आघात - एक प्रेम कथा - 1 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 1

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

प्रस्तावना

‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. याचे कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, त्यांचं सोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा नायक असाच आहे. जगताना घडणाऱ्या घटना नुसत्या घडत नाहीत, तर मनावर व्रण निर्माण करणाऱ्या घडतात. कुणाचा आधार असतो तोपर्यंत या घटना सोसताना काहीच वाटत नाही. पण आधार संपतो तेव्हा माणूस निराधार होतो. प्रत्यक्ष आयुष्यात मला वाटतं परशुराम हा असा आईवडिलांचं छत्र हरवलेला माणूस कुणाकुणाच्या आधाराने उभा राहत आला आहे. कादंबरी काही अंशी तर आत्मचरित्रात्मक आहे की काय असा प्रश्न पडतो? खरी वाटेल अशी काल्पनिकता साहित्यकृतीत असतेच, कारण काही घटना,माणसं प्रसंग पाहिल्यावर पुन्हा लेखक त्याची साहित्यकृती निर्माण करण्याच्या प्रेरणेतून सुसंगती लावतच असतो. काल्पनिक भागातला नायक परशुराम असेल असं नाही, पण शहरात येणारा तोपर्यंतचा प्रशांत मात्र परशुराम असावा अशी शंका येते.

ही कादंबरी शहर आणि खेडे अशा दोन्ही ठिकाणी घडते. तिच्यातल्या घटना, वातावरण, प्रसंग, नातेसंबंध तरुणवयात असतात तसेच आहेत. पण एका क्रमाने घटना घडत जातात. एका उंचीवर जाऊन कादंबरी संपते.पूर्वी सुखांत किंवा दु:खांत असायचा. आता नात्यातली रचना, नात्याकडे बघायच्या दृष्टीतही बदल झालाय. म्हणजे समजा एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर

प्रेम असेल नि त्या मुलीने धोका दिला, म्हणजे नकार दिला तर तो मुलगा देवदास होई. आता असं आयुष्य थांबवत नाहीत. नवीन माणसं येऊन नवं आयुष्य सुरू होतं.

या कादंबरीत चढउतार आहेत, कोसळणं आणि सावरणं आहे. समज-गैरसमज आहेत. माणसाच्या मनाशी खेळणं आहे आणि शेवट तसा त्या नायकाच्या वयाप्रमाणे तसाच सोडून दिला आहे. कदाचित हा आघात पचवल्यावर तो नवं आयुष्यही सुरू करेल. नायकाचं वाहवत जाणं, स्वत: फसत जाणे, ज्या माणसांनी घडवलं त्यांचा शेवट पाहणं हे जसं आहे तसा एक चांगुलपणा कसा संपत जातो, गुणवान मुलगा कसा संपत, खचत जातो याचंही वर्णन आहे. किंबहुना माणसात असणारं हे द्वंद्व, संघर्ष या कादंबरीत कादंबरीकारानं जिवंत केलं आहे. ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांच्या ठिकाणी घात-आघात सोसायचं बळ होतं नि आपल्यात मात्र हे बळ राहिलं नाही. यामुळे उद्‌ध्वस्त झालेला तरुण, निराश तरुण, परिस्थितीला शरण गेलेला तरुण हा या कादंबरीचा शेवट आहे.

प्रा. माळी यांची जगण्याकडे, समाजाकडे, अनुभवांकडे बघण्याची संवेदनशीलता अशीच राहून जास्तीत जास्त साहित्य निर्मिती करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!

रेणू दांडेकर

renudandekar@gmail.com

*****

कृतज्ञतेचे दोन शब्द

माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंब साहित्यातून उमटत असतं. साहित्य विेशातलं हे माझं पहिलं पाऊल. जे जगलं, जे भोगलं हे साहित्यातून मांडण्याच्या पलिकडेही कलात्मकता, मनोरंजकता आणि रसिकता या साऱ्या पातळीवर लेखन होणे ही नैसर्गिक बाब आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.कुणी खाचखळग्यातून, संकटातून धैर्याने तरुन जातात. त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य असतं. कुणी शून्यातून विेश निर्माण करण्याचं स्वप्न पाहत असतो, तर एखाद्याजवळ समृद्धी, भरभराट असूनही थोड्याशा हव्यासापोटी सारं गमावून बसतात. सुखदु:ख, मोह, माया, मत्सर हे एक मानवाच्या आयुष्यातील चक्र आहे. प्रत्येकाने कोणते तत्व घेऊन जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.माझी कलाकृती माणसाच्या वेगवेगळया भावविेश्वाचे दर्शन घडविते. माणसाची वाईट परिस्थिती, वाट्याला आलेलं खडतर जगणं, चुकलेल्या दिशा, क्षणिक मोहापायी विसरलेली जाणीव, विसरलेले उपकार, सुखामध्ये असताना विसरलेले खडतर दिवस, उपकाराची जाणीव, कशाचीही तमा न बाळगता भरकटत जाणं आणि एक दिवस दिशाहीन होणं हा मूल्यांचा झालेला ऱ्हास होय. ज्यावेळी मूल्यांचा ऱ्हास होतो त्यावेळी माणसाचा अंत होतो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादेचा भंग झाल्यास येणारा प्रसंग हा भयाण असतो. म्हणूनच जाणीवेचा नंदादीप मनामध्ये सतत तेवत ठेवावा आणि जीवनाची वाटचाल चालावी.

ज्यावेळी माणूस समोरच्या माणसाचं दु:ख, व्यथा, वेदना जाणून घेईल त्यावेळीच खरा संवेदनशील समाज निर्माण होऊ शकतो. अशी संवेदनशील समाजाचीच आज खरी गरज आहे.

माझी ही छोटीशी कलाकृती वेगवेगळया भावनांचं स्पंदन आणि गुंफण असून माणसामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, आणि आजच्या दिशाहीन तरुणांना नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारी ठरेल.

माझी ही कलाकृती पूर्ण होण्यासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभले ते माझे आदरणीय गुरुजन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शिक्षणशास्त्र विभागाच्या अधिव्याख्यात्या डॉ. गितांजली पाटील, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे, लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव संस्थापक अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर, लोकमान्य टिळक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रेणूताई दांडेकर, अनुभूती स्कूल संचालिका, सौ. निशाजी जैन, अनुभूती स्कूल ग्रंथपाल,चंद्रशेखर वाघ, माझ्या गावच्या काबाडकष्ट करणाऱ्या माय-माऊलीस, पूजनीय मातीप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी पत्नी सौ. पूनम माळी यांनी हे पुस्तक वेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे.

परशुराम

*****

(1)

कोल्हापूरला वसतीगृहात एकदाचं जायचं निश्चित झालं होतं. एका लहानशा खेडेगावातून कोल्हापूर सारख्या मोठ्या शहराकडे मी पहिल्यांदाच शिक्षणासाठी बाहेर पडत होतो. थोडीशी मनामध्ये भीती होतीच. मित्र-मैत्रिणींबरोबर असलो की लाजल्या बुजल्यासारखं व्हायचं. माझ्या खेडवळ बोलण्याला सारे हसायचे

पण नंतर नंतर माझी त्यांना आणि त्यांची मला सवय झाली होती. मी त्यांच्यात रमलो होतो. तेही माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत होते. मी लांबच्या गावातला आणि नवीन असल्यामुळे मला ते त्यांच्या ग्रुपमध्ये सामावून घेतील की नाही याबद्दल मनात थोडी शंका होती. पण त्यांनी मला सामावून घेतलं होतं.

कॉलेजला जाणे, कॉलेज सुटल्यानंतर वसतीगृहात जाणे, जेवल्यानंतर तासभर विश्रांती. त्यानंतर अभ्यासाला बसणे. सायंकाळी ४ च्या दरम्यान फिरायला जाणे. पुन्हा अभ्यासाला बसणे. ८ वाजता जेवण. जेवण झाल्यानंतर पुन्हा अभ्यास व १० वाजता झोपणे असा नेहमीचा दिनक्रम असायचा.सुरुवातीच्या काळात मन रमत नव्हते. गावाकडची खूप आठवण यायची. पण हळुहळू सगळयांच्या ओळखी झाल्या. त्यामुळे मन रमू लागले. गावाकडची आठवण विसरून त्यांच्यात मिसळून गेलो.

शनिवारचा दिवस होता. वाचनालयात वृत्तपत्र वाचत बसलो होतो. इतक्यात वर्गातील वर्गमित्र व खोली मेंबर सुरेश, दिलीप व अनिल पळत पळत माझ्याकडे आले.

अरे प्रशांत कुठे आहेस तू?

अरे किती शोधायचं तुला?

चल आता वेळ नको!

तिघेही एकेक वाक्यं बोलून थांबले. मला काहीच समजले नाही. मी थोडा गोंधळल्यागत झालो.

दिलीप लगेच म्हणाला अरे एवढं गोंधळायला काय झालं? तुला माहीत नाही काय? ठीक आहे त्याच्या लक्षात नसेल.

अनिल आणि सुरेश दिलीपकडे पाहत म्हणाले.

मी पुन्हा गोंधळून गेलो.

अरे काय बोलताय तुम्ही, काहीच माहीत नाही मला, काहीच लक्षात नाही माझ्या, अरे मला तर खरंच काहीच माहित नाही.

सुमैयाने कदाचित याला तिच्या वाढदिवसाला सांगितलेल नसेल.अनिल म्हणाला.

त्यावर दिलीप म्हणाला.

बरं ठिक आहे.

कदाचित तुला सांगायला विसरली असेल.

चल आमच्या बरोबर.

सुमैयानं मला सांगितलं नसल्यामुळे मलाही थोडा राग आला होता.

मला नाही जमणार यायला, तुम्ही जा. मी रागाने म्हणालो.

अरे, असं काय करतोस? एवढ मनावर घेवू नकोस.

ती तशी वागली म्हणून आपणाला तस वागून चालणार नाही. काही झालं तरी ती आपली वर्ग मैत्रीण आहे. नाही म्हणू नकोस.

सुरेश कळकळीने मला सांगत होता.

चल ऊठ आता.

अनिल हाताला धरून ओढू लागला.

शेवटी सगळयांनी इतक्या कळकळीने विनंती केल्यावर मी तयार झालो.

*****