Coronacha vaadhta prasaar books and stories free download online pdf in Marathi

कोरोनाचा वाढता प्रसार....हलगर्जीपणा नको खबरदारी घ्या..!

कोरोनाचा वाढता प्रसार....

हलगर्जीपणा नको खबरदारी घ्या..!

(नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या सावधगिरीबाबत आणि गंभीरतेबाबत आणखी एक लेख शेयर करतोय. कृपया, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे पालन करा. जागरूक राहा.)


तिकडे लोकांच्या दुर्लक्षपणामुळे इटलीमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे. दररोज बाधितांची संख्याच एवढी वाढते आहे की, उपचारासाठी हॉस्पिटल्स आणि सुविधाही अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. लोकांना मरू दिलं जातंय, कारण उपचार करण्यासाठी पुरेशी साधणंच उपलब्ध नाहीयेत. सरकारला पूर्णपणे लॉकडाउन करावं लागलं आहे. तरीही अजून आपल्या लोकांना या गोष्टींचे गांभीर्य नाहीये. मोक्कार बाहेर फिरतायेत, हलगर्जीपणा करतायेत. वेळीच सावध व्हा, नाहीतर येणारे संकट इटलीपेक्षाही महाभयंकर रूप धारण करेल. आणि त्याचे इतके दूरगामी परिणाम होतील, कि त्यातून सावरायला आपणास कित्येक वर्षे लागतील.


लोकांची गर्दी टाळण्यासाठी देवालये मशिदी, चर्च बंद केले आहेत. जरा त्या देवांना तरी विश्रांती द्या. रोज रोज हजारो लोकांची तोंड बघून आणि मागण्या ऐकून त्यांना पण कधीतरी विश्रांती हवी असेल. पूजा अर्चा केल्या तरी प्रॉब्लेम आणि बंद केलं तरी प्रॉब्लेम. लोकांना प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाही. जरा सामंजस्याने घ्या. सर्व कार्यालये एखादं दुसरा आठवडा बंद ठेवण्यासाठी सांगितलं आहे तर ठेवा ना! उगाच आम्ही किती काम करतो, हे दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नाही. पेंडिंग काम परिस्थिती निवळली कि, करालच! थोडा उशीर होईल पण काही फरक पडत नाही.


संपूर्ण जग एका जागतिक संकटाचा सामना करत आहे. आणि अजूनही आपल्याकडे काही विरोधी नेते, विद्यमान सरकारवर आरॊप प्रत्यारोप करत आहेत. सहकार्य करायचं सोडून नको त्या गोष्टी करून विरोध करत आहेत. तर काही नेते या परिस्थितीचा फायदा उठवू पाहतायत. जाहीर सभा घेऊन मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करून स्वतःची जाहिरातबाजी करीत आहेत. जमावबंदी असूनही लोकांना गोळा करून सभा घेतायत! लोकांच्या जीवाशी खेळतायत? लक्षात कसं येत नाही यांच्या?


चीनमध्ये ज्या वुहान शहरामधून या विषाणूचा प्रसार साऱ्या जगामध्ये झाला आहे. अजूनही होतो आहे. त्या शहरामध्ये कालच्या दिवशी एकही नवीन बाधित रुग्ण सापडला नाही. त्या सरकारने तेवढी कडक धोरणं राबवली आहेत आणि लोकांना सक्तीने त्याची अंमलबजावणी करायला लावली आहे. शहरांमध्ये गावांमध्ये सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी चालू आहे. त्यांच्याकडं तेवढी प्रगत साधन सामग्री आणि व्यवस्थापन आहे. म्हणून त्यांनी त्यावर मात केली. विषाणूचा प्रसार आटोक्यात आणला आहे.


इकडे इटलीमध्ये पूणपणे लॉकडाउन करूनही विषाणूचा प्रसार थांबवण्यात यश मिळालेलं नाहीये. आता त्यांच्या वाटेवर अमेरिका आहे. जगातील प्रगत देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये कालच्या दिवसात चार हजारांवर रुग्ण बाधित झाले आहेत. तर दोनशेच्यावर रुग्ण दगावले आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये त्यामध्ये प्रचंड वाढ होईल जर कडक उपाययोजना केल्या नाहीत ! तिकडे अमेरिकेची अशी अवस्था आहे तर मग आपली काय अवस्था होईल? याचा कधी आपण विचार केला आहे का?


किराणा, भाजीपाला, डेअरी चालू आहेत, म्हणून रोज सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडणं बंद करा. शक्यतो एक दोन आठवडे पुरेल एवढा किराणा आणि दोन चार दिवस पुरेल एवढा भाजीपाला फळे आणून ठेवा.


तीन आठवडे अजून व्हायचे आहेत, आकडा २०० पार झाला आहे. अजूनतरी उपचारांसाठी पुरेशी हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स नर्स आहेत. आपल्याकडे एक तर भरमसाट लोकसंख्या आहे. असाच हलगर्जीपणा, निष्काळजीपणा राहिला आणि रुग्णांची संख्या जर आटोक्यात नाही आली तर हॉस्पिटल्स कमी पडतील आणि डॉक्टर्स नर्सही उपचारासाठी मिळणार नाहीत. मग लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय नाही. बाहेर फिरणं तर बंदच! मग, एक तर लोकं रोगाने मरतील नाहीतर उपासमारीने. अजनुही आपल्यावर ती वेळ आलेली नाहीये. आणि येऊ नये म्हणून वेळीच सावध व्हा.


प्रशासनाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा. घरीच व्यायाम करा. सकस आहार घ्या. चांगली पुस्तके वाचा. चांगले चित्रपट बघा. आपल्या मुलांशी खेळा. त्यांना पुस्तकांतील गोष्टी वाचून दाखवा. ओरिगामी शिकवा. बाहेरचं खाणं बंद करा. महत्वाचं म्हणजे, फालतुगिरी बंद करा आणि आपल्याला सगळं कळतंय असं समजू नका. तुमच्यामुळे बाकीचे अडचणीत येतील असे काही करू नका.


काळजी घ्या!

घरीच थांबा!

फक्त काही दिवस!


~ धन्यवाद

~ ईश्वर त्रिंबकराव आगम


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED