BABANCHI Date books and stories free download online pdf in Marathi

बाबांची डेट

बाबांची डेट

"सई अगं आवर ना लवकर ... बाबांना सोडल्यावर मला ऑफिसला पण जायचं आहे ... दोन तीन दिवसांपासून रोज उशीर होतोय... बॉस जाम चिडलाय माझ्यावर", शिरीष बुटाची लेस बांधीत काहीसा चिडून म्हणाला.

"हो रे बाबा करतेच आहे ना मी... बघतो आहेस ना ? दहा हात नाहीयेत मला", सईने पण आपला राग व्यक्त केला.

"बाबा तुमचं आवरलं का ? चला लवकर तुम्हाला बँकेत सोडतो... नंतर मला ऑफिसला पण जायचं आहे... पेन्शन घेतल्यावर तुम्हीं या मग रिक्षाने"

"शिरीष ... तू जा ऑफिसला, मी जाईल नंतर सावकाश"

"नको नको, चला माझ्या बरोबर ... नंतर बँकेत खूप गर्दी होते"

"शिरीष, अरे कशाला इतकी काळजी करतोस ? जा तू ... मी जाईल नंतर", बाबा खिडकीतून खाली बघत म्हणाले

"ठीक आहे जा मग... इथे मीच सगळ्यांची काळजी करीत असतो... तुम्ही मात्र आपले मर्जीचे मालक"

"सई झालं का तुझं? मला चहा दे थोडा", शिरीष किचनमध्ये जात म्हणाला.

"तिकडे बघा", सईने दबक्या आवाजात बाबांकडे बोट दाखवीत सांगितले

"काय?"

"अरे आजकाल बाबा घरात कमी आणि बाहेरच जास्त असतात"

"म्हणून काय झालं ? नसेल लागत घरात मन, घरात तरी किती वेळ बसणार म्हणून जात असतील मित्रांमध्ये"

"ते मी समजू शकते रे, पण दहा बारा दिवसांपासून मी काहीतरी वेगळंच बघत आहे"

"काय म्हणायचं काय आहे तुला ? जरा स्प्ष्ट बोलशील का?"

"समोरच्या बिल्डींगमध्ये एक नवे कुटुंब राहायला आले आहे. एक आजीबाई आहेत त्यांच्या सोबत, बाबा सतत त्यांच्या घराकडे बघत असतात"

"छे .. काहीतरीच काय सई ? अगं बाबांविषयी असा विचार तरी कसा केलास?"

"ठीक आहे, तुझा विश्वास नाहीये ना? मी दाखवते, ये इकडे", असे म्हणून सई शिरीषला घेऊन बाल्कनीत गेली. तिथून बेडरूमची खिडकी दाखवली. बाबा खिडकीच्या चौकटीवर हनुवटी टेकवून समोरच्या बिल्डींगकडे एकटक बघत होते. शिरीषला हसू आले.

"चल व्यत्यय नको आणू, मजा करू दे", शिरीष सईच्या डोक्यावर टपली मारीत म्हणाला

शिरीषने टिफिन, बॅग घेतली आणि सईकडे बघत बाबांना थट्टेने हाक मारीत विचारले

"बाबा येताय ना? कि मी जाऊ?"

"नाही तू जा, माझे जरा पोट दुखत आहे, मी जाईल नंतर"

"काय... पोट दुखतंय? मग दवाखान्यात जायचं का?"

"अरे नाही नाही, असं काही जास्त दुखत नाही, तू जा ... मी थोडा आराम करतो, मग वाटेल बरे"

"बरं, काळजी घ्या हं... येतो मी"

बाबांनी उत्तर दिले नाही. त्यांचे सारे लक्ष समोरच्या इमारतीतील तिसऱ्या माळ्यावरील असलेल्या घरावर होते. कधी बाल्कनी, कधी किचनची खिडकी, तर कधी बेडरूमची खिडकी अशी त्यांची नजर फिरत होती. शिरीषचा आवाज त्यांच्या कानी गेलाच नाही.

शिरीष गाडीची चावी घेऊन खाली उतरला. त्याला हसू आले. आयला, आपले बाबा पण ? गाडीत बसता बसता वरती बघितले. स्वारी अजून पण खिडकीतच होती. शिरीषने बाल्कनीत उभ्या असलेल्या सईला हात दाखवून निरोप घेतला. तोच हात आपल्या कपाळी लावून 'च...च च ' करीत ऑफिसला निघून गेला.

सई घरकामात गुंतली. शिरीषचे बाबा, विनोद चांदवडकर, खिडकीतून कधी खाली.. कधी समोरच्या इमारतीकडे बघत होते. शेवटी कंटाळून घरात येरझाऱ्या मारू लागले. चेहऱ्यावर प्रचन्ड तणाव दिसत होता. इतक्यात खिडकीतून एक प्रखर प्रकाश आत आला. उन्हामध्ये कोणीतरी आरसा धरला असावा. विनोद चांदवडकर त्याप्रकाशाने चमकून उठले. एखाद्या वीस-बावीस वर्षांच्या तरुणा सारखी खिडकीकडे धाव घेतली. समोरच्या बाल्कनीत कोणीतरी उन्हात आरसा घेऊन उभं होतं. विनोदरावांनी धावत जाऊन कपाटातून एक छोटा आरसा काढला. खिडकीपाशी येऊन तो आरसा त्यासमोरून येणाऱ्या प्रकाशात धरला. तसा तो प्रकाश बंद झाला. विनोदरावांनी घाईघाईने बूट घातले आणि शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर पडले. जातांना सुनबाईला हाक मारून सांगितले, "सई ..बेटा जातो मी"

"हो हो .. जा सांभाळून, लवकर या तुमच्या आवडीचे जेवण तयार करून ठेवते", सईने किचन मधून होकार दिला

पण विनोदरावांकडे ऐकायला वेळच नव्हता. ते एखाद्या तरुण मुलासारखा धावत जिना उतरू लागले. उतरता उतरता दोनदा पाय घसरून पडले असते पण थोडक्यात बचावले.

समोरच्या इमारतीतून तितक्याच चपळाईने एक साठ – बासष्ठ वर्षांच्या आजीबाई उतरल्या. विनोदरावांनी त्यांना बघून न बघितल्यासारखे केले. डाव्या बाजूला चालत जाऊन एक टॅक्सी थांबवली. ते टॅक्सित बसले. मागून त्या आजीबाई आल्या आणि त्यांच्या टॅक्सित बसल्या.

"अगं काय इंदू ? किती उशीर?"

"अरे असं काय करतोस विनू? घरात लेकी-सुना आहेत. प्रशांत आताच गेला ऑफिसला, तो गेला तेव्हा कुठे मला संधी मिळाली घरातून बाहेर पडायला"

"तुझे हे नेहमीचेच आहे... आधी उशीर करायचा आणि नंतर कारणे दाखवायची"

"तुझ्यासारखी मोकळी नाहीये रे मी, काम असतात घरात, सगळं आयतं येत नाही समोर तुझ्यासारखं"

"तू कधी ऐकून घेतलं आहेस का?"

"निघायचं का? का इथंच बसायचं?", टॅक्सीवाल्याच्या प्रश्नाने दोघे भानावर आले.

"हो हो... ते बँकेत घेऊन चल"

"कोणती बँक?"

"अरे ती आहे ना? ती.... काय बरं नाव तिचं?"

"अहो बाबा नाव नाही सांगितलं तर कसं कळणार मला?"

"अरे ... ती आहे ना ... त्या सर्कलजवळ, इंदू तू समोर असलीस ना कि मी सगळं विसरून जातो बघ"

"शी बाई... अहो काहीतरीच काय? तो टॅक्सीवाला काय म्हणेल?"

"बाबा हर्निमन सर्कल म्हणायचं आहे का?"

"हो तेच ते , त्याच्याजवळचआहे ती बँक"

"ठीक आहे सोडतो तिथे...नंतर घ्या शोधून"

"बरं चल लवकर इथे उभा नको राहू जास्त "

'यांना बँकेचे नाव आठवेना, आणि लफडी करायचीयत', टॅक्सिवाला पुटपुटला

"काय म्हणालास?"

"काय नाय, तुम्ही बसा"

"ठीक आहे चल लवकर आणि जास्त हुशाऱ्या मारू नकोस, तुझ्या वयाचा मुलगा आहे माझा"

टॅक्सिवाला चालवू लागला. विनोदराव टॅक्सित बसून इंदूबाईंना भरभरून आपल्या डोळ्यात साठवू लागले. एकटक त्यांच्याकडे बघत होते. इंदूबाईच्या हवेने उडणाऱ्या केसांना नीट करण्याचा प्रयत्न करीत होते. इंदुबाई मात्र लाजून बाहेर बघत होत्या. त्यांना आपल्या विनूच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचे धाडस होईना. एखाद्या नववधू प्रमाणे त्या आपले अंग चोरून बसल्या होत्या. टॅक्सिवाला आरशातून त्यांची गंमत बघत होता. त्याला ह्या वृद्ध-प्रेमाचे नवल वाटले. साहजिक कुणाला पण वाटले असते.

"अरे अरे थांबव, किती पुढे नेतोस?", टॅक्सी हर्निमन सर्कल जवळ आल्या बरोबर विनोदराव टॅक्सिवल्यावर ओरडले.

"अहो बाबा, थांबवतो ओरडता काय? गाडी बाजूला तर घेऊ द्या, इथे रस्त्यातच थांबवू का? एखादी गाडी बिडी लागली तर बोंबलत सुटलं माझ्या नावान"

"अरे ये असा उद्धट पणाने काय बोलतोस? तुला माहित आहे का मी कोण आहे तो?"

"जाऊ द्या हो, ये बाबा किती पैसे झाले तुझे?", इंदूबाई मध्यस्ती करीत म्हणाल्या

"बहात्तर झाले"

"हे घे", असे म्हणून इंदूबाईंनी टॅक्सीवाल्याला शंभर रुपयांची नोट दिली.

"अगं इंदू तू कशाला देतेस? मी देतो थांब"

टॅक्सीवाल्याने उरलेले पैसे इंदूबाईंच्या हाती दिले. विनोदराव टॅक्सिवाल्याकडे रागाने बघत बघत टॅक्सितून खाली उतरले.

"आजी म्हाताऱ्याला सांभाळून ने", टॅक्सीवाला जाता जाता चिडवून गेला.

"अरे ये नालायका थांब थांब, जातो कुठे?", असे म्हणून विनोदराव टॅक्सिच्या मागे धावले. त्यांना इंदूबाईंनी रोखले.

"जाऊ द्या हो. नका उगीच त्रास करून घेऊ"

"बघितलंस इंदू ? ही आताची पिढी म्हणजे समाजाला कलंक आहे नुसती, बघितलंस तू किती उर्मट होता तो?"

"जाऊ द्याहो, नका आपला दिवस खराब करून घेऊ"

"हो, तझे म्हणणे बरोबरच आहे म्हणा, चल ती समोर आपली बँक आली.. बघ कशी माझी वाट बघत आहे?"

"हो चला, सगळे तुमचीच वाट बघत असणार", इंदुबाई विनोदरावांची थट्टा करीत म्हणाल्या

विनोदरावांना हसू आले. दोघे बँकेकडे चालू लागले. रस्ता ओलांडताना विनोदरावांनी इंदुबाईचा आपसूकच हात धरला. इंदुबाई शरमल्या.

"अहो हे काय? हात काय धरताय? कुणी पाहिल ना?"

"अगं ह्या वयात कोण बघणार म्हातारा म्हातारीला? चल तू, आणि हो... मी काही संधीचा फायदा नाही घेत आहे, एखादी गाडी वैगेरे नको लागायला म्हणून काळजी घेतोय"

या वयात आणि इतक्या वर्षांनंतर देखील विनोद आपली अशी काळजी घेतो हे बघून इंदुबाई मनोमनी सुखावल्या.

"विनू किती रे काळजी घेतोस माझी?"

"अगं ये, विनू काय म्हणतेस? विनोदराव चांदवडकर म्हण, मोठा आहे मी तुझ्यापेक्षा"

"बरं .. विनोददादा", इंदूबाई हसू लागल्या

"अरे रे उगीच तुला सांगितले, म्हण काय म्हणायचं ते म्हण बाई"

दोघेही बँकेच्या पायऱ्या चढून बँकेच्या दारात गेले. व्दारपालाने अदबीने दरवाजा उघडला. विनोदराव मनातून सुखावले. इंदूबाईंकडे बघत आपल्या कोटाची बाही नीट असतानाही उगीचच नीट केली. जणू काही ते इंदूबाईंना असे सांगायचं प्रयत्न करीत होते कि बघ माझी किती वट आहे. द्वारपालाच्या खांद्यावर हात ठेऊन त्याची विचारणा केली. जसे काही त्यांचे रोजचे बँकेत येणे जाणे आहे. बँकेत जाऊन ओळख नसतांनाही बँकेतल्या स्टाफला हात वर करून, "काय बरे आहे ना? सगळं ठीक चाललंय ना?" अशी विचारणा करून इंदूबाईंवर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न केला. इंदूबाईनी मात्र हे ओळखले होते. त्यांनी पण विनोदरावांच्या फुशारकीला योग्य दाद दिली .

विनोदरावांनी पेन्शन घेतली. बँकेतल्या स्टाफला नमस्कार करून निरोप घेतला. द्वारपालाला जाताना दहारुपयांची नोट देत, "तब्बेतीची काळजी घे" असा न मागता सल्ला दिला. बँके बाहेर येऊन इंदूबाईंचा हात धरून पायऱ्या उतरविल्या. टॅक्सिला हाक मारून बोलावले. दोघे टॅक्सित बसले.

"मरिन ड्राइव्ह चलो"

"मरिन ड्राईव्हला कशाला? घरी जाऊया ना", इंदूबाईंनी काहीसे घाबरूनच विचारले.

"अगं थोडं काम आहे माझं तिथे, झाल्यावर लगेच जाऊया घरी,... भय्या आप चलो"

"मला तर बाई काळजी वाटायला लागली आहे, अहो घरी काही सांगितले नाही मी"

"तू शांत बस बघू, किती घाबरणार घरच्याना, आजपर्यंत घाबरतच आलीस ना?", विनोदरावांनी इंदुबाईकडे बघत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

"तस नाही, पण मी कधी राहत नाही जास्त बाहेर, आणि काही सांगून पण आले नाही, मुलं काळजी करतील"

विनोदरावांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. टॅक्सी मारिन ड्राइव्हच्या रस्त्यावरून धावताना विनोदराव त्यांना बाहेर दिसणाऱ्या वस्तू, इमारती, समुद्र इत्यादी एखाद्या लहान मुलीला दाखवाव्या त्याप्रमाणे दाखवीत होते . इंदुबाई त्या गोष्टींचा आनंद घेत होत्या पण मनात मात्र भीतीचे काहूर माजले होते. टॅक्सी तारापोरवाला मत्स्यालया समोर उभी करून विनोदरावांनी अगोदरच काढून ठेवलेले पैसे टॅक्सिवाल्याला दिले. रस्ता ओलांडून मत्स्यालयाच्या गेटवर आले. दोन तिकिटे खरेदी करून मत्स्यालयात गेले. तिथे विविध प्रकारचे मासे दाखविताना विनोदरावांना कोण आनंद होत होता. आज ते खूप खुश होते. मत्स्यालय बघून झाले. दोघे तेथील माश्यांची स्तुती करीत बाहेर आले. तशी इंदूबाईंनी त्यांना परत घराची आठवण करून दिली.

'जाऊया थांब थोडी' या एका उत्तरा पेक्षा विनोदराव काहीच बोलले नाही. थोडे पुढे जाऊन चौपाटी समोरील एका महागड्या हॉटेल मध्ये इंदूबाईंना घेऊन गेले.

"अहो इतक्या महागड्या हॉटेलात कशाला आलो आपण?"

"तू पैशाची काळजी करू नकोस इंदू, मी आहे ना. अगं अगोदर कधी तुझी हौस पुरवू शकलो नाही. निदान आज तरी नाही म्हणू नको"

"ठीक आहे बाबा, पण मला खूप लाज वाटते आहे, सगळे बघ कशे आपल्या तोंडकडे बघत आहेत!"

"खुल्लम-खुल्ला प्यार करेंगे हम दोनों

इस दुनियासे नहीं डरेंगे हम दोनों

प्यार हम करते हैं चोरी नहीं

मिल गए दिल ज़ोरा-ज़ोरी नहीं

हम वो करेंगे दिल जो कहे

हम को ज़माने से क्या ??"

विनोदराव खूपच रंगात आले होते. इंदुबाई मात्र लाजून पाणी पाणी झाल्या. विनोदराव समोरची खुर्ची सोडून त्यांच्या शेजारी येऊन बसले. आता तर इंदूबाईचे काळीज तोंडाशी आले. त्यांना खूप भीती वाटली. इतक्यात हॉटेल मधील काही शौकीन लोकांनी त्यांचे फोटो काढले. त्यांच्या सोबत बसून फोटो काढले. त्यांच्या अतूट प्रेमाचे गूढ विचारले. इंदूबाईंनी लाजून चेहरा साडीच्या पदराखाली झाकून घेतला. वेटरने जेवण आणले. दोघांनी त्या खमंग जेवणाचा आस्वाद घेतला. विनोदरावांनी इंदूबाईंना स्वतःच्या हाताने भरवायचा प्रयत्न केला, पण इंदूबाईंनी त्यांना तसे करू दिले नाही. जेवण आटोपून दोघे बाहेर आले. हॉटेल बाहेर असलेल्या पानाच्या गादीवरून एक मसाला पान घेतले. दोघांनी ते अर्धे -अर्धे खाल्ले. समोरची टॅक्सी बोलावून तिच्यात बसले.

"गेट वे ऑफ इंडिया चलो", विनोदराव टॅक्सिवाल्याला म्हणाले.

इंदुबाई उडाल्याच, "अरे काय करतोस? आता गेटवे कशाला? किती उशीर होईल आपल्याला? घरचे काय म्हणतील?"

"इंदू, आज जगूया ना आपल्या मनासारखे, इतक्या वर्षांनी देवाने आपल्याला एकत्र आणले आहे. आज तरी ऐकुया ना मनाचे"

"तुझे म्हणणे मला पटते रे राजा, पण काही बंधनं आहेत कि नाही?"

"इंदू तुझा एक दिवस तरी देशील का नाही मला? तुला नाही वाटत का कि आपण जावे ? तुझी इच्छा नसेल तर ठीक आहे जाऊया परत", विनोदरावांचा कंठ दाटला.

"ठीक आहे. तुझ्या शब्दा बाहेर कधी गेले आहे का मी? तू म्हणशील तसे कर"

दोघे गेटवेला पोहचले. तिथून एलिफंटा गुफेकडे जाण्यासाठी बोटीत बसले. इंदुबाई काहीच बोलल्या नाही. जसे विनोदराव म्हणतील तसे करीत होत्या. त्यांना आपल्या विनूचे मन दुखवायचे नव्हते. एलिफंटाला पोहचल्यावर दोघांनी खूप धमाल केली. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवला. जुन्या आठवणी उजळल्या. रुसवे फुगवे काढले.

इकडे सई मात्र खूप अस्वस्थ झाली. दोन वाजून गेले तरी सासरा घरी आला नाही. विनोदराव घरी पोहचल्यावर ती पियूला, तिच्या लाडक्या मुलीला, शाळेतून आणायला जाणार होती. पण ते आले नव्हते. खूप उशीर झाला होता. म्हणून शेजाऱ्यांना घराकडे लक्ष द्यायला सांगून ती शाळेत गेली. शाळेतून पियूला घेतले. रस्त्यात कोणाशी बोलली देखील नाही. सरळ घरी आली. घरी येऊन बघते तर सासरे अजून आले नव्हते. ती खूप घाबरून गेली. तिने शिरीषला फोन केला.

"शिरीष, अरे बाबा अजून घरी नाही आले", सई रडू लागली.

"हे बघ सई .. रडू नकोस, असतील कोण्या मित्रांकडे..येतील ते", शिरीष ने तिला दिलासा दिला .

सहा वाजता तिने परत फोन केला

"शिरीष, बाबा अजून ही आले नाहीत. मला खूप भीती वाटते आहे, काही तरी गडबड आहे, तू लवकर घरी ये"

आता मात्र शिरीषच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातातून रिसिव्हर खाली पडला. ऑफिस मधल्या मित्राने येऊन त्याला सावरले. रिसिव्हर हातात घेऊन सईशी बोलला. सईने त्याला सगळी घटना सांगितली. तो म्हणाला, "वाहिनी काळजी करू नका, आम्ही लगेच निघतो."

शिरीष आणि त्याचा मित्र घरी पोहचले. त्यांना पाहताच सई शिरीषच्या गळ्यात पडली. तीला रडू अनावर झाले.

"शिरीष, कुठे गेले असतील रे बाबा? काही झाले तर नसेल ना?"

छोट्या पियूला काही कळेना काय चाललं आहे. मम्मी पप्पाचे बघून ती पण रडू लागली. सगळ्या घरात रडारड सुरु झाली. शेजारी पाजारी जमा झाले. झाला प्रकार ऐकून सर्वजण हादरून गेले. विनोदरावांचे गुण गाऊ लागले.

"ममा काय झालं आजोबांना? कुठे गेले ते?", गोंधळलेल्या पिऊन विचारले.

"माहित नाही पिऊ, पप्पा चाललेत शोधायला, येतील लवकरच ते", सईने पियूला दिलासा दिला.

"ममा, आजोबा देवबाप्पाच्या घरी तर नसतील ना गेले?, तिकडे गेल्यावर कोणीच परत नाही येत. आमच्या शाळेतल्या सोनूचे आजोबा अजून नाही आले."

"पिऊ ...!! असं नाही बोलायचं बेटा, बाबा येतील लवकरच", सईने पियूला शांत केले.

पियूचे बोलणे ऐकून तर शिरीषला रडू आवरेना. तो धाय मोकलून रडायला लागला. मित्राने, शेजाऱ्यांनी त्याला सावरले. गर्दीमधून कोणीतरी पोलीस स्टेशन ला जायचा सल्ला दिला. शिरीषला तो योग्य वाटला. सईला पियूकडे लक्ष द्यायला सांगून तो मित्रा सोबत पोलीस स्टेशनला जायला निघाला.

इकडे विनोदरावांना आणि इंदूबाईंना वेळेचे भानच राहिले नाही. कधी संध्याकाळ झाली कळलेच नाही. ते एलिफंटाहून संध्याकाळची शेवटची बोट घेऊन परत आले. थोडावेळ गेटवे जवळ घालवला. एकमेकांच्या सोबत फोटो काढले. तिथली कुल्फी खाल्ली. गेटवेची गर्दी कमी होऊ लागली, तेव्हा घरची आठवण झाली. दोघे उठले, घराकडे जाण्यासाठी टॅक्सित बसले.

शिरीष पोलीस स्टेशनला जायला घरातून निघाला. तितक्यात इंदूबाईंचा मुलगा प्रशांत आणि त्याची पत्नी सविता आले.

"अहो, तुमचे बाबा......."

"काय झालं बाबांना? कुठे आहेत ते?", शिरीषने प्रशांतचे पूर्ण ऐकून न घेताच घाबरून विचारले.

"अहो मी तुम्हालाच विचारायला आलो आहे. माझी आई देखील घरात नाहीये सकाळ पासून, खालच्या मुलांनी सांगितले कि ते दोघे एकाच टॅक्सितून गेले होते", प्रशांतने खुलासा केला.

"काय? एकाच टॅक्सितून? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. आमचे बाबा सकाळी पेन्शन घ्यायला गेले होते".

"अहो, मला खालच्या मुलांनी सांगितले, ते खोटं कशाला बोलतील? तुमच्या बाबांनीच नेलं असेल आईला, तशी ती कुठे जात नाही", आता प्रशांत काहीसा चिडला होता.

"हे बघा, आता इथे हुज्जत घालण्या पेक्षा आपण त्यांना शोधायला गेले पाहिजे, नाही तर नको ते वाईट घडायचे", शिरीषच्या मित्राने मध्यस्ती करीत म्हटले.

"हो हो बरोबर आहे, आणि तुम्ही माझ्या बाबांवर सरळ सरळ आरोप नका करू, तुमच्या आईने नसेल नेलं त्यांना हे कशावरून ?"

"वो जरा तोंड सांभाळून बोला, माझ्या आई विषयी बोलत आहेत तुम्ही", प्रशांत शिरीषच्या अंगावर आला.

"अरे काय करताय तुम्ही? इथे प्रसंग काय आहे आणि तुम्ही दोघे भांडत आहात", शेजारच्या जोशी काकांनी दोघांना बाजूला करीत म्हटले.

"ठीक आहे, चला अगोदर पोलीस स्टेशनला जाऊ", प्रशांत म्हणाला. ते घरातून बाहेर निघणार तितक्यात शेजारची पिंकी ओरडली.

"काका...काका तुमचे बाबा आले".

"बाबा आले?" पियूने विचारले. ती पळतच खाली गेली. बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली,

"बाबा कुठे गेले होते तुम्ही?"

"अगं, पिऊ रडतेस काय असं, थोडा बाहेर गेलो होतो", विनोदरावांनी पियूला शांत करीत म्हटले.

"बाबा, आपल्या घरात खूप लोकं आले आहेत", पियूने बातमी दिली.

विनोदराव समजून गेले, कि आपल्या पाठी काय झालं असेल. ते इंदूबाईंना म्हणाले, 'चल वरती... आज आपल्याला व्यक्त व्हायचं आहे'. इंदुबाई पुरत्या घाबरल्या. त्यांचे हात-पाय थरथरू लागले. विनोदरावांनी त्यांचा हात धरला आणि वरती आले. त्यांनी इंदूबाईंचा धरलेला हात बघून प्रशांतची तळपायाची आग मस्तकी गेली. तो त्यांच्या अंगावर धावून गेला. शेजाऱ्यांनी त्याला रोखले. शिरीष काही बोलूच शकला नाही. त्याला खूप शरमल्या सारखे वाटू लागले.

सई धावत पुढे गेली.

"कुठे गेला होतात बाबा? आम्हाला किती भीती वाटली. मनात काय काय विचार आले"

"सई अगं कशाला विचारतेस त्यांना? त्यांना कुठे काळजी आहे घराची? त्यांना तुझ्या अशा रडण्याने काही फरक पडणार नाही", शिरीषने आपला राग व्यक्त केला.

"शिरीष, अरे माझं ऐकून तर घे बेटा", विनोदरावानी त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले.

"काय ऐकायचं बाकी राहीलं बाबा? अहो, ज्या गोष्टी तरुण मुलं देखील करीत नाहीत त्या गोष्टी तुम्ही करीत फिरत आहात, शरम वाटते मला"

"शरम? काय वाईट केलं रे मी? मी विचारतो... अशी काय वाईट गोष्ट केली कि तुला माझी शरम वाटायला लागली?"

"बाबा आता काय बोलायला बाकी ठेवलं तुम्ही? अहो पूर्ण सोसायटीमध्ये आम्हाला उठण्या बसण्याच्या लायकीचे नाही ठेवले, आणखी काय वाईट व्हायला हवं होत?"

"शिरीष, अरे असं काय बोलतो आहेस?', विनोदरावांच्या डोळ्यात पाणी तरळले.

"बाबा पण तुम्ही सांगून जायला पाहिजे होत ना?", सई मध्ये येऊन म्हणाली.

"हो बेटा, चुकलं माझं, नाही सांगितलं मी, पण सांगितलं असत तर तुम्ही जाऊ दिलं असत का?", विनोदरावांनी आपली बाजू मांडली.

"अहो म्हणून का तुम्ही दुसऱ्याच्या आईला घेऊन जाणार का? आमच्या सर्वांना किती संकटात टाकले?", इतका वेळ गप्प बसलेल्या प्रशांतने जाब विचारला.

"मी म्हणते, त्यांनी जे केले ते केले पण आईला तरी समजायला पाहिजे होते ना?", सविताने पण आपला रोष काढला.

जी सून आपल्या समोर ब्र काढीत नव्हती, ती सून आज चार-चौघात आपली नालस्ती करते आहे हे बघून इंदूबाईंना जमिनीत गाडल्या सारखे झाले. त्या तोंडाला पदर लावून रडू लागल्या.

"आता बरे तुम्हाला रडायला आले, सकाळपासून घरातून बेपत्ता राहताना अक्कल कुठे चरायला गेली होती का?", सविताने सासूबाईंचा चांगलाच पानउतारा केला.

"नको ग सविता असं लांच्छन लावू, अगं काही वाईट नाही केलं मी, यायला जरासा उशीर झाला बस, यासाठी मी तुझी माफी मागते", इंदुबाई काकुळतीला येऊन म्हणाल्या.

"बस बस पुरे ते", सविताने एक तुच्छतेचा धुत्कार टाकला.

"बस !! पुरे झाले, एक शब्द ही बोलू नका इंदूला", विनोदराव कडाडले.

"हो नाही बोलत, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते", सविताने आपला रोष विनोदरावांकडे वळविला.

"आम्ही दोघांनी पुन्हा एकत्र येऊन उरलेलं आयुष्य सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे", विनोदरावांनी आपले मन मोकळे केले.

"वाह वा! आता हेच बाकी राहील होत ऐकायचं", सविता टाळ्या वाजवीत म्हणाली..

"अहो बाबा, काय बोलताय काय? डोकं ठिकाणावर तर आहे ना?", शिरीष आपल्या जागेवरून उठत म्हणाला.

"अहो, आता असं वागायचं वय राहीलं का तुमचं?", जोशीकाकांनी मिश्कीलपणे हसत विचारले.

"का काय झालं आमच्या वयाला?", विनोदरावांनी हात-खांद्याला झटका देत म्हटले.

"अहो, जगणे मुश्किल होईल आमचे, या समाजात आम्ही मान वर करून जगू नाही शकणार, काय खूळ भरलं या बाईंनी तुमच्या डोक्यात?", शिरीष ने इंदूबाईंकडे रागाने बघत म्हटले.

"खबरदार !! एक शब्द ही बोलू नकोस इंदुविषयी, हा विनोदराव चांदवडकर आपल्या इंदुविषयी एक शब्द ही ऐकू शकत नाही, पुन्हा बोलशील तर थोबाड फोडून ठेवीन".

"कोण लागते हो ही बाई तुमची? जिच्या मुळे तुम्ही माझे थोबाड फोडायला निघालात, काय नातं आहे तुमचं?', शिरीषने कंबरेवर हात ठेवीत विचारले.

प्रशांत तर काही बोलेनासा झाला. सविता त्याच्या बाजूला उभी राहून आपल्या सासूबाईंला खालच्या नजरेने बघत होती. जोशीकाका, शेजारचे इतर लोकं तमाशा बघत होते. आता विनोदराव काय उत्तर देतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले. सगळे कानात प्राण आणून ऐकू लागले.

विनोदराव सांगू लागले.

"इंदू आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. पाचवीला ती माझ्या वर्गात आली. पहिल्याच दिवशी तिची आणि माझी मैत्री जुळली. एकत्र खाणे पिणे, खेळणे बागडणे, अभ्यास करणे इत्यादी गोष्टीत आम्ही कधी मोठे झालो कळलेच नाही. बालपणीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कॉलेजात गेलो. तिथेही सोबतच होतो. जसे काही आम्ही एकमेकांसाठीच बनलो होतो. आम्ही लग्न करायचं ठरवलं. जात आड आली. हिच्या घरच्यांनी नकार दिला. आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. त्याच काळात माझ्या मामाची मुलगी म्हणजे तुझी आई आमच्या घरी राहायला आली. दोन महिन्यांची गरोदर होती बिचारी. तिने ज्याच्यावर अतोनात प्रेम केले तो मुलगा तिला सोडून पळून गेला होता. तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मामांची तब्बेत ढासळू लागली होती. त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तुझ्या आईला घरातल्या लोकांनी गर्भपात करायला सांगीतला. ती तयार होईना. तिला तिच्या पहिल्या प्रेमाची निशाणी म्हणजे तुला जन्म द्यायचा होता. ती काही एक ऐकायला तयार नव्हती. दिवस जात होते. तिचे पोट दिसून यायला लागले. मामा चिंतातुर झाले. त्यांचं तुझ्या आईवर खूप प्रेम होत. तिला नवरी झालेली पाहायचं होत. अशातच त्यांचा रक्तदाब खूप वाढला. त्यांना हार्टअटॅक आला. माझ्यावर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. माझा नाईलाज होता. मला इंदूला सोडून तुझ्या आई बरोबर लग्न करावे लागले. मामा वारले. माझे प्रेम मात्र उध्वस्थ झाले होते. माझी इंदू माझ्या पासून दुरावली गेली होती.

विनोदराव पुढे सांगू लागले, "तुझ्या आईला या प्रकरणाचा फार मोठा धक्का बसला. ती या प्रकरणातून स्वतःला सावरू शकली नाही. शरीराने जरी ती माझ्याशी विवाहित झाली होती तरी मनाने मात्र तिच्या सोडून गेलेल्या प्रियकराचीच होती. ती त्याला कधीच विसरू शकली नाही. त्याच्या विरहात झुरुन झुरुन शेवटी तू सहा महिन्यांचा होतास तेव्हा तिने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे माझे जीवन पुरते उध्वस्थ झाले. माझी इंदू माझ्या पासून दुरावली होती. आणि जिच्या सोबत इच्छा नसताना ही केवळ एक सहानुभूती, एक मदतीचा हात म्हणून विवाह केला ती सुद्धा सोडून गेली होती. बऱ्याच लोकांनी मला दुसऱ्या लग्नाविषयी सुचविले. कितीतरी नातेवाईकांनी स्थळं आणली. एक मुलाचा बाप आहे हे बघून देखील काही मुली माझ्याशी लग्न करायला तयार होत्या. पण मी दुसरे लग्न केले नाही. मला तुझ्यासाठी सावत्र आई आणायची नव्हती. तुझी आई आणि बाबा दोन्ही मीच झालो. दोन्ही भूमिका मोठया जबाबदारीने आणि व्यवस्थित पार पडल्या. तुला कसलीही कमी जाणवू दिली नाही." इतके बोलून विनोदराव खाली बसले. त्यांना भोवळ आली.

"झाले तुमचे? आता सगळे उघड झालेच आहे तर एक काम करा, आपले सामान घ्या आणि या घरातून चालते व्हा, एका क्षणात तुम्ही मला परकं केलंस, जे काही घडलं होत, ते तुमच्या पाशी होत. त्याची अशी जाहिरात नव्हती करायची, इतकी निंदा नालस्ती झाल्यावर मला तुमच्या सोबत एक क्षण ही राहायचे नाही".

"अरे आता या वयात मी कुठे जाणार? माझ्याकडे काय आहे? जे काही होत ते सर्व मी तुझ्या शिक्षणावर आणि लग्नावर खर्च केलं, आता माझ्या कडे काही शिल्लक नाही", विनोदराव काकुळतीला येऊन म्हणाले.

"ते मला काही सांगू नका, याचा विचार तुम्ही हे सगळं प्रकरण करण्या अगोदर करायला हवा होता", शिरीष काही ऐकायला तयार नव्हता.

"ठीक आहे, तू म्हणशील तसे, चल इंदू आपण जाऊ या", विनोदराव गुढघ्यावर हात टेकवीत म्हणाले.

"आई कुठेही जाणार नाहीये", प्रशांत ओरडला.

"काय? काय म्हणालास कुठे जाणार नाही? तू कोण तिला अडवणारा? चल इंदू या निर्दयी आणि मतलबी दुनिये पासून आपण लांब जाऊ", असे म्हणून विनोदराव इंदूबाईंसमोर हात पुढे करून उभे राहिले.

"तुम्हाला एकदा सांगितले ना आई कुठेही जाणार नाही म्हणून", प्रशांत ने विनोदरावांना धक्का देत दम दिला. प्रशांतच्या धक्क्याने विनोदराव तोल जाऊन खाली कोसळले, शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर डोके आदळून भळभळा रक्त वाहू लागले. शिरीषने बघून न बघितल्या सारखे केले. इतका वेळ आपल्या बाबांविषयी एक शब्दही सहन न करणारा शिरीष एक क्षणात परका झाला होता. त्याला काही एक फरक नाही पडला. छोटी पिऊ धावून गेली.

"बाबा ... बाबा !"

सई धावून पुढे आली. पियूच्या हाताला धरून खसकन तिला उभे केले. विनोदरावांकडे रागाने बघत पियूच्या पाठीत एक धपाटा देऊन म्हणाली, "कपडे खराब होतील ना".

स्वतःला इतके लागलेले असून देखील विनोदराव पियूच्या धपाट्याने हळहळले, "नको मारू सई, लहान आहे ती".

विनोदराव कसेतरी धडपडत उठले. इंदूबाईंना म्हणाले, "इंदू सगळे जग परके झाले... आता तू तरी नाही म्हणू नकोस"

इंदुबाई पुढे सरसावल्या आपल्या विनूला हात देण्यासाठी… पण प्रशांत आडवा आला.

"आई, खबरदार एक पाऊल पण पुढे टाकशील तर, या माणसाने आपली लाजलज्जा सोडली आहे. तू तरी आमचे नाक नको कापू"

"इंदू अगं, या बंधनात अडकवून घेऊ नकोस, हे सर्व मोहाचे पाश आहेत. तुला नाही कळणार. हे सर्व मतलबी आहेत. तुझे हात पाय चालू आहेत...तुझी कुठे तरी मदत होते म्हणून ठेवतील तुला, नंतर देतील फेकून एखाद्या कोपऱ्यात...नाही तर वाट बघतील तुझ्या मरणाची… चल".

इंदुबाई पुढे झाल्या. प्रशांत ने शपथ घातली, "आई… जर तू गेली तर मेलीस तरी तोंड पाहणार नाही तुझे, असे समजेन कि तू मला मेली आणि मी तुला मेलो".

इंदुबाई जागीच थांबल्या. टाकलेले पाऊल परत पाठी घेतले. त्यांना रडू अनावर झाले. भरल्या कंठाने त्या आपल्या लाडक्या विनूला म्हणाल्या.

"विनू, नाही रे येऊ शकत मी !

माझ्या मुलाची शपथ मोडून नाही येता येणार मला… आई आहे मी. तुझी गोष्ट वेगळी आहे, पुरुष काहीही निर्णय घेऊ शकतात. आम्हा बायकांना नसते ती मुभा, जा तू ... एक गोड स्वप्न समजून विसरून जा सगळं".

इंदुबाई मागे फिरल्या. प्रशांतचा हात धरला आणि पायऱ्या उतरू लागल्या.

विनोदराव खाली बसले. आज संपूर्ण जग हरवलं होतं.

त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी आठवल्या

"कसमे वादे प्यार वफ़ा सब

बातें हैं बातों का क्या

कोई किसी का नहीं ये झूठे

नाते हैं नातों का क्या"

ते डोळ्यांतून अश्रू ढाळू लागले.

तितक्यात सई पाठवून आली आणि पियूच्या पाठीत धपाटा घालून तिला म्हणाली, "तुला झोपायचे नाही का? सकाळी शाळा आहे ना? चल घरात". असे म्हणून ती पियूला घरात घेऊन गेली.

विनोदराव तिथेच सोफ्यावर बसून राहिले. बसल्या बसल्या त्यांना कधी झोप लागली, हे कळलेच नाही.

शिरीष मात्र खूप खूप दुःखी झाला. तो अंथरूणावर पडल्या पडल्या उशीमध्ये तोंड खुपसून रडू लागला. सईला त्याची दशा बघवेना. तिला माहित होते कि शिरीष इतका निर्दयी नाहीये. त्याचे त्याच्या बाबांवर किती प्रेम होते, हे तिला चांगलेच ठाऊक होते. तो जरी त्यांच्या बोलण्याने दुखावला गेला होता, त्यांच्यावर रागावला होता, तरी आतून तो किती तळमळत होता हे त्याचे त्यालाच ठाऊक होते. तो रात्रभर अंथरूणावर या कुशीवरून त्या कुशीवर फक्त लोळत राहिला. झोपेचे सोंग घेऊन पडुन राहिला. सई पासून हे लपू शकले नाही. ती रात्र तिने सुद्धा जागून काढली. पहाटे कधीतरी त्या दोघांचा डोळा लागला.

विनोदरावांना पहाटे जाग आली. त्यांनी आपले चार कपडे सोबत घेतले आणि घर सोडले. त्यांनी सरळ स्टेशन गाठले आणि आपल्या गावी रवाना झाले.

इकडे इंदुबाईंना झालेल्या अपमानाचा खूप मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी अंथरूण धरले. दोन दिवस झाले, त्यांनी अन्नपाणी सोडले. प्रशांतला त्यांचे दुःख बघवेना. इंदूबाईंची तब्येत खालवू लागली. शेजारपाजारचे लोक येऊन बघून गेले. काहीजणांनी सुचविले, "अहो, किती दिवसाच्या पाहुण्या आहेत त्या? निदान शेवटचे चार दिवस तरी त्यांना सुखाने जगून द्यायचे होते.

प्रशांतला प्रचंड दुःख झाले. त्याचे बाबासुद्धा फार लवकर देवाघरी गेले होते. तेव्हापासून त्याच्या आईने किती हाल-अपेष्टा सहन करून त्याला वाढविले, वाचविले होते, हे त्याने आपल्या डोळ्यांनी बघितले होते. त्याला एक एक दिवस आठवू लागला. त्याला फार दुःख झाले.

तीच परिस्थिती शिरीषची देखील झाली. त्याला खूप पश्चाताप झाला. बाबांशी आपण असे वागायला नको होते, या गोष्टीचा त्याला प्रचंड मनस्ताप झाला. सईने त्याच्या मनात चाललेली विचारांची तळमळ ओळखली.

सई म्हणाली, "शिरीष बाबांना परत आण, त्यांना परत बोलून घे, त्यांच्याशिवाय हे घर..घर नाही राहिले रे. खूप उदास वाटते, काहीतरी हरवल्यासारखे वाटते, तू राग सोड... त्यांना परत बोलव".

शिरीष म्हणाला, "सई, तुझे म्हणणे बरोबर आहे. पण तुला काय वाटते? मला बाबांची आठवण नसेल येत का? अगं मी मनातून किती दुखी झालो आहे हे तुला कसं सांगु? चल... मला माहित आहे, बाबा कुठे गेले असतील. ते नक्कीच आपल्या गावी गेले असणार. चल, आपण त्यांना घ्यायला जाऊ".

शिरीषने आपले मन मोकळे केले. पुरुषाच्या मनात असतात बर्‍याच गोष्टी, पण पुरुषी अहंकारामुळे तो नाही करत त्या. कमी पणा घ्यायचं त्याच्या ठायी नसते. मी का झुकू ? मी का माफी मागू ? अशा विचारांचा त्याच्यावर पगडा असतो.

सई म्हणाली, "हो, आपण जायलाच पाहिजे. चल, मी तयारी करते".

तेवढ्यात प्रशांत त्यांच्या घरी आला. हा त्याने शिरीषची माफी मागितली.

म्हणाला, "दादा, मला माफ कर. माझी चुकी झाली. मी तुमच्या बाबांना असे बोलायला नको होते. मी त्यांना धक्का दिला... यासाठी वाटेल ती शिक्षा दे. मला एकदा त्यांची माफी मागायची आहे. कृपया त्यांना बाहेर बोलव".

शिरीष म्हणाला, "प्रशांत मी तुझी मनस्थिती समजू शकतो. अरे मी तुझ्या जागी असतो, तर मी देखील असाच वागलो असतो. तु मनाला लावून घेऊ नकोस. पण बाबा इथे नाहीत. ते बहुदा गावी गेले असणार. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे त्यांना घ्यायला गावी जात आहोत. शक्य असेल तर आमच्या सोबत ये".

प्रशांत म्हणाला, "हो, मी नक्की येईन. मी आईला पण सोबत घेऊन येतो".

शिरीष म्हणाला, "हे फार बरे होईल. जा तू तयारी कर. मी गाडी काढतो".

प्रशांत आपले डोळे पुसत म्हणाला, "दादा, तू फार मोठ्या मनाचा आहेस. माझी एवढी मोठी चुकी तू माफ केलीस. मी तुझा सदा ऋणी राहीन. आता मला बाबांची माफी मागायची आहे. त्यांनी माफ केले म्हणजे मिळवलं".

शिरीष म्हणाला, "चल लवकर आता जास्त उशीर करायला नको".

प्रशांत घरी जाऊन आईला म्हणाला, "आई माझी चुकी झाली. मी तुला आणि विनोदरावांना वेगळे केले. मला माफ कर. चल, आपण त्यांना घ्यायला जाऊ".

इंदूबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी झोपल्या झोपल्या प्रशांतला म्हटले, "प्रशांत... अरे तुमच्या सुखापेक्षा आम्हाला काही नको रे. किती दिवस आहेत माझे? नको तु त्रास करून घेऊ. चार दिवसाची सोबती मी... नको माझ्यासाठी दुखी होऊन घेऊ".

प्रशांत म्हणाला, "आई, नको ग असे बोलू. मी तुझ्या पाया पडतो. पण आता तू माझ्या सोबत चल. बाहेर शिरीष गाडी घेऊन उभा आहे. आपल्याला गावी जायचे आहे".

सविता पुढे येऊन म्हणाली, "आई.. मला माफ करा. माझी चुकी झाली. मी नको तसं बोलले. पण आता तुम्ही तयार व्हा. आपण बाबांना घ्यायला जाऊया".

इंदुबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेला जवळ घेतले. "बेटा, मी तुमच्यावर रागवले नाही. माझ्याकडूनच काहीतरी चुकले, म्हणूनच तुम्ही मला अशी वागणूक दिली".

"आता काही बोलू नका.. चला बघू", सविता हट्ट करीत म्हणाली.

तिने इंदूबाईंना हाताला धरून उठलेले. त्यांना नवीन साडी नेसायला मदत केली. एखाद्या नव्या नवरी सारखे नटविले आणि ते सर्वजण गाडीत येऊन बसले. गाडी मुंबईहून कोल्हापूरकडे धावू लागली. इंदुबाई च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आपल्या सुना-मुलाचा अभिमान वाटू लागला.

इकडे विनोदराव थंडी वाजत असल्याने उन्हामध्ये येऊन बसले होते. त्यांनी दुरून बघितले. त्यांच्या शिरीषची गाडी त्यांच्या घराकडे येत होती. त्यांना फार आनंद झाला. त्यांना माहित होते, त्यांचा मुलगा त्यांना विसरणार नाही. त्यांच्यापासून दूर राहू शकणार नाही. त्यांना भरून आले. गाडी जवळ आली. गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि इंदूबाई त्या गाडीतून उतरल्या. विनोद रावांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांची इंदु त्यांच्यासमोर उभी होती. पाठोपाठ शिरीष, प्रशांत, सविता, सई आणि त्यांच लाडकं कोकरू पिऊ उतरली.

शिरीष आणि प्रशांत ने पुढे येऊन त्यांचे पाय धरले. त्यांची माफी मागितली.

"बाबा आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही".

विनोदरावांनी मोठ्या मनाने सर्वांना माफ केले.

रामुला हाक मारून सर्वांसाठी पाणी आणायला सांगितले. रामूला दुपारच्या जेवणाची तयारी करायला सांगितले. सर्वांनी एकत्र बसून जेवण केले.

गप्पा गोष्टी झाल्या. सर्वजण परत जायला निघाले.

गाडी चालू केली. शिरीष, सई, सविता, प्रशांत आणि पिऊ गाडीत बसले.

इंदुबाई मात्र आपल्या विनोद सोबत थांबल्या. गाडी चालू लागली. विनोदराव आणि इंदूबाई एकमेकाला घट्ट पकडून गाडीला बघत उभे राहिले. त्यांना आपल्या सुना-मुलाचां अभिमान वाटला. गाडी दिसेनाशी झाली. विनोद रावांनी आपल्या इंदूकडे बघितले. तिच्या माथ्यावर एक चुंबन घेतले आणि एक गोड गीत गायले,

"बहारो फुल बरसाओ..

मेरा मेहबूब आया है

मेरा मेहबूब आया है"

इंदूबाईंनी स्वतःला त्यांच्या मिठीत सामावून घेतले.

- प्रदीप बर्जे

इतर रसदार पर्याय