Andhaarchhaya - 9 books and stories free download online pdf in Marathi

अंधारछाया - 9

अंधारछाया

नऊ

दादा

मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी.

भूत-पिशाच निकट नहीं आवै ।

महाबीर जब नाम सुनावै ।।

हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म! म्हणजे आधीचा जन्म आणि आत्ताचा जन्म यांना जोडणारा काही सांधा, दुवा आहे. जो शरीरातीत आहे. तोच आत्मा किंवा जीव!

हे आत्मे, जीव आपले आधीचे शरीर टाकून जर निखळपणे आले तर त्यांना आधीच्या जन्माचे आठवणार नाही. पण काही संतमंडळी नाही का सांगत, ‘अहो पुर्वजन्मीचे उरलेले कार्य करायला हा जन्म घेतलाय आम्ही! म्हणजे हा आत्मा आपल्या बरोबर ह्या इच्छा – वासना घेऊन येऊ शकतो बरोबर म्हणायचा! बरोबरच आहे! ती इच्छा-वासना अती प्रखर असेल तरच ती बरोबर येणार. ती चांगली असेल लिखाणाची, संशोधनाची, जगदुद्धाराची तर भलेच होणार त्या आत्म्याकडून जगाचे! पण तिच वासना नीच, नकारात्मक किंवा हलकी असेल पण पुर्ती न झाल्याने प्रखर असेल तर मात्र ती कदाचित या भूत पिशाच्च योनीतून सफल होत असेल.

मग यांना माध्यम कोण? यांच्या वासना जर मानवी असतील तर त्याच्या पूर्तीसाठी माणूस हवा. एखाद्याला माणूस मारून खाव वाटला तर तो कदाचित वाघ किंवा सिंह यांना पकडून वासनपूर्ती करेल. पण एखाद्याला बाईच्या भोगाची किंवा पंचपक्वांनाच्या जेवणाची अशी वासना करून मृत्यू आला, तर मग त्याला माणूस हेच माध्यम!

मग यांना कुठले लोक मिळणार पछाडायला? वीक माइंडेड! वीक माइंडेड म्हणजे तरी काय? हे मनच आधी काय भानगड आहे? हे कुठे आहे हेच कळत नाही! तर तर वीक की स्ट्रॉंग कसे ठरवणार? ते हार्ट, लिव्हर सारखे थोडेच माहिती आहे कि बाबा पहा कार्डिओग्राम काढून किंवा आणखी काही करून!

मन म्हणजे कंटीन्युअस फ्लो ऑफ थॉट्स असे त्याचे स्वरूप असले तर वीक–स्ट्रॉंगचा प्रश्नच येत नाही. काय वीक आणि काय स्ट्रॉंग विचार करणार? सगळे कल्पनेचेच खेळ!

कल्पना! हे विचार म्हणजे काय? कल्पनांचे तरंगच की! संकल्प विकल्प यांचे! करेक्ट, आता लक्षांत आले की ज्यांचा संकल्प–विकल्प किंवा कल्पना, मिथ्या, नेभळट, सामान्य त्यांचे मन कमकुवत - वीक! या उलट जे नेमके उदात्त, सत्प्रवृत्तीचे, विचार करणारे, पॉझिटिव्ह थिंकींगचे, ते बलवान मनाचे असले पाहिजेत! म्हणूनच जे वीक माइंडेड तेच असल्या वासनाधारी आत्म्यांचे बळी होतात!

पण असे कोण असतील ते नेहमी स्ट्रॉंग माइंड बाजूचेच विचार करत असतील? सर्वसामान्यांचे विचार हे दोन्हींचे मिश्रण असणार! मग क्षणात जो माणूस वीक विचार करेल तोच दुसऱ्या क्षणाला स्ट्रॉंग विचार करेल. त्यामुळे असे निखळ स्ट्रॉंग किंवा वीक विचार करणारे फारच कमी. किंबहुना नाहीतच!

मग खर तर सगळेच पछाडले जावेत या भुताखेतांनी! कारण आत्ता पर्यंत मेलेले जर मानगुटीवर बसायचे म्हणाले, तर प्रत्येकाला एक एक तरी घ्यावा लागेल उरावर!

पण तसे नाही. याचा अर्थ प्रत्येकाची काही वाही वासना जरी अतृप्त राहिली तरी त्यांचा फ्रीक्वेन्सी इतकी स्ट्रॉंग नसणार. त्यामुळे मेजॉरिटी या भूत पिश्शाच योनीत जात नसावेत. जे जातील ते इतके कडेलोटाचे त्या वासनेत बुडलेले असतील की त्यांच्या पूर्तीशिवाय त्यांना अशक्य वाटत असेल आधीचे आयुष्य!

असे आले आणि बसले मानगुटीवर? तर यांना काढायचे कसे? का त्यांची मनमानी चालू द्यायची? दिली तर कितपत? यांना हरवायला येणार कसे? काय उपाय? उपाय जालिमच हवा कारण रोग जालीम तर उपाय जालिमच! म्हणून पूर्वी ते देव-देवर्षी मारझोड करीत चिंचेच्या फोकाने, चाबकाने, धुरी देत उलटे टांगून कडूलिंबाच्या पानांची! नाही नाही ते छळ करत! शिवाय पैसे उकळण्यासाठी पिळवणूक करीत ती वेगळीच! दुसरा उपाय म्हणजे शॉक ट्रीट मेंट वगैरे किंवा तिसरा म्हणजे हा गुरूजींचा, जपाचा!

हा जप खरे तर काय करतो? या जपाचा आणि भुताखेतांचा कसा काय डायरेक्ट संबंध? त्यांच्यात अशी कुठली शक्ती की नुसत्या शब्दासरशी आपण या भुताखेतांना नामशेष करू शकतो?

जप म्हणजे तरी काय? ही देवता, हा देव – राम, कृष्ण, शंकर माझ्यापाठीशी आहेत. ते आधार आहेत ही भावना करून देतो. त्यामुळे त्या मंत्राचे सारखे उच्चारण जप करताना आपल्या मनात एक प्रकारचे विशिष्ठ भावनेचे तरंग निर्माण करतो. ते तरंग त्या संकल्पांच्या भावना इतर वाईट, असत् विचारांना येऊ देत नाहीत. म्हणजेच विकारी मनाला बांधून ठेवतात. वासनामय आत्म्यांच्या विचारांना, कल्पनांना बंधनात कोंडून एक सारखे ते चांगले मंत्र तरंग हळू हळू देव-देवतांचा आधाराच्या कल्पनेने मनाला घट्ट बळकट निर्भय बनवतात. वीक माइंडेड माणसातल्या वासना, भय आत्म्याला निष्प्रभ बनवतात!

पण हे मंत्र, जे आपणाला सांगितले जातात की बाबांनो, राम, कृष्ण, शंकर, देवी-देवतांचे म्हणा. हेच का म्हणायचे? अन्य उच्चार केला तर नाही का चालणार? नाही तरी संस्कृत भाषेत किंवा त्यातून निर्माण झालेल्या भाषेतच ॐ नमःशिवाय याला विशिष्ठ अर्थ आहे! उद्या चिनी माणसाला या ॐ नमःशिवाय मधे काही अर्थ वाटणार नाही! मग या शब्दांना अर्थ नाही! काहीही म्हटले तरी चालेल!

खरचं, चालेल का? नाही चालणार! कारण या शब्दोच्चाराला आज कित्येक जणांनी म्हणून, त्याचा वापर करून त्या मंत्राच्या शब्दांना एक प्रकारचे वजन, धार आणली आहे. ती इतर शब्दोच्चारांना नाही! त्यामुळे आधी पासूनच्या चालत आलेल्या मंत्र जपाचे सिद्ध झालेले आहे! ॐमधून निघणाऱ्या लहरी अत्यंत प्रखर आणि वैशिष्ठ्यपूर्ण आहेत! ॐला तोड नाही! त्यामुळे इतर शब्दोच्चार त्याच्या तोडीचे नसतील! तसेही असू शकेल!

विचार करता करता किती वेळ निघून गेला, कळलेही नाही. कपडे करून ऑफिसला जायला निघालो तेंव्हा मनांत आले या विषयावर चर्चा करावी गुरूजींजवळ. मांडावे आपले विचार. विचारावे हे फुल्या किंवा अतर्क्य काम कोण करतो? कसे करतो?

******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED