आघात - एक प्रेम कथा - 6 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 6

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(6)

सतिशने सगळया साथीदारांना आदेश दिला. तसे ते एका पाठोपाठ गाडीत बसले आणि क्षणाचाही विलंब न करता निघून गेले. मी विव्हळत, तडफडत त्या निर्जन जागी झाडीत पडलो होतो. संध्याकाळचे आठ वाजले होते. भीतीचे काहूर माजले होते. चारी दिशांवर अंधार पसरत होता. त्यांना थोडी देखील माझी द्या आली नाही. गुडघे फोडले होते. पाठीत काठ्यांचे व्रण उठले होते. अमानुषपणे त्यांनी मारहाण केली होती. जायचे तर कुठे? या पडलेल्या गडद अंधारात वाट कशी शोधून काढणार? रात्रभर थंडीनं कुडकुडत पडावं लागणार. एखादं श्वापद आपणाला गिळंकृत करणार तर नाही ना? असे अनेक नाना तऱ्हेचे विचार आणि प्रश्न मनाला भेडसावत होते. तिकडे तिघांची शोधाशोध चालू होणार होती. अपहरण झाल्याची बातमी सगळीकडे पसरणार होती, हे नक्कीच. मी रात्रभर भितीच्या छायेत पडून राहिलो. झोपही नव्हती, पक्ष्यांच्या किलबिलाटात पहाटे लागलेला डोळा उघडला, तशी सकाळ झाल्याची जाणीव झाली. अंधार सरताच मनातली भिती थोडीशी नाहीशी झाली. आता दुसरा प्रश्न माझ्या समोर होता की, या जंगलातून कसं बाहेर पडायचं?

वाट दिसेल त्या मार्गावरून चाचपडत चालत होतो. मनाला खूप वाईट वाटत होतं. कशाला हवा होता स्वाभिमान? काय करायचं होतं ते गीत गाऊन? मी असल्या फालतू गोष्टीत गुंतून जायला नको होतं? स्वाभिमान शिकविणारे आणि पाठीवर हात ठेवणारे आता कुठे गेले? या दु:खाच्या क्षणाला कोण येतं का? अशा अनेक विचारात मन गुंतलं होतं. इतक्यात... कुणाच्या तरी बोलण्याचा... कुजबुजाण्याचा... झाडाच्या सरसरणाऱ्या पानांचा अचानक आवाज आला. जिथं होतो तिथच एकदम स्थिरावलो. छातीत धडधड झाली. थोडीशी भीती मनाला स्पर्श करून गेली. पण ओळखीचा आवाज कानावर पडताच जीवात जीव आला. थोडंसं हायसं वाटलं. तो इतक्यात माझे मित्र माझ्यासमोर आले. त्यांना पाहताच माझ्या डोळयातून पाणी आले. सर्वांचेच डोळे पाणावले होते. अनिलने तर मला मिठीच मारली. मी भारावून गेलो होतो. सुरेश, दिलीप, हे माझे जिवाभावाचे मित्र माझ्या शोधात आले होते. थोडीशी धास्ती वाटत होती. ती याची की, सर्वांनी प्राध्यापकांना आणि हॉस्टेलच्या सरांना माझ्या संदर्भात माहिती दिली असेल तर या प्रकरणाला वेगळेच वळण लागेल.लोकांचा माझ्याकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन बदलून जाईल, म्हणून मी पटकन्‌ अनिलला विचारलं,

‘‘माझ्या अपहरणाची माहिती आणखी कुणाला सांगितलंय का तुम्ही?’’

‘‘आमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही तुझ्या अपहरणाची माहिती नाही.”

‘‘कारण याच्या परिणामाची आम्हाला जाणीव होती आणि माहिती दिली असतीच तर ती आम्ही तुझा दोन दिवस शोध घेऊनही तू जर आम्हाला सापडला नसतास तर...’’

‘‘बरं ते जाऊ दे. बाकीचं विचार मनातून काढून टाक. आम्ही आहोत ना! घाबरायचे काहीच कारण नाही.’’

सुरेश गडबडीने पुढे येत माझा हात पकडत म्हणाला,

‘‘प्रशांत, आता हॉस्पिटलला तुला दाखल व्हायला हवं.’’

‘‘ते ठीक आहे पण?’’ दिलीप अर्धवट बोलून थांबला

‘‘अरे पण आमचा जीव भांड्यात पडेल असे अर्धवट का बोलतोस. पूर्ण वाक्यात बोल ना.’’ रोहन म्हणाला.

‘‘आपणाला प्रशांतबाबत सगळयांकडून विचारपूस केली जाणार. आपणाला एकच कारण सांगायला हवं. सगळयांनी वेगवेगळं कारण सांगून जमणार नाही.आपण सगळयांनी मिळून गाडीच्या अपघातात थोडीशी दुखापत झाली आहे म्हणून सांगायचं. कारण फ्रॅक्चर वगैरे काही झालेलं नाही. ठीक आहे! ठरले तर मग.’’

सगळयांनी होकारार्थी मान हलवली. अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. दुखापत वगैरे काही नव्हती. मुका मार बसल्याने अंग सुजलं होतं. आजी-आजोबांना न सांगण्याची विनंती मी मित्रांना केली होती. सगळे हॉस्पिटलमध्ये येऊन तब्येतीची विचारपूस करून गेले होते. सुरेशचा चेहरा आता पडलेला होता. म्हणून मी विचारले,

‘‘सुरेश, काय झाले आज नाराज का आहेस?’’

‘‘काही नाही नाराज वगैरे काही नाही मी.’’

‘‘खर सांग. माझ्यापासून लपवून ठेऊ नको.’’

‘‘काही नाही रे गेली चार दिवस तू येथे ॲडमिट आहेस. पण दोन दिवसांपासून एक गोष्ट वारंवार माझ्या मनाला सतावते आहे.’’

‘‘कोणती रे?’’

‘‘हीच की, बाकी सगळे मित्र,शिक्षक तुझी चौकशी करून गेले पण राज, स्नेहल, सुमैय्या इकडे फिरकलेच नाहीत. किती स्वार्थी असतील. असे मित्र कुणालाच कधीच भेटू नयेत.’’

‘‘येतील रे. नक्कीच येतील. त्यांच्या मनात माझ्याबद्दल आपुलकी, प्रेम आहे. त्यांना मित्रत्व कसे निभवायचं माहीत आहे ते नक्कीच येतील.’’

दुपारचे साडे बारा वाजले होते. बाहेर कडक ऊन पडले होते. उन्हाच्या झळा खिडकीतून आत येत होत्या. एकटाच विचारात मग्न होऊन बसलो होतो. प्रत्येक रूग्णाला स्वतंत्र खोली व त्यामध्ये उपचार व्यवस्था अशा सोयीने नटलेलं हे एकमेव हॉस्पिटल होतं. मी दार बंद केलं होतं. अचानक दारावर टिक्‌ टिक्‌ असा आवाज आला. मला आता थोडं बरे वाटत होते. पडून राहण्याचा प्रश्नच नव्हता. सुजही कमी झाली होती. मी आतून आवाज दिला.

‘‘दार उघडेच आहे.’’

हळूवारपणे दार उघडले. पाहतोच तर समोर सुमैया.

‘‘ये सुमैया.’’ तशी सुमैया खुर्चीवर येऊन बसली.

‘‘आता बरे वाटते का?’’

‘‘खूप लागले नाही ना?’’

सलग दोन प्रश्न विचारून सुमैया थांबली.

‘‘पहिल्यांदा प्रशांत मला माफ कर. पुन्हा तुला मी कोणताही आग्रह करणार नाही.’’

‘‘काय बोलतेस तू सुमैया, तुझे बोलणे मला समजले नाही.”

‘‘प्रशांत, माझ्यामुळे तुला हे सारं सोसावं लागलं. मला सारं काही समजलं आहे. त्या सतिश आणि त्याच्या मित्रांनी मिळून मारहाण केली आहे ना. कारण तू कार्यक्रमात भाग घेऊन माझ्या आवडीचं गीत गायलंस म्हणून. खरंच प्रशांत तुझ्या मित्रत्वाला मी सलाम करते. कारण गॅदरींगच्या अगोदर तुला त्यांनी धमकी देऊनही तू माझ्यासाठी हे संकट ओढवून घेतलंस. केवळ माझ्यासाठी. जर हे अगोदर माहित असते तर मी तुला भागच घेऊ दिला नसता. मला माफ कर, प्रशांत. तुझ्यातली मैत्री मी समजू शकले नव्हते. मला माफ कर, प्रशांत.’’ खरंतर मी फक्त तिच्यासाठीच गीत गायलं नव्हतं पण ते तिला सांगून पटणारं नव्हतं. माझ्या मित्रांनी माझ्यातला स्वाभिमान जागा केला होता. त्यांच्या निर्भिड विचारानं मी पेटून उठलो होतो. सतीश आणि साथीदारांच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मी भाग घेतला होता. यामुळे सुमैयाच्या मनात माझ्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण होणं साहजिक होतं.

ती म्हणाली, ‘‘खरंच प्रशांत, मी तुला आजपर्यंत कधीच समजू शकले नाही. हा पण तुझ्याबद्दल मला पूर्वीपासून आपुलकी आहे. पण इथून पुढे तू माझा सच्चा मित्र म्हणून आयुष्यभर राहशील. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात तू असशील.’’

‘‘नको सुमैया, या साध्या गोष्टीचा तू एवढा गाजावाजा करू नकोस. खरं तर सतिश आणि त्याच्या मित्रांनी दिलेल्या धमकीमुळे मी भाग घेणारच नव्हतो. पण मला माझ्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली. माझ्यातलं ‘मी’पण जाग केलं, ते माझ्या जिवलग मित्रांनी. म्हणूनच तुझं गीत गाऊ शकलो. याच सारं श्रेय तू त्यांना द्यायला हवं.’’

सुमैया म्हणाली, ‘‘तुझा मोठेपणा लपवून ठेवण्यासाठी तू खोटं बोलत आहेस. लक्षात ठेव,

मी न समजायला काही वेडी नाही.”

दुपारचे चार वाजले होते. बारा वाजल्यापासून आमचं बोलणं चालू होतं.

‘‘प्रशांत, मी जाते. तू विश्रांती घे. मी उद्या येऊन जाईन. तब्येतीची काळजी घे. काय.’’

सुमैया जड अंत:करणाने गेली होती. हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. तिला माझ्याशी खूप गप्पा माराव्यात असं वाटत होतं. पण शेवटी वेळेचं बंधन आहेच ना!

हॉस्पिटलमधून पाच दिवसांनी मला डिसचार्ज देण्यात आला.

मी होस्टेलवर आलो. होस्टेलवर सरांनी, त्यांच्या पत्नीने माझी आपुकीने चौकशी केली.

सर म्हणाले, ‘‘प्रशांत, तुला कुणाचा आधार नाही. जरा काळजीने रहा. आपली परिस्थिती गरिबीची. उद्या जास्त काही झाले तर मोठा खर्च तुला झेपणार आहे का? आता थोडक्यात आवरले म्हणून नाही तर त्या काबाडकष्ट करणाऱ्या आजी-आजोबांनी काय करायचं? तुच सांग.’’

सर थोडेसेच बोलायचे पण त्यांचं बोलणं खूप काही सांगून जायचं. मनातल्या मनात मी मलाच दोष देत होतो. पण झालं गेलं शेवटी विसरून जाणं आणि पुढं चालत राहणं महत्त्वाचं असतं. झालेल्या चुकीबद्दल विचार करत बसल्यास पुढच्या प्रगतीला खिळ बसते.

*****