तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ७ Vrushali द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ७

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला होता. वातावरण नेहमीपेक्षा जास्त कोंदट व कुबट झाले होते. पोट ढवळून टाकणारा आणि श्वास घ्यायला जमणार नाही इतका घाणेरडा वास सगळीकडे पसरला होता. वाराही अगदी जागीच गोठून गेला होता. ज्या प्राण्यांत थोडाफार जीव उरला होता ते अशुभाच्या जाणिवेने आक्रोशत होते. विश्वनाथशास्त्रींनी पहाटेपासून शिवाची आराधना चालू केली होती. भल्या पहाटे तिथून दूर असलेल्या नदीवर सचैल स्नान करून शिवलिंगावर अभिषेक करून आशीर्वाद घेतला होता.

नेहमीसारखाच साधारण असा पोशाख परिधान करून ते बळी देण्याच्या मंडपाकडे निघाले.परंतु आज कपड्यांच्या आत संरक्षणासाठी रुद्राक्षाच्या माळा लपवल्या होत्या. खांद्याला भलीमोठी झोळी अडकवून आणि कपाळाला भस्ममिश्रित माती फासून सर्व तयारीनिशी त्यांनी बळीच्या मंडपात प्रवेश केला मात्र तेथील प्रकार पाहून त्यांचा जीव गुदमरून गेला. सगळीकडे नुसती निश्चल प्रेते पसरलेली होती. त्यातले नक्की जिवंत कोण व मेलेल कोण हे कळणार नाही अशी अवस्था होती. पखाली भरून मद्य साठवलेले होते. त्यातले किती सांडून पसरलेल्या रक्तातून वाहून गेले त्याचा काही मेळ नव्हता. वाहणारे रक्ताचे पाट बघून त्यांच्या पोटात ढवळून आल परंतु कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.

आपला हात तोंडावर ठेवत त्यांनी झोळीतील चिमुटभर राख तोंडात टाकत कसंबस स्वतःला सावरलं. त्यांच्या आगमनाने तिथल्या भारलेल्या वातावरणाला त्यांची चाहूल लागली होती. शास्त्रीनाही तिथल्या वाईट शक्तींच वर्चस्व समजून चुकलं होत. मात्र ही वेळ विचारात घालवायची नव्हती. मनातच मंत्र जपत आणि चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता ते तिथल्याच एका ठीकठाक वाटणाऱ्या दगडी बैठकीवर विसावले. समोर विविध बळीचे प्रकार न थांबता चालूच होते. काही प्रकार तर इतके किळसवाणे व क्रूर होते की विश्वनाथ शास्त्री स्वतःच दडपून जायचे. बसल्या जागी सकाळची रात्र कधी झाली कोणालाच कळलं नाही. व विश्वनाथ शास्त्रीही थांबले नाहीत. पूर्ण एकाग्रतेने आपल्या मंत्रबळावर त्यांनी अनेक दैवी शक्तींना आवाहन केलं. काळजातून घातलेल्या सादेने त्या दैवी शक्तीही प्रभावित झाल्या होत्या. तिथे चाललेले प्रकार थांबवणं तर शक्यच नव्हतं. मात्र त्यात शक्य तितके फेरबदल करणं त्यांच्या हातात होत. त्याचीच कमाल म्हणून करालने दिलेले कित्येक बळी छोट्याश्या चुकांमुळे वाया गेले होते आणि म्हणून तो जास्तच चिडला होता. जो कोणी त्या चुकांसाठी जबाबदार होता त्याला तो मागाहून बघून घेणार होता परंतु आता उशीर चालणार नव्हता... त्याच्यासाठी मुख्य यक्षिनीला खूष करण जास्त महत्त्वाचं होत. तेच त्याच ध्येय होत. बाकी सर्व अक्राळ विक्राळ हिडीस आणि भयाण शक्ती त्याच्या ताब्यात होत्या. परंतु यक्षिणीविद्या त्याला प्राप्त नव्हती. ती जर गुलाम झाली तर सगळं मनोवांच्छित त्याच्या पायाकडे असणार होत व त्याला अडविण्याचा विचार करायची पण कोणाची हिम्मत झाली नसती. याक्षणी त्याला कोणत्याही प्रकारची चूक नको होती. बऱ्याचश्या हुकमी शक्तिंमधील यक्षिणीची शक्ती ही एक प्रबळ शक्ती होती. म्हणून तो स्वतःच बलिदानाच्या विधीला बसला.

सर्वत्र रक्तामांसाचा व प्रेतांचा खच पडला होता. तिथेच रक्ताने माखलेल्या यज्ञवेदीवर त्याने स्थान ग्रहण केले. त्याचा धिप्पाड उघडा देह घामाने आणि रक्ताने चिंब भिजून गेला होता. त्याच्या लांबसडक जटाधारी केसांच्या अंबाड्यात रक्ताचे टपोरे थेंब चमकत होते. त्याच्या अवतारापेक्षा जास्त भयानक असा त्याचा चेहरा होता. डोळ्याभोवती काजळाने रेखाटलेली वर्तुळे त्याचा क्रूरपणा अधोरेखित करत होती. त्याच त्वेषाने फुरफुरलेल नाक व विचकलेले दात कोणाच्याही काळजात धडकी भरवायला पुरेस होत. त्याच्या तांबड्या आणि लालसेने पछाडलेल्या डोळ्यात साक्षात मृत्यूचा भास होत होता. करालच्या मंत्रशक्तीची ताकद खचितच सर्वांपेक्षा जास्त होती अगदी विश्वनाथशास्त्रींपेक्षाही. तो विधीला बसला असताना तर साधं विघ्न निर्माण करणं अत्यंत कठीण. जगातील चांगल्या वाईट शक्तींसोबत त्याच मन आणि इंद्रियेदेखील त्याच्या मुठीत होती.

रात्री बरोबर चंद्रग्रहणाच्या मध्यावर जेव्हा चंद्र पूर्णपणे झाकला जाईल. जेव्हा पृथ्वीवर नावालाही प्रकाशाचं अस्तित्व नसेल त्याच वेळी काही क्षणांसाठी यक्षिणी पृथ्वीवर अवतरणार होती. त्याचवेळी तिचा बळी तिला मिळाला पाहिजे. जर हे आखलेल्या वेळेत घडून आल तर करालला रोखणार कोणीच नसेल..... विश्वनाथ शास्त्रींच्या जीवनातील सर्वात कठीण आव्हान त्यांच्या समोर मृत्यूचा थयथयाट करत उभ ठाकल होत. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. काहीच वेळात चंद्रग्रहण चालू होणार होत त्यामुळे त्यांनाही तयारीत राहणं गरजेचं होत. त्यांनी आपला हाथ पाठीमागे नेत कंबरेभोवती बांधलेल्या वस्त्रातून काही सफेद रंगाचे खडे काढले. मागचे कित्येक महिने आपल्या जिवापेक्षा जास्त जपत त्यांनी गंगेच्या पात्रातील पाण्याने त्या खड्याना नुसत अभिमंत्रित केल नव्हतं तर त्यातील सुप्त शक्तीही जागवल्या होत्या. सारे खडे आपल्या डाव्या हाताच्या मुठीत गच्च पकडत त्यांनी ओठात पुटपुटत एका मंत्राच उच्चारण चालू केलं. त्यांच्या मुखाद्वारे निघणार प्रत्येक शब्द ऊर्जेचा एक अंश बनून त्या खड्यांत शिरत होता. एकेक शब्द सामावून घेत ते खडे तेजाने तळपू लागले. तेजासोबत त्यांच्यातील उष्णताही वाढत होती. मंत्र संपेपर्यंत त्यांना ते खडे मुठीत पकडणं असह्य होऊन गेलं. खडयाची गरमी त्यांचा तळहात जाळत होती.