Ek hota raja - 12 (Last part) books and stories free download online pdf in Marathi

एक होता राजा…. (भाग १२) अंतिम भाग

थोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. "असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… " पाऊस थांबला होता… " पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… " निलमने डोळे पुसले आणि निघाली. " बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…" निलमने होकारार्थी मान हलवली."चल… कार पर्यंत सोडतो तुला… " निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं.
" जेवून जातेस का… ",
"नको… एक शेवटचं विचारू का… ",
"हो… विचार ना…",
"स्वतःसाठी काही केलंस का कधी…. आतापर्यंत… " राजेश उगाचच हसला.
" तुला आठवतेय का मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये… ",
"हो… ते कसं विसरणार…तेव्हापासून ओळख झाली आपली… म्हणून तर तुला 'राजा' बोलते मी… राजा झालेलास ना तू… ",
"हो… राजा केलेलं मला… त्यात एक dialogue होता मला… अजून आठवतो मला… "राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच.प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते… एक राजा जातो,दुसरा येतो. फक्त नाव बदलतं… जबाबदारी तीच राहते…. त्याची प्रजा आनंदात रहावी म्हणून… "…. तसाच जगतो आहे मी. बस्स, बाकी काही नाही." तितक्यात वरून राजेशच्या "निलम" ने हाक दिली." बाबा… जेवायला ये. " तेव्हा राजेश निघाला. " Thanks निलम… आठवण ठेवल्याबद्दल… पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही… तरी माझी निलम माझ्याजवळच आहे… एक ती… आणि एक हि… " राजेशने शर्टाच्या खिशाला हात लावला. निलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली, खूप रडली.


रात्रीचे १२ वाजत होते. पुन्हा पाऊस… थोडासा रिमझिम असा, सोबतीला गार वारा… गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होती. राजेश घरी येऊन झोपला होता शांत… तिकडे निलम, तळमळत होती आजही… तिच्या त्या महागड्या, मऊ अश्या बेडवर तिला झोप येत नव्हती.काहीतरी टोचत होतं तिला… उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली पुन्हा… पावसाच्या सोबतीने… इकडे राजेश, त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्याच्या वर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली निलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा… त्यातल्या एकाला झोप येत नव्हती… तो आजीजवळ बसला होता… त्याचे नावं राजेशने " राजा" ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. "याद पिया कि आये… " सोबतीला राजेश आणि निलमचे विचार होते. राहून राहून तिला तेच वाटतं होतं, यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं, राजा झोपला असेल… पण तो जागाच होता.
" काय रे… झोप येत नाही का आज… ",
"नाही ना… आज्जी, एक गोष्ट सांग ना…. छान अशी…. राजा-राणीची… "छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला.
"हं… सांग आता." ,
"आठवते आहे… थांब जरा… हा आठवली. एक आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत होता… मग ",
"आज्जी… आज्जी… ",
"अरे काय… ? " ,
" प्रश्न आहे एक…",
"गोष्ट तर पूर्ण होऊ दे… ",
"नको… मला सांग आधी… शाळेत शिकवलं मला, शिवाजी महाराज… ते राजा होते ना… त्याच्यासोबतीला पण खूप राजा होते… मग, गोष्टीत असा का म्हणतात, एक राजा होता… म्हणून."आजीला त्या बाल-प्रश्नावर हसू आलं.
" सांगते हो… झोप तू… " आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो.
"सांग ना आज्जी… ",
"सांगते… राजा खूप होते… खूप सम्राट होऊन गेले… खूप जणांनी राज्य केलं. पण जो मनावर राज्य करतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो, तो खरा राजा… लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा… तसे फार कमी झाले आतापर्यंत… आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला." पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. " समजलं ना आता तुला….चल, तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते… गोष्टीच नावं आहे,…. एक होता राजा… "


---------------------------------------------------- The End ----------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED