तोच चंद्रमा.. - 20 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 20

२०

दुसरे पत्र

पुढे दोन तीन दिवस असेच टेन्शन मध्ये गेले. आमच्या घराबाहेर नि ब्रुनीच्याही घराबाहेर पाळत ठेवत होते कुणी. ब्रुनी म्हणालेली, कर नाही तर डर कशाला .. त्यामुळे धीर येत होता. पण तिला पृथ्वीवरचे वास्तव ठाऊक नाही. इथे चोर सोडून संन्याशीही सुळावर चढवू शकतो आम्ही, सोयीचे असेल तर. त्यामुळे हे असेच होईल याची खात्री नव्हती. तशातच एकदा दुसरे पत्र अाले. पूर्ण तपशीलवार होते ते..

ते पत्र टायटन वरून आलेले. टायटनच्या दूतावासातून. होते इंग्लिश मध्येच. आणि पृथ्वीवासियांच्या वागणुकीचे विश्लेषण होते त्यात..

प्रिय अंबर राजपूत यांस,

मूळ पृथ्वी निवासी आणि आता चंद्रावर स्थायिक असलेल्या आपणाबद्दलच्या सकारात्मक भावनांनी हे पत्र टायटन राजदुतावासातून पाठवण्यात येत आहे. आमच्या चांद्रभारतातील सदिच्छा दूत मिस ब्रुनी बर्नेटो यांजकडून आम्हाला तुमची साद्यंत माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने हा पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

त्या दृष्टीने काही सांगण्याअगोदर आम्हा टायटन वासियांची पृथ्वीसंबंधी, खरेतर पृथ्वीवरील मानवासंबंधीची काही निरीक्षणे नोंदवणे योग्य होईल.

टायटनवासी अखिल जगतात आपले सदिच्छा दूत पाठवून त्यांच्याशी संबंध जोडू इच्छित असतात. या प्रयत्नात आमचे संबंध कित्येक परग्रहांशी जुळले असून त्यांच्याशी आमचे राजनैतिक संबंधही आहेत. मात्र पृथ्वीवरील विविध देशांनी आमचे हे प्रयत्न कधीच पुढे जाऊ न दिल्याने अामचे हे संबंध चांद्रदेशांशीच मर्यादित राहिले आहेत. तरीही आमच्या पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा अभ्यासातून निष्पन्न झालेली एकूण निरीक्षणे अशी:

पृथ्वीवासी स्वतःस अत्यंत असुरक्षित समजतात. त्यांनी आपली पृथ्वी विविध देशांत विभागली आहे.

या पृथ्वीवासी मनुष्याचा स्वभाव असा की, जे दिसेल त्याचे विभाजन करा. प्रत्येक भूभागावर मालकी सांगणे व राज्य करणे हा मनुष्याचा महत्त्वाचा उद्योग आहे.. प्रथम पृथ्वीचे तुकडे विविध देशात पाडले गेले. मग देशा देशात वैर ठेवून युद्धे खेळली गेली. एकेका भूभागाचा तसेच पृथ्वीवर मुबलक असलेल्या सामुद्रिक विभागाचा ताबा ठेवण्यासाठी मोठमोठया लढाया भूतकाळात करण्यात आल्या आणि अजूनही होत असतात. त्यात आपल्याच पृथ्वीवासी जनांच्या जिवाची पत्रास न ठेवणे हे एक मनुष्य प्राण्याचे लक्षण मानता यावे. त्यासाठी त्याने शास्त्रीय संशोधन विध्वंसक रीतीने वापरून अणुबाँब तयार केला. त्यात एकच नव्हे तर पुढील कित्येक पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आणले. स्वतःच्या शास्रीय प्रगतीचा अभिमान नि गर्वही या मनुष्यप्राण्यास असावा. पण तरीही ही प्रगती स्वतःच्या उत्कर्षासाठीच न वापरता आपल्या मर्यादित उद्दिष्टांसाठी म्हणजे साम्राज्य विस्तार, सत्ता बळकट करणे, कोणावर तरी सत्ता वाजवणे यासाठी वापरात आणली गेली आणि जात आहे. व पृथ्वीवासियांच्या एकूण वागणुकीवरून या नंतरही तो तसाच राहिल अशीच लक्षणे आहेत.

मानवप्राण्याची पुढची गंमत ही की देशविदेशात विभाजन करून त्याचे समाधान झालेले नसावे. भेदाभेद हा पृथ्वीवासियांचा आवडता उद्योग असावा. त्यामुळे आपल्याच देशात श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असे विभाजन करण्यास मनुष्य कचरत नाही

मग कातडीच्या रंगावरून माणूस ओळखला जाऊ लागला. गोरे आणि काळे भेद आला. वंशभेद अाला. धर्म नामक गोष्ट पृथ्वीतलावर आली. भाषा आल्या. पंथ आले नि जाती अाल्या. सारे काही मानवजातीच्या भल्याकरता आले असे म्हणत त्याचाच वापर तीच उद्दिष्टे टाळण्याकरता हुशारीने करण्यात येऊ लागला. एक धर्म दुसऱ्यास, एक वंशीय इतरांशी, एक समुदाय इतरांशी, एक भाषिक इतर भाषिकांस, नि मग एक जण दुसऱ्यास .. स्वत:हून लहान समजून त्यावर वर्चस्व गाजवू लागला. त्यामुळे माणसाने दुसऱ्या माणसास किमान माणूस म्हणून वागवणेही कठीण मानले जाऊ शकते येथे.

असे नाही की इथे हे सारे मोडून काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत. पण ते काही संत महात्म्यांपुरते मर्यादित राहिले. त्यांनी उपदेश केले. जीवनाची सत्ये समजावून सांगितली. बाकी मनुष्य प्राण्यांनी टाळ्या पिटल्या, भक्ती केली या सगळ्यांची नि या साऱ्यांस डोक्यावर बसवून ठेवले. माणसास आपल्या स्वतःच्याच डोक्यावरची गोष्ट दिसेल कशी. त्यामुळे त्या सगळ्या शिकवणुकींची आज ही पूजा होते. माणसाने यासाठी देवाचा शोध लावला. देव आणि दैव यांच्या आड लपून आपले अवगुण लपवत आता मनुष्य स्वतःला महान समजू लागला. आणि स्वतःस महान समजण्यासाठी इतरांना लहान. सारे जण एकच अाहेत नि कुणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही ही शिकवण तर याच संत महात्म्यांची. पण ती सोडून या संतांची फक्त पूजा बांधणे हा पृथ्वीवासियांचा उद्योगच आहे. या साऱ्यांमुळे मानव समाज विभागला गेला आहे, या सगळ्यांची परिणिती स्वतःस मोठे होता येत नसल्यास दुसऱ्यास लहान बनवणे यात झाली आहे. मग याबद्दलची सदैव असुरक्षितता त्याच्या मनात घर करून बसली आहे. कुणी आपले मोठेपण बळकावून तर घेणार नाही ना यासाठी तो स्वतःच्या जिवास तोशीस पडली तरी सदैव जागरूक राहतो.

त्यातूनच हे टायटॅनियन्सना पृथ्वीवर फिरकूही न देण्याचे मानवाने ठरवले असावे. यात आमच्या येथील प्रजेस अजिबात आश्चर्य वाटत नाही. पण आमची भूमिका मर्यादित आहे त्यामुळे पृथ्वीवासियांबद्दल. आमची सदिच्छादूत मिस ब्रुनी बर्नेटो हिचे हितरक्षण करणे ही अामची जबाबदारी आहे. आमच्या राज्यात कोणाचेही अहित न होण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो. त्यास मिस ब्रुनी देखील अपवाद नसेल. त्यामुळे तिला आम्ही टायटनवर परत तातडीने बोलावून घेत आहोत. आमच्याच दुतामागे अविश्वासाने पाळत ठेवणे टायटनवरील आमच्या संस्कृतीत अमान्य आहे. तसेच पृथ्वीवासियांप्रमाणे आम्ही स्वतःस असुरक्षित समजत नसल्याने कोणत्याही पृथ्वीवासियाचे आम्ही खुल्या दिलाने स्वागतच करू. त्यामुळे पृथ्वीवासी सरकारे तुम्ही आणि ब्रुनी बर्नेटो यांच्यात अडसर म्हणून येत असल्याने तुमचे तुमच्या कुटुंबियांसह टायटनवर स्वागतच होईल. यात तुमची सुरक्षितता जपली जाईलच त्याबरोबर आमची टायटॅनियन मिस ब्रुनी हिची इच्छा देखील पूर्ण होईल. आशा आहे तुम्ही आणि तुमचे चांद्रवासी कुटुंबीय या आमंत्रणाचा स्वीकार कराल.

पत्र वाचले मी. आपल्याच पृथ्वीबद्दल असे लिहिलेले वाचणे क्लेशदायक तर होतेच. पण त्यातील मुद्दे मात्र दुर्दैवाने चुकीचे नव्हते हे खरे. त्यातही ब्रुनी आता परत टायटनवर जाणार .. म्हणजे मला ही टायटन निवासी होणे गरजेचे .. पृथ्वी आणि आपला देश सोडून परग्रहावर जाऊन राहाणे.. इतक्या वर्षांतील इकडचे संबंध कायमचे तोडून .. न जावे तर.. ब्रुनीला मुकावे लागणार.. काय करावे?

*****

उपसंहार

दहा वर्षे झाली आम्हाला टायटनवर येऊन. ब्रुनी आणि मी आणि आमची एक ब्रुनीइतकीच गोड छोकरी. टायटन म्हणजे एखादी आदर्श व्यवस्था कशी असावी याचे उदाहरण आहे. सारे काही आहे इथे. आर्थिक सुबत्ता आहे, सामाजिक उन्नती आहे. लोक चांगले आहेत. इतक्या वर्षात लोकांची भांडाभांड नाही की दंगेधोपे नाहीत. धर्म नि राजकारणाच्या नावाने शिमगा नाही. साधे सरळ आणि प्रगत विचारांचे लोक. टायटनवरच्या विकासाचे मापनच मुळी हॅपीनेस इंडेक्सने होते. सर्वजण किती खुशाल आहेत यावर समाजाची प्रगती नि विकासाचे मोजमाप होते. समाज म्हणून एकसंधता आहे. विविध भाषा आहेत, लोकांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत.. पण कुणाचा द्वेष नाही. कुणी कुणाला लहान वा मोठे समजणे नाही. असा ही समाज असू शकतो? आजूबाजूस पर्यावरण सांभाळत झालेला 'विकास'.. आपल्याकडे विकास म्हणजे जंगलतोड करत बांधलेले रस्ते, फ्लायओव्हर्स नि वसवलेली शहरे.. नि नदी असेल तर गावेच्या गावे बुडवीत बांधलेली धरणे. तिथल्या लोकांना कायम देशोधडीला लावण्यास आपल्याला काही खुपत नाहीच.. देशोन्नतीच्या नि विकासाच्या नावे त्यांचे बलिदान आम्ही सहज करवून घेतो. आणि स्वत:स देशभक्त म्हणवतो. बाकी पूल आणि त्यावरील लांबलचक गाड्या, वेगवेगळ्या रेल्वे गाड्या नि उड्डाण घेणारी विमाने ही आमची विकासाची व्याख्या. त्यात तळागाळातल्या माणसाचा विचार नाहीच आणि तो तळ आणि गाळ जाऊन एकसंध समाज यावा याचा विचारही नाही. जंगलराज म्हणावे तर जंगलातील प्राणी देखील कधी इतक्या क्रौर्याने वागणार नाहीत असे कधी कधी काही जणांचे वर्तन. कल्याणकारी व्यवस्था म्हणून काही असते ह्याचे कागदोपत्री भान असणारे नि बोले त्याच्या अगदी उल्टा चाले असे ब्रीद असलेले राजकीय

धुरंधर.. काय काय आठवावे? टायटनसारखे राज्य पृथ्वीवर का नाही येऊ शकत..? आणि त्याच पृथ्वीवरील देशांनी उलट या परग्रहावरील लोकांचा संशय घ्यावा? चोराच्या मनात चांदणे याचे याहून उत्तम उदाहरण नसावे. कदाचित मनुष्यप्राण्यास अशी कुठे मिळाली संधी की तो त्याची गत पृथ्वीसारखीच करेल..

मला ती दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. ते पत्र आलेले टायटन वरून. करावे तर काय? आपल्या घरचा मोह कोणाचा कसा सुटावा. तो दिवस अजून आठवतो..

घरी सगळ्यांनी वाचले ते पत्र. सर्वात पुढे आई होती..

"छान. प्राॅब्लेम सुटला एक.."

"म्हणजे?"

"म्हणजे काय काय? अरे टायटनवर जाणे.. हे श्रेयस्कर.."

"पृथ्वी सोडून?"

"तू पत्र नीट वाचलेच नाहीस.."

"वाचले की.."

"नाही. त्यातला आशयच हा आहे.. सारे जग .. किंवा विश्वच आपले घर आहे. आपल्याकडे ही कल्पनाच कुणाला पटत नाही. आणि त्यातून मग भांडणे सुरू होतात .. हे विश्व आपले घरच आहे. त्यात पृथ्वीवर येण्यास विरोध असेल त्यांचा .. तर आपणच टायटनवर जाऊन राहावे.."

"म्हणजे मी? तुम्हाला सोडून?"

"नाही, मी ह्या पाॅलिसीच्या विरोधात राजीनामा देतोय.. तू मी आणि तुझी आई.." बाबा म्हणाले.

"आणि मी देखील .." राॅबिन म्हणाला मध्येच..

"हो. आपण चौघे.. जाऊयात टायटनवर.."

आज एक दशकपूर्ती झाली त्या गोष्टीला. आईने इकडून अजून तीन पुस्तके लिहून तिकडे पृथ्वीवर प्रकाशित केलीत. बाबा आपले रिटायर्ड आयुष्य नातीबरोबर खेळत मजेत घालवताहेत. राॅबिनने आपल्या प्रोग्राममध्ये केलेला तो बदल इकडे येऊन वापरात आणलाय. इकडे नवीन ग्रेटा नावाची त्याची गर्लफ्रेंडही आहे .. आणि दोघेही खुशीत आहेत इकडे.

आणि ब्रुनी? ती सदाच आनंदात असते. तिच्या वडलांनी बनवलेल्या नव्या प्रचंड क्षमतेच्या दुर्बिणीतून अाम्ही पृथ्वी ही पाहतो नि ज्या चंद्रावर भेटलो आम्ही तो चंद्र ही. मी अर्थातच ब्रुनीला सांगतो, पृथ्वीचा चंद्र नि शनिचा चंद्र एकत्र आले तरी सर्वात प्रिय मला तो तिचाच मुखचंद्रमा! ती अजूनही तशीच गोड हसत लाजते ..

पृथ्वीच्या चंद्रावर सुरू झालेली ही गोष्ट या इथल्या चंद्रावर सुरू आहे.. नभातून तोच चंद्रमा तसाच चमकत आमच्याकडे पाहात असतो नि आम्ही त्याच्याकडे ..