Narmada parikrama - 3 books and stories free download online pdf in Marathi

नर्मदा परिक्रमा - भाग ३

नर्मदा परिक्रमा भाग ३

परिक्रमेची सुरुवात कुठूनही करता येते पण परिक्रमेची विधिवत सांगता करण्यासाठी ओमकारेश्वरला जावे लागते म्हणून साधारण सर्व परिक्रमावासी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात. अमरकंटक पासून परिक्रमा सुरु करणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे .

देवळात प्रदक्षिणा घालताना जसे आपण देवाला उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालतो, तसेच परिक्रमेत सुद्धा मैय्या आपल्या उजव्या हाताला ठेवून परिक्रमा पूर्ण करायची असते.

परिक्रमेत असताना कोणत्याही परिस्थिती मध्ये मैय्या ओलांडायची नसते. तसे केल्यास परिक्रमेचा भंग होतो आणि परत पहिल्यापासून परिक्रमा सुरु करावी लागते.

परिक्रमा सुरु करण्याआधी आणि पूर्ण झाल्यानंतर क्षौर-म्हणजेच डोक्यावरचे केस आणि दाढी काढायची असते. तसेच परिक्रमेच्या काळात दाढी, केस आणि नखे कापणे वर्ज्य असते

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे.तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो.
तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात.
ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी परिक्रमा करतात.
तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते.
येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते.
दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते.
या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात.
जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते.
गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा ताक अशी सेवा देतात.
परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे.
काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो.
या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे.
दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्‍वर महादेव मंदिर आहे.
येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था करतात.
येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते.
वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते.
गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात.
येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते.
या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल.
तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम.
या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम.
आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते.
येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते.

या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्‍वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्‍वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्‍वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.

नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कण्डेय मुनी ! त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या ९९९ नद्यांच्या धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना २७ वर्षे लागली !

अलिकडे - म्हणजे सुमारे दीडशे वर्षापूर्वी धुनीवालेबाबांच्या परंपरेतील श्रीगौरीशंकर महाराजांनी मोठा जथा घेऊन नर्मदा-परिक्रमा केल्यापासून ह्या परंपरेला खऱ्या अर्थानं चालना मिळाली.

नर्मदे हर नर्मदे हर ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED