अंधारछाया - 4 Shashikant Oak द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंधारछाया - 4

अंधारछाया

चार

मंगला

गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’

हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते. आता हे अंघोळ करून येतील चहा नाश्त्याला, तेंव्हा काढते विषय तिच्याजवळ. आज शनवार आहे. शशी-लता पण गेलेली आहेत शाळेत सकाळच्या. नाहीतर त्यांनी कान टवकारले असते लगेच!

‘बेबी, चहा झाला गं, येतेस का आत स्वैंपाकघरात?

‘हो आले’ म्हणत आली. ‘सकाळ वाचतेय ग. अक्का, पुण्यात विजयानंदला सांगत्ये ऐका शंभर आठवड्याच्यावर चाललाय! माहिती आहे का? मला इतका पाहायचा होता तो! पण काकांना म्हटलं तर वसकन अंगावर आले. काही पहायला नकोत तसले नायकणींचे तमाशापट. मग राहूनच गेलं.’

‘अग आपल्या काकांना कोण देणार तसल्या तमाशाप्रधान सिनेमात काम? म्हणून राग असेल त्यांचा अशा सिनेमांवर’ मी म्हणाले.

चहाचा कप हाती दिला. पाट पुढे सरकवून हे बसले जरा आरामात आणि मग म्हणाले, ‘का गं बेबी, परवा विचारलं कशी काय झोप लागते तुला इथे म्हणून, तर म्हणालीस की छान लागते म्हणून. खरे ना’?

‘हो, का?’

‘हे पहा तो पेपर ठेव खाली. नंतर वाच’.

‘हे म्हणतायत तुला रात्री उठायची सवय आहे उठतेस का तू रात्री?’

‘कोण मी?’

‘अरे गंमतच आहे! तुला काय म्हणायचय की तू उठतच नाहीस म्हणून?’ मी विचारले.

‘हो मी कशाला उठेन? मला रात्री बाथरूमला सुद्धा जायला भिती वाटते म्हणून तर मी झोपतानाच करून येते लताला सोबत घेऊन.’

मी यांच्याकडे पाहिलं. ते गंभीर होते. मग हेच म्हणाले, ‘का ग बेबी, तुला स्वप्नं बिपनं पडत होती का गेले काही दिवस? कोणी सांगतय, उठ चल तिकडे. बाहेर जाऊ. फिरून येऊ. सिनेमाला जाऊ. खायला हॉटेलात जाऊ वगैरे’

‘नाही स्वप्न तशी काही नाही पडली! निदान पडली असली तरी आठवत नाहीत!’

‘बर जाऊ दे. नाही पडत ना? ठीक आहे. मंगला, तू मुलांना व हिला घेऊन आज नाही तर उद्या जरा सांगलीला जाऊन फिरून सिनेमा पाहून या. अंबोळी, इडली खाऊन या’ हे म्हणाले.

‘आज शनिवार बाजारची गर्दी, आम्ही उद्यालाच जाऊ. अहो, मग तुम्ही पण चला की. सगळेच जाऊ.’

ह्यांनी तंबाखूचा बार भरला. पेपर हातात घेऊन चष्मा पुसत हे बेबीला म्हणाले, ‘का ग तुझ्या चपला तू रात्री मधल्या खोलीच्या बाहेर का ठेवतेस? आम्हीतर सगळे बाहेरच्या खोलीतल्या स्टँडवर ठेवतो चपला. गेले चारपाच दिवस पाहतोय मी.’

‘काही नाही असचं. उद्यापासून ठेवीन बाहेरच्या खोलीत हं अक्का?’ बेबी म्हणाली आणि उठून गेली.

शशी–लताला रविवारचा सिनेमा–हॉटेलिंगचा बेत कळला. पोर लागली उड्या मारायला. आमचं ठरलेलं होतं साधारण महिन्या दीड महिन्यातून एकदा जायचे सिनेमाला, फिरायला सांगलीत. टांगा ठरवून.

सगळीकडे झोपाझोप झाली मी कड्या लाऊन कुलुपे लावली. पुढच्या, मधल्या, दारांना. पडले गादीवर. महिला मंडळाचा नवरात्रीचा हिशोब यायचा होता शिंत्रेबाईं कडून. समोरच्या अंबूताईंना बोलावणार आहे गप्पा मारायला. गव्हले छान करतात एक हाती. काकूंनाही दम्याचा त्रास वाढलाय. त्यांना तरी कशाला म्हणावं करणार का? विचार करत करत केंव्हा झोप लागली कळलं नाही.

एकदम जागी झाले! ह्यांच्या गादीवर हात ठेऊन पाहिला. तेव्हड्यात कोपऱ्यातून काठी घेतल्याचा आवाज आला. त्यासरशी उठले मी धसक्यानं! दार उघडलेलं! हातात धुणं वाळत घालायची काठी घेऊन हे बॅटरीच्या प्रकाशात जाताना दिसले. मी ही उठले झटक्यात. सापडली ती केरसुणी घेतली हातात! अनवाणीच गेले बाहेर. तोवर हे पोचले होते फाटकाच्या बाहेर. ह्यांच्या पुढे ही भवानी! तरातरा चालली होती. मला कळेना, ओरडलेच, ‘बेबी, ए बेबी, ढिम्म नाही. हे मागे वळून हातानेच म्हणाले, थांब म्हणून. आणि आपण गेले तिच्या मागोमाग. भस्मे टांगेवाल्याच्या शेजारी पवारची चाळ होती. तिकडे तर नाही चालली ही? मग मला राहववलं नाही, ‘अहो आणा बरं पकडून तिला.’

हे गेले. धरला दंड तिचा. गदागदा हालवल तिला. काही पत्ताच नव्हता तिला. परत फिरवली तर यायलाच तयार नव्हती. दंड सोडवायला पहायला लागली. तेवढ्यात मी पोचले. धरली बखोट्याला दोघांनी आणि ओढत आणली तिला घरात.

इतकं धस्स झालं. पाह्लं तर कोणी उठलेलं नव्हतं म्हणून बरं! नाही तर काय म्हणली असती लोकं?’

घरात पाऊन ठेवलन आणि एकदम आपली हात सोडवून अंथरुणात परत चपला सकट!

यांनी मला खूण केली, असू दे म्हणून. मग मी आणि हे बाहेरच बसलो होतो घराच्या पायरीवर. गार गार वारा होता. कोपऱ्यावरच्या दिव्यामुळे लांब लांब सावल्या हालत होत्या झाडांच्या. मनःस्थिती जरा शांत झाली. तशी हे म्हणाले, ‘जरा कॉफी टाकतेस का? नाही तरी झोप गेलेलीच आहे.’

‘आता कसल्या कॉफ्या पिताय? ह्या पोरटीच काय करायच ते बोला? आता रोज का असं धावायचं मागे?

‘मंगला, तू आज कड्या कुलुपं लावलीस ना? नीट? नक्की?

‘हो?’

‘मग किल्ल्या कुठे ठेवल्यास? मला वाटत ठेवल्या असशील माझ्या उशाखाली!’

‘हो बाई, विसरलेच मी, आपल्या उशाशी ठेवायला! कुलुपं लावली आणि ठेवल्या किल्ल्या कपाटावरच.

‘बेबी काय करत होती तेंव्हा?’

‘काय की बाई! असेल इथेच कुठेतरी. नाही, पण आज लता शशी अन् आजी बसले होते कवड्या खेळत. सगळी अंथरुणावर पडली. मगच मी कुलुपं घेतली घालायला. पोरांनी विचारायला नको म्हणून.’

‘अस्स ठीक! मला वाटतं तिला अजून माहिती नाही आपण बाहेर जाऊन आलोय ते.’

आतून काकूंचा ढास लागल्याचा आवाज झाला. अन आम्ही आत गेलो. ह्यांनी कॉफी करायला लावली. रात्र जागवून काढली आम्ही. बेबीचं उठणं पथ्यावर पडलं म्हणायचं माझ्या!

बेबी

का sss न, का sss न अशा दोन झापडा लगवाव्यात यास्नी! कोण उठाया सांगितलं यास्नी? म्या तर वाईच डाव धरून होतो, किल्या कुठ हैत म्हणून. त्यो दादा उशी खालती ठेवायचा. हात घातला एक डाव. जमेना म्हणताना पडले गप. आज चांगला वकूत आला होता. भैनीनं ठेवलेली पाह्यली किल्ली. मग म्या केलाच चटका. तिकडं ती चाळीच्या कडंला बसली व्हती दबा धरून. पर दोघं दोघं धरून निघाली परत न्यायाला म्हनल्यावर मला बी कुठवर पेलणार? हे नुस्ते बघत बसले व्हते! एक रांडीचा जवळ येईल तर शप्पत! सगळं म्हनत्यात, ‘इकती वर्स झाली. धरलं तवा पासून. देतासा का तिच्या आत?’

आता इकडं आलियात. मी सोडन तिला म्हनून. आलेत संग संग.

त्यो ढोल्या म्हणतो, ‘मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’

चकन्य म्हनतो, ‘हित आलो कशापाई? पुन्याला पाडली झाडं चिंचा-बाभळीची. आता जावं कुठ आमी? आधी भनीचा दादला मारपीट करायचा सनीमा बघतो म्हनून! म्हनून जीव दिला हिरीत. आता बसलोय वाट बघत. पुन्यात लै पंचाईत झालिया. लोकाला ऱ्हायाला जागा न्हाई. आमी तरी कुट कुट बसावं वळचणीला? बरेच दिस पडून होतो हिरीतल्या पिंपळावर. दोन वर्स धरले एका डोरकीपरला. पण ते मेलं. मी बी थांबलो वाट बघत दुसऱ्याची. ही बरी होती. हिचं कुळ झालयं बुढ्ढ! खाईना. पिईना. सोडलं तर धरावं म्हनतोय.’

*****