तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ११ Vrushali द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ११

" मी.. नाही.. मी कसा काय..." अचानक सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकली गेल्याने ओम गडबडून गेला.

" तूच सांग तू कसा काय आलास ह्या सगळ्यात.. आपली भेट.. त्यानंतर काहीतरी अभद्राची चाहूल लागण.... त्या भारलेल्या भागातून सहीसलामत येणं.. त्या काळोख्या वातावरणातून योग्य मार्ग शोधत इथे पोचणं.." गुरुजींना त्यालाच प्रश्न विचारले.

" मी...." त्याच्या मनातील प्रश्न गुरुजींनी त्याच्याच समोर मांडले होते.

" तू... विश्वनाथ शास्त्रींचा वंशज आहेस... त्यासाठी तुला तुझ्या घराण्याचा सगळा इतिहास खोदून काढावा लागेल पण तितका वेळ नाहीये आता... मला सांग हे तुझ्या गळ्यातील लॉकेट कोणी दिलं तुला..?"

" हे.. माझ्या वडिलांनी... आमच्या घराण्याची परंपरा आहे..." ओम बोलता बोलता विचारांत हरवला.

" हा तोच मंतरलेला खडा आहे जो शास्त्रींनी वापरला होता. त्यातील एक खडा हा बघ...." बोलता बोलता गुरुजींनी आपल्या गळ्यातील खडा बाहेर काढून दाखवला. त्यांच्याजवळील खडा पाहून ओमदेखील अचंबित झाला. " एक खडा वारसदाराला व एक वंशपरंपरेने शास्त्रींच्या कुळातील मुलाला देण्यात येतो.. आणि भविष्यात काही अघटीत घडल तर वारसदार स्वतःहून शास्त्रींच्या वंशजाला शोधत यावा अशी तरतूद करण्यात आली होती... जेणेकरून वंशजाला त्याच्यातील शक्ती जागवता येतील..." गुरुजी बोलून दमले होते आणि ओमचे आश्चर्य वाढतच होते.

" पण मग त्यांनी त्यांच्या वंशजाला का नाही माहिती पुरवली जस तुम्हाला वारसदार म्हणून तयार केलं...?"

" वारसदार स्वेच्छेने येतो तर वंशजावर परंपरेने जबाबदारी येते. कोणत्याही कारणास्तव वंशजाने पळ काढणे त्यांना मान्य नव्हते म्हणूनच सर्व स्मृती सुप्तावस्थेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेल्या.."

" त्यांच्याशी लढायच तर त्यांची शक्ती..काही कल्पना..." ओमने बालिश प्रश्न विचारला.

" आपल्यापेक्षा करोडो पटीने जास्त..." गुरुजींनी सहज आविर्भावात उत्तर दिले.

" काय...?" ओम घाबरून जवळपास किंचाळला. त्याला वाटणारी भीती त्याच्या मोठ्या उघड्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. " मग आपण सामना कसा करणार..?"

" विश्वनाथ शास्त्रीही एकटेच होते. त्यांना तर पूर्ण माहिती पण नव्हती की ते कशासोबत लढणार आहेत. अगदी निकराच्या क्षणीदेखील... परंतु चांगलं कार्य करणाऱ्यासोबत परमेश्वर नेहमीच असतो... तो आपल सहाय्य करेल.." गुरुजी त्याला दिलासा देत होते.

" बापरे.... " ओम भेदरून पुढचं बोलणंच विसरला.

" अरे एवढा धीट आहेस घाबरतोस काय लहान मुलासारखा..." त्याला भित्र्या मुलासारख पोटाशी पाय घेऊन बसलेलं पाहून गुरुजी गालात हसले.

" घाबरलो नाही.. पण मला जमेल का हे... माझ्याकडे कोणतीच शक्ती नाही का मला कोणते मंत्र येतात.. माझ्या जीवावर कसं काय...?" ओमच्या कपाळावर आठ्यांच जाळ निर्माण झाल.

" झोप आता ओम.. काय करायचं.. कसं करायचं.. ते उद्या समजेल..." ओमच्या डोक्यावर थोपटून गुरुजी आपल्या शय्येवर झोपूनही गेले. ओमच्या डोळ्याभोवती सगळी गुहा फेर धरू लागली. शेकडो वर्ष जुन्या बलाढ्य अमानवी शक्तीशी मी साधारण माणूस काय लढणार....? बरेच प्रश्न त्याच्या डोक्यात उसळत होते. आणि त्यांची उत्तर ज्यांच्याकडे होती ते गुरुजी खुशाल झोपी गेले होते... ओम डोळे टक्क उघडे ठेवून छताकडे पाहत होता. अचानक वरून काहीतरी जोराने खाली आल व गुहेच्या भिंतीवरचे पलिते फरफरत विझून गेले... ओमची किंकाळी घशातच विरून गेली..

कसल्याश्या अपरिचित सुगंधित वासाने ओमची झोप चाळवली. त्याने नेहमीप्रमाणे हवेत हात उंचावून अंग मोडत आळस दिला. आपली मान गोल फिरवत त्याच्या रोजच्या स्टाईलमध्ये वरती पाहत हलकेच डोळे उघडले. उठायचं मन तर करत नव्हतं पण अचानक... त्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांना अंधार जाणवला. त्याने डोळे चोळत सभोवार पाहिलं. मिणमिणत्या मशालींच्या उजेडात त्याला गुहेच दगडी छत दिसलं... क्षणभर वेगळच दृश्य पाहून तो भांबावला.... शीट... आपण आपल्या पलंगावर नसून गुरुजींसोबत एका गुहेत आहोत हे लक्षात आल्यावर तो गडबडून जागा झाला. एव्हाना मशालीच्या उजेडात तो सरसावला होता. गुरुजी कुठे आहेत हे पहावं म्हणून त्याने वळुन पाहिल तर एका दगडी चौथऱ्यावर गुरुजींनी काहीतरी पूजा मांडण्यात व्यस्त होते.... हे सर्व लोक लवकर उठून तयार झाले आणि आपण मात्र झोपलोय.. त्याची त्यालाच लाज वाटली.

" झोप झाली का नीट..?" पूजेचं लाकडी तबक घेऊन येत गुरुजींनी विचारलं. कालपेक्षा आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाच हसू फुललं होत. शुभ्र वस्त्र परिधान केलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा ल्यालेले व अंगावर चंदनाची बोट उमटलेले गुरुजी साक्षात निरंकारी परमेश्वराच रूप भासत होते.

" अं... हो... सॉरी मी झोपून राहिलो..." तो क्षणभर त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्यांच्या नुसत्या दर्शनाने त्याला अगदी कृतकृत्य झाले.

" चालेल की... तुझ्या शरीराला आरामाची नितांत गरज होती.... काल तू ज्या परिस्थिती पार करून आलायस ना त्यात तुझ्या शरीराची बरीचशी ऊर्जा खर्च झालीय... पण आता लगोलग आवरून घे... आपल्याला काही महत्त्वाचे विधी करायचेत..." बोलत बोलत गुरुजींनी त्याला प्रातर्विधी व आन्हिक आवरायला गुहेतीलच एका भुयाराकडे बोट दाखवलं. त्याला नीट रस्ता समजावा ह्यासाठी गुरुजींचा एक अनुयायी त्याच्यासोबत निघाला.