Rajeshree books and stories free download online pdf in Marathi

राजेश्री - पुस्तकानुभव

राजेश्री - पुस्तकानुभव

ना. स. इनामदार लिखित या कादंबरी बद्दल थोडक्यात.

एखादी गोष्ट जो पर्यंत आपल्याला मिळत नाही तो पर्यंत आपण तिला मिळवण्यासाठी धडपडत राहतो. त्या गोष्टीबद्दलची ओढ तीव्र होत जाते आणि ती मिळवण्यासाठी आपली धडपड आणखीनच वाढत जाते. ती गोष्ट मिळवल्यानंतर होणारा आनंद, हा स्वर्ग सुखाहूनही मोठा असतो. पण कधी कधी मात्र आपली घोर निराशा होते.

शिवराय, छत्रपती, राजे, महाराज अश्या नावांनी उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपण वाचावे, बोलावे, लिहावे तेव्हढे कमीच. पुण्यातील बऱ्याचशा पुस्तक प्रदर्शनांना अन अक्षरधारा बुक गॅलरीला भेटी होतात. शिवरायांबद्दल नेटवर अन पुस्तकांमध्ये भरपूर वाचणं होतं. पुरंदरेचं राजा शिवछत्रपती, रणजित देसाई यांचं श्रीमानयोगी, बेडेकरांचं शिवचरित्र, जयसिंगराव पवार यांचे शिवछत्रपती एक मागोवा, नामदेवराव जाधव यांची शिवरायांवर लिहिलेली पुस्तके अन असं बरचसं वाचून ऐकून झालेलं आहे. तरीही राजांवर लिहिलेलं एक पुस्तक माझं नेहमी लक्ष वेधून घ्यायचं. पण घेऊ कि नको असे वाटायचे. त्यामुळे बरेच दिवस त्यापुस्तकाबद्दल मनात विचार घोळत होता. डिसेंबर महिन्यात अक्षरधाराचे पुस्तकांचे प्रदर्शन होते, तेव्हा हे पुस्तक खरेदी करण्याचा योग आला.

मराठी लेखकांमध्ये एक प्रतिष्ठित, प्रतिभावंत ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे नागनाथ संतराम इनामदार म्हणजेच ना.सं. इनामदार. आता तुम्ही ओळखलेच असेल कि, मी कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतो आहे. इतिहासातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची ओळख. त्यांच्या झुंज, झेप, शहेनशहा आणि राऊ या कादंबऱ्या वाचल्यानंतर खरंच त्यांच्या जबरदस्त लेखन शैलीची प्रचिती येते. एखादा प्रसंग वाचताना तो आपल्या समोर घडतोय, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत की काय असे वाटू लागते. राजेश्री हि इनामदारांनी अशीच एक ऐतिहासिक कादंबरी. राज्याभिषेकानंतर शिवरायांचा अखेरपर्यंतचा प्रवास या पुस्तकामध्ये इनामदारांनी चितारला आहे. त्यांनी जेव्हा हि कादंबरी लिहिली त्यावेळी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांना अनुसरून त्यांनी हे लेखन केलेले आहे. जवळ जवळ साडे सहाशे सातशे पाने असलेले हे कॉंटिनेंटल प्रकाशनचे पुस्तक, किंमत ४००/- रुपये.

ज्याप्रमाणे राऊ आणि झुंज कादंबऱ्या सुरुवातीपासून पकड घेतात. त्याप्रमाणे राजेश्री मात्र वाचनाची अन मनाची पकड घेण्यास कमी पडते. एकूण चार भागांमध्ये विभागलेली अशीही कादंबरी. पहिला भागामध्ये शिवरायांबद्दल कमी पण कारभाऱ्यांचे प्रसंगच जास्त भरलेले आहेत. मोरोपंत आणि अण्णाजीपंत यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह वर्णन करणारे प्रसंगही इनामदारांनी रंगवलेले आहेत. त्यामुळे पुस्तक कंटाळवाणे वाटते. दुसरा भागात शंभू राजांची प्रतिमा एकदम निगेटिव्ह आहे. बऱ्याचश्या प्रसंगांमध्ये तर शंभू राजांच वागणंच कळत नाही. शंभू राजे सदानकदा शाक्तपंथीय मित्रांच्या संगतीत होम हवन करण्यात गुंगलेले दिसतात. (कादंबरी जेव्हा लिहिली गेली, तेव्हा शंभू राजांबद्दल जेवढे ऐतिहासिक साहित्य उपलब्ध होते. जास्त करून बखरी आणि ज्यांनी त्या लिहिल्या त्यांनी शंभू राजांना बदनाम करण्यासाठी काहीच्या काही काल्पनिक प्रसंग लिहून ठेवलेले आहेत. इनामदारांनी त्याप्रमाणे शंभूराजे रंगवले आहेत, असं मला तरी वाटतंय.) त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला एक प्रकारची निराशावादी छटा असल्यासारखी वाटते. शंभूराजांच्या अशा वागण्यामुळे राजे नेहमी चिंताक्रांत, विचारमग्न असल्यासारखे दिसतात. तिसऱ्या भागामध्ये राजांच्या दक्षिण दिग्विजयाबद्दल माहिती मिळते तीही रायगडावर आलेल्या पत्रांच्या उल्लेखाने वर्णनं आलेली आहेत. तिकडे दक्षिण मोहिमेचे प्रसंग सोडून इकडे कारभाऱ्यांचेच प्रसंग पुस्तकामध्ये जास्त रंगवलेले आहेत. कादंबरीचा चौथा अन शेवटचा भाग काय तो उत्कंठावर्धक अन वाचनीय असा आहे. शंभू राजांचे दिलेर खानाला सामील होणे, भूपालगडचा प्रसंग, आणि जालना मोहीम. दिलेरखानाच्या गोटातून शंभुराजांना सोडवण्यासाठी शिवरायांनी संताजी, मोरोपंत पिगळे आणि हंबीरराव यांच्या बरोबर केलेली जालना मोहीम लक्षात राहते. या मोहिमेचे वर्णन इनामदारांनी जबरदस्त केलेलं आहे. मोरोपंतांची कामगिरी, संताजीचे शौर्य अन बहिर्जी नाईकांनी राजांना सहीसलामत स्वराज्यात आणण्याचे प्रसंग वाचनीय. क्षणा क्षणाला उत्कंठा ताणून धरणारे जबरदस्त प्रसंग या भागात असल्याने हाच भाग तेवढा कादंबरीमध्ये मनाची पकड घेतो. त्यानंतर राजे आणि शंभूराजे यांच्या भेटीचा प्रसंगही काही विशेष ठसत नाही. महाराज शंभू राजांना भेटण्यासाठी टाळाटाळ करत एकांतात चिंताक्रांत बसलेले दिसतात. तर शंभू राजांना जणूकाही नजरकैदेत बंदिस्त करून ठेवल्यासारखे वाटते. राजांच्या अखेरच्या प्रसंगात तर अक्षरशः डोळ्यांत पाणी दाटून आले.

एकंदरीत कादंबरीमध्ये विनाकारण घुसडलेले कारभाऱ्यांचे प्रसंग, शंभूराजेंची नकारात्मक प्रतिमा, आणि त्यामुळे शिवरायांची चिंताक्रांत, निराशावादी तर कधी कठोर प्रतिमा समोर येते. खूप आतुरतेने, उत्साहाने पुस्तक वाचायला घेतले होते पण काहीशी निराशाच झाली. असो. सुरुवातीला पुस्तक वाचावं कि नको असे वाटत राहते पण हळू हळू आपण गुंतत जातो. इनामदारांची लेखन शैली खरंच लाजवाब आहे. प्रत्येक प्रसंग न प्रसंग डोळ्यांसमोरून जात असल्या सारखे वाटतात. ऐतिहासिक कादंबऱ्या ज्यांना आवडतात अशा वाचकांनी एकदा वाचून बघा. मात्र, मनाची तयारी ठेवा. कारण, शंभू राजांबद्दल खटकणारे प्रसंग आहेत.

मी काही कुणी मोठा विचारवंत, प्रतिभासंपन्न, किंवा मोठा तत्वज्ञानी वगैरे नाहीये. पण एक सामान्य वाचक म्हणून मला जे पुस्तक वाचून वाटले, ते मी आपल्या समोर मांडले.

पुस्तकाच्या मागच्या पृष्ठावर रंवींद्रनाथ टागोर यांच्या कायम लक्षात राहतील अशा खूप सुंदर ओळी आहेत.

तुझा संदेश आजही दर्याखोऱ्यांतून गुंजतो आहे.
तुझे नेत्र अजूनही अनागताला न्याहाळताहेत.
तुझी तपस्या,
तुझे ध्येय,
तुझे कार्य,
जणू चिरंतनाला आजही आव्हान देत आहेत.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

धन्यवाद 🙏
चूक भूल माफ असावी.
- ईश्वर त्रिम्बकराव आगम

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED