Andhaarchhaya - 1 books and stories free download online pdf in Marathi

अंधारछाया - 1

अंधारछाया

एक

मंगला

खर तर सगळं आठवलं की अंगावर शहारे येतात. आणि मन सुन्न होऊन जातं! आता चांगले सहा महिने झाले त्या सगळ्याला, तरीही झोप चाळवतेच!

आज ते पत्र येऊन पडले आणि जीव भांड्यात पडला. बेबीचं लग्न आहे म्हणे. मुलगा नागपूरकडचा. पुण्यात आई-वडील आहेत. नोकरीला नागपुरात आहे म्हणे. पण ही पसंत पडली पाहिजे ना. हं जाऊ देत. उद्या हेच ठरवतील पुढं काय करायचं ते. आता इतकं त्यांच्यामुळं निस्तरलयं! साहजिकच काका-काकूला, ह्यांना बोलावल्याशिवाय लग्नाचं पुढचं ठरवणं कसं प्रशस्त वाटणार? जाऊ दे. उद्या पाहू.

मी हळूच लताला मधून ह्यांच्या पलिकडे सरकवली. सरळ ह्याच्या कुशीत गेले. ह्यांचा हात अंगावर घेतला. इतकं निर्धास्त वाटलं! का कुणास ठाऊक एक एक आठवायला लागलं...

आम्ही राहायला आलो माधवनगरात ते इस्लामपुरहून. ट्रकने सामान आलं. आम्ही मिलच्या कार मधून. माधवनगर गाव तसं टुमदार. सात वारांच्या सात पेठा. म्हणजे काय गल्ल्याच. एका बाजूला रेल्वे स्टेशन. पलिकडे कॉटन मिल. सांगली तासगाव-विटे जाण्यासाठी हेच स्टेशन उपयोगी. म्हणून स्टेशनात ही चांगली वर्दळ. मिल मालक ब्राह्मण म्हणून काम करणारे कटाक्षाने ब्राह्मण. शिवाय गावात मागांचा धंदा. त्यामुळे गल्ली गल्ल्लीत खटर-फटरचा सतत आवाज. आधी आधी तर डोकं भणभणे त्या आवाजाने, मधोमध सांगलाकडून बुधगावकडे डांबरी रस्ता. वाटेत रेल्वे फाटक. तिथेच बस स्टॉप.

आम्ही उतरलो तो ट्रक येऊन अर्ध सामान आत गेलेलं! शशी, लता तर आधीच ट्रक मधून आले होते. सामान लावलं गेलं. आठ दिवसात आसपासच्या ओळखी झाल्या. महिला मंडळात नाव घातले. यंदा मलाच अध्यक्ष केलय बायकांनी. म्हसकरांचा गाण्याचा क्लास लावला. गेल्या वर्षी भिशी चालू केली. फटक्यात स्टीलच कपाट घेतलं ह्यांच्या मागे लागून. आधी म्हणाले हे, ‘कशाला’ म्हणून, पण मीच जोर केला!

गेल्या मे मधे दोन वर्ष झाली आम्हाला इथे येऊन. आल्या नंतरच्या मेमधे शशी म्हणतो बाई मुंजीची तारीख चार मे साठ की काय म्हणून. आमचे शशोबा म्हणजे काय? काय काय तारीख-वार लक्षात ठेवत असतो! झाली थाटात मुंज त्याची. अगदी माझ्या मनासारखी. स्वामी पुर्वी म्हणायचे, ‘जनार्दन, मुंज करशील शशीची तेंव्हा यथासांग वैदिक पद्धतीने झाली पाहिजे. बरं. हे प्रथम सांग, तू संध्या करतोस की नाही? हे ‘करतो’ म्हणाले, पण दुसऱ्या दिवशीपासून लागले करायला! स्वामी म्हणजे काय, लगेच मला खडसावलं त्यांनी, म्हणाले ‘मंगला, तू लक्षांत ठेव. डामडौल जास्त नको. संस्कारांवर भर दे. तुझं असतं याला बोलावू, त्याला बोलावू.’

झालं बाई सगळं यथास्थित. तीनशे पान झालं मुंजीच्या दिवशी. शिवाय घरची पंचवीस–तीस लोकं. सात आठ दिवस राहायलाच आले होत ते वेगळेच. गुप्ते काका, चिटणीस डॉक्टर, आमचे काका, नाना, सगळी टक्कलवाली मंडळी मधल्या हॉलमधे बसून होती चक्का फेटत. हसत खेळत तीनशे जणांचे श्रीखंड फेटलं सगळ्यांनी! शशी, लता होते सगळ्यांच्या टकलावरचा घाम पुसतं! नंतर एक दिवस आमरस-पुरी, रात्री पिठलं-भात, एक दिवशी भरीत-भाकरी, मजा आली सगळ्यांना.

ह्यांचा धंदाही छान चाललाय. पुण्यात गेले की काका-काकू विचारायचे, ‘काय शांते, कसा काय चाललाय पंतांचा धंदा?

‘छान चाललाय’, हसून म्हणताना ऊरात इतकं भरून येई. मग ह्यांचं पुराण सुरू होई, किती माणसं कामाला आहेत, सध्या कुठे कुठे माल जातो, यावर्षी काय काय दागिने घेतले, काय अन काय. तिकडे पर्वत्यांच्याकडे गेलं आजोळी की, आजी विचारे, ‘शांते ठीक चाललय ना गं बाई सगळं? ‘हो ताई, खूप छान’ म्हणे मी. पण आजीच्या डोळ्यातलं पाणी पाहून मलाही थांबवत नसे. जवळ जाऊन मायेनं हात फिरवलानं की फार फार जवळ गेल्या सारख वाटे. खरच आई असती तर असच वाटल असत का? मग मला काय म्हणाली असती ती?

बापूंचं गर्जना करणार बोलणं, ‘काय शांता बाई केंव्हा आलीस? सर्व कुशल मंगल? ऐकल्याशिवाय बरच वाटायचं नाही. बापूंना ह्यांच्या बद्दल फार जिव्हाळा वाटे. ह्यांचा थाट तसा गंभीर. मध्यम उंची. पोट सुटल्या सारखं. चेहेरे पट्टी गोलसर. रंग गोरटेला. गोबरे गाल घारे डोळे. चटकन कोणाशी न बोलणारे. बापूंच्या भाषेत विदेशी साहेबाच्या म्यानर्सचे!

आजी विचारे, ‘कसे काय आहेत बाळकोबा? मुलं कशी आहेत? खरे तर माझ्या लग्नापासून त्यांच्याकडे पर्वत्यांचे येणे-जाणे कमीच झाले. त्यामुळे दिवाळी, मेच्या सुट्टीत गेले की माझ्याकडूनच त्यांना माहिती कळे.

‘आहे, आता सुभाष, एसटीत लागलाय नोकरीला, बेबी यंदा मॅट्रिकला आहे. श्रीकांत आहे नववीत. सुमन आहे तिसरीत. काकांनाही मिळाल्येत एक दोन पिक्चर्सची कॉन्ट्रॅक्ट्स. गेल्या महिन्यात मुंबईची माणसं आली होती. उग्रमंगल नाटक बसवताय का विचारायला. काकूची कथा-कीर्तनं, भजनं चालू असतात दुपारच्या वेळी.’

रग लागली म्हणून हात काढला अंगावरचा ह्यांच्या. पांघरूण ओढलं ह्यांच्या अंगावर. लतीचा फॉक नीट केला. शशीचे हात-पाय नीट केले. मोरीवर जाऊन आले. मच्छरदाणी जरा ठीक खोचली आणि झोपले कुशीवर.

काका

‘मी बाळकोबा. जुन्या नाटकातून प्रोज काम करणारा. बलवंत मधे होतो बरेच दिवस. त्याआधी बाकीच्या कंपन्यातही हजेरी लावली. नंतर वय ही वाढलं. पुण्यात प्रभातमधे बोलावल दामल्यांनी मला. मग तिथेच राहिलो. रमलो. आता दिसायला ही अंधुक झालय. तेंव्हा जरा जास्त विश्रांतीच घेतो. मला मुलं दोन अन तीन मुली. एकीच लग्न झालेय ती दिलीय ओकांच्याकडे. शांता तिचे नाव. सुभाष एसटीत अकौंट्स खात्यात. सरोज - बेबी म्हणतो आम्ही तिला – यंदा मॅट्रिकला पुन्हा बसतेय. श्रीकांत आहे नववीत. धाकटी सुमन तिसऱीत गेलीय.’

मी बोललो खरं खरं. त्या फोटोग्राफर व चश्मिश वार्ताहराबरोबर. राजा कामतेकरान धाडला होता त्याला. ‘रसरंग’ मधे मुलाखत घ्यायला. मी म्हटले, ‘घ्या लेको मुलाखत. नट म्हटला की ते छपवाछपवी, भानगडी, नशापाणी वगैरे असणारच अशी झालीय सध्या समजूत. आमच्याकडे पहा लेको. आज साठी उलटली पण भलते सलते काही केलं नाही. आपले काम बरे की आपण बरा.’

‘गेले चाळीस वर्षे राहतोय सदाशिव पेठेतल्या बोडस वाड्यात. आहे एकच दोन खणी खोली. पण आहे कामचलाऊ.’ एवढ्यात सौ आल्या चहा घेऊन. त्यांना चहा देऊन बसल्या स्टूलावर. पदर सावरून बोलणार इतक्यात मीच म्हणालो, ‘या आमच्या सौभाग्यवती. हा आमचा द्वितीय संबंध. पहिली पत्नी पहिल्याच बाळंतपणानंतर आजारात वारली. पर्वते तिकडचे आडनाव. पहिली मुलगी शांता तिचीच.’

जुजबी नमस्कार चमत्कार झाले. तसा कॅमेरा उचलून जाताना चश्मिश म्हणाला, ‘दिवाळी अंकात येईल छापून.’ मग मी कलंडलो कॉटवर. डोळ्यावर ठेवला रुमाल पसरून आणि पडलो स्वस्थ.

मुलाखत दिली मी. पण माझी खरी मुलाखत माझ्यापाशी चालू झाली. झाली साठी आपली. काय पडलं आपल्या गाठी? म्हणायला ठीक आहे हो हे मुलाखतीत की मी कामाकरता कोणाच्या दारी गेलो नाही म्हणून पण आता पश्चात्ताप होतो कधी कधी. ‘रामशास्त्री’त मोठा रोल देणार म्हणत होते दामले. करता करता काही बिनसलं. पार्ट्या पडल्या. त्यात आमची उगीचच वर्णी लागली त्यांच्या विरोधकात! आणि तो रोल आला लेल्याचा पाच मिनिटांचा! ‘ज्ञानेश्वर’ मधे अशी चीड आली डायरेक्टरची. पण नाव ना बर मी हेच काम करीन असं म्हणायचं माझ्या स्वभावात नाही. तोही रोल गेला पुढं!

प्रभातला कंटाळून दोन तीन नाटक कंपन्यात काम केली. एकच प्याल्यात सुधाकर केला गंधर्वाबरोबर. आधी बालगंधर्वांची अवस्था मोडकळीची. त्यात ती गोहराबाई. तीन-चार प्रयोग झाले पण लोकांनाही गंधर्वांचा आदर राहिला नाही म्हणा किंवा सिनेमाच्या आकर्षणाने म्हणा, नाटक चालेना. टरचूभावबंधन मधलं माझं पेटंट काम धुंडीराजाचं. काय एक एक डायलॉग आहेत पान पानभरून आधीच गडकरी मास्तरांच नाटकं त्यात ते पात्र गोष्टी वेल्हाळ. झाले काही प्रयोग विदर्भात, तिकडे खाली गोव्यात. मा. दत्तारामने खूप कष्ट केलेन. पण पुण्या-मुंबईत नाटक चालेना. मग कंटाळले सगळेच. प्रयोगाच्या पैशाचा भरवंसा राहीना, प्रभातला मग पुन्हा चिकटलो झालं.

सौ. नेहमी म्हणायच्या, ‘अहो जरा व्हाव पुढं. म्हणावं मला हा रोल द्या. इथली माझी सीनियारिटी पहा. कालची पोर तुमच्या पुढं जातात आणि तुम्ही मात्र असेच? खरच मी हा असाच. तडकफडकपणा कमी. संताप यायचा खूप. मग कुढत बसे घरात. हे बरं पडतं कॉटवर कलंडून पडलेलं.

सायकलची घंटा वाजली. सुभा आला वाटतं ऑफिसातून. चला आता त्याच्या बरोबर चहा होईल. मग फिरायला जावे सारसबागे पर्यंत. तेवढ्यात पाय वाजलेले वाटले कुणाचे. कोण असेल? की भास असावा? ‘चहा काका म्हणून ऐकलं. डोळे किलकिले करून पाहतो तो, ही, बेबी कपबशी हातात घेऊन!

‘केंव्हा आलीस ग?’ मी विचारलं.

‘झाला बराच वेळ सुभ्या आला. त्याला चहा केला. श्रीकांताही चहा घेऊन गेला सायकलवरून बाहेर, आई येईल आता देवळातून. मी बसलेय पडवीत बाहेर अभ्यासाला.’

चहा सावकाश ओतला बशीत आणि पहात होतो पडवीत. बेबी आमची जरा हडकुळीच. मॅट्रिकची ही पोरगी. अजून आठवी-नववीच्या मुलींपेक्षा जरा चणीनं लहानच वाटते, रंगही जरा फिक्कट. दोन लांब लचकशा वेण्या. मी कितीकदा म्हणतो, ‘बेबे जरा खावं झडझडून, काय हे चिमणीच्या घासाचं जेवण? शक्ती यायची कशी तुला ती शांती बघ कशी होती खाणंपिणं यथास्थित अन् कामाला वाघ!

चहा थंड झाला होता. पुढच्या दोन घोटात संपवला. कपबशी कॉट खाली सरकवली. थोडं तोंडावर पाणी मारून शर्ट बदलला. धोतर सावरलं. टोपी घेऊन पंपशू पायात सरकवला.

हिराबागेपर्यंत वर्दळ संपली. माझी चाल मंदावली. मोठी पोस्टर्स लावून लाऊडस्पीकरवरून कुठल्याशा सिनेमाची जाहिरात करत वरात पुढे चालली होती. गीताबाली अन् देव आनंद काय नाव सिनेमाचं म्हणाला जोराच्या आवाजात नाव नीट कळलं नाही. हा देवानंद लेकाचा बारा पंधरावर्षात कुठं पोचलाय! आत्ता आत्ता अठ्ठेचाळीसपर्यंत आमच्या बरोबर हम एक है मधे होता प्रभात मधे. शामळू लेकाचा! त्या मानाने रेहमानला बरे मिळाले रोल प्यासाबिसात, मलाही हिन्दीत जायला हवं होतं पुर्वीच. निदान शांतीला तरी करायच होतं पुढे सिनेमात.

शांती तिचं नाव काढलं की घरच्याना वाटतं मी निंदा करतोय त्यांची. पण आता आहेच ती तशी त्याला कोण काय करणार!

ती गोरी, शाळेत एकदम हुशार. कामाला ताठ. तर यांना सदा आळस भरलेला! तो शिंक्या सदा सायकलवरून भटकतो मित्रात. दिडदमडीचे त्याचे मित्र! एकही धड नीट अभ्यासात. त्यात त्याची जीभ जड. नुसते केसांचे कोंबडे करून हिंडायला हवं झालं. बेबी एक अशी. गेले चारपाच महिने टॉनिकची बाटली लावलीय द्राक्षासवाची. पण काय उपयोग ना शरीर तरतरीत ना बुद्धी तल्लख!

मला वाटतं बेबीला जरा हवा पालटासाठी पाठवावी शांतीकडे माधवनगरला. सुभ्याला सांगावं पत्र पाठवायला तिच्याकडे. पावले झपाझप पडली. बागेतला गणपती लवकर आला असे वाटले. देवाला हात जोडले. काय मागावे कळेना! आपल्याला रोल मागावा हिन्दी पिक्चर मधे की तो इंग्रजीत गांधी-नेहरूंवर सिनेमा काढणार आहेत त्याच्यातल्या रोलची मागणी करावी? स्क्रीनटेस्ट तर छान झाली होती गांधी करता. का त्या कीचकवधाच्या आणखी प्रयोगा बद्दल मागावे? अरे हो विसरलोच ते मध्यंतरी ते फॉर्म भरून पाठवले होते मुंबईला सुभ्याने साठीच्या वरच्या नटांना पेन्शन देतय सरकार म्हणे! त्याचं काय झालं कोणास ठाऊक! एव्हाना पत्राचं उत्तर तरी यायला हव होतं. की बेबी, श्रीकांतच्या नीट वागण्याबाबत मागू की बाबा यांना नीट मार्गी लाव. बेबी आता लग्नाची होईल. ती नीट पास होऊ दे. श्रीकांताची वाईट संगत सुटू दे.

काय मागावे तेवढ्यात धक्का बसला. लोकांच्या गर्दीमुळे मला हलायला हव होतं. काहीच न मागता!

रात्री कॉटवर पडल्या पडल्या पुन्हा विचार आला. शांतीला कळवाव पत्रानं. बेबीला ठेव तुमच्याकडे. जरा अभ्यास घे. यंदा मॅट्रिकला गचकता कामा नये. पंतांना विचारून कळव म्हणावं लवकर. म्हणजे सोबतीनं पाठवता येईल तिला कोणाच्या तरी. नाहीतर सुभाषच पोचवील पासावरून. रामकृष्ण हरी...!

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED