रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते.
“वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना म्हणाली…”त्या रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” स्वतःशीच हसत ती म्हणाली, “बिच्चारी, लग्न झालं नाही की लग्गेच जावं लागलं तिला आणि ते पण थोडे थोडके नाही, एक महिन्यासाठी..
असो..रोशनी इथे नसताना तिचे वकील.. मि. फर्नांडीस ह्यांना एकदा भेटुन घे. त्यांच्याशी ओळख करुन घे. त्यांना सांग रोशनीची विमा पॉलीसी काढायची आहे. त्यांना दाखवुन दे की तुझे रोशनीवर कित्ती प्रेम आहे. ते इथे असतानाच रोशनीला एकदा फोन कर, तिच्याशी गोड गोड बोल. तसेच त्यांच्याकडुन इतर काही माहीती जसे रोशनीचे काही मृत्युपत्र आहे का?, इतर लिगल बाबी काय आहेत वगैरे जाणण्याचा प्रयत्न करुन घे..”
“येस.. डार्लींग.. आपका हुकुम सर आखोंपर..”, जोसेफ म्हणाला..
“आता पुढचा प्लॅन.. रोशनीला टपकवायचा. अतीशय धुर्तपणे आपल्याला हे करावं लागणार आहे. कुणाला जरासासुध्दा संशय येता कामा नये. तिचा मृत्यु पुर्णपणे अपघाती वाटला पाहीजे, नाहीतर संशयाची सुई पहीली तुझ्याकडेच येईल. एक रस्त्यावरचाअ मेकॅनिक रोशनीचा नवरा होतो काय, दोन महीन्यात तिचा मृत्यु होतो काय आणि तोच कफल्लक मेकॅनीक रातोरात करोडपती होतो काय..”.. नैना..
“हम्म, बरोबर आहे तुझं म्हणणं.. बर सांग आता, काय प्लॅन आहे?”, जोसेफ
“वेल.. फुल प्रुफ प्लॅन अजुनही तयार होत नाहिये.. माझा विचार चालु आहे.. पण ढोबळ मानाने असा विचार आहे..
हे बघ… रोशनी डिप्रेशनची शिकार आहे. एखादी मनाविरुध्द गोष्ट झाली की तिला मध्येच नैराश्य येते. डॉक्टरांनी तिला नैराश्यावर काही गोळ्या दिलेल्या आहेत. परंतु त्या गोळ्यांचे अतीसेवन ड्रग्सचा परीणाम करते.
त्या दिवशी कुठल्याश्या छोट्या गोष्टींवरुन तुझ्या आणि रोशनीमध्ये भांडण होईल, आणि तेच भांडण बघता बघता वाढत जाईल. तु ह्याची काळजी घ्यायचीस की तुमच्यातले हे भांडण घरातील गडी माणसे आणि इतर शक्य तेवढी लोकं ऐकतील.
तुमचे भांडण झाले की तु तणतणत मुख्य गेटातुन बाहेर पडशील. परंतु गाडी एका ठिकाणी लपवुन तु परत येशील.. कुणाच्याही नकळत आणि मागच्या गेटमधुन तु परत घरी येशील. भांडण सुरु व्हायच्या आधी तुला तुमच्या बेडरुम मध्ये रोशनीसाठी असलेल्या पाण्याच्या जग मध्ये, ज्युसमध्ये किंवा आणखी कश्यातही जे ती झोपण्याआधी खाईल, किंवा पिईल त्यात तिच्या गोळ्या टाकुन ठेवायच्या.
साधारणपणे एक तासाने तु बेडरुम मध्ये येशील. ह्या गोळ्यांच्या ओव्हरडोसने रोशनी गाढ झोपली असेल. तिला उचलुन तिच्याच गाडीत बसवुन तु पुन्हा बाहेर पडशील. आज जसे इतरांच्या नकळत मी आतमध्ये आले, तसेच त्यादिवशी सुध्दा असेन. मागच्या सिटवरच रोशनीला गाडीत ठेवुन तु तिच्या शेजारी लपुन बसशील. मी ड्रायव्हींग सिटवर रोशनीचाच कुठलातरी ड्रेस घालुन बसेन. आपण गाडी वेगाने मुख्य गेटातुन बाहेर काढु. गेटवरील गार्ड रोशनीला गाडी घेउन जाताना पाहेल.
तिला घेउन आपण लोटस-हिल च्या घाटात जायचे. रात्रीच्या वेळेस हा घाट पुर्ण सुनसान असतो. तेथेच तिला ड्रायव्हींग सिटवर बसवुन ती गाडी आपण घाटात ढकलुन द्यायची. बस्स.. रोशनी खतम..” टाळी वाजवत नैना म्हणाली..”शवतपासणीमध्ये रोशनीला गोळ्यांचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे एका अवघड वळणावर आलेल्या ग्लानीमुळे गाडी दरीत कोसळली आणि तिचा अपघाती मृत्यु झाला हे स्पष्ट होईल..”
“वॉव, दॅट्स ब्रिलीयंट…जिनीयस आहेस तु…” जोसेफ म्हणाला..
“अर्थात ह्यात काही खाच-खळगे आहेत जे पुर्ण करायचे आहेत.. जसे की तुझ्यासाठी अलेबी.. तु घरी नव्हतास तर मग रोशनीचा अपघात झाला तेंव्हा कुठे होतास? ह्याचा पुरावा. त्यावेळेस तु दुसर्याठिकाणी देखील असणे गरजेचे आहे, आणि तु तेथे होतास, ह्याचा पुरावा देखील असणे गरजेचे आहे. ह्या मुद्याला एकदा का उत्तर सापडले की आपला प्लॅन रेडी-टु-गो..”, घड्याळात बघत नैना उठुन बसत म्हणाली..
समोरच्या आरश्यात बघत आपले केस एकसारखे करत नैना म्हणाली.. “चल मला जायला हवे..”
नैनाच्या लांबलचक उघड्यापाठीकडे बघत जोसेफ म्हणाला…”इतक्यात कुठे चाललीस डीअर.. हनीमुनची रात्र आहे, इतक्या लवकर थोडी नं पहाट होणार..” आणि तिला पुन्हा एकदा आपल्या बाहुपाशात ओढुन घेतले..
पुढचे काही दिवस जोसेफसाठी स्वर्गसुखाचे होते. हातामध्ये सत्ता आणि संपत्ती दोन्ही होती.
रोशनीच्या महालातला राजेशाही थाट तो पुर्णपणे अनुभवत होता. प्रोजेक्टचे काम व्यवस्थीत चालु होते. जोसेफला पुर्ण स्वतंत्रता असल्याने स्वतःला हवे तसे, हवे तेंव्हा बदल तो करवुन घेत होता. सारे काही सुरळीत चालु होते, पण त्याच्या सुखाला गालबोट लागले ते रोशनीच्या एका फोन मुळे..
“जोसेफ, मी एक आठवडा लवकरच येत आहे. इथली सर्व कामं मी लवकर संपवली आणि तुला भेटायला मी आतुर आहे. कधी एकदा तुला भेटते असे झाले आहे बघ..”
जोसेफ दुःखानेच “हम्म” म्हणाला..
“तुला माझ्या येण्याने आनंद नाही झाला जोसेफ?”, रोशनी
“झाला ना, खुप झाला, प्रत्येक दिवस मी मोजुन काढतो आहे रोशनी..” जोसेफ आवाजावर नियंत्रण ठेवत म्हणाला..
“ठिक आहे तर मग.. मी पुढच्या शुक्रवारीच येते आहे.. तु येशील ना एअरपोर्टवर मला घ्यायला?”
जोसेफला ’हो’ म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
***************************************
’शिकागो’ वरुन येणारे डेल्टा एअरलाईन्सचे विमान धावपट्टीवर उतरल्याची घोषणा झाली आणि जोसेफने एक दीर्घ श्वास घेतला..
“अश्या रीतीने जेमतेम एक महीन्याचे स्वातंत्र्य, आनंद संपुष्टात आले..” जोसेफने मनोमन विचार केला.
’आजच हिला घरी घेऊन जाताना मारुन टाकता आले असते तर कित्ती बरं झालं असतं!’ असाही एक विचार त्याच्या मनात तरळुन गेला. ’आज नाही तर नंतर कधी ना कधी तिचा खुन करायचा आहेच.. मग कश्याला इतके दिवस वाट पहायची?’ जोसेफ खाली मान घालुन विचार करत होता इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला –
“हाय जोसेफ!!.. कसा आहेस”, रोशनीचा आवाज ऐकुन जोसेफ ताडकन उठुन उभा राहीला.. त्याने समोर बघीतले
समोर जेमतेम २६-२८ वर्षाची एक तरूणी उभी होती. उंची साधारण पाच फुट, मध्यम बांधा, डस्की कंम्प्लेक्शन, प्रचंड आत्मविश्वासाने चमचमणारे डोळे, शरीरावर योग्य ठिकाणी योग्य कर्व्हज, चेहर्यावर कधीच न दिसलेली एक मोठ्ठी स्माईल..
काहीतरी बोलण्यासाठी उघडलेले जोसेफचे तोंड उघडेच राहीले..
“काय झालं जोसेफ? मला बघुन आनंद नाही झाला?”, रोशनी
“रोशनी??.. व्हॉट.. आय मीन.. तु,.. अशी….. म्हणजे…” जोसेफला काही सुचतच नव्हते..
“माफ कर जोसेफ, मी तुला आधी सांगीतले नाही. मला तुला सरप्राईज द्यायचे होते. कशी दिसते आहे मी?”, रोशनी
“गॉर्जीयस..तुफान..”, जोसेफला अजुनही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता..
“पण.. पण हे कसं..?? म्हणजे..”, जोसेफ
“लिपोसक्शन सर्जरी केली रे..” रोशनी म्हणाली.. “माझं काही काम वगैरे नव्हते अमेरीकेला. तिकडे गेले आणि सरळ तिन आठवडे दवाखान्यातच काढले बघ. लिपोसक्शनने शरीरातली सर्व अतीरीक्त चरबी काढुन टाकण्यात आली. पायावर सुध्दा मी उपचार केले.. निदान आता मी निट चालु तरी शकते. दोन आठवड्यातच मी खरं तर पुर्ण बरी झाले. पण मग पहीले सर्व जुने कपडे.. एकही परत नाही आणला.. सगळे नविन खरेदी.. कम्प्लीट मेकओव्हर..” रोशनी बोलत होती…
जोसेफची नजर रोशनीच्या महागड्या ज्वेलरी आणि अंगाबरोबर बसलेल्या टाईट आउटफिट्स वरुन फिरत होती.
“तु माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याबद्दल प्रथमच प्रेम वाटु लागले. माझ्या आयुष्यातला एकटेपणा दुर पळाला. सर्व जग सुंदर दिसु लागलं. मला हे आधी सुध्दा करता आले असते जोसेफ, पण मग मला लोकांच्या खर्या आणि खोट्या नजरा कश्या कळल्या असत्या? कोण माझ्यावर प्रेम करतं आणि कोण पैश्यावर हे सुध्दा समजले नसते.
तु माझ्यावर प्रेम केलेस जोसेफ, माझ्या संपत्तीवर नाही. मी जशी होते तसे तु मला स्वीकारलेस. माझं जग तुझ्या येण्याने पुर्णपणे बदलुन गेले. ह्या सुंदर जगात मला फक्त एकच कमतरता जाणवत होती ते म्हणजे माझे बेढब कुरुप रुप. जे तुझ्या नजरेला खुपले नाही ते मला खुपायला लागले आणि मग मला सुध्दा सुंदर दिसण्याची ओढ निर्माण झाली. बस्स.. हीच एक प्रेरणा होती ज्यामुळे आज एक नविन रोशनी तुझ्या समोर उभी आहे..”
जोसेफला काही बोलायला शब्दच सुचत नव्हते. रोशनी नुसती शरीरानेच नाही तर वागण्याने सुध्दा बदलली होती. तिच्या वागण्यातला तो एक प्रकारचा एकलकोंडेपणा, स्वतःला रिझर्व्ड ठेवणे कुठल्याकुठे गेल्यासारखे वाटत होते. आज एका नविन व्यक्तीमत्वात, एका नविन रुपात रोशनी त्याच्या समोर उभी होती…
“पण!!.. तरीही..”
“काही बोलु नकोस जोसेफ..आजपासुन एका नविन आयुष्याची ही सुरुवात आहे आपली..लेट्स मेक लव्ह जोसेफ.. आय एम डाईंग फॉर दॅट मोमेंट..”, जोसेफला थांबवत रोशनी म्हणाली..
*************************************************
[क्रमशः]