मागील भागावरून पुढे.......
आरती घरी आली तेच मोठा विजय झाला त्या अभिर्भावात.. तिचा प्रसन्न चेहरा... बघूनच बाबा काय ते समजून गेले...
" बाबा मला जॉब मिळाला..." ती घरात शिरल्या शिरल्या म्हणाली..
" अरे वाह.... अग ऐकलेस का ? " बाबा नी आईला हाक मारली.
" देवा जवळ साखर ठेव... आरतीला जॉब मिळाला आहे.. "
" अग बाई खरंच की काय ? " आई चकित झाली.. कारण काल रात्री दोघींचा विषय झाला होता.. त्यात तिचे शिक्षण, अनुभव नसणे वैगरे बघून दोघीनाही अजिबात
शक्यता वाटत नव्हती. पण कॉल आलाय म्हणून ती गेली होती तेव्हडाच इंटरव्यू चा अनुभव म्हणून...
पण लकीली तिला हा जॉब मिळाला होता. आणी त्यात त्या करण चा खूप मोठा हात होता.. त्याने चुकीने तिला कॉल पाठवला होता. आणी सरांनी माहित नाही काय बघून तिला जॉब ऑफर केला होता... रात्री तिने घडलेली सगळी घटना आईबाबा नां सांगितली.. ते ऐकून दोघे खुश झाले.. तिला जॉब मिळाला म्हणून नव्हे तर तिने त्या करण ची नोकरी वाचवली म्हणून... सगळे खुश होते.. खूप दिवसांनी ह्या घरात आज आनंदी वातावरण होते..उद्या सकाळी वेळेवर जायचे असल्यामुळे आरती लवकर झोपली.. आणी आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या बाजूला पडली...
आरतीने खुप वाईट दिवस पाहिले होते. कॉलेज ला असताना तिच्या बरोबर शिकणाऱ्या दोन मुलांनी तिच्यावर बलात्कार केला होता.. मित्र मित्र म्हणून केलेल्या ह्या कृतीचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला.. ती काहीशी एकलकोंडी झाली , अभ्यासात घसरली..
त्यानंतर सुरु झाला कोर्टाचा खेळ... सतत तीन वर्ष ती कायम तणावात जगली... आणी अखेर त्या दोघांना सात वर्षाची शिक्षा झाली..पण ही तीन वर्ष लोकांच्या घाणेरड्या नजरा , टोमणे सगळे सहन करत आरती आणी तिच्या कुटुंबाने काढली.. म्हणून जेव्हा आरतीचे कॉलेज पूर्ण झाले तेव्हा लगेचच सगळ्यांनी ते शहर सोडले आणी कोणालाही काहीही न सांगता ते मुंबईला निघून आले..
नवीन शहर... नवीन माणसे... त्यात पण सगळे कामात एव्हडे व्यस्त की त्यांना ह्या नवीन आलेल्या लोकांकडे पाहायला पण वेळ नाही तर त्यांना टोमणे मारणे तर खुप लांबची गोष्ट आहे...
त्यामुळे हळूहळू आरती बसलेल्या धक्यातुन सावरत बाहेर आली.. बाबा आपली नोकरी सोडून आले असल्याने आता त्यांना एक छोटीशी नोकरी करावी लागत होती. आणी त्याच कारणाने तिला कामाची खूप गरज होती आणी आता तिला पटवर्धन ग्रुपज ऑफ कंपनी मध्ये नोकरी मिळाली होती.. तात्पुरती का असेना पण सॅलरी चांगली होती.. महिना पंचवीस हजार रुपये तिला मिळणार होते आणी कदाचित तिला कायम करण्यात आले तर साधारण चाळीस एक हजार पगार मिळण्याची शक्यता होती..
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ती ऑफिस ला आली.. ऑफिस ची वेळ साडे दहाची होती.. पण तिच्या घरून येणारी बस इथे यायला सव्वा दहा वाजता वाजत होते. पण जर मध्ये ट्राफिक वैगरे लागले तर लेट होईल आणी लेट आलेले सरांना आवडत नाही म्हणून ती लवकरच निघाली.. आणी आता ती गेट जवळ आली तेव्हा नुकतेच दहा वाजले होते.
आता इतका वेळ काय करायचे ? तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला.. आणी तेव्हड्यात जुई पण गेट वर आली..
" काय ग इथे का उभी आहेस ? " तिने अगदी सलगीने विचारले...
" ऑफिस टाइम साडे दहाचा आहे.. त्यात माझा पहिलाच दिवस मग काय करू सुचत नव्हते... "
" बस्स एव्हडेच..... चल माझ्या बरोबर... कँटीन ला मस्त चहा घेऊ मग तु देशपांडे सरांना भेट ते सांगतील तुला काय करायचे , कुठे बसायचे वैगरे... "
" ह्म्म्म... " आणी आरती तिच्या बरोबर आत जाऊ लागली...
" मॅडम...? " सिक्युरिटी गार्डस ने तिला अडवले...
" नवीन एम्प्लॉयी आहे... अपाईंटमेन्ट लेटर आहे.. कार्ड आज बनेल..." जुईनेच त्याला उत्तर दिले.. आणी आपले कार्ड त्याला दाखवले...
" सॉरी मॅडम... तुम्ही जाऊ शकता..." तो बाजूला होत म्हणाला...
" बरं झाले तु होतीस नाहीतर त्यानं सोडले नसते.. आणी उशीर झाला असता तर पहिल्याच दिवशी सरांचा ओरडा खावा लागला असता.. "
" अहं... त्यांना लेटर दाखवल्या नंतर त्यांची हिम्मत झाली नसती तुला अडवण्याची.. "
" म्हणजे? " न समजून आरतीने विचारले..
" अग.. नेहमी देशपांडे सर लेटर वर सही करतात.. पण तुझ्या लेटर वर स्वतः मोठ्या सरांनी सही केली आहे.. म्हणजे तुला सरळ सरळ त्यांनी अपॉइंट केले आहे... मग तुला अडवण्याचा मूर्खपणा तो करेल ?" जुईने हसत हसत स्पष्ट केले.. तो पर्यंत दोघी कॅंटीन ला पोहोचल्या होत्या..
" काय घेणार ? चहा की कॉफी ? " जुईने तिला विचारले...
" कॉफी... " ती उद्गारली..
जुईने सराईत माणसासारखी पटकन जाऊन कॉउंटर वरून दोन कॉफी आणल्या..
" ह्म्म्म... घे... अग मी पण तुझ्या सारखीच लवकर येते.. नंतर मग खूप उशीर होतो.. ह्यावरून मी सरांची खूप बोलणी खाल्ली आहेत म्हणून आता लवकर येते आणी मग इथे कॉफी पिऊन मग वरती आपल्या डेक्स वर जाते.. "
" छान आहे... मी पण उद्यापासून असेच करत जाईन..." आरती खुश होत म्हणाली.. सव्वा दहा वाजत दोघी उठल्या... आणी आपल्या तिसऱ्या माळ्यावर निघून गेल्या.. जुईने आपला डेक्स कडे मोर्चा वळवला..
" पुढे गेलीस की शेवटचा दरवाजा आहे त्या केबिन मध्ये देशपांडे सर बसतात.. त्यांना प्रथम भेट.. मग ते तुला पुढील सूचना करतील..." तिला मार्गदर्शन करत जुई ने सांगितले..
" बरं.. " म्हणून आरती सरळ देशपांडे सरांच्या केबिन कडे गेली..
" मे आय कम इन सर..? "
" एस... कम इन प्लिज... "
" सर ...? "
" ओह मिस. आरती आलात तुम्ही ? चला मी तुम्हाला तुमचे टेबल दाखवतो.." देशपांडे उठत म्हणाले..
मग त्यांनी तिला तिच्या जागेवर नेले..
" हे तुमचे टेबल.. ऑल द बेस्ट... आणी काही कळले नाही तर हीला विचारा... बाय द वे... ही रीमा ही सगळे सांगेल.. "
" रीमा.. ही आज पासून जॉईन झाली आहे.. तिला काही अडचण असेल तर जरा मदत कर.. " रीमा कडे वळून देशपांडेनी तिला सूचना दिल्या..
" शुअर सर... तुम्ही काळजी करू नका..." रीमा ने हसतमुखाने आश्वासन दिले...
" गुड... गुड.... मिस.आरती तुम्ही बसा काही वेळातच काही फाईल्स मी पाठवतो त्यांची टॅली करून द्या.. काही गडबड तर नाहीना ते बघा.. ठीक आहे ? "
" चालेल सर... थँक्यू सर... " आरतीने म्हंटले.. आणी देशपांडे नी काही वेळातच एक मोठा फाईल्स चा गठ्ठा प्युन करावी तिच्या कडे पाठवला... तो गठ्ठा बघूनच तिला धडकी भरली... बापरे... एव्हडे सगळे चेक करायचे ह्यात तर सहज दोन दिवस निघून जातील...
तिच्या मनात विचार यायला आणी रीमा ने तिच्या चेहऱ्यावरील भाव अचूक वाचले...
" काळजी करू नकोस.. हे असेच असते... तु नवीन आहेस नां म्हणून नाहीतर आपल्याला सगळी कामे कॉम्युटर वर करावी लागतात... हे फक्त तुला जरा सराव व्हावा म्हणून आहे... सावकाश कर कोणी विचारणार नाही..." रीमा म्हणाली तसें आरतीच्या जीवात जीव आला..
एकदा तिने त्या गठयाकडे पाहिले आणी वरची एक फाईल काढून चेक करायला सुरवात केली... आणी असे करता करता.. किती वेळ गेला तिला माहितच नव्हते... अगदी लक्षपूर्वक ती आपले काम करत होती...
" ए... हाय... रीमा.... गुड मॉर्निग..." अचानक आलेल्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली..
एक गोरापान , कुरळ्या केसाचा , रेखीव चेहऱ्याचा तरुण आरतीच्या बाजूच्या टेबलवर येऊन विराजमान झाला होता.. तिने पटकन घड्याळात पाहिले.. आता बारा वाजले होते.. हा एव्हडा उशिरा कसा आला...? ह्याला माहित नाही की सरांना उशिरा आलेले चालत नाही..?
" गुड मॉर्निग ...? अरे आता बारा वाजायला आलेत..." रीमा ने त्याला घड्याळ दाखवत म्हंटले..
" अरे काल काय झाले माहित आहे ? तो मुलगा सावरून बसला.. कामाचे सगळे त्यांनी बाजूला ठेवले.. " तो कामाच्या बाबतीत एकदम बेशिस्त असावा..
" सर.... तुम्हाला मोठ्या सरांनी आत बोलावले आहे..." प्युन त्याच्या टेबल जवळ येत म्हणाला.. आणी त्याने चेहरा पाडला...
" जा आता.. बहुतेक आज तुझे बारा वाजणार आहेत. "रीमा ने हसत म्हंटले..
" बरं आहे नां... नाहीतरी मी पण तेच बघतोय... " तो पण हसत म्हणाला.. आणी आरतीला आश्चर्य वाटले.. पटवर्धन सरांनी त्याला बोलावले तरी त्याला बिलकुल भीती वाटतं नव्हती...
" कोण आहे हां ? " आरतीने इशाऱ्याने रीमा ला विचारले .
" करण....करण पटवर्धन... सरांचा मुलगा..." रीमा शांतपणे म्हणाली.
" काय ? " आरतीच्या तोंडून स्वाभाविकपणे निघून गेले. आच्छा म्हणजे हां तोच होता ज्याच्या मुळे तिला चुकून अपॉइंटमेंट लेटर आले होते.. तिला विश्वास बसत नव्हता की तो चक्क तिच्या बाजूलाच बसला होता...
" हो... आता सर त्याला चांगलाच झापत असतील... ह्या महिन्यातील त्याची ही तिसरी वेळ आहे लेट येण्याची.. "
" पण तो इथे का काम करतोय ? म्हणजे आपल्या सारख्या बरोबर? आणी त्याला भीती नाही वाटतं का सरांची...? "
" नाही. तो एकदम वाया गेलेला आहे.. म्हणून सरांनी मुद्दाम त्याला इथे कामाला ठेवला आहे.. त्याला पण काम वैगरे अजिबात आवडत नाही.. पण पॉकेटमनी देत नाहीत म्हणून तो नाईलाजाने कामाला येतो..." रीमाने सांगितले आणी आपल्या कामाकडे वळली... त्यामुळे आरतीने पण मग आपल्या कामाकडे लक्ष वळवले...
" मी आत येऊ ? "
" या... तुमचीच वाट बघत होतो... झाली का सकाळ ? "
सर जाम भडकले होते..
" आज का उशीर झाला...? ह्या महिन्यात ही तिसरी वेळ आहे.. "
" सकाळी जागचं आली नाही.." तो मक्खपणे म्हणाला..
" करण... हे असे चालणार नाही... मी तुला आधी पण सांगितले होते... आता ह्या महिन्यात तुझा दोन दिवसाचा पगार कापायला सांगितला आहे मी देशपांडे नां.... "
" अरे...पप्पा पण... " तो सांगण्याचा प्रयत्न करत होता.
" काही बोलू नकोस काल रात्री कुठे होतास ? " त्यांनी विचारले.. त्यावर करण काही बोलला नाही..
" काल रात्री पण कोणत्यातरी नाईट क्लब ला गेला अशील ? रात्री वेळेवर झोपायचे नाही मग सकाळी जाग येईल कशी ? काल त्या मुलीला लेटर पाठ्वलेस.. माहित होते नां आपल्याला M.com. मुलगी हवी आहे तर मग तिला कसे काय लेटर गेले...? झोपेत काम करता का ? "
त्यावर पण करण काही बोलला नाही.. शेवटी वैतागून सरांनी त्याला जायचा इशारा केला...
तो खांदे पाडून आपल्या टेबल वर आला...
" मग आज तरी इच्छा पूर्ण झाली की नाही?" रीमा ने विचारले.
" नाही नां ग.. ते मला काढत पण नाहीत आणी उलट जास्तच छळतात .... आता ह्या महिन्यात माझा दोन दिवसाचा पगार कापायला सांगितला आहे देशपांडेनां.." तो मलूल आवाजात म्हणाला.. आणी रीमा हसू लागली...
दुपारी दोन वाजता त्यांचा लंच टाइम झाला.. आणी सगळे जेवायला बसले...
" करण.. ! ये रे जेवायला..." रीमाने त्याला बोलावले..
" अग नको मी कॅन्टीन ला जातोय जेवायला... " असे म्हणून तो खाली जेवायला गेला. आरतीने डब्बा आणला होता..
म्हणून ती आणी रीमा तेथेच जेवायला बसल्या...
आणी जेवताना त्यांच्या गप्पा चालू झाल्या.. थोड्याच वेळात तिची आणी रीमाची घनिष्ट मैत्री झाली... आरती पण खुश झाली.. पहिल्याच दिवशी तिला रीमा , जुई सारख्या मैत्रिणी मिळाल्या होत्या... त्यामुळे तिला आता इथे चांगलेच रमायला लागले होते. ती कामात एकदम चोख होती. वेळेच्या बाबतीत एकदम काटेकोर होती. त्यामुळे तिला कधी देशपांडे सरांन कडून काहीही ऐकून घ्यावे लागले नाही...
तसा इथला स्टाफ सगळा चांगला होता.. अपवाद एक करण...
त्याचे वागणे बेछूट होते.. सगळ्या बरोबर त्याची घनिष्ट मैत्री होती... पण कामात दिरंगाई , वेळेवर न येणे हे प्रकार पण सर्रास चालू होते.. आणी त्यामुळे सरांचे बोलणे खाणे पण आले...
" रीमा.. अग.. ह्याला नोकरीची पर्वाच नाही का ग ?" नेहमी प्रमाणे तो सरांच्या केबिन ला गेला असताना आरतीने विचारले..
" त्याला खरं तर नोकरीच करायची नाही... पण सर त्याला काढत नाहीत आणी पॉकेटमनी पण देत नाहीत म्हणून तो पण आपल्या मनाला येईल तसें वागत असतो... "
" खूप वाया गेला आहे का ग ? " आरतीने काहीश्या शंकेने विचारले..
" हो... खूपच.. "
" मग तुम्ही लोक त्याच्याशी का बोलता..? त्याच्याशी बोलणे सोडून द्यायचे नां ? "
" एक मिनिट... एक मिनिट... तो वाया गेला आहे म्हणजे तो पितो , रात्रीचे क्लब ला जातो असे म्हणायचे आहे मला... पण इथेच काय पण बाहेर पण त्याचे स्त्रियाशी वागणे एकदम जन्युअल आहे.. तो कोणत्याही मुलीशी बिनधास्त बोलू शकतॊ , तिची मस्करी करू शकतो... पण त्याच्या मनात पाप नसते.. त्या बाबतीत तो एकदम चांगला आहे.. आणी तो बाहेर काय करतो ह्याचे आपल्याला काय करायचे आहे. इथे तो आपल्या बरोबर नीट वागतोय नां बस्स झाले.." रीमा तिला समजावून सांगत म्हणाली... आणी करण परत आला म्हणून त्यांचे बोलणे खुंटले..
" रीमा तुझ्या मैत्रिणीला विचार की मला कधी पार्टी देणार आहे..? हा जॉब माझ्या मुळे तिला मिळाला आहे... "
करण ने रीमा ला विचारले.. आरती त्याच्या पासून अंतर ठेऊन वागत होती , फारशी त्याच्याशी बोलायची नाही.. म्हणून त्याने रीमाच्या माध्यमातून तिला ही गोष्ट ऐकवली... आरतीने रागाने त्याच्या कडे बघितले...
" बापरे... मी घाबरलो नां...! " करण आज खूप मस्करी करायच्या मूड मध्ये होता आणी आरती तिच्या बरोबर झालेल्या प्रकारामुळे शक्यतो मुलां पासून लांबच राहत होती... आणी हां तर नेहमी तिच्या बरोबर प्लटिंग करण्यात गुंतलेला असायचा..
त्या सगळ्याचा वीट येऊन एके दिवशी तिचा संयम सुटला आणी ती त्याच्यावर भडकली... त्याला खूप काही बोलली... ती खूप चिडली होती... त्याला स्वतःच्या नोकरी बद्दल अजिबात पर्वा नव्हती पण त्याच्या बरोबर लागून आपली नोकरी पणाला लावायला ती अजिबात तयार नव्हती.. मिळालेली ही नोकरी टिकवणे तिच्या साठी खूप गरजेचे होते. त्याच्या बरोबर बोलताना , मस्करी करताना कदाचित मोठ्या सरांनी बघितले तर त्यांना ते खचितच आवडणारे नव्हते...
तिच्या भडकण्याने तो एकदम गोरामोरा झाला. ह्या ऑफिस मध्ये त्याच्याशी कोणी असे फटकून वागले नव्हते. ती अशी सगळ्या समोर घालून पाडून बोलल्याने त्याला एकदम गिल्टी फील होऊ लागले..
सॉरी... मिस. आरती , मी जरा मस्करी करत होतो... तुम्हाला राग आला असेल तर मला माफ करा... एव्हडेच तो म्हणाला आणी तेथून निघून गेला... दुपार नंतर त्याचा पत्ता नव्हता... पण झालेल्या प्रकारची बोंबाबोंब सगळया ऑफिस ला झालेली असल्याने देशपांडेनी झालेल्या प्रकारची खबर पटवर्धन सरांना लागू दिली नाही...
पण त्या दिवसापासून तो एकदम बदलला... आता तो रोज वेळेवर कामाला येऊ लागला.. आपल्या कामावर नीट लक्ष देऊ लागला.. परिणामी त्याच्या काम पण लवकर होऊ लागले.. बाकीच्या सगळ्यांशी त्याचे समंध जरी अजूनही मैत्रीपूर्ण असले तरी आरती पासून तो आता चार हात लांब राहायचा.. पूर्वी तिच्याशी बोलायला उत्सुक असलेला तो , आता तिच्या जवळपास पण फिरकत नव्हता.. असे होता आता आरतीला इथे कामाला लागून पाच महिने झाले होते.... ह्या पाच महिन्यात तिने एकही दांडी मारली नव्हती... कामात कसूर केली नव्हती.. तिचे वागणे अगदी मर्यादशील होते.. त्यामुळे तिला कायम करण्यात येईल असेच सगळ्यांना वाटत होते...
आता मार्च एंडिंग आली. आणी कामाचा पसारा वाढला... त्यादिवशी तिला दिलेली कामे काही संपत नव्हती... त्यामुळे देशपांडे सरांनी तिला आणी आणखीन तिघांना काम पूर्ण करूनच घरी जाण्याच्या सूचना केल्या होत्या.. नाईलाजाने तिला , करण ला आणी दोघांना थांबणे भाग होते.. संध्याकाळी सहा वाजता सुटणारे ऑफिस आता आठ वाजले तरी उघडे होते...
ती आपल्या कामात दंग होती.. त्यात तिला एके ठिकाणी घोळ सापडला... पण कशामुळे ते काही तिला सापडत नव्हते... ती एकदम हैराण झाली. तेव्हड्यात त्याचा फोन वाजू लागला..
" हॅलो.... "
" ............."
" ऑफिस ला आहे यार.... "
" .............."
" हो आहे माझ्या लक्षात... काम संपवून येतो मी... "
" .............."
" हो रे बाबा नक्की येतो... दहा वाजे पर्यंत येतो मी... "
" .............."
" ओके... बाय..." त्याने फोन ठेवला... आरती त्याच्या कडे पाहत नव्हती पण तिने त्यांच्यातील बोलणे ऐकले होते.. त्यावरून तिला अंदाज आला की त्याला कुठेतरी पार्टीला जायचे असावे आणी त्याच संदर्भात त्याला हां फोन आला होता...
" झाले का ?" त्याने उतावीळ पणे विचारले..
" नाही नां.... ह्यात एक घोळ आहे पण कुठे तेच सापडत नाही... " ती पण एकदम रडवेली झाली होती.. खरं म्हणजे ते काम झाल्या शिवाय तिला घरी जाता येणार नव्हते... आणी इतक्या उशिरा ती कधी घरी गेली नव्हती..
मग करण पण त्या फाईल्स चाळायला लागला. तिचे बरोबर होते.. घोळ तर होता पण सापडत नव्हते.. आता ह्यात खूप वेळ जाणार होता... सगळे पहिल्या पासून पुन्हा चेक करावे लागणार होते..
" तु एक काम कर... खूप उशीर झालाय तु घरी जा... मी हे बघतो... " करण म्हणाला...
" नको... नको.... हे करूनच आपण जाऊ..." तिची पण इच्छा होती घरी जाण्याची. तिला पण घरून दोन वेळा फोन येऊन गेला होता पण तिला भीती वाटतं होती की , आपण जाताच सगळे गुंडाळून हां सरळ पार्टीला निघून जाईल.. आणी तसें झाले तर काम काही होणार नाही आणी उद्या पटवर्धन सरांचा ओरडा आपल्याला खावा लागणार... आणी त्याचा परिणाम तिच्या नोकरीवर होण्याची शक्यता होती..
ती जायला तयार नाही म्हणून मग त्याने खांदे उडवले आणी सगळे परत कामाला भिडले.. आता रात्रीचे नऊ वाजले आणी अखेर त्यांना ती चूक सापडली.... आता तासा दीड तासाचे काम राहिले होते..
" करण आम्ही जातो यार.. खूप उशीर झालाय..." त्याच्या बरोबरचे दोघे त्याला म्हणाले.. ते दोघे लांब राहत होते.. एक वसई ला राहत होता तर दुसरा बदलापूर ला.. त्यांना आता जरी निघाले तरी घरी जायला साधारण बारा वाजणार होते...
" हां तुम्ही निघा....." मी हे सगळे आटॊपून निघतो... ते गेल्यावर आता ऑफिस ला करण आणी तीच उरली... शेवटी एकदाचे साडे दहा वाजता त्यांचे काम पूर्ण झाले...
" चला झाले एकदाचे.." करण खुश झाला.. आता त्याला पार्टीला जायला मिळणार होते... आणी आज उशिरा पर्यंत काम केल्यामुळे उद्या लेट आले तरी चालण्या सारखे होते. तो खुश झाला... ती आणी तो दोघे बाहेर पडतच होते तेव्हड्यात पटवर्धन सर पण केबिन बाहेर आले..
" अरे इतक्या उशिरा पर्यंत तुम्ही काय करत होतात...? "
" उद्या काही फाईल्स पाठवायच्या आहेत.. त्याची तपासणी करत होतो.. " करण म्हणाला..
" करण , हिला घरी सोडून ये... "
" नको सर... मी जाईन... " आरती ने पटकन सांगून टाकले..
" नो... मिस. आरती...तुम्ही ऑफिसच्या कामा साठी थांबल्या होतात तर मग आपल्या एम्प्लॉयी ला व्यवस्थित घरी पोहोचवणे हे आमचे काम नाही का ? "
" करण... हिला व्यवस्थित घरी सोडून ये... उद्या दोघेही उशिरा आलात तरी चालेल....." असे म्हणून सर निघून गेले..
त्याचा चेहरा पडला.. आधीच त्याला पार्टीला जायला उशीर झाला होता त्यात आता हिला सोडायला जायचे म्हणजे... शी... तो वैतागला...
तिला पोर्च मध्ये थांबायला सांगून तो आपली कार आणायला गेला...
" बसा... " तिला विचारत पडलेली बघून तो म्हणाला.. आरती त्याच्या बरोबर जावे की नाही ह्या बदल साशंक होती. तिच्या बरोबर घडलेल्या प्रसंगामुळे आता तिचा कोणत्याही पुरुषावर विश्वास बसत नव्हता..
" अग बस नां आता.... आधीच माझ्या पार्टीचे तीन तेरा वाजलेत आणी त्यात तुला सोडायचे काम पप्प्पानी मागे लावलेय..." तो खूप वैतागला होता... ती पण आपल्या विचारातुन बाहेर येत काहीशी घाबरत त्याच्या कार मध्ये बसली.. त्याने घड्याळात एक नजर टाकली... आणी सुसाट कार काढली...
" जरा हळू चालव नां गाडी.. मला भीती वाटतेय..."
" ह्म्म्म... " त्याने गाडीचा स्पीड कमी केला..
" एक काम करूया का...?"
" काय ? "
" मी जेवलो नाही.. आणी आता पार्टी ला जाऊन पण काही फायदा नाही तेव्हा इथे जवळच एक छान हॉटेल आहे तर आपण जेऊ या का ? "
" नको... नको.... आपण सरळ घरी जाऊया..." ती घाबरून म्हणाली..
" अग असं काय करतेस ? तुला सोडून परत येई पर्यंत हॉटेल बंद होईल... जरा माझा तरी विचार कर.. "
थोडा वेळ विचार करून तिने मान डोलावली...
दोघे हॉटेल मध्ये शिरले...
" तु काय घेणार ? "
" मला काही नको... "
" किमान कोल्ड ड्रिंक तरी..." कोल्ड ड्रिंक चे नाव काढताच ती आणखीन घाबरली... कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्या मित्रानी तिच्यावर अत्याचार केला होता...
" नकोय मला..." ती जरा रागाने म्हणाली.. आणी त्याला ह्यातले काही माहित नसल्याने त्याला वाटलं की तिला इथे घेऊन आलोय म्हणून राग आलाय.. त्यामुळे आता तो पण जरा चिडलाच आज तिच्या मुळे त्याच्या सगळ्या प्रोग्राम चा विचका झाला होता. त्या दिवशी पण ती त्याला खूप बोलली होती...
" हे बघ... आरती, मला माहित नाही तुझा काय प्रॉब्लम आहे.. पण मला तुझ्यात काडी इतका ही इटरेस्ट नाही म्हणजे आता मला प्रेम वैगरे ह्यावरच विश्वास राहिला नाही... त्यामुळे मी तुझ्याशी जवळीक वैगरे करण्याच्या प्रयत्नात आहे असा जर तुझा समज असेल तर तो डोक्यातून काढून टाक... समजलं.. " तो रोखठोक म्हणाला...
" हां... आता मी मज्जा मस्करी करतो.. पण म्हणून काय मी चारित्र्याने अघळपघळ आहे असा होत नाही नां? "
त्याच्या त्या बोलण्यावर ती निरुत्तर झाली.. तिला स्वतःचा पण थोडा राग आला.. त्या बिचाऱ्याला काय माहित तिच्या बाबतीत काय घडले आहे ते... आपण उगाच कोणाचा राग कोणावर काढला...
" सॉरी करण... "
" इट्स ओके... बोल आता काय खाणार आहेस..? "
" नको मला खरोखर.. अरे घरी आई बाबा वाट बघत असतील... "
" बरं जरा तुझा फोन दे... "
" कशाला...? "
" अग दे ग... खूप प्रश्न विचारतेस तु.. "
त्याने पटकन तिच्या मोबाईल मधून आईला फोन लावला.. आई ह्या नावानी सेव्ह होता नंबर...
" हां... अग कुठे आहेस तु ? कधीची वाट बघतोय आम्ही... " आईने तिचा नंबर बघून सरळ बोलायला सुरवात केली...
" एक मिनिट... एक मिनिट... आई मी तिचा कलीग बोलतोय.. करण.. "
" करण..? मग आरती कुठे गेली ?" आईने भांभावून विचारले..
" आहे इथे. काळजी करू नका... मी ह्या साठी फोन केला की , आम्ही तासाभरात घरी येतोय.. तुम्ही जेऊन घ्या... मला पण खूप भूक लागली होती म्हणून मी तिला घेऊन जेवायला आलोय..."
" अरे मग इथेच यायचे होते नां.. मी बनवले असते...? "
" असुदे उगाच तुम्हाला कशाला त्रास..काळजी करू नका तिला अगदी घरा पर्यंत सोडून जाईन... तिच्याशी बोलायचे आहे..? "
" हो.. द्या.. "
" ह्म्म्म... घे आई आहे तुझी... " त्यानं मोबाईल तिला दिला.
" हा... आई.. "
" अग कशाला जेवायला गेलीस ? "
" अग त्याला खूप भूक लागली आहे.. आणी मला सोडून येई पर्यंत सगळी हॉटेल्स बंद होतील म्हणून जेवूनच पुढे निघू म्हणाला... "
" बरं.. सांभाळून ये... "
" हो.. चल ठेवते..." आरती म्हणाली...
" आता बोल काय खाणार..? वेटर ला पण घरी जायचे आहे.. लवकर सांग..."
" काहीही चालेल... "
" नॉन व्हेज चालेल का ? बटर चिकन आणी रोटी ऑर्डर करू का ? "
" चालेल.. "
" बरं दोन बटर चिकन आणी चार रोट्या..." त्याने ऑर्डर दिली... ती यायला वेळ लागणार होता म्हणून ते गप्पा मारत बसले..
" करण , तुला एक विचारू ? राग येणार नसला तर ? "
" ह्म्म्म विचार... "
" तु मगाशी म्हणालास की तुझा आता प्रेमावर अजिबात विश्वास राहिला नाही.. काही घडले आहे का...?" तिच्या प्रश्नावर त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... तिची नजर चोरत तो उगाच कुठे तरी लांब बघत बसला...
" जर तुला सांगून त्रास होणार असेल तर मी हट्ट करणार नाही... पण मला वाटते की तु मन मोकळे करावेस... "
" तिचे नाव... आराध्या.... " त्याने सावकाश आपले डोळे टिपले आणी सांगू लागला...
पुढील भाग लवकरच.....
© सर्वाधिकार लेखकाकडे...