नर्मदा परिक्रमा - भाग ४ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नर्मदा परिक्रमा - भाग ४

नर्मदा परिक्रमा भाग ४

नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करतात .

ह्या वाटेनं जाणाऱ्या परिक्रमावासींना त्या परिसरातील भिल्ल केवळ लुटतंच नाहीत तर अक्षरश: नागवतात. परंपरावादी लोकांच्या मते असं लुटवून घेणं हा परिक्रमेदरम्यानच्या वाटचालीतील अटळ-अपरिहार्य भाग असल्यानं तो अनुभव प्रत्येक परिक्रमावासीना घेण अगत्याच आहे.

खरं तर हे भिल्ल लुटारू नाहीत ! ह्या परंपरेमागचं खरं कारण असं की, नर्मदा-परिक्रमा करत असताना परिक्रमावासीयांनी मोह, माया, आसक्ती, लोभ इत्यादींचा त्याग करणं अभिप्रेत आहे नि ते तसं सहजा-सहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी ‘सोय’ केली असावी.

स्वाभाविकच ह्या वाटेत भिल्लांकडून लुटलं जाण्याच्या भयानं बहुतेक परिक्रमावासी हा टप्पा वाहनातून प्रवास करून ही वाट टाळतात किंवा कुणी नर्मदेच्या तटाची वाट सोडून थोडीशी दूरची वाट पायी-पायी आक्रमतात. अर्थातच हा अनुभव परिक्रमावासींनी घ्यायला हवा .

परिक्रमावासीयांनी कोणता पेहेराव करावा असा कोणताच दंडक घालून दिलेला नसला तरी परंपरेनं चालत आलेला पेहेराव धोतर वा लुंगी नि सदरा व स्त्रियांसाठी पांढरी साडी अथवा पांढरे कपडे असा असतो .

नर्मदा-परिक्रमेदरम्यान पाळावयाचे परंपरागत नियम आहेत त्यापैकी स्वत:ला पाळणे शक्य आहेत असे वेचक नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वत:च ठरवून घ्यावेत किमान काही नियम तरी आवर्जुन पाळायचे ठरवावे व ते निष्ठापूर्वक पाळावेत. मग परिक्रमा कितीही कालावधीची वा पद्धतीची, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातून कशीही असू, परिक्रमेची वाटचाल नर्मदामाईप्रती अतीव आदरानं नि श्रद्धेनं करणं एवढंच महत्त्वाचं अन् पुरेसं आहे

नर्मदा-परिक्रमा कुणी, का, कशी नि कशासाठी करावी ?
नर्मदा-परिक्रमा कुणीही करावी. इथे जन्मजात वंश-जाती-धर्म-लिंगभेद, वय ह्यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा-परिक्रमा का करावी ह्यांचं उत्तर असं की नर्मदा-परिक्रमा हे मानवी मनाच्या उन्नयनाचं/ सबलीकरणाचं - निर्मलीकरण साधणं हे आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात नाही.
दुसऱ्याचे अनुभव वाचून-ऐकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही श्रेयस्कर !नर्मदा-परिक्रमा कोणत्या वयात करावी ? कुणी म्हणतील, नर्मदा-परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा म्हणजे उत्तर आयुष्यात करण्याची-वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन निर्मलीकरण सबलीकरणाचं साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्माचर्याश्रम नि गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे, अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही.

नर्मदा-परिक्रमा कशी करावी ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा-परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नि श्रद्धेनं करणं अगत्याचं आहे.

नर्मदा-परिक्रमेची फलश्रुती-परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र परिवर्तन होते .

त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक दोषांचं निर्मूलन होऊन स्वस्थ शरीर, शांत स्थिर आणि संतोषी वृत्ती प्राप्त होते.

या परीक्रमे दरम्यान आपल्याला असलेले ज्ञान आणि माहिती ह्यांचा पडताळा परिक्रमेदरम्यान घेण्याची अपूर्व संधी लाभते ती अशी वनस्पती, भूगर्भ, पुरातत्त्व, प्राणी-पक्षी अशी शास्त्र, इतिहास, भूगोल, आयुर्वेद, संगीत, शिल्पकला, रेखाटन, चित्रकला, छायाचित्र काढणं… ही यादी कितीही लांबू शकेल. ह्यापैकी ज्यांचं आपल्याला ज्ञान आहे त्याची प्रचिती घेणं हे जमू शकेल तसंच अन्य विषयांचं ज्ञान मिळविण्याची प्रेरणा मिळते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासीचे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही.
नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे , तसेच हि परिक्रमा 108 दिवसांत देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्तीनुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात

नर्मदा-परिक्रमेच एक अपूर्व वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा-परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक नि सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावरसुद्धा समान पातळीवरची मानली जाते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. नर्मदा-परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीनं ती कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्तरावर असो. तिनं अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढंच धन वा साधन-सामुग्री परिक्रमेदरम्यान सोबत बाळगावी. अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे.

आपला वेगळेपणा मोठेपणा लोकांच्या ध्यानात येईल असे वर्तन नर्मदा-परिक्रमेत अभिप्रेत नाही. आपल्याकडे पंढरीच्या वारीत उच्च-निच, लहान-थोर, गरीब-श्रीमंत भेदाभेद नाहीत हे तर आपण नित्य अनुभवतो. नर्मदा-परिक्रमेत ‘समभावाचं’ हेच तत्त्व स्वत: आचरणात आणायचं आहे. थोडक्यात नर्मदा-परिक्रमेची वाट माणसातलं अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारी अभिनव वाट आहे.

त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे !

नर्मदे हर नर्मदे हर ..