Andhaarchhaya - 5 books and stories free download online pdf in Marathi

अंधारछाया - 5

अंधारछाया

पाच

मंगला

सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे आठ झाले. काकू वाट पहातच होत्या आमची.

अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय?

रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली.

जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय. आपण महिला मंडळाच्या अध्यक्ष आहात, म्हणून भेटायला आलोय.’ दारातून कटवणार होते. पण ‘आत या’ म्हणावं लागलं. एक बाई होत्या स्थूल, गोरटेल्या. जरा थोराड वाटल्या. घारे डोळे, कलप लावलेले केस विरळ होत चालले होते. दुसरी बरीच ओढग्रस्त खप्पड वाटली. दोघींच्या हातात मोठ्या पिशव्या होत्या. मेतकूट, पापड असावेत असं दिसलं.

कोचावर जरा दबकत बसल्या. पाणी देऊन दोघींसाठी फॅन सुरू केला. आणि म्हटलं, ‘बोला’

त्या थोराड बाई म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीत गाव भागात राहतो. आमचा वाडा आहे गाव भागात. येतानाच्या चढावर. माझे यजमान रिटायर झाले, मग त्यांच्या पेन्शनवर व घर भाड्यावर भागेना. म्हणून घरगुती पदार्थ बनवायचा धंदा करते. मेतकूट, पापड्या, कुरडया, लोणची, मसाले सगळं आम्ही घरी बनवतो. माधवनगरात जर माल विकता आला तर फार बरं होईल. मला जरा मंडळातील बायकांची नाव, पत्ते दिलेत. तर आपल नाव सांगून विकेन म्हणते. बाजारपेक्षा आमचा माल स्वस्त व चांगला आहे. हे बघा सँपल’ असं म्हणत त्यांनी काही पापड कुरडयांचे पॅकेट हातात दिले. माल पाहताच कळत होत चांगला आहे म्हणून. आपल्या हातून जर मदत होत असेल त्यांना तर काय हरकत आहे असा विचार करून ह्यांच्या लेटर पॅडवर बायकांची नाव व पेठा लिहायला घेतले.

बेबीला हाक मारून म्हटले, ‘अग जरा चहा टाकतेस का? आणि हे बघ हे पापड पण आण तळून.’ हो म्हणत बेबी बाहेर आली. पापडाचे पॅक घेऊन आत गेली.

चहा बनवून आणे पर्यंत मी सहज विषय काढला त्यांच्या घराचा. वाडीकरांच्या मंगल कार्यालयात जाताना एकदा पाहिल्यासारखा वाटला बोर्ड. म्हणाल्या, ‘आहे मोठा वाडा. पण भाडे करी जुने. भाडेही कमी. लोकही टाळाटाळ करतात. बायकामाणसांना कोण विचारतोय? शिवाय मागच्या बाजूला एक खोली दिलीय एक गुरूजी म्हणून आहेत त्यांना. ते आठवड्यातून सोमवारी, गुरूवारी येतात कोल्हापुरहून. त्यांना भेटायला लोक येतात कुठूऩ कुठून. आधी आधी कौतुक वाटलं. पण आता डोकेदुखीच झालीय. लागिराचे, भ्रमिष्ठ लोक येतात त्यांना दाखवायला. आणि ओरडा, त्रास आम्हाला होतो. बरं बोलायची सोय नाही. खर तर मला त्यांनीच मदत केलीय काही वर्षांपुर्वी, आमच्या पडत्या काळात.’

मला उगीचच गुरूजींची उत्सुकता वाटली. एकदा वाटलं झाला प्रकार सांगावा का या बाईंना? पाहू काय म्हणतात ते!

चहा आणि पापड तळून आलीच बेबी. आणि मी तो विषय काढला नाही. बेबीची ओळख करून दिली. चहा पिऊन त्या बाई लगेच उठल्या. चपला अडकवून निघायला लागल्या. तेंव्हा बेबीला मी दोन रुपये आणायला सांगितले, पापडाच्या पॅकेटचे. तशा थांबल्या. दोन रुपये हातावर ठेवले आणि म्हणाले त्याबाईंना, ‘जरा थांबता का मला काही बोलायचय तुमच्याशी.’

दुसऱ्या बाई पुढे होते म्हणाल्या. गेल्या. बेबी आतल्या खोलीत गेल्याचे पाहून जरा दबक्या आवाजात त्यांना थोडक्यात सांगितले, काय झाले ते. त्यांचं म्हणणं पडलं आशा केसमधे त्यांच्याकडेच जावे. त्यांचा चांगला गूण आहे. मुख्य म्हणजे ते भोंदू किवा खोटारडे नाहीत व पैसे मुळीच घेत नाहीत.’

‘बरं येते’ म्हणून त्या गेल्या व उगीचच मनाला हलकं वाटलं.

रात्री जेवणं झाल्यावर हे टाईम्स वाचत बसले होते कोचावर. तेंव्हा रोडिओचा आवाज जरा मोठा करून मी ह्यांना त्या बाईंबद्दल व गुरुजींबद्दल सांगितले. तसे हे म्हणाले, ‘हे पहा, उद्या डॉ. फडणिसांकडे घेऊन जा पाहू. त्याना दाखवून ते टॉनिक्स वगैरे देतात का ते विचार. जरा जाऊदेत दोन चार दिवस. कदाचित थांबेल तिचे बाहेर जाणे आपोआपच.’

त्या रात्री काहीच घडलं नाही. तिच्या चपलाही मधल्या दाराशी नव्हत्या!

मंगळवारी सकाळी आम्ही डॉक्टर फडणीसांना जाऊन दाखवले. त्यांनी नेहमी प्रमाणे हसत खेळत तिला बोलतं केलं. वजन उंची घेतली. नाडी, बीपी घेतला. केस पेपर तयार करून मला म्हणाले, ‘जनरल वीकनेस आहे. हिमोग्लोबिन पाहायला हवं. ब्लड, युरीन टेस्ट करून घेऊ. मी ही औषध देतो ती रेग्यूलर घ्या.’

एकदा वाटलं सांगावे का यांना रात्रीचे प्रकार? पण हे म्हणाले होते, डॉक्टरांशी या बाबत बोलू नकोस म्हणून.

संध्याकाळी आम्ही शनिवार पेठेतील दत्ताला जाऊन आलो. आजी मधल्या खोलीतल्या दारात बसल्या होत्या. शेजारच्या पाटलीण बाईंशी बोलत. म्हणून तिथे चपला काढून आम्ही आत आलो. थोड्या वेळानं शशीनं सगळ्या चपला बाहेरच्या खोलीत स्टँडवर ठेवलेल्या पाहिल्या. मी भाकरी करत होते. तेवढ्यात हे आले. सायकल भिंतीला वाकडी करून लावत जरा त्रासातच बोलले, ‘बेबा कुठाय? तिच्या चपला इथे मधल्या दारात कशा? मी चमकलेत. बेबीने पटकन चपला बाहेरच्या खोलीत नेल्या. आजची रात्र कशी जाणार होती? मी तेंव्हाच ठरवलं गुरूवारी गुरूजींना दाखवायचं.

बुधवारची सकाळ उजाडली. बेबीला पाहिलं अंथरुणात आणि मनांत हायसं वाटलं. ‘आता आजची रात्री ठीक जाऊ दे रे बाबा’ असे म्हणत मी स्वामींना नमस्कार केला. दुपारची भिशी होती, शरयूबाई भिड्यांच्याकडे. छान झाले होते दोन्ही पदार्थ. पण माझे मनच त्यात नव्हते. धागधूक होती. ही आजींबरोबर राहील ना? घरात निघून जायला रात्र थोडीच लागतेय? भिशीत इतर कोणाला आणायचे नाही असं ठरल होतं, म्हणून माझ्याही नाईलाज होता!

चपला काढता काढता बेबीच्या चपला दिसल्या. आपण जरा जास्तच धास्तावलो होतो की काय असं वाटलं.

त्या रात्री ह्यांनी सगळ्यांच्याच चपला दडवून ठेवल्या कुठेतरी. म्हणाले, ‘चपला मुळेच अडत असेल तर आज रात्री ही काही जात नाही.’

गुरूवारचा दिवस उजाडला. दुपारचा चहा घेऊन साडेतीनला सांगलीला जायचं ठरलं आमचं. तेवढ्यात ह्यांना शेठचा फोन आला. म्हणून ह्यांच येणं रहीत झालं. चहा पिता पिता मी बेबीला म्हणाले, ‘अग सांगलीला एक ज्योतिषी आहेत. पत्रिका, हात वगैरे पाहतात. दादा म्हणाले, ‘दाखवून ये तुझी पत्रिका त्यांना. जाऊ या का आपण आज?’

‘आज? माझी तर काहीच तयारी नाही. आजच जायला हवे का? उद्या परवा जाऊ?’ बेबी म्हणाली.

‘नाही, आजच भेटतात ते म्हणे. चल कपडे बदल. निघू अर्ध्या तासात.’ तिने माझी पांढरी साडी नेसली. पर्स वगैरे घेऊन आम्ही सव्वाचारला बस स्टँडवर होतो. रेल्वे क्रॉसिंगचे फाटक बंद होते. म्हणून गाड्या अडकल्या होत्या. एक मालगाडी गेली रेंगाळत. फाटक उघडायला सुरवात झाली तशी आम्ही जरा तयारीत उभ्या झालो, तो हिची पाठ माझ्या बाजूला झाली. पहाते तो पोलक्यावर काळ्या फुल्या! काळ्या कुळकुळीत! डिजाईन सारख्या फुल्या! मी पटकन तिचा पदर पाठीवरून ओढून घेतला. तिला म्हटले, ‘अगं पाठीवर काय हे पाहिलस का?

‘काय आहे?’ म्हणत तिने माझ्याकडे पाहिले. इतक्यात धूळ उडवत बस आली. आम्ही लगबगीने आत चढलो.

गुरूजी

ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय असे म्हणा माझ्याबरोबर 108 वेळा. मी देतो ही पुडी भस्माची आहे. ती रोज सकाळी संध्याकाळी लावायची आणि कमीत कमी रोज 108 माळा करायच्या. मला येऊन सांगायचं पुढच्या गुरुवारी. मी मंत्र दिला. इतक्यात बाई चहा घेऊन आलेल्या दिसल्या. बऱ्याच दिवसात बाई माझ्या करता चहा घेऊन आल्या नव्हत्या. मला आश्चर्यच वाटलं!

प्रत्येकाचं असच असतं. गरज असली की मारतात लोक चकरा. पुढे कुणी कुणाला विचारतही नाही. या बाईंना इतकी मदत केली. माझ्या सारखा खंबीर म्हणून निभावलं मी. हिचे यजमान मला ही खोली घेऊन रहा म्हणाले, पुढे ही बाई बरी झाली. मग पुढे आमच्याकडे येण्याचं बंद झालं. मग कुठला चहा अन काय!

बाई या ओकबाईंना चहा द्यायला आल्या होत्या होय! त्यामुळेच मला चहा मिळाला म्हणायचा! चहा घेता घेता ओक बाईंनी विचारले, ‘आपण कुठले? ही विद्या कुठे शिकलात? आपणाला भुतं खेतं त्रास देतात का?

मग मी सविस्तर उत्तर देत गेलो. ‘मी तसा हरिपुरचा. जळितानंतर नांद्र्याला प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी आलो. लहानपणापासून भुताखेतांचे प्रकार पाहिलेले. तिथेच एक जोशी महाराज म्हणून होते. शिवाचे भक्त. त्यांना भूत प्रेत योनीच्या माध्यमाशी बोलता येई. त्यांनी बऱ्याच लोकांना सोडवले. सुधारले. प्रथम मी भीत असे असल्या प्रकारांना. मग धीट झालो. त्यांच्या कडून ॐ नमः शिवाय मंत्र घेतला. त्यांच्या हाताखाली काम केले. त्यांनीच कुंडली पहाणे, हस्तसामुद्रिक, थोडाफार आयुर्वेद शिकवला. पुढे ते वारले. तसे लोक माझ्याकडे यायला लागले. मग मी इतर गावात गेलो. लोक तिथेही पिच्छा पुरवीत. आता मी कोल्हापुरात दोन दिवस व इथे दोन दिवस येतो. सोमवारी आणि गुरूवारी.

चहा घेऊन त्या गेल्या. मी पुढली केस घेण्यासाठी आलेल्या पागोटेवाल्यांना म्हणालो, ‘या मामा.’

******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED