Trushna ajunahi atrupt - 5 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ५

" ये... बस इथे.." गुरुजींच्या आवाजाने त्यांची तन्द्री भंग झाली. चुपचाप आवाज न करता तो गुरुजींनी बोट दाखवलेल्या मृगजीनावर जाऊन बसला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. एक प्रकारची शांतता पूर्ण वातावरणात भिनली होती. गुरुजींच्या अनुयायापैकी कोणीतरी त्याला एका मातीच्या वाडग्यात कसलस लाल रंगाचं द्रव्य आणून दिलं. ते पाहताच त्याला भुकेची आठवण झाली. कधीपासून तो भयंकर खडतर प्रवास करत इथे येऊन पोचला होता. तहान भुकेपलीकडे इथे येऊन पोचायची ओढ इतकी जबरदस्त होती की घरातून निघाल्यापासून साधं पाणीही त्याने प्यायल नव्हतं.

" ओम.. ते द्रावण पिऊन टाक.." गुरुजींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आज्ञा केली.

त्यानेही क्षणाचा विचार न करता तो वाडगा तोंडाला लावला. खारट, तुरट, कडवट चवीने त्याच तोंड वाकडं झाल. आणि गुरुजींकडे नजर जाताच त्याने एका घोटात सगळ द्रावण पिऊन टाकल. जाळ निर्माण करत ते द्रावण घश्यातून पोटात उतरलं आणि मेंदूला झिणझिण्या आल्या. क्षणासाठी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारून आल आणि सर्वांगाला दरारून घाम फुटला. गुरुजींनी पुढे होत एक राखेच बोट त्याच्या कपाळाला टेकवल. थरथरत बऱ्याच वेळाने तो नॉर्मल स्थितीत आला.

" घाबरु नको.. हे तुझ्या संरक्षणासाठी होत... तुझं मानवी शरीर ते पचवायला जरा वेळ घेईल..." गुरुजींनी त्याच्या डोक्यावर थोपटल.

" गुरुजी.. मी ते स्वप्नात.." ओम त्याच स्वप्न सांगायचा प्रयत्न करत होता. पण नुकत्याच प्यायलेल्या द्रावणाची चव त्याच्या जिभेवर येत त्याला त्रास देत होती.

" माहित आहे सगळ... म्हणूनच तुला इशारा मिळाला इथे यायचा.." गुरुजींना भविष्यातील घटनांचा इशारा आधीच मिळाला होता.

" पण मीच का.. आणि तो ओसाड भाग..ते दुभांगणार झाड...काय होत हे सगळं.. " ओमने कडवट चव गिळत विचारलच.

" सगळ सांगतो... तू विज्ञानाच्या जगात जन्मलेला.. तुझं ह्या सगळ्यांवर विश्वास बसत जरा कठीण आहे म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने साधना करवून घ्यावी लागली तुझ्याकडून... तू आता ज्या जागेत आहेस ती जागा भगवान शंकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कित्येक हजारो वर्षांआधी ही जागा म्हणजे एक घनदाट जंगल होत... अगदी पाऊल ठेवण्यास जागा नव्हती एवढं घनदाट... अशा जंगलात हजारो अघोरी लोक येऊन इच्छापुर्तीसाठी साधना करत असत.. काहींची साधना परमेश्वरभेटीसाठी होती.. तर काहींना सर्वशक्तिमान व्हायचं होत. सर्वच्या सर्व अगदी कडक तपस्वी... शेकडो वर्ष काहीही न खाता पिता, मल मुत्राचा त्याग न करता त्यांच्या पूजनीय शक्तीला अखंड साद घालत होते. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेने हा प्रदेश इतका भारला गेला की ती ऊर्जा सहन न होऊन त्या जंगलाचं रूपांतर ह्या उजाड माळरानात झाल. दोन्ही ऊर्जेच्या चकमकीत इथे काळ थांबून गेला. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या तपश्चर्यादेखील पूर्ण झाल्या नाहीत. कित्येक वर्षांनी जेव्हा त्यांनी देहत्याग केला तरीही आत्म्याच्या स्वरूपात ते भटकतच राहिले. चांगल्या आणि वाईट दोन्ही आत्म्यांच्या टोळ्यांमध्ये वर्षानुवर्षे युद्ध चालत होत.... ज्याचा काहीच अंत नव्हता. सर्वच अघोरी भगवान शिवाचे भक्त असल्याने शेवटी त्यांना प्रकट व्हावं लागलं. त्यांनी जगाच्या हिताच्या दृष्टीने त्या आत्म्यांना काही बंधन टाकली आणि ह्याच जागी ह्याच गुहेत अंतर्धान पावले. त्यामुळे इथे कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. येथील कोणतीही शक्ती कोणाला हानी पोचवू शकत नाही. व बाहेरील कोणालाही मग तो मनुष्य असो वा एखादा आत्मा कोणीही इथे प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणूनच ह्या आपल्या कामासाठी ह्याच्यापेक्षा उत्तम व सुरक्षित जागा दुसरी कोणतीच नाही. केवळ आणि केवळ ज्याला सर्व सिद्धी प्राप्त आहेत व ज्याचं तपोबल ह्या शक्तीपेक्षा जास्त आहे तो व्यक्तीच इथून सुरक्षित ये जा करू शकतो. "

" मग मी कसा...?" ओमने त्यांना मध्ये तोडल.

" धीर धर... सांगतो... पूर्वीचे लोक भलेही चांगल्या किंवा वाईट वृत्तीचे असुदे ते देवावर विश्वास ठेवायचे. म्हणूनच भगवान शिवाची बंधने त्यांना ताब्यात ठेवून होती. सगळ तोपर्यंत ठीक चालत होत जोपर्यंत करालचा जन्म झाला नव्हता. करालचा जन्मच मुळी ह्या कलयुगात हाहाकार माजविण्यासाठी झाला होता. भयंकर हट्टी आणि अती महत्त्वाकांक्षी असा कराल त्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी मागे पुढे पाहत नसे. तो स्वतःला देवापेक्षाही उच्च समजत असे. ह्या जगावर नुसत तात्पुरतं राज्यच नाही तर अनंत काळापर्यंत त्याला आपली सत्ता प्रस्थापित करून ठेवायची होती. आणि त्यासाठी देवाची वर्षानुवर्षे पूजा करण्यापेक्षा मानवातील तामसिक गुणांना वाढीस लावून त्यांच्या मनात स्वतःची भीती प्रस्थापित करून त्यांच्यावर राज्य कारण जास्त सोप होत. आजही बघ ना.. आपण एकतर अंधश्रद्धा बाळगतो अथवा सरळ नास्तिक बनतो. ईश्र्वरावर सात्विक श्रद्धा ठेवणारे फारच कमी मिळतील... कर्म वगैरे लांबची गोष्ट... करालने ईश्वरी नाही तर अमानवी अघोरी शक्तींना आवाहन करायला सुरुवात केली. आपणही पूजनीय होऊ शकतो व इच्छित गोष्ट मिळतेय ह्या हेतूने अघोरी शक्ती त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला हवी ती मदत करायच्या. बऱ्याचश्या शक्ती त्याच्या ताब्यात असल्याने तो खूप जास्त शक्तिशाली बनला. त्याच्याच बळावर त्याने व त्याच्या शक्तींनी नास्तिकता पसरवायला सुरुवात केली. अर्थात ईश्वरी शक्तीवरील विश्वास कमी झाल्याने साहजिकच त्यांच्या मनात भीतीने वास करायला सुरुवात केली. आणि ते सहजच करालच्या तावडीत सापडत गेले. असाच बळी पडला तो अवंतीनगरीतील सम्राटाचा लहान भाऊ चांद्रहास... चांद्रहास लहानपणापासून हट्टी, उचापती आणि भयंकर लोभी. असच त्याच मन नगरीतील एका वेश्यालयातील सर्वात सुंदर वेश्येवर जडल... तीच नाव होत शशिकला... नानाप्रकारे तिच्यासोबत रासलीला रचल्यावर त्याला तिचा मोह सोडवत नव्हता. ती त्याला कायमस्वरुपी स्वतःसोबत पाहिजे होती. मात्र अवंतीसम्राट ह्या विरोधात होते. वेश्या कधीही राजघराण्याची कुलवधू बनू शकत नाही. जर ती पाहिजे असेल तर राजे चांद्रहास यांना राजघराण्याशी संबंध तोडावे लागतील अशा परखड शब्दात सूनावून सम्राटांनी त्यांची बोळवण केली. प्रणयाच्या कलेत शशीकलाही त्यांच्याप्रमाणे पारंगत असल्याने ते आयुष्यभर तिच्या बाहुंत पडून राहण्यास तयार होते. मात्र त्याचवेळी त्यांची भेट करालशी झाली. आणि इथेच ठिणगी पडली. करालने घडल्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या मनात सम्राटांबद्दल काळबेर पसरायला सुरुवात केली. आपल्या सम्राट पदाचा एकट्यालाच उपभोग घेता यावा ह्यासाठी छोट्याश्या कारणावरून त्यांना राज्यत्याग करावयास भाग पाडले ही गोष्ट करालने पुरेपूर चांद्रहासांच्या मनावर बिंबवली. आणि मग सुरू झालं मृत्यूच तांडव. करालची जगावर सत्ता प्रस्थापित करण्याची लालसा आणि चांद्रहासांची सूडाची आग ह्यात संपूर्ण अवंती नगरी पापण्या लवण्याआधीच जाळून खाक झाली. आणि चांद्रहास शशिकलेसोबत करालचे परमभक्त झाले. एवढ्यावरच न थांबता ' तुला संपूर्ण जगाचे सम्राटपद मिळवून देतो ' ह्या बोलीवर त्याने चांद्रहासाना स्वतःचा गुलाम बनवून टाकले. कित्येक वर्ष ते दोघे आपल्या अनुयायांसहीत पृथ्वीवर भयाच सावट पसरवायला यशस्वी झाले होते. काळया जादूचे कित्येक प्रकार त्यांनी शोधून काढले. सगळे प्रकार आजमावून बघायला त्यांना हवालदिल जनतेच्या स्वरूपात आयते सावजही मिळाले होते. पृथ्वीवरून देव हा प्रकारच नष्ट होण्याच्या मार्गात होता. त्यात निसर्गाने साथ देणं बंद केलं होत. पृथ्वीभोवती सतत काळया ढगांचे सावट पसरलेले असे. क्वचितच कधीतरी सूर्यकिरणांचा स्पर्श धरेला होई. अन्न धान्य पिकण कधीचं बंद झालं होत. विहिरी नाले नदीचं पाणी किड्यांनी भरून दूषित झाल होत. सर्वत्र रोगराई पसरली होती. माणस एकमेकांच्या रक्ताने स्वतःची तहान भागवत होते. नाती गोती कधीच लुप्त होऊन मागे पडली होती.

इतर रसदार पर्याय