Prem ase hi - 6 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम असे ही (भाग 6)

मागील भागावरून पुढे.....


करण ने आपले प्रेम व्यक्त केले आणी तो लग्नाला तयार झाला. इथूनच त्यांच्या प्रेमाचा नवीन अध्याय चालू झाला.. आता ऑफिस सुटल्यावर पण तो किंव्हा ती एकमेकांसाठी थांबणे... मग गप्पा मारत घरी येणे... कधीतरी जेवायला बाहेर जाणे नाहीतर फिरायला बाहेर जाणे असे चालू झाले... हळूहळू सगळ्या ऑफिस मध्ये त्याची चर्चा चालू झाली... करण च्या पप्पाच्या कानावर पण ह्या गोष्टी आल्या... त्याला बोलून काही फायदा नव्हता.. कारण आधीच त्याचा एकदा प्रेमभंग झाला होता आणी त्या नंतर त्याची झालेली अवस्था बघता.. परत त्याला तिच्या पासून दूर करणे जरा धोकादायक होते . पोरगा हातून जाण्याचा संभव होता म्हणून त्यांनी हे प्रकरण जरा नाजूक पद्धतीने हाताळायचे ठरवले...

इकडे आरतीच्या घरी पण तिचे सध्याचे वागणे बघून आईबाबा काळजीत पडले.. करण चांगला मुलगा आहे ह्यात त्यांचे दुमत नव्हते पण तिच्या बाबतीत जे घडले होते त्याचा विचार करता त्याचे वडील तिचा स्वीकार करतील का? हाच प्रश्न त्यांना भेडसावत होता. आणी जर दुर्दैवाने त्यांनी ह्या लग्नाला नकार दिला तर मग आरती स्वतःला कशी सावरेल म्हणून त्यांना ही काळजी वाटत होती...

करण बाबाशी बोलायची संधी शोधण्यात गर्क होता... पण हवी तशी संधी त्याला अजून तरी मिळाली नव्हती.. नुसते प्रेम असते आणी लग्न करतोय हे सांगणे सोपे होते. पण तिच्या बाबतीत घडलेले त्यांना सांगायचे ही तिची अट खूप जाचक होती... त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येईल हे त्याला माहित नव्हते....

अशातच एके दिवशी पप्पानी त्याला केबिन मध्ये बोलावले...

" मला बोलावलंत पप्पा...? "

" ह्म्म्म... बस..." त्यांनी आपल्या समोरील फाईल मधून डोके वर उचलत त्याला बसण्याचा इशारा केला..

" ही फाईल बघ.... मागील सहा महिन्यापासून आपल्याला नागपूर प्लांट मध्ये लॉस होतोय.. " त्यांनी फाईल त्याच्या कडे सरकवली....

" ह्म्म्म..." काही वेळ त्याने फाईल चाळली...

" ह्यावर लवकरच काही तोडगा काढावा लागेल नाहीतर आपल्याला खूप मोठा लॉस होईल... "

"'आपण आपला एखादा विश्वासू माणूस तिकडे पाठवला तर...? " असे बोलून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे त्याच्या लक्षात नाही आले...

" एकदम बरोबर बोलतो आहेस... मला वाटते की तुच तिकडे जावे... "

" काय..? मी...? "

" हो काय हरकत आहे.... तु हुशार आहेस , कंपनी माझ्या नंतर तुलाच चालवायची आहे आणी तुला पण अश्या प्रकरणाला कसे सामोरे जायचे ते कळले पाहिजे नां ? "
बाबा बारीक नजरेने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत आहेत हे त्याला कळले नाही तो आपल्याच विचारात गुंग होता.. त्याच्यासमोर आरतीचा साधा , भोळा चेहरा तरळून गेला... आता नागपूर ला जायचे आणी तिथले सगळे प्रकरण सांभाळून घ्यायचे तर सहज सहा आठ महिने लागणार होते... आणी इतका वेळ तिच्यापासून दूर राहणे त्याला शक्य होते ?

" काय झाले? कसला विचार करतोस ? "

" नाही... काही नाही....मी उद्या सांगू का ? "

" हो चालेल.... पण लक्षात ठेव आपण बिजनेसमन आहोत.. आपल्यात उद्याला महत्व नसते... काही निर्णय हे वेळीच घ्यावे लागतात... आणी ही कंपनी पण तुझीच आहे... हे पण लक्षात घे.... ह्याचा होणारा नफा , नुकसान हे पण तुझेच आहे..." पप्पा त्याला समजावत म्हणाले...

" बरं.... "

" ठीक आहे आज रात्री विचार कर आणी मला उद्या सांग.. आपल्याला उशीर करून चालणार नाही... "

" हो मी उद्या सांगतो.. " आणी करण उठून बाहेर आला... त्याचा चेहरा पडला होता... तो मोठया द्विधा मनस्थितीत अडकला होता.. तो गेला नाही तर पप्पा समोर त्याला लग्नाचा विषय काढायला होणार नव्हता... आणी गेला तर आरती पासून खूप महिने लांब राहावे लागणार होते... काय करावे त्याला सुचत नव्हते...

संध्याकाळी दोघे घरी जायला निघाले पण त्याचा मूड आज एकदम खराब झाला होता.. तो काही बोलत नव्हता.. तिच्या बोलण्याकडे ही त्याचे लक्ष नव्हते...

" काय झाले करण ? तो आज खूप बैचेन दिसतोस...? "

" काही नाही ग.... "

" खरंखरं सांग काय झालं ? " तो आपल्याशी खोटे बोलू शकत नाही ह्याची तिला खात्री होती..

" अग नागपूरच्या प्लांट मध्ये गडबड आहे.. मागील सहा महिन्यापासून तो प्लांट लॉस मध्ये चालला आहे आणी पप्पाचे म्हणणे आहे की मी तिथे जाऊन चार्ज घ्यावा..."

" मग बरोबर तर आहे... तुमची कंपनी आहे तर तुलाच जावे लागेल नां.... "

" अग दोन चार दिवसाची गोष्ट नाही आहे... चांगले सहा आठ महिने जातील... आणी एव्हडे दिवस मी तुझ्या शिवाय राहू शकतो...? "

" ह्म्म्म.... " ती पण विचारत पडली...

" तुला एक सांगू...? " काही वेळानी तिने विचारले.

" ह्म्म्म... "

" ही एक संधी आहे असे ह्या कडे बघ.... जर तु तो प्लांट पुन्हा प्रॉपिट मध्ये आणलास तर पप्पा तुझ्यावर खुश होतील... "

" हो ते मला माहित आहे.. "

" मग ते खुश झाले तर त्यांच्या जवळ तुला आपल्या लग्नाचा विषय काढायला संधी मिळेल नां.. "

" ह्म्म्म...." तो पण विचार करू लागला.. ती म्हणते त्यात दम होता. पण एव्हडे दिवस तिच्या शिवाय राहायचे जरा कठीण वाटत होते...

" आता कसला विचार करतो आहेस ? "

" तु बोलतेस ते बरोबर आहे... पण...." त्याच्या मनात अजून पण शंका होती.

" आता पण बिन काही नको.... आपल्याला आयुष्यभर जर सोबत काढायचे असतील तर सहा आठ महिने आपल्याला कळ सोसावीच लागेल... "

" तुला वाटते हे सगळे झाल्यावर ते आपल्या लग्नाला मान्यता देतील ? "

" का नाही देणार ? तु स्वतःला सिद्ध केल्यावर त्यांना आनंद नाही का होणार ? म्हणूनच म्हणते आहे की तु नागपूरला जा.. माझी काळजी करू नकोस.. असे पण आपण मोबाईल वर एकमेकांच्या संपर्कांत राहूच की..? "

" ह्म्म्म.. " आता त्याला पण तिचे बोलणे पटायला लागले.. त्यांच्या येणाऱ्या सुखाच्या भविष्याकडे बघता आता त्याला थोडा त्रास सहनच करावा लागणार होता.

" बरं ठीक आहे... मी उद्या पप्पाना सांगतो... "

" ह्म्म्म... " आता कसा शहाण्यासारखा बोललास... ती पण खुश झाली... आणी दोघे भविष्यात एकमेकांच्या सोबत घालवता असलेल्या स्वप्नात हरवून गेले. पण त्यांना कुठे माहित होते... की त्यांच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवले आहे....

दोनच दिवसात करण नागपूरला निघून गेला... आणी आरती एकटी पडली... तसा त्याचा रोज तिला फोन यायचा त्याच्याशी बोलल्यावर तिला खुप बरं वाटायचे... पण जसे जसे महिने होत गेले करण त्याच्या कामात खूप व्यस्त झाला... आता तर त्याचा फोन कधीतरी आठवड्यातुन एखादया वेळेस यायचा... त्याला तो प्लांट यशस्वी करून दाखवायचा होता.. म्हणून तो दिवस रात्र त्याच्या कामात गढलेला होता...
त्याने पहिल्या दोन महिन्यात तिथे होत असलेल्या चुका शोधून काढल्या... मग त्यावर उपाययोजना , कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना कंपनी आणी त्यांचे भवितव्य कसे निगडित आहे ते दाखवून देणे.. कंपनीला परत फायद्यात घेऊन येण्यासाठी जे जे शक्य आहे ते तो करत होता.. आणी त्यातच त्याचा सगळं वेळ जात होता.. आणी पर्यायाने त्याचे आरती कडे दुर्लक्ष होऊ लागले... सुरवातीला तो कामात व्यस्त असल्यामुळे असे होतेय हे कळत होते... पण जेव्हा त्याचा फोन यायचा बंद झाला तेव्हा तिने त्याला फोन करायचा प्रयत्न केला तर तो उचलत नसे... असे खूप वेळा झाल्यावर तिने मुद्दाम रागाने त्याला फोन करायचे बंद केले... तिला वाटले काही दिवस आपण फोन नाही केला तर तो स्वतः तिला फोन करेल.... पण तसें काही झाले नाही म्हणून ती काळजीत पडली... त्यातच एक नवीन बातमी तिच्या कानी पडली...
करण ची ex गर्लफ्रेंड आता नागपूर मध्ये होती... आणी करण ने तिला आपल्या प्लांट मध्ये जॉब दिला होता..
हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन हादरली... ती सुन्न मनस्थितीत ते ऐकत होती...
त्यादिवशी तिने त्याला खूप वेळा फोन केला पण त्याचे उत्तर नाही.... ती आता पूर्णपणे हादरून गेली होती.. आधीच तिची आणी त्याच्या नावाची चर्चा ऑफिस मध्ये रंगत होती. जो पर्यंत तो होता तिला त्याची पर्वा नव्हती पण आता त्या लोकांच्या कुश्चित नजरा तीला टाळता येत नव्हत्या... तो असताना आनंदी असणारी ती आता पुन्हा एकदा अबोल आणी शांत शांत झाली... असेच चार महिने निघून गेले... मागील चार महिने आरतीने खूप संयमाने काढले होते... तिला अजून पण आशा होती की , तो परत येईल.. ती त्याची वाट बघत होती...

आणी अचानक एके दिवशी तीने कामावर येणे बंद केले... आठवडा झाला तरी तिच्या कडून कोणताही निरोप आला नाही... म्हणून अजून काही दिवस वाट बघून देशपांडेनी तिच्या घरी एक माणूस पाठवला... पण तिच्या घराला टाळे होते... आजूबाजूला चौकशी करता कळले ते आठ दिवसापूर्वीच हे घर सोडून गेले आहेत.... कुठे गेले वैगरे कोणालाही सांगून गेले नाहीत...
त्या माणसाने ती हकीकत देशपांडेनां सांगितली.. त्यामुळे शेवटी तिच्या जागेवर त्यांना दुसऱ्या मुलीची नेमणूक करावी लागली...

इकडे करण नागपूरला आला तो सुरवातीच्या काळात त्याला सगळे समजून घेण्यात , गडबड शोधण्यात खुप वेळ गेला... त्या काळात त्याचे आरती बरोबर फोन वर संभाषण होत होते... पण जसे जसे महिने होत गेले तसें तसें तो कामात जास्तच गुरफटला गेला... आणी दोघात असलेला संभाषणाचा धागा हळूहळू कमी कमी होत गेला... त्यातच त्याची भेट पुन्हा एकदा आराध्याशी झाली... ती लग्न होऊन नागपूरला आली होती... सुरवातीचे नवलाईचे दिवस गेल्यावर तिला आपल्या नवऱ्याचे खरे रूप कळले होते... तो कामाला तर होता पण सगळ्या बाजूने कर्जात बुडाला होता... पण आता वेळ निघून गेली होती... आराध्या पण शिकलेली असल्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती आणी अचानक तिची भेट झाल्यावर करणच्या जुन्या जखमा पुन्हा हिरव्या झाल्या... पण तिची परिस्थितीची जाणीव झाल्यावर त्याने एक माणुसकी म्हणून तिला आपल्या प्लांट मध्ये जॉब दिला... तिच्या सध्याच्या परिस्थिती वर तो एव्हडीच मदत तिला करू शकत होता.. ह्या पेक्षा जास्त त्याच्या हातात काही नव्हते.....जेव्हा कोणी सोबत नव्हते तेव्हा आरतीने त्याचा हात धरला होता... आणी आता तिचा हात सोडायचा नाही हे त्याने पक्के ठरवून टाकले होते... त्यामुळे त्याने आराध्या कडे फारसे लक्ष दिले नाही.... पण मुंबई हेड ऑफिस वरून आलेल्या काही जणांनी ही गोष्ट तिखटमीठ लावून हेड ऑफिस ला सर्वाना सांगितली...त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला... आरती त्या सगळ्या बातम्यांनी खूप कष्टी झाली.. करण आल्यावर त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा हे तिने ठरवले होते... जर त्याला परत आराध्या कडे जायचे असेल तर त्याला अडवायचे नाही.. तो तिच्यावर किती प्रेम करत होता हे तिला चांगलेच माहित होते... मग अश्यावेळी त्या दोघात आपण जाणे काही बरोबर नाही.. प्रेम तर ती पण त्याच्यावर खूप करत होती... पण बहुतेक तो तिचा होणे काही शक्य होईल असे तिला वाटत नव्हते...

पुढे जवळ जवळ आठ महिन्याने करण मुंबई हेड ऑफिस ला परत आला... येण्याच्या आठवडाभर आधी तो आरतीला फोन लावत होता पण तिचा फोन नॉट रिचेबल लागत होता... शेवटी कंटाळून तिला डायरेक्ट सरप्राईज देऊ म्हणून तो खुशीत मुंबईला परत आला...
ऑफिस मध्ये शिरल्या शिरल्या त्याचे लक्ष आरतीच्या टेबल कडे गेले... तिथे कोणी दुसरीच मुलगी बसली होती. त्याला आश्चर्य वाटले.... असे कसे झाले ?
कदाचित ती आली नसेल...? पण जरी ती आली नसेल तर एका दिवसा साठी तिच्या जागी दुसरी मुलगी कशी काय येईल ? आणी ह्या ऑफिस मधील सगळ्यांना तो ओळखत होता.. ही मुलगी नवीनच लागली होती... हे काय गौडबंगाल आहे ह्याचा विचार करत तो पप्पांच्या केबिन ला शिरला....

" ये.... करण.... तु करून दाखवलेस.... शाब्बास... ":पप्पा आनंदाने म्हणाले...
" आज मला आनंद वाटतो आहे की , तु माझ्या पश्चात तु कंपनी नीट संभाळशील... "

" पप्पा.... आरती नाही येत का कामाला ? " सगळ्या कडे दुर्लक्ष करत त्याने पाहिला प्रश्न विचारला..

" अरे तु बस नां.... मग निवांत बोलू आपण...." पप्पाना तो आल्या आल्या हां विषय नको होता...

"'पप्पा... मला शब्दाचे खेळ नकोत... ती कामाला का येत नाही.. ?" करण ला वेगळाच संशय येत होता.. कदाचित तो इथून गेल्यावर त्यांनी आरतीला कामावरून काढले तर नसेल...?

" तीने जॉब सोडला आहे... चार महिन्यापूर्वी..." पप्पा शांतपणे म्हणाले...

" जॉब सोडला... का ? "

" मला कसे माहित असणार...? तिने कोणाला ही काही ही सांगितले नाही... तिचे ऑफिसचे ड्यू अजून बाकी आहेत. ते न्यायला पण ती आली नाही... "

" काय? " हां धक्का पचवणे करण ला खुप जड गेले... तो मटकन खुर्चीत बसला... त्याचा हात कपाळावर होता.. होत्याचे नव्हते झाले होते... किती काय काय स्वप्ने घेऊन तो परत आला होता... पण हे काय बघायला मिळत होते.. कितीतरी वेळ तो असाच विस्मयक अवस्थेत होता... काही वेळानी त्याला पप्पानी भानावर आणले...

" ह्यात सगळे कागदपत्र आहेत... मागील सहा महिन्यापासून आपला प्लांट नफ्यात आला आहे.... आता तेथील घडी नीट बसवूंन आलो आहे... " करण ने सगळ्यां बाबतीतील माहिती पप्पाना दिली....

" छान... मला तुझ्या कडून हीच अपेक्षा होती.... तु चार आठ दिवस आराम कर मग पुन्हा ऑफिस ला यायला सुरवात कर..." त्यांनी त्याला सल्ला दिला...

" पप्पा आता माझ्याच्याने इथे काम होणार नाही...." करण पुटपुटला... त्याचा आवाज भरून आला होता....
तिच्या अचानक जाण्याने तो एकदम मोडून पडला होता.. ऑफिस चे लोक काय म्हणतील ? आरती आणी त्याच्या बद्दल सगळ्यांना माहित होते.. ती बिचारी किती दिवस त्याची वाट बघत राहिली असेल... आता ती गेल्यावर हां आला होता... लोकांना काय वाटेल की ह्यांनी तिचा वापर करून घेतला आणी मग हिला सोडून दिले.... तो पूर्णपणे हताश झाला होता... तो जेव्हा बाहेर पडला तेव्हा... आत येणारा करण आणी आता बाहेर जाणारा करण ह्यात जमीन अस्मान चा फरक होता....

पुढील चार दिवस त्याने तिला खूप शोधायचा प्रयत्न केला.. तिच्या घरी , तिच्या आजूबाजूला त्याने खुप लोकां जवळ तिच्या बद्दल चौकशी केली.. रीमा आणी जुई ला खोदून खोदून विचारले.. पण व्यर्थ.... तिचा काहीही पत्ता लागला नाही... ती जणू काही गायबच झाली होती... तिच्या जाण्या मागे त्याला पप्पाचा संशय येत होता... पण त्यांना तसें विचारणे त्याला योग्य वाटत नव्हते... चार दिवस अथक मेहनत घेऊन पण जेव्हा त्याच्या हाती काही लागले नाही तेव्हा त्याने तिला शोधण्याचा नाद सोडून दिला... आणी आपल्या फ्लॅट वर येऊन बसला. ह्या फ्लॅट मध्ये त्या दोघांच्या खुप आठवणी होत्या... त्या आठवत तो एकटाच बसून राहायचा..

त्याने ऑफिस ला जाणे सोडले होते.. पप्पानी त्याला लाख परीने समजावून सांगितले पण आता त्याला ते ऑफिस नको वाटत होते... तिच्या आठवणीत तो सकाळ संध्याकाळ बुडालेले असायचा... असेच काही दिवस गेले... करण आपल्या दुःखातून काहीसा बाहेर आला...
आता पुढे काय ? म्हणून तो विचार करू लागला....तिच्या आठवणींतून बाहेर येण्यासाठी त्याने ते शहर सोडण्याचे नक्की केले.... आपला विचार पक्का झाल्यावर तो पप्पाना जाऊन भेटला... आणी त्याने त्यांना आपला निर्णय कळवला... त्यांना पण धक्का बसला...

पण आता करण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता... पप्पाच्या हरतऱ्हेने समजावून पण त्याचा विचार बदलला नाही... खरंतर ती गायब होण्यामागे त्याला पप्पाचा हात असावा असा संशय होता. आणी त्याच्या मनात काय चाललेय ते त्यांच्या ही लक्षात आले..

" हे बघ करण ! मला माहित आहे. तुझ्या मनात काय चालले आहे. "

" नाही पप्पा तुम्हाला नाही माहित... "

" मला माहित आहे. तुला वाटतेय की ती गायब होण्यात माझा काही हात आहे.. पण तसें नाही... "
" हे खरं आहे की , तु तिच्या प्रेमात पडला हे काही मला रुचले नव्हते.. म्हणून मी तुला नागपूरला जाण्याचा सल्ला दिला... ह्या उप्पर ह्यात माझा काही हात नाही. ती अचानक कुठे गायब झाली ? काय झाले ? ..... खरोखर ह्या सगळ्याने जेव्हडा तुला धक्का बसला तेव्हडाच मला पण धक्का बसला आहे. " पप्पा त्याला नीट समजावून सांगत होते.
" तुला हे शहर सोडून जायचे असेल , तर तु जा हरकत नाही... पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचे... "

" त्याने काय होणार आहे ?" करण ने हताश आवाजात विचारले..

" तु ह्या सगळ्याचा एकमात्र वारस आहेस... आणी जर तूच सगळे सॊडून गेलास तर मग हां सगळा पसारा कोणासाठी ? मग एक काम करतो . मी पण सगळे बंद करतो... आणी घरी बसतो... पण किमान माझ्या चितेला अग्नी द्यायला तरी येशील नां... म्हणून म्हणतोय की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा..." पप्पा त्याला इमोशनल ब्लँकमेल करत म्हणाले...

" ठीक आहे... मी जिथे कुठे आहे तिथून तुम्हाला फोन करत राहीन... "

आणी मग मुंबई सोडून करण फिरू लागला.... सुरवातीला गाव गाव फिरणाऱ्या करण ला कोकणातले एक छोटेसे गाव खूप आवडले... निसर्गाने भरलेले , समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले ते गाव... बहुसंख्य लोक कोळी... भल्या पहाटे ते होडी घेऊन समुद्रात जातं.. आणी संध्याकाळी मासे पकडून परत येत... त्यामुळे गावात दिवसभर तसा शुकशुकाट असे ...

करण तिथे रमला.. तिथे मनाला शांती होती.. लोक चौकशी करत नव्हते... मग करण ने तिथेच राहायचे ठरवले.... हळूहळू गावातल्या लोकांनी त्याला पण आपल्यातील एक मानायला सुरवात केली... तो खूप शिकलेला होता... ह्या आडवळणाच्या गावात तसें पण सहसा कोणी येत नसे... त्यामुळं सगळ्यांना करण चे खूप अप्रूप... कोळी लोक खूप चांगले.. एखाद्याला आपला मानला तर त्याच्या साठी जीव पण देतील... त्या लोकात करण राहू लागला...
गावातल्या जुन्या लोकांनी त्याला गावाच्या बाजूला असलेल्या जागेवर त्याच्या साठी एक लहानसे घर बांधले..करण त्यांच्या बरोबर कधीकधी मासे पकडायला समुद्रात जायचा... कधी कधी एकटाच किनाऱ्यावरील सुरुच्या सावलीत.... आरतीला आठवत बसायचा.. आजूबाजूच्या कोळणी त्याला आपल्या मुलांसारखा माया लावायच्या.. त्या मुळे त्याला कधी जेवणाची काळजी करावी लागली नाही.. ते लोक गरीब होते पण दिलदार होते. आपल्या ताटातील एक भाकरी ते करण साठी काढायचे...
असेच काही महिने गेले... करण आपल्या सध्याच्या आयुष्यात खूप खुश होता...

अशातच एके दिवशी त्याला पप्पाचा फोन आला...

" हॅलो... "

" करण... कसा आहेस ? "

" मी ठीक आहे पप्पा..... तिकडे कसे चालू आहे...? "

" ठीक आहे... एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची होती.."

" काय पप्पा ? "

"'अरे काल आरतीचा फोन आला होता... म्हणजे मला नाही... रीमा ला फोन केला होता. मी रीमा आणी जुई ला सांगून ठेवले होते.. जर तिचा फोन आला तर तिला ऑफिस ला परत बोलावलं म्हणून सांगा.."

" काय ? " तो उडालाच...

" हो.. पण ती कामाला येणार नाही म्हणाली.... पण तिला एकदा तुला भेटायचे आहे.. "

" ह्म्म्म...." करण विचार करत राहिला.. आज पाच सहा महिन्यानंतर तिला त्याची आठवण येत होती.. आणी त्याचा फोन नंबर असून पण तिने रीमा ला फोन केला होता... तिला आता आपल्याशी काय बोलायचे असेल.. तो विचारात पडला...

" करण..... करण... " पलीकडून पप्पा त्याला हाक मारत राहिले..

" ह्म्म्म... तु येतोस इकडे..? "

" नाही पप्पा... तिला इथला पत्ता द्या.. तिलाच इथे पाठवा.. आली तर ठीक... नाहीतर पुढे फोन करू नकोस म्हणून सांगून टाका.." आपल्या डोळ्यातील पाणी पुसत करण ने उत्तर दिले...

" बर... करण... तु येणारच नाहीस का परत मुंबईला ? "

" असे काही नाही पप्पा पण आता सध्या माझी मनस्थिती ठीक नाही म्हणून मी मुंबईत येत नाही.. जरा मन शांत झाले की मी येईन मुंबईला... "

" बरं..." मी तिला पत्ता द्यायला सांगतो...

" ठीक आहे..." फोन ठेऊन करण परत तिच्या विचारत बुडून गेला....


पुढील आणी अंतिम भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे...इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED