Aaghat - Ek Pramkatha - 11 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 11

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(11)

त्यांनी सिद्ध करून मगच सुमैयाशी न बोलण्याचा आणि दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण मी इतका बेभान का झालो होतो? आता हा भयानक एकांत मला सतावत होता. त्या तिघांनाही मी खूप दुखविलं होतं. नको नको तेबोललो होतो. माझं चुकलं तिथं त्यांनी समजावलं होतं. पण एका क्षणाला मीकसा काय बदललो. एकमेकांच्या विचाराने आणि सल्ल्याने या गोष्टीवर पडदा पाडता आला असता. या आणि अशा अनेक विचारांनी माझं मन मला खात होतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सतत बैचेन आणि उदास होतो.

एक दिवस खूप आजारी पडलो. दोन दिवस कॉलेजला गेलो नाही. सुरेश, संदिप, अनिलच्या ही गोष्ट लक्षात आली. आमच्यात भांडण झालंय ही गोष्ट कांबळे सरांना आणि इतर हॉस्टेलच्या मुलांना समजणार, कारण ते तिघेही माझ्याकडे येणार नाहीत असं वाटत होतं.पण तसे न होता तिघेही आले. लिहून दिलेल्या औषधांची चिठ्ठी आणि सरांकडचे पैसे घेऊन संदिप औषध आणायला गेला. मला खूप वाईट वाटलं. खरंच आपल्याबद्दल यांच्या मनात वाईट नाही. असतेच तर ते आजसुद्धा या अशा स्थितीत मी आजारी असताना आले नसते, त्यांचं मन कठोर नाही, हवं तर त्यांना कठोर करता आलं असतं. मी कठोर होतो पण ते कठोर वागणार नव्हते. कारण खरं मित्रत्व त्यांना माहीत होतं. माझ्या डोळयातून अचानक आलेलं पाणी पाहून सुरेशला जे समजायचं होतं ते समजला होता.

‘‘रडू नको, प्रशांत तुला बरं वाटल्यानंतर आपण सविस्तर बोलू. तुझी चूक तुला समजलेली आहे. यातच सारं काही आलं.’’ सुरेशनं मला समजावलं. मी निश्चिंतपणे डोळे मिटले. इतक्यात संदिपही औषध घेऊन आला. त्यानं येताना चहा आणि बिस्किटे आणली होती. डोळा लागणार तोपर्यंत मला त्यांनी उठवून बसविलं. चहा, बिस्किटे दिली. मी पुन्हा तो विषय काढणार पण त्यांनी मला एक शब्दही बोलू दिला नाही.

तब्बत चार दिवसानंतर मी या दुखण्यातून बाहेर पडलो होतो. माझे साहित्य पुन्हा अगोदरच्या खोलीत आणलं होतं. पुन्हा मी त्या तिघांजवळ राहायला गेलो होतो. चौघे मिळून कॉलेजला जाणे-येणे पूर्वीसारखंच मिळून-मिसळून राहणं, गप्पाटप्पा. उत्साहात आणि आनंदात होतो. खूप बरं आणि खुलं वाटत होतं. मित्राच्यांत आल्यामुळे पुन्हा आता पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होतं. मस्त मजेत दिवस जात होते.

संध्याकाळचं जेवण आवरलं होतं. आम्ही चौघे गप्पात रंगलो होतो. मीही खूप आनंदात होतो, पण तो आनंद क्षणिक होता. कारण गप्पा रंगात आल्या होत्या. इकडच्या तिकडच्या मित्रमैत्रिणींचे विनोद, किस्से, चेष्टामस्करी चालली होती पण अचानकच सुरेशच्या मनात माझा विचार आला आणि त्यानं आमच्या गप्पा थांबविल्या.

‘‘प्रशांत तुला वाईट वाटेल, तुझ्या चेहऱ्यावर आनंदाची छटा असताना मी हा विषय काढतोय म्हणून. पण तुला त्याची जाणीव करून द्यायची म्हणून सांगतोय. आज आम्ही तुला माफ केलंय पण एक गोष्ट लक्षात ठेव एक दिवस तुझ्याबाबतीत इतकं मोठं प्रकरण होईल की तुला आम्ही काय, ही सारी दुनियासुद्धा माफ करणार नाही. तुला जर हा प्रसंग येऊ नये असं वाटत असेल तर तिच्या अंत:र्मनाचा शोध घे. तुला तिच्याबद्दल विश्वास आहे, एक मैत्रीण म्हणून. कारण आम्हांला जे जाणवलंय ते तुला कधी जाणवलेलं नाही. ठीक आहे! तुझं मतही आम्ही बरोबर आहे असं मानत नाही आणि आमचंही पण काय बरोबर आणि काय चूक म्हणजे कुणाचं मत बरोबर आणि कुणाची समज चुकीची हे तुला सिद्ध करावं लागेल. पण हे सिद्ध करताना तुझ्या अभ्यासावर परिणाम होता कामा नये.’’

सुरेश सांगत असताना अचानकच अनिल त्याचे बोलणे थांबवत म्हणाला,

‘‘बरं ते जाऊ दे तुला सिद्ध करायचंय जर नसेल तर राहू दे. झालं गेलं विसरून जाऊया. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीच जाणीवपूर्वक गैर केलेलं नाहीस, पण नक्कीच तुझ्या बाबतीत काहीतरी गैर गोष्टी घडण्याच्या मार्गावर आहेत, आमचं स्पष्ट मत आहे, या सर्व प्रकरणातून तू दूर रहावंस, पहिल्यांदा तू सुमैयापासून दूर रहावसं. आमचं मत नाही की बोलणं बंद करावं.पूर्ण संबंध तोडावसं पण तू दूर रहावसं. तुझी घरची परिस्थिती आठवावीस. खरं तर तुला हे सांगावयास नको. कारण तुला याची सर्व जाणीव आहे. पण न राहवून पुन्हापुन्हा आम्हांला सांगावसं वाटतं. यामागे हाच उद्देश आहे की तू तुझे ध्येय विसरू नयेस म्हणूनच.’’

‘‘ठीक आहे! तुझं म्हणणं मला पटतंय.पण?”

“पण काय?”

‘‘माझी अस्वस्थता मला स्वस्थ बसू देणार नाही. मी हे सिद्ध करून दाखविणारच. मलाही अनुभवायचे आहे की चेहऱ्यामागचाही एक चेहरा असू शकतो का? न वाटणारी माणसंसुद्धा तशी वागू शकतात का? की खरंच शुद्ध मैत्रीचं नातं हळुवारपणे जपणारी त्यागी वृत्तीची माणसंही असू शकतात का? या प्रश्नांची उत्तरे मला शोधायची आहेत. माणसं ओळखायला शिकायचं आहे. हे मी आव्हान समजतो. मी तुमचं हे आव्हान स्विकारलेलं आहे.’’

सुमैयाचं एकतर्फी प्रेम असेल का माझ्यावर? ती मला प्रेमपाशात ओढण्याचा प्रयत्न करतेय का? जाणीवपूर्णक मला मागे खेचण्याचा ती प्रयत्न करतेय का? अभ्यासापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला शोधायची होती. तिला याचा जराही संशय येऊ नये असे मी ठरविले होते. माझा अभ्यासावर परिणाम होता कामा नये. अभ्यासाच्या वेळापत्रकात फरक पडता कामा नये, मी जे करतोय हे कुणाला जाणवू नये,संशय येवू नये.

बी.ए.च्या दुसऱ्या वर्षीचं वातावरण थोडंसं वेगळं जाणवत होत. थोडी मरगळ असायची. उत्साह जाणवत नव्हता. काही जुन्या मित्रमैत्रिणींनी कॉलेज सोडलं होतं. नवीन मुलं-मुली यांचं प्रमाण जास्त होतं. नव्या मुलामुलींची जुन्या मुलामुलींशी ओळख करुन घेण्याची धडपड असणं साहजिकच असतं. तेच घडत होतं. माझ्याही बाबतीत घडणं साहजिकच होतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो. नेहमीप्रमाणे पहिला इंग्रजीचा तास संपला. दुसऱ्या ऑफ तासाच्या वेळी अचानक माझ्यासमोर मुलगी उभी राहिली. क्लासमध्ये नवीन होती. असं अचानक उभं राहिल्याचे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. मी जरा गोंधळून गेलो. उगीचचं मला तिनं विचारलं,

‘‘तुझं नाव काय?’’

‘‘प्रशांत.’’

‘प्रशांत, तुझी एक वस्तू माझ्याकडे आहे.’’

‘‘मग दे ना!’’

‘‘आहा’’

‘‘मी सहजासहजी देणार नाही.’’

‘‘ठीक आहे! चहा किंवा नाष्टा देईन. मग तर देशील?’’

‘‘चहानाष्ट्‌यापेक्षा ती वस्तू मौल्यवान आहे.’’

कोणती वस्तू मौल्यवान असेल याचा विचार करीत मी माझ्या बॅगमध्ये हात घातला आणि शोधू लागलो. पण मला काहीच हरवल्याचं जाणवलं नाही.

‘‘मस्करी तर करीत नाहीस ना!’’

‘‘छे! मला सवयच नाही.’’

‘‘मग पटकन माझी वस्तू मला देऊन टाक.”

‘‘देईन पण एक अट आहे.’’

‘‘कोणती?’’

‘‘तु माझ्याशी मैत्री करशील का?’’

‘‘ठीक आहे! हरलो. मी करीन.’’

‘‘मग हे घे, पुन्हा हरवू नकोस.’’

‘‘अरेच्च्या! मानसशास्त्राची वही. बापरे! यात तर महत्त्वाचे प्रश्नोत्तर आहेत.खूप खूप आभारी आहे तुझा.”

‘‘ओके. वेलकम्‌!’’

‘‘अरे! पण एक गोष्ट राहिली विचारायची.’’

‘‘काय?’’

‘‘तुझं नाव नाही सांगितलंस.’’

‘‘माझं नाव सरिता. लक्षात ठेव हं. नाहीतर उद्याला विचारशील तुझं नाव काय?’’

‘‘मला पुन्हा विचारशील तुझं नाव काय?”

‘‘मला पुन्हा विचारशील त्यावेळी मात्र मी सांगणार नाही.’’ सरिता हसत आपल्या जागेवर जाऊन बसली.

सरिताही सुमैयासारखीच खुल्या मनमोकळया स्वभावाची मुलगी होती. तीचं आणि माझं वारंवार बोलणं, माझ्याकडून वही घेऊन जाणं, यामुळे काही दिवसांतच ती चांगली मैत्रीण झाली. या नव्या मैत्रिणीप्रमाणे स्वप्नील, आकाशसारखे नवे मित्रही मिळाले होते.

पण सरिताची आणि माझी मैत्री खूप दिवस टिकली नाही. एक दिवस सरिता माझ्या हॉस्टेलवर आलेली पाहून मी दचकून गेलो. तिला पटकन्‌ बाहेर घेऊन आलो आणि जवळच असलेल्या ग्राऊंडवर गेलो.

‘‘सरिता काय झालं? असं अचानकपणे येणं का झालं?’’

सरिताचा चेहरा पडलेला होता. मी हा प्रश्न विचारताच तिनं रडायला सुरवात केली.

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED