद्द, जबरदस्त इच्छाशक्ती आणि बळकट शरीसंपदा यांच्या जोरावर कोणत्याही कठीण परिस्थितीवर अन कोणत्याही अडचणीवर मात करता येते."

पुस्तकाच्या मागच्या पानावर पुस्तकाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे.
"जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीर संपदा यांच्या जोरावर एक सामान्य माणूस आयुष्यात किती अचाट आणि प्रचंड साहस करू शकतो याची हि कहाणी."

"काही धोकेबाज लोकांच्या आणि भ्रष्ट पोलिसांच्या कारवाईमुळे मनुष्यवधाच्या आरोपांखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. पहिले यशस्वी पलायन केल्यावर रेड इंडियन लोकांसोबत घालवलेले काही सुखद महिने. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघताना झालेल्या क्षुल्लक चुकांमुळे तो आणि त्याचे मित्र पुन्हा पकडले जातात. त्यानंतर पुढचे सहा अयशस्वी प्रयत्न अन शेवटी आठवे यशस्वी पलायन करताना आलेल्या अनुभवांचे चित्रण या पुस्तकामध्ये केलेले आहे."

फ्रेंच मध्ये फुलपाखरू याचा अर्थ होतो पॅपिलॉन. जगण्यासाठी आणि उडण्यासाठी जसे फुलपाखरू आपल्या पंखांची अखंड फडफड करत असते त्याचप्रमाणे मुक्त जीवन जगण्यासाठी अन त्यामुळे सुटकेसाठी केलेली अखंड धडपड म्हणून त्याला हे नाव सार्थक आहे, असे वाटते.

क्षणा क्षणाला उत्कंठा वाढवणारे, रोमांचक आणि अंगावर काटा आणणारे, तर कधी कधी हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग पुस्तकामध्ये भरलेले आहेत. पूर्ण पुस्तकभर आपण पापिलोन सोबत प्रवास करतोय, भोगतोय असे वाटत राहते.

पुस्तकातील लक्षात राहणारे काही प्रसंग -
ज्यूलट, चेतल, मॅच्युरेट, जोन्स हे त्याचे जीवाभावाचे मित्र..
सेंट लोरेंट बेटावर मॅच्युरेट आणि जोन्सशी मैत्री आणि त्यांचे यशस्वी पलायन...
समुद्रावरील ऊन, वारा, पाऊस, वादळ यांच्याशी झगडत केलेली थरारक आणि साहसी सफर...
कोलंबिया मधील रिओ हॅशा तुरुंगामध्ये अंधारकोठडीत रवानगी, तेथील हलाखीची परिस्थिती...
'गोअजीरा' नामक रानटी लोकांच्या वस्तीतील वास्तव्य.
पुन्हा रिओ हॅशा तुरुंगात अंधारकोठडीत रवानगी, तेथील खडतर जीवन तर अंगावर काटा आणणारे..
बारानक्विला तुरुंगातुन पळून जाण्याचे अयशस्वी प्रयत्न...
दोन वर्षांचा एकांतवासाची शिक्षा म्हणून सेंट जोसेफ बेटावर आगमन..
येथील जीवन तर खूपच एकाकी आणि मन सुन्न करणारे..
शिक्षा संपता संपता जोन्सचा मृत्यू...
रॉयल बेटावर पुन्हा पलायनासाठी बोट बनवण्याचा खटाटोप, पण एका विरोधी कैद्याच्या दगाबाजीमुळे पकडले जाणे...
त्या धोकेबाजाची हत्या, पुन्हा आठ वर्षे एकांत तुरुंगवास.. दोन वर्षांत सुटका.
एका मित्राची अज्ञात कैद्याकडून हत्या. समुद्रात टाकताना शार्क मासे त्याच्या मित्राचं शव त्याच्या देखत खाऊन टाकतात. त्याच्यासाठी हा खूपच दुःख प्रसंग होता. खचलेल्या मनस्थितीत त्याची तर जगण्याची इच्छाच मरते.
सहकारी मित्र सिल्व्हेन सह पळण्याचा यशस्वी प्रयत्न...
किनाऱ्या जवळ आला म्हणून मित्र तराफ्यावरून उडी मारतो. पण चुकीमुळे चिखलात फसतो, पपी समोर तो चिखलात बुडून मरून जातो. त्याच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र त्याला वाचवण्यात त्याला अपयश येतं. त्याची हतबलता, दुःख, आपण अनुभवतो.
त्या चिनी बेटावरुन चिनी मित्रांसह एक चांगली बोट मिळवून पुन्हा पलायन...
एका शहरात चार पाच महिने वास्तव्य, तेथेच पहिल्या बेटावरील तुरुंगातून त्याच्या आधी पळालेला मित्र ज्यूलटशी भेट आणि नव्या आयुष्याची सुरुवात.

वाचता वाचता कधी आपण एकरूप होऊन जातो, कळतही नाही. वाचनाची लिंक तुटू न देता आपणास खिळवून ठेवणारे जबरदस्त असे हे पुस्तक आहे.

पॅपिलोन आपल्याला खूप काही शिकवतो.
- कमीत कमी गरजांसह माणसानं कसं जगावं...
- परिस्थिती कितीही प्रतिकूल असो आपली शारीरिक ताकत आणि मानसिक संतुलन कसे जपावे...
- माणसानं आपला आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नये...
- अपयश आले म्हणून खचून न जाता, प्रयत्न करत राहावं...
- प्रतिस्थिती कितीही कठीण असो, कितीही अनंत अडचणी असो! माणसानं नवे नवे मार्ग शोधत राहावं, प्रयत्न करत राहावं...
- जगात अशी कोणतीही अडचण नाही, जी आपण सोडवू शकत नाही. असा कोणताही प्रश्न नाही की, त्यावर उत्तरं नाहीत.
- कोणतेही काम करण्यासाठी परिपूर्ण योजना असावी, तरच हमखास यश मिळू शकेल..
- जर प्लॅन ए फेल झाला तर विसरू नका अजून बी टू झेड अक्षरं (म्हणजेच प्लॅन्स ) बाकी आहेत.
म्हणजेच, मी अजून हरलेलो नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, प्रयत्न करत राहीन..
- आत्महत्या हा काही कोणत्या अडचणींवर / परिस्थितीवर शेवटचा उपाय नाही. किंबहुना आत्महत्या हा काही प्रश्न सोडवण्याचा वा अडचणींपासून मुक्त होण्याचा मार्ग होऊच शकत नाही. कमजोर लोकं हा पर्याय अवलंबतात.
- त्यासाठी आपण नेहमी आपला आत्मविश्वास, जिद्द, शक्ती, सहनशक्ती टिकवून ठेवावी..

जर तुम्ही कधी खचलेले असाल, निराश झालेले असाल, कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, आपल्या कठीण परिस्थीतीशी लढता लढता हतबल झालेला असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उभारी देईल. नवी प्रेरणा देईल. जिद्द निर्माण करेल. तुमच्यात आत्मविश्वास जागृत करेल..

धन्यवाद
चूक भुल माफ असावी.
- ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती..

इतर रसदार पर्याय