आघात - एक प्रेम कथा - 2 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 2

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(2)

रोषणाईने घर सजलं होतं. इतका मोठा वाढदिवस. मला आश्चर्य वाटत होतं. आमच्या अगोदर सारे मित्रमैत्रिणी आले होते. तसं पहायला गेलं तर आम्हालाच थेाडा उशीर झाला होता. मित्रांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. पण तरीही सुमैयाने मला वाढदिवसाला बोलविले नसल्याची खंत मनात होतीच.

ती माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

केक कापण्यात आला, सगळयांनी सुमैयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याची माझी वेळ आली. हातात हात दिल्यानंतर हात थरथरू लागले. मी थोडं बावरल्यागत झालो. मी बावरलेला पाहून माझे मित्र आणि खुद्द सुमैयाही हसू लागली. तिने जवळच असलेल्या बॉक्समधून केक काढला आणि मला भरवला.

मी मित्राबरोबर थोडा पुढे जातो न जातो तेवढ्यात प्रशांत इकडे ये! पाठीमागून सुमैयाचा आवाज आला.

मी एकदम दचकून थांबलो आणि मागे वळून पाहिलं.

सुमैया मला हातवारे करून बोलवित होती.

माझे तिघेही मित्र माझ्याबरोबर होते.

त्यांनाही मी माझ्याबरोबर येण्याची विनंती केली. पण सुमैयाने फक्त मलाच बोलविल्याने ते आले नाहीत.

अरे, असा चेहरा का पडलाय तुझा? का दु:खी आहेस तू?

माहीत असूनही प्रश्न विचारू नकोस.

काय बोलतोस हे तू? लक्षात येत नाही माझ्या?

तू वाढदिवसाला बोलविलं नसतानाही मी मैत्रीखातर तुझ्या वाढदिवसाला आलोय हे लक्षात असूदे.

अरे पण मी स्नेहलकडून निरोप पाठविला होता. कदाचित ती विसरली असेल. सॉरी! ठीक आहे.

बरं असू दे!

प्रशांत माझे तुझ्याकडे काम आहे. थोडावेळ समोरच्या खोलीत थांबतोस काय?

दुसऱ्या एका मैत्रिणीबरोबर बोलता बोलता तीने मला सूचना केली.

घरातील एका मोठ्या हॉलमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला होता. हॉलमधील गर्दी आता हळुहळू कमी होत होती. वेळही खूप झाला होता. मित्रही माझी वाट पाहून निघून गेले होते. अंधार गडद होईल तसे वसतीगृहात जायला

वेळ होणार या विचारानं मनाची तगमग होत होती. काय करावं काहीच समजत नव्हतं. कदाचित तिच्या लक्षात नसावं, असंही मनाला वाटून जात होतं. एवढ्यात एक छोटी मुलगी खेळत खेळत मी बसलो होतो त्या खोलीत आली. तीला मी जवळ बोलविले,

तुझं नाव काय गं?

माझं नाव सायली.

माझा प्रश्न पडतो न्‌ पडतो तोच त्या लहान मुलीनं उत्तर दिलं.

सायली तू माझं एक काम करशील ?

हो, पण मला चॉकलेट हवं!

आता चॉकलेट कोठून आणायचं?

पण काहीच विचार न करता मी हो म्हटलं.

चॉकलेट देण्याचं आश्वासन दिल्यावर सायली आनंदाने म्हणाली.

सांगा काय काम आहे?

तुझ्या दिदिला मी वाट पाहतोय म्हणून सांगून ये.

सायलीनं निरोप दिल्यानंतर थोड्या वेळात सुमैया आली.

पहिल्यांदा मला माफ कर. मला यायला वेळ झाला. तू फार कंटाळला

असशील.

बसं! तुला गरम गरम मस्त कॉफी करून आणते

नको, आता मला काहीच नको, मला जायला हवं, खूप उशीर झालाय.

अरे तुला एवढा उशीरापर्यंत थांबवायला मी काही वेडी नाही.

आज तुला रहायला हवं. मी माझ्या आईबाबांना तुझी ओळख करून देणार आहे.

आजची रात्र तू इथेच रहा. आपण सगळे मिळून जेवण करू.

पुन्हा कधीतरी येईन मी.

मी खूप विनवण्या करत होतो. पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

शेवटी रागाने मला म्हणाली, ठीक आहे, तुला जायचं असेल तर जाऊ शकतोस. पण तू ज्यावेळी माझ्या घरातून बाहेर पाऊल टाकशील त्यावेळी तुझी आणि माझी मैत्री कायमची संपली असं समज.

पण सुमैया वसतीगृहात माझी सगळे वाट पाहत असतील.

पण, वगैरे काही नाही. तुला काहीतरी कारण सांगता येईल.

अरे तुला कळत कसं नाही. मला थांबवून घ्यायचं असतं तर मी बाकीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनाही थांबवून घेतलं असतं, त्यांचीही माझ्या आईबाबांशी ओळख नाही. तेही माझ्या घरी पहिल्यांदाच आले होते. मी तुलाच का थांबवून घेतलं? कारण तुझा स्वभाव मला आवडतो, तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो, तुझं साधं राहणं, तुझा प्रामाणिक स्वभाव खरंच मला जसा अपेक्षित मित्र असावा असं वाटतं तसाच तू आहेस अगदी सच्चा.

बसं इथेच मी आलेच एवढ्यात!

मला काहीच कळत नव्हतं, अधाशासारखा बसून होतो. वेळही खूपच झाला होता. आता कितीही प्रयत्न केले तरी मी काही जाऊ शकत नव्हतो. थांबण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

वाढदिवसानिमित्त आलेली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली होती.

सगळीकडे अगदी निरव शांतता पसरलेली होती. न राहवून मनाला वाटून गेलं

खरंच किती भाग्यवान आहे ही मुलगी. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा झाला. सगळयांनी तोंडभरुन कौतुक केलं. आईवडिलांनी छातीशी कवटाळून धरलं. भरभरून सगळयांचं प्रेम मिळालं.

खरंच, किती नशीबवान असतात अशी माणसं आणि एकीकडे आपलंही नशीब आहेच. ना जगण्याला गंध आहे ना रंग. जावू दे जे मिळालं नाही त्याची

खंत बाळगत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे माणसाची अधोगतीच होते. माणसाने सदैव वर्तमानकाळाचा विचार करावा आणि आपली वाट चालावी. हे कोणत्यातरी तत्ववेत्याचं वाचलेले वाक्य माझ्या लक्षात आलं आणि मी तो

संकुचित विचार मनातून काढून टाकला. पण थोडसं अस्वस्थ वाटतच होतं.

सुमैयाचे वडिल प्राथमिक शाळेत शिक्षक,आई गृहिणी, दोन बहिणी एवढीच माहिती त्यांची भेट होण्या अगोदरची सुमैयाकडून मिळालेली.

सुमैयाची बहिण मी बसलो होतो त्या खोलीत आली.

तुम्हाला ताईनं बोलवलंय चला लवकर.

मी तिच्याबरोबर गेलो.

डायनिंग टेबलवर जेवण मांडून ठेवलं होतं.

सुमैया आणि तिच्या आईवडिलांची आतील खोलीत चर्चा चालली होती.

मी डायनिंग टेबलजवळ तसाच उभा होतो.

चर्चा संपवून सुमैयाचे आई-बाबा बाहेर आले.

अरे तू उभा का? ये बस इथे.

सुमैयाचे आई-बाबा एकासुरात म्हणाले.

तसा मी डायनिंग टेबलाजवळ मांडलेल्या खुर्चीवर जावून बसलो.

सुमैया कुठे गेली?

सायलीला आणि स्वप्नालीला बोलवायला गेलीय येईल एवढयात.

सुमैयाच्या आई-बाबांचं बोलणं थांबतं न थांबतं इतक्यात त्या तिघीही आल्या. आम्ही जेवायचे थांबलोच होतो. त्या तिघीही आल्यानंतर सगळयांनी जेवणाला सुरुवात केली.

तुझं नाव काय? वडीलांनी प्रश्न केला.

प्रशांत कदम

गाव कोणतं?

माळवाडी

आई-वडील काय करतात?

आई-वडीलांचं लहानपणीच निधन झालंय. मी तेव्हापासून आजोबा-आजीकडे असतो.

माफ कर.

सध्या रहायला कोठे आहेस? आईचा प्रश्न

आता सध्या मी वसतीगृहात राहतोय.

आमच्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी आहे. सगळे शिक्षक याचे खूप

कौतुक करतात.

सुमैया उतावीळ होवून सांगत होती.

काहीही अडचण असल्यास आम्हाला भेटत जा. घरी येत जा. आमची सुमैया वरचेवर तुझ्याबद्दल सांगत असते.

मी गालातल्या गालात हसलो आणि सुमैयाकडे कटाक्ष टाकला.

सुमैयाच्या वडिलांनी झोपण्याची खोली दाखविली आणि ते निघून गेले. खूप उशीर झाला होता. झोपण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण काही केल्या झोपच लागत नव्हती. एवढ्या मोठ्या बंगल्यात आणि एअर कंडिशनल खोलीत झोपण्याची माझी पहिलीच वेळ होती.

मनात अनेक विचार चाटून जात होते. परमेश्वरानं एखाद्याला किती भरभराट, सुख-समृद्धी, आनंद दिला आहे तर एखाद्याला नुसतंच भरभरून दारिद्र्यच दारिद्र्य आणि असह्य दु:ख दिलं आहे. किती ही तफावत, केवढी मोठी ही दरी निर्माण झालीय आपल्या समाजामध्ये. मग ती आर्थिक दरी असो अथवा

सामाजिक, जाती-धर्मातील दरी, या सगळया विचारात झोप कधी लागली कळलंच नाही.

पहिल्या-पहिल्यांदा या शहरी जीवनात मन रमत नव्हतं. घुसमटल्यासारखं वाटायचं. दिवस जाता जात नव्हते. वसतीगृहात, कॉलेजात मन रमत नव्हते. पण आता सारं खुलं खुलं वाटत होतं. जिवलग मित्रही झाले होते. माझ्या गावचा जिवलग मित्र अनिल आणि मी एकाच खोलीत रहात होतो. आणि एकाच वर्गातही होतो.दोघांच्या गावाकडच्या गप्पागोष्टी तासन्‌तास रंगायच्या. आमचा एकमेकांना खूप मोठा आधार होता.

सुमैयाचा वाढदिवसाच्या दिवशी तिच्या घरी राहिलो होतो ही बातमी सगळया मित्रमैत्रिणींना समजली होती.

*****