ती एक शापिता! - 14 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक शापिता! - 14

ती एक शापिता!

(१४)

आशाला जाग आली. तिने शेजारी बघितले. अमर शांत झोपला होता. नेहमीप्रमाणे त्याला मिठीत घेऊन प्रणयाचे रंग उधळण्याची इच्छा तिला झाली नाही. का कोण जाणे पण अचानक तिचे डोळे भरुन आले. तसा प्रकार तिच्या जीवनात फारसा कधी घडला नव्हता. तिचे डोळे सहसा भरून येत नसत. तिला प्रकर्षाने माहेरची आठवण आली. आई-बाबा, दादाला भेटावे अशी इच्छा अनावर झाली परंतु वास्तव लक्षात येताच तिला भरून आले. इतर मुलींप्रमाणे आठवण येताच माहेरी धाव घ्यावी अशी तिची परिस्थिती नव्हती. अमरसोबत लग्न करून ते हक्काचे दरवाजे तिने स्वतःच बंद करून टाकले होते. एका अमरला मिळविण्यासाठी तिने अनेक जिवाभावाच्या नात्यांना, जिवाभावाच्या संबंधाला तिलांजली द्यावी लागली होती. माहेरच्या आठवणीने तळमळणाऱ्या आशाच्या मनात विचारांनी गर्दी केली,

'अमरशी मी विवाह केला ती चूक तर नाही ना? ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळले त्यांना त्याप्रकाराने सोडून येण्यात तर मी चूक केली नाही? पण मी तरी काय करणार? प्रेमाचे संबंध असे जुळत गेले की, अमरशी विवाह करण्याशिवाय मला दुसरे काहीही करता आले नाही, करता आले नसते. त्यावेळी वाटलं होतं की, काही दिवसांनी आईबाबा मला जवळ करतील परंतु त्यांनी तर ही गल्ली सोडून मला कायमचे दूर केले...'

आशाची आणि अमरची बालपणापासूनच मैत्री होती. गल्लीतल्या इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा आशा अमरसोबत जास्त रमायची. सुरुवातीची मैत्री लहान वयातच प्रेमात बदलली. प्रेम या भावनेचा दूरान्वयानेही संबंध नसणारी ती जोडी एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू लागली. त्यातच आशाच्या घरी दिवसभर कुणी नसल्यामुळे घरातील एकांत त्यांना आवडू लागला. सुरुवातीला खेळाच्या माध्यमातून, धिंगाण्याच्या माध्यमातून होणारे शारीरिक स्पर्श, शारीरिक लगट नंतर हवहवीशी वाटू लागली. आशा लहानपणापासूनच अत्यंत सुंदर, सुडौल होती. सुंदरतेमुळे ती तीन चार वर्षांनी मोठी वाटत असे. सर्वांनाच तिचा सहवास हवहवासा वाटत होता. तिच्या शाळेतील शिक्षकही या ना त्या कारणामुळे तिला स्पर्श करण्याची संधी शोधत असत. मिळालेल्या संधीचा भरपूर फायदा घेत असत. त्यामुळे आशालाही लहानपणापासूनच तशा स्पर्शांची सवय झाली. त्या स्पर्शासाठी ती चटावली. तिला त्यात आनंद वाटत असे. नंतर तर अमर तिला तिच्या घरी एकांतात भेटत असल्यामुळे तिची स्पर्शाची भूक भागत गेली नव्हे वाढत गेली. त्यांचे ते संबंध तिच्या घरी समजले परंतु का कोण जाणे सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आशा दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षेत नापास झाली. तिची शाळा बंद करण्यात आली. त्यामुळे ती फार आनंदली कारण दिवसभर घरी कुणीच नसल्यामुळे तिला ते बंधन स्वातंत्र्य मिळाल्याप्रमाणे झाले. ती बिनदिक्कतपणे अमरला घरी बोलावून घेत असे. सुरुवातीला होणारी लगट, स्पर्श यांनी त्यांना नको ती पायरी ओलांडायला, समाजाला मान्य नसणारे संबंध स्थापित करायला प्रवृत्त केले. एकांताने उत्तेजित केले. दोघेही नको त्या संबंधाला चटावले, दिवसागणिक वाहवत गेले. मात्र त्यांचे ते चोरटे संबंध अनेकदा अशोकच्या तर एकदा सुहासिनीच्या लक्षात आले. भर दुपारी रंगलेले संबंध अशोकने पाहिले. ते आशा-अमरच्या लक्षात आले परंतु का कोण जाणे अशोक शांत राहिला. त्याच्या मौनामुळे त्यांना एकप्रकारे संमती मिळाली. अशोकच्या वागण्याचे आशाला आश्चर्य वाटायचे कारण स्वतःच्या लहान बहिणीच्या खोलीत, तिच्या मिठीत एका तरुणाला पाहून मोठा भाऊ मूग गिळून कसा काय बसू शकतो. खरे तर त्यावेळी अशोकने अमरला फोडून काढायला हवे होते. मार द्यायचे सोडा पण अशोकच्या नजरेत राग, संताप दिसायचा नाही तर वेगळेच भाव असायचे.

सुहासिनी! आशाची आई! पोटच्या पोरीला भर दुपारी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापते आणि मुलीला बडविते. काही दिवसांनंतर आशाने शांतपणे विचार केल्यानंतर तिला आईच्या वागण्याचा राग आला नाही तर तिला तिचे वागणे योग्यच वाटले कारण कोणतीही आई स्वतःच्या लग्न न झालेल्या मुलीला परक्या मुलासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जशी संतापेल तसेच सुहासिनीचे वागणे होते. आईची ती प्रतिक्रिया तिला स्वाभाविक, नैसर्गिक अशीच वाटली परंतु नंतर काही दिवसांनी सुहासिनीने आशाला समजावून सांगायला हवे होते. त्या संबंधातील तोटे, नुकसान सांगताना एखादे वेळी आयुष्यातून उठायला लावणारा प्रसंगही कसा येऊ शकतो ते सांगायला हवे होते. आशालाही आईकडून तीच अपेक्षा होती. आई कदाचित मला त्या संबंधापासून परावृत्त करेल. योग्य वय होताच तुमचे लग्न लावून देईल असे समजावेल असे तिला वाटत होते परंतु सुहासिनीने तसे काही केले नाही तिने आशासोबत बोलायचेच टाळले, मौन धरले. आशाचा सामना होताच सुहासिनीच्या डोळ्यात प्रचंड द्वेष, घृणा आणि एक प्रकारची आग धगधगताना दिसत असे. त्या प्रसंगानंतर सुहासिनीने आशाला पदोपदी लाथाडलं. नको नको ती दूषणे लावली. तिला एखाद्या तुरुंगात टाकल्याप्रमाणे ती आशावर पाळत ठेवू लागली. रजा टाकून घरी राहिली त्यामुळे आशा मनोमन चिडली. अमरसोबतचे तिचे संबंध दुरावले आणि नकळत आशाच्याही मनात जन्मदात्या आईबद्दल चीड निर्माण झाली. सुडाची भावनाही जागृत झाली. आईचा सूड घ्यायचा या निश्चयाने तिने अमरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. इच्छा तिथे मार्ग याप्रमाणे सर्वांचा डोळा चुकवून आशाने पळून जाऊन अमरसोबत लग्न केले. तेव्हाही आशाला एक आशा होती, अपेक्षा होती की, लग्न झाले म्हटल्यावर सारे सुरळीत होईल. घरचे मला समजून घेतील पण आशाची आशा फोल ठरली. तिच्याशी सारे संबंध तोडून टाकताना तिच्या आईबाबांनी चक्क घरच बदलले....

*****