Aaghat - Ek Pramkatha - 5 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 5

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(5)

पण आता तिला मी आश्चर्याचा धक्का द्यायचं ठरविलं. तिच्या मैत्रिणीला शबानाला जाऊन भेटलो. पण सुमैयाला काही न सांगण्याच्या अटीवर तिला सुमैयाचं आवडतं गाणं कोणतं ते विचारून घेतलं. तिचं आवडतं गाण होतं ‘मोहब्बते’ चित्रपटातील ‘हम को हमीसे चुरालो दिल में कही तु छुपालो.’

सांस्कृतिक कार्यक्रमाचा एकदाचा दिवस उजाडला. कार्यक्रम सुरू झाला. मला ज्यांनी भाग घेण्यास विरोध केला होता त्यांना आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. पण त्यांनी मला काहीच करण्याचा त्यावेळी मात्र प्रयत्न केला नाही. मी मात्र माझ्या मैत्रिणीच्या शोधात होतो. कार्यक्रम सुरु होऊन एक तास झाला तरी सुमैया आली नव्हती. डान्स शो, मिमिक्री शो, फॅशन शो, कॉमेडी शो संपले होते. समूहगीत, ग्रुप डान्सनंतर मध्यांतर होणार होता. आता शिल्लक होते फक्त वैयक्तिक गायन. तरीही सुमैयाचा येण्याचा काही पत्ता नव्हता. शेवटी मी शबानाला जाऊन भेटलो तिला विचारलं,

‘‘शबाना, सुमैया आली नाही?’’

‘‘नाही! तू येणार नाहीस, तिच्या आवडीचं गीत गाणार नाहीस, म्हणून कदाचित ती आली नसेल आणि तू अट घातल्यामुळे मी तिला भेटलेच नाही.’’

माझ्या लक्षात आलं की, आपण फार मोठी चूक केली आहे. पण नंतर वाटलं की मी येणार नाही,म्हणून सुमैयानेही यायचं नाही असे ठरवलंच असावं. शेवटी मी पुन्हा शबानाकडे जाऊन सुमैयाला बोलावून आणायला सांगितलं. माझं गीत सुरू व्हायच्या अगोदर सुमैया ५ मिनिटे अगोदर आली होती. पण ती आलेली मला दिसली नाही. मी माझ्या गाण्याचा नंबर येईपर्यंत चारी दिशांवर नजर फिरवत होतो. मी गर्दीतून उठून पुढं जाऊन बसलो. कदाचित मी पुढे जाऊन बसल्यानंतर सुमैया पाठीमागे गर्दीत येऊन बसली असेल. नंतर मी तिला शोधण्याचा

प्रयत्न केला नाही. या क्षणाला आपल्याला माघार घेऊन चालणार नाही. माझं नावं पुकारण्यात आलं. मी स्टेजवर गेलो. उत्साह जाणवत नव्हता. कदाचित सुमैया असती तर उत्साह दुणावला असता. पण - बिनं काही नाही. मनानं ठरवलं.

हृदयातून गीत गायचं, हृदयाची हाक, तळमळीने मी म्हटलेले गीत सुमैयाच्या काळजाला नक्कीच स्पर्श करून जाईल. मी गीत गायला सुरू केलं.

‘‘हमको हमीसे चुरालो,

दिल में कही तुम छुपालो,

हम अकेले होना जाए,

दूर तुमसे होना जाए,

पास आओ गलेसे लगाओ.’’

गीत गात असताना इथपर्यंत येतो न्‌ येतो तोच सुमैयाच्या आनंदून गेलेल्या आणि भावनामय झालेल्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं आणि पुन्हा माझा उत्साह दुणावला.

मी जोशपूर्ण गीत म्हणू लागलो. तसा सगळयांचाच प्रतिसाद मिळू लागला. वन्समोअरने कॉलेजचा हॉल दणदणू लागला. मी पुन्हा गीत साजरे केले. ते अप्रतिम झाले. सगळयांची शाबासकीची थाप पाठीवर पडली. मी भारावून गेलो. गावाकडच्या आजी-आजोबांची आठवण आली. त्यांना दाखवायचं होतं, मलाही गाता येतं, तेही सुंदर!

सुमैया भावविवश झाली होती. तिचे डोळे पाणावलेले होते. याचं कारण मी समजू शकलो नाही. पण ते तीचे कदाचित आनंदाश्रू होते. प्रत्येकजण मला भेटून शाबासकी देत होते, अभिनंदन करीत होते. मी भारावून गेलो होतो.

हळूहळू गर्दी ओसरत होती. सुमैयाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान वाटलं. मी तिचा चेहरा न्याहाळत होतो. कार्यक्रम संपला तरी गर्दी अजूनही होती. बाहेर पडण्याचा प्रत्येकाची धडपड चालू होती. हा कार्यक्रम मला सुखद समाधान देऊन गेला होता. प्रत्येकाची बाहेर जाण्याची धडपड चालू होती. मी स्तब्ध होऊन एकाच जागी थांबलो होतो. इतक्यात -

‘‘अरे, प्रशांत चल आता, तुझ्या गाण्याची धुंदी अजून गेली नाही वाटतं.’’

(अनिल गर्दीतून अचानक येऊन मला म्हणाला.)

‘‘नाही तसं काही नाही.’’

‘‘मग असा स्तब्ध होऊन काय विचार करतोस?’’

‘‘विचार काही नाही.’’

‘‘मला माहित आहे. तू कोणता विचार करतोस, तुझ्या मनात कोणता विचार आहे.’’

‘‘तुला धमकी दिलेल्या मुलांचाच ना ! कारण तू त्यांच्या मर्जीविरुद्ध वागलास म्हणून.’’

‘‘आम्ही जीवाला जीव देणारे मित्र असल्यावर काळजी करायचं काहीच कारण नाही.’’

‘‘चल, आता खूप उशीर होतोय.’’

माझ्या मनात काय चाललंय ते अनिलनं अचूक ओळखलं होतं. त्याच्याबरोबर रस्ता कातरू लागलो. हॉस्टेलवर आलो तर सुरेश आणि संदिप

अगोदर येऊन खोलीत काहीतरी बोलत होते. त्याचं बोलणं थोडं गंभीर वाटत होतं. मी गेल्यानंतर त्याचं बोलणं थांबलं. मी विचारलं,

‘‘काय झालं? असं अचानक तुम्ही तुमचं बोलणं का थांबवलं?’’

माझ्या या प्रश्नावर दोघांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. दोघांचेही चेहरे गंभीर वाटत होते. तसं माझ्या मनातही अनेक प्रश्नांचं काहूर माजायला सुरूवात झाली होती. काय वाईट झालेलं आहे? की वाईट घडणार आहे? मी वारंवार विचारूनही माझ्या प्रश्नांची उत्तरे त्या दोघांकडून मिळत नसल्याने मला खूप चीड आली आणि मग मी रागाने म्हणालो –

‘‘तुमच्या या जिवाभावाच्या मित्राची शपथ आहे. खरं खरं सांगा काय झालं आहे? निदान जे संकट असेल त्यातून मार्ग काढता येईल.’’

‘‘होय, प्रशांत मार्ग तर काढायलाच हवा, तू आता आम्हाला सोडून एकटे कुठेच जाऊ नको. तुला धोका आहे.’’

संदिप थोडंसं घाबरत म्हणाला,

‘‘म्हणजे तू काय म्हणतोस मला समजले नाही.’’

‘‘प्रशांत, तुम्ही येण्याच्या अर्धा तास अगोदर सतिश आणि त्याचे मित्र आले होते. तू त्यांच्या मनाविरुद्ध वागलास म्हणून ते तुझ्यावर खूप चिडले आहेत. हातात काठ्या घेऊन ते इकडे आले होते. त्यांनी तुझ्याबद्दल आम्हाला विचारलं. आम्ही सांगितलं,

‘‘कार्यक्रमावरून अजून आलेला नाही.’’ त्यावर ते म्हणाले,

‘‘ठीक आहे, त्याला जीवाची काळजी घ्यायला सांगा.’’ असे बोलून गेले.

‘‘त्यांनी मला आव्हान दिलं आहे तर मी हे आव्हान झेलायला तयार आहे.’’

‘‘जीत होवो अगर हार, लढणं महत्त्वाचं मानतो. कारण लाचार जगणं आता जगायचं नाही. ताठ मानेनं जगायचं आहे.’’

‘‘होय, हेच अपेक्षित होतं आम्हांला प्रशांत तुझ्याकडून, तू एकटा आहेस असं समजू नकोस. या जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची साथ आहे तुला.’’

त्यांनी पेटविलेला माझ्या मनामधला स्वाभिमान जागृत झाला होता. याला कारणीभूत माझे हे जीवाभावाचे मित्र होते. त्यांना माझ्याकडून जे अपेक्षित होतं ते साध्य झालं होतं. ते माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार झाले होते. आता आम्ही एकजीव होऊन लढणार होतो. आम्हांला रोखणं कठीण होतं. पण

नियतीचा खेळ कुणाला समजला होता? जे व्हायचं ते झालं. जीवाची काळजी घेण्याची धमकी दिल्यानंतर आठ दिवसातच माझ्या कटू प्रसंग ओढवला.

अनिल गावी गेला होता. मी, संदिप आणि सुरेश रंकाळयावरती फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. सतीश आणि त्याचे साथीदार आमच्या पाठीमागे येत असल्याचे कोणालाच समजले नाही. सुरेशला वही घ्यायची होती म्हणून तो आणि संदिप जवळच असलेल्या स्टेशनरीत गेले. मी रस्त्याच्या कडेला थांबलो होतो. इतक्यात भरधाव गाडी आली. अचानक उचलून मला गाडीत ओढलं. मी ओरडणार तोच माझं दोघांनी तोंड दाबून धरलं. गाडी सुसाट वेगाने धावत होती. मला काहीच कळत नव्हतं. माझ्या नंतर लक्षात आलं की, हे सतीशचे आणि त्याचे साथीदार आहेत. त्यांच्या हातातील तलवार आणि सुरी पाहून मी पुरता घाबरुन गेलो होतो. गाडी निर्जन स्थळी येऊन थांबली.

सतीशने आपल्या साथीदारांना आदेश दिला. लाठ्या, काठ्या, तलवार बाजूला ठेवून मुक्का मार देण्याचा.

‘‘साल्या, आमच्या मर्जीविरुद्ध वागतोस? आम्हाला आव्हान देतोस? हुशारपण मिरवतोस. लक्षात ठेव आमच्यासारखे वाईट आम्हीच आहोत. आमच्या वाटेला जाशील तर आयुष्यातून उठशील.’’

अशा प्रकारच्या धमकीचे शब्द तोंडातून तर वरून हाताने, पायाने मार चालू होता. मी रडवेल्या चेहऱ्याने त्यांच्याकडे विनवणी करत होतो, पण कुणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मी ओरडत होतो, किंचाळत होतो. पण त्यातल्या कुणालाच दया येत नव्हती. त्या घमेंडखोर धमकीचा आव आणणाऱ्यांचे मी काहीच वाईट केलं नव्हतं. फक्त त्यांच्या दंडेलशाही विरुद्ध वागलो होतो. म्हणून मला त्यांनी एवढी मोठी शिक्षा द्यावी? सुडबुद्धीने पेटलेल्या त्यांच्या मनाला मायेचा पाझर फुटला नाही.

‘‘थांबा, चला आता लवकर उशीर नको.’’

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED