नर्मदा परिक्रमा भाग ६
परीक्रमेदरम्यान वेगवेगळ्या गावात असणार्या मंदिरांची आणि घाटांची त्याबद्दल असणार्या धार्मिक कथाची ओळख होत जाते.
एकूण बारा घाट आहेत.सर्व घाट खुप साफ व सुंदर आहेत .
नदीचे पाणीही सगळीकडे निर्मळ आहे .
नर्मदा परिक्रमा चालू केली की नर्मदेला मैय्या असे संबोधले जाते .
ओमकारेश्वरला जाताना वाटेत मुक्ताईनगर मध्ये संत मुक्ताबाईंचे मंदिर आहे .मुक्ताबाई त्या ठिकाणी कडाडणाऱ्या वीजेसोबत लुप्त झाली अशी आख्यायिका आहे .
नेहेमी आपल्याला दत्त त्रिमूर्ती स्वरूपात दिसतो पण बडवानी येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे .
शहादा येथून पुढे जाताना वाटेत प्रकाशा येथे पुष्पदन्तेश्वर म्हणजे महादेवाचे देऊळ आहे .
या ठिकाणी शिवमहिम्नाची रचना केली गेली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार पांडवानी केला आहे अशी आख्यायिका आहे .
या महादेवाला पुष्पदन्तेश्वर नाव कसे पडले याची एक कथा सांगतात .
एक ब्राम्हण रोज एक लाख फुले महादेवाला वाहत असे .
तो त्याचा संकल्प असे .
एकदा महादेवाने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले व त्यातील एक फुल कमी केले .
तेव्हा ती कमी पूर्ण करण्यासाठी ब्राम्हणाने आपला दात काढुन फुल म्हणून वाहिला .
गरुडेश्वर ला टेंबे स्वामींची समाधी तसेच त्यांनी बांधलेले दत्ताचे देऊळ आहे आणि गरुडेश्वर मंदिर आहे .
यानंतर बिडवाह येथे नर्मदेच्या काठी सुंदर हेमाडपंथी राममंदिर असुन तो स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे .
महेश्वर चा नर्मदा घाट अत्यंत प्रशस्त असुन घाटावर अहिल्यादेवींचा सुंदर उत्कृष्ट चिरेबंदी राजवाडा आहे .
राजवाड्यात अनेक देवांची मंदिरे असुन अहिल्यादेवी होळकर यांच्या खुणा जपून ठेवलेले एक भव्य दालन आहे.त्यांचे देवघर,त्यातील चांदीची खुप मोठी आणि छोटी शिवलिंगे सोन्याच्या मुर्ती ,आणि त्यांच्या कामगिरीची भित्तीचित्रे आहेत .ते सर्व पाहून समृद्ध इतिहासाचा अभिमान वाटतो .
प्रांगणात त्यांचा अजस्त्र पुतळा आहे .
येथे सहस्त्र्धारा नर्मदा आहे म्हणजे जेव्हा नर्मदेला वाहण्याची वाट अर्जुनाने आपल्या सहस्त्र बाहुनी अडवली तेव्हा ती सहस्त्र धारांनी वाहू लागली .हे दृश्य खुप नयनरम्य आहे .
उज्जैन येथे गोंदवलेकर महाराजांचे ध्यान मंदिर असुन त्यांचे शिष्य रामस्वामी यांचा मठ आहे .
बडा गणपती मंदिर ,महाकालेश्वर मंदिर व तेथील भस्मारती ,कालभैरव मंदिर .
जिथे बलराम कृष्ण आणि सुदामा यांचे शिक्षण झाले तो सांदीपन ऋषींचा आश्रम ,
पार्वतीने लावलेले वडाचे झाड ,विक्रमादित्याचा दरबार ,त्यांच्या लहान व मोठ्या भावाच्या गुंफा ,
मंगळमंदिर जेथून कर्कवृत्त जाते ,पुरातन शिवमंदिर आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत .
नेमावर हे नर्मदेचे नाभिस्थान मानले जाते जेथे घाटावर सिद्धेश्वराचे पांडवकालीन मंदिर आहे .
जबलपूरमध्ये भेडाघाट इथे अतिशय उंचावरून होणारा नर्मदा प्रपात हा धुंवाधार धबधबा म्हणून ओळखला जातो तेथुन पुढे शहाडोल इथे कपिल ऋषींनी तपस्या केलेली गुंफा आहे .
त्यांच्या स्वागता साठी नर्मदा दुग्ध धारा बनून आली होती .
अमरकंटक हे मैय्याचे उगमस्थान
इथे रेवाकुंड आहे .याची कथा अशी आहे .
रूपमती एक उत्तम गायिका होती .
तसेच ती दिसायला खुप सुंदर होती .
मांडवगडचा राजा भोज एक कलासक्त राजा होता ,त्याला गायन वादन कलेमध्ये खुप रुची होती .
अनेक उत्तम उत्तम गायक गायिका त्याच्या दरबारी होते .
एकदा राजाने रूपमतीचे गाणे ऐकले व तो त्या गाण्यावर लुब्ध झाला .
त्याने रूपमतीला आपल्या दरबारी गायिका म्हणून येण्याचे आमंत्रण दिले .
परंतु नर्मदेचे दर्शन केल्या खेरीज काहीही न खाण्याचा रूपमतीचा नेम होता.
मग भोज राजाने नर्मदेचा प्रवाह वळवून तेथे रेवाकुंड निर्माण केले .
आणि मग रूपमती भोज राजाच्या दरबारातील गायिका बनली .
इथे गायमुख असुन सतत पाण्याचा स्त्रोत सुरु असतो .
या कुंडाजवळ कर्णाने बांधलेली शंकराची मंदिरे आहेत .
अमरकंटक च्या पुढे महाराजापूर येथे नर्मदेला बंजारी नदी आणि सरस्वती नदी भेटतात .
त्यामुळे येथे पवित्र असा त्रिवेणी संगम आहे .
होशिन्गाबादला परिक्रमेतील शेवटचा घाट म्हणजे शेठानी घाट आहे ,येथे नर्मदेचे पात्र अतिशय विस्तीर्ण असुन शांत आहे .
सर्वच ठिकाणी परिक्रमा वासियांना खुप मान देतात .
काही ठिकाणी गरिबी असली तरी मनाची श्रीमंती पाहायला मिळते .
नर्मदा मैय्या महान आहेच पण इथे माणसामध्ये देवत्व पाहायला मिळते .
नर्मदे हर नर्मदे हर ..