तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १७ Vrushali द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १७

तो... दरवाजातून आत गेला म्हणजे..... ओम खडबडून जागा झाला. शरीर जरी गोठून गेलं असलं तरी त्याचा मेंदू अजुन विचार करायच्या स्थितीत होता. खूप कष्टाने आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तो नीट पहायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्याभोवती वेढलेल्या धुक्यातून त्याला काही स्पष्ट दिसेना... आपल्या दुबळ्या पडलेल्या शरीराला जोर देत त्याने थोडी हालचाल करायचा प्रयत्न केला परंतु धुक्याच्या दोरखंडाने त्याला पक्क जखडून ठेवल होत.... नक्कीच अनय त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीत अपयशी ठरला...

ओमचा योजनेप्रमाणे त्याने अनयला तिथे पोचल्यावर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. ते व आजूबाजूचा पूर्ण परिसर त्या शक्तींच्या अधिपत्याखाली असणार होता. घरात सर्व वाईट शक्तींचं वास्तव्य असल्याने कोणालाच आत प्रवेश करणं शक्य नव्हतं. ती आतच असणार होती व तिला वाचविण्यासाठी काहीही करून आत जाण गरजेचं होत. परंतु त्यासाठी आतील शक्तींना घरातून बाहेर काढलं तर काही काळासाठी का होईना त्यांचा इथला प्रत्यक्ष प्रभाव कमी झाला असता. त्या शक्तींच शेवटचं अपूर्ण हवन पूर्ण झाल्याशिवाय त्यांना घराबाहेरच्या हद्दीत जाता येणार नव्हतं. ओम अस काहीतरी करणार होता जेणेकरून त्या शक्ती त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर येतील. त्या हल्ल्याच्या वेळात अनय संपूर्ण घराभोवती अभीमंत्रीत राखेने रिंगण रेखटणार होता. त्या रिंगणात ती घराच्या आत सुरक्षित राहिली असती आणि त्या शक्तीही त्यांच्या मूळ कब्जा केलेल्या जागी जाऊ न शकल्याने कमकुवत पडल्या असत्या व बाहेर कदाचित त्या शक्तींशी मुकाबला करन बऱ्यापैकी सोप वाटत होत. मात्र..... ज्या अर्थी कराल आत पोचला त्याचा अर्थ अनय त्याच काम पूर्ण करू शकला नाही.... ओम व गुरुजी दोघेही निपचित पडले होते. बाबा तर कधीचेच बेशुद्ध होते... अनय कुठे आहे हे माहीत नव्हतं...

-----------------------------------------------------------------------घरात ती अजूनही बेशुध्द अवस्थेत पडलेली होती. तिच्या अंगावरची जर्द गुलाबी साडी तिच्यासारखी निस्तेज व अस्ताव्यस्त पडली होती. तिचे केस विस्कटून चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरले होते. तिचे गोरेपान केळीच्या गाभ्यासारखे हात निर्जीवपणे पडले होते. हातातील काही बांगड्या फुटून त्यांच्या काचांचा सडा पडला होता. तिच्याकडे पाहताच करालचा मागच्या जन्मातील राग उफाळून आला. हेच ते स्त्रीचे शरीर जे पाहून त्याचा संयम ढळला होता. त्याने भयंकर संतापाने तिलाही जोराची लाथ मारली... मात्र तिला त्याचा स्पर्शच झाला नाही. तिच्याभोवती एखाद मजबूत कवच असल्यासारखं आपटून तो मागच्या मागे ढकलला गेला. त्याचे लाल डोळे विस्फारून तो तिच्याकडे पाहू लागला... ते शूद्र मानव बाहेर असताना हिला आत वाचवणारा कोण.... त्याने रागाने फुत्कारत सगळीकडे शोधलं. तणतणत तिथल्या सगळ्या वस्तू उलथ्यापालथ्या केल्या.... परंतु काहीच मिळालं नाही.... रागाने तो पुन्हा तिच्यावर प्रहार करणार त्याच लक्ष तिच्या भोवती बनवलेल्या राखेच्या रिंगणावर गेले. इतका वेळ जर्द अंधारात त्याच्या लक्षात आलं नव्हतं. परंतु त्याच्या जागेत.... त्याच्या शक्तींनी भरलेल्या जागेत... कोणीतरी यायची हिम्मत केली होती.. त्याने आपली पेटती क्रूर नजर सभोवताली फिरवली... कोपऱ्यातील अर्धवट तुटक्या खिडकीवर रक्ताचे काही ताजे थेंब ओघळले होते...

-----------------------------------------------------------------------

आतमधून मोठमोठ्याने मंत्रोच्चार घुमत होते... तोच करालचा खडा आवाज... मात्र त्यातील गुर्मी व जरब वाढलेली होती... प्रत्येक मंत्रांच्या उच्चारासोबत वातावरण बदलत होते. अवकाळी आकाशात काळे ढग जमू लागले. मधूनच एखादी वीज जोराने लखलखत होती. ढगांचा गडगडाट सुरू झाला. वारा सर्वच लगाम सुटून उधळलेल्या घोड्यासारखा स्वैर वाहत होता. त्याच्या वेगात कित्येक झाड झुडूप तग धरू न शकल्याने गवताच्या काडीप्रमाणे उन्मळून पडत होते. जंगलात सुकी झाडे वेगाने घासली जाऊन वणवा भडकला व वाऱ्याच्या वेगानेच जंगलात पसरू लागला. समुद्र व नद्याही खवळून निघाल्या. समुद्राच्या लाटा स्वतःची सीमा विसरून उंचच उंच जाऊ लागल्या. करालच्या मंत्रसामर्थ्यावर पंचमहाभूत आपले हात जोडून त्याच्या समोर उभे होते. चंद्रग्रहण संपायला काही मिनिटांचा अवधी होता. पण...पण... आता ते कदाचित कधीच संपणार नव्हते...


ओम डोळे मिटून आपले शेवटचे क्षण आठवत होता. मागच्या काही दिवसांत खूप काही घडून गेलं होत.. जे त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं... गुरुजींची भेट... मजेत दीक्षा घेणं.. मग विचित्र स्वप्नाचा पाठलाग.. पुन्हा गुरुजींचं भेटणं... आणि तो भूतकाळ.... भूतकाळ..... अचानक त्याच्या नजरेसमोर उभ राहील एक हत्यागृह... अंधाराने भरलेल्या त्या मोठ्या सभागृहात कोपऱ्यात काही चरबीचे दिवे भगभगून पेटत होते. त्या प्रकाशात अस्ताव्यस्त पसरलेल्या मृत धडांकडे पाहून ओकारी येत होती... संपूर्ण सभागृह लालभडक रक्ताने व मदिरेने ओलेचिंब झाले होते.... सभागृहात मध्यवर्ती एक क्रूर दिसणारा व्यक्ती स्वतः बळी देत बसला होता.. त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य.... पूर्ण चेहरा आक्रसून दात विचकत केलेलं काळजात धडकी भरवणार हास्य... कराल... हो तो करालच होता... तेच भयानक खुनशी रक्त उतरलेले डोळे... तसाच माज... त्याच्याच बाजूला उभ राहून सर्वांना आज्ञा देणारा व लालसेने पछाडलेला चांद्रहास... घाबरून त्यांच्या आज्ञा पाळणारे व स्वतःच्या जिवाच्या भीतीने हादरलेले काही प्रजानन.... अचानक दूरवर कुठून तरी मंजुळ आवाजात शिवस्तुतीचे स्वर झंकारले.. करालच्या साम्राज्यात देवाचं नाव... त्याची नजर वायुवेगाने त्या आवाजाच्या दिशेने वळली.. कुठल्याशा झाडाखाली पदन्यास करणारी एक तरुणी... तिची जर्द गुलाबी सोनेरी कोरीवकाम केलेली साडी त्या अंधुक प्रकाशात अजुन चमकत होती... तिचा चेहरा पाहिलाय कुठेतरी... ती... तीच आहे का... हो... ती...कसा विसरणार तो हा गोड चेहरा...ती.. त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर स्वप्न... त्याची मैत्रीण....त्याच सर्वस्व... तिच्या मनात छेडल्या जाणाऱ्या प्रेमाच्या तारेचे सुर त्याच्या मनाला कधीच गवसले होते... फक्त कबुली बाकी होती... मात्र घात झाला.. तिच्या वडिलांना कुठूनतरी समजलं व जातीपातीच्या तलवारीने त्याच्या प्रेमाचा गळा चिरला गेला... तिच्या वडिलांनी केलेल्या एका धमकीच्या फोनमुळे त्याच अख्खं आयुष्यचं बदललं.. व तिच्या आयुष्यात काही त्रास नको म्हणून तो चुपचाप तिलाही न सांगता निघून गेला... जायच्या आदल्या दिवशी त्याने जर्द गुलाबी रंगाची साडी भेट दिली होती... त्याची शेवटची आठवण म्हणून... तिच्या केसांच्या सोनेरी छटांना शोभून दिसावी म्हणून त्याने बरेच कारागीर शोधून त्यावर सोनेरी नक्षीकाम करून घेतल होत... नशिबाने सोंगट्या फिरवाव्यात तस त्यांना फिरवलं होत... आयुष्याच्या पटावर अजुन असत तरी काय... आपल्या मनाविरुद्ध खेळी झाली की वाटत बस... आपण हरलो समजून माघार घेतो... पण त्याचा खेळ कुठे पूर्ण झालेला असतो... आपल्यासाठी त्याने टाईमप्लीज दिलेला असतो.. नव्या दमाने नवीन डाव मांडण्यासाठी... आतमध्ये ती होती... हो... तीच... ज्याच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होत... अनय म्हणजे.... तिचा नवरा कुठेतरी त्यांच्यासारखाच निपचित पडून शेवटच्या घटका मोजत असेल... त्यांच्या प्रेमात येणारे तिचे बाबा सर्वांपासून अनभिज्ञ बेशुद्धावस्थेत महत्प्रयासाने मंद श्वास घेत पडून होते... त्यांना वाचवणारा एकमेव आधार गुरुजीही आपल्या जीवाची आशा सोडून निस्तेज डोळ्यांना अंधुक दिसणारा प्रकार पाहत होते... आणि तो...
-----------------------------------------------------------------------