SAUDAGIRIN books and stories free download online pdf in Marathi

सौदागिरीन

सौदागिरीन

"आई, मला नाश्ता दे. मला इंटरव्यूव्ह साठी जायचं आहे".

"थांब थोडी, बाबांना डब्बा देते, त्यांना उशीर होईल".

"आई तुला समजत कसं नाही, अगं माझी इंटरव्यूव्ह आहे आज. आणि हे तरी जाऊन काय करणार आहेत? लिफ्टच चालवणार ना?"

"नलू अगं काय बोलतेस? त्यांच्या लिफ्ट चालवल्या मुळेच आपण जगत आहोत. त्यामुळेच तू शिक्षण पूर्ण करू शकलीस ना?"

"हो, माहित आहे. काय दिवस काढले आहेत आणि काय काढीत आहोत...ते मी पण बघितले आहे आणि तू पण... आई मला एक समजत नाही कि जे लोक आपल्या बायका-मुलांना व्यवस्थित सांभाळू शकत नसतात, त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नसतात ते लग्नच का करतात?"

"नलू ...काय बोलतेस? तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? जा बाहेर बस थोडा वेळ"

नलिनी बाहेर गेली. तिचे डोळे भरून आले होते. ती घरासमोरच्या झाडाखाली जाऊन बसली. आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला ती अगदी कंटाळली होती. लहानपणापासून तीच परिस्थिती. त्यात काहीच बदल होत नव्हता. प्रत्येक सणावाराला मन मारून राहावे लागे. आईला घरकाम करून मिळालेले जुने कपडे घालावे लागे. घरात खायला पुरेशे अन्न देखील नव्हते तिथे कपड्याचे काय?. कित्येक वर्ष तिने नवा कपडा बघितला नव्हता. तिच्या वयाच्या मुली नवनवीन कपडे घालीत, चपला बूट वापरीत. ते बघून नलीनीच्या मनाला फार दुःख होत असे. ती घरात येऊन रडत बसे. कुणाला सांगायची सोय नव्हती. ती या परिस्थितीला तिच्या बाबांना जबाबदार धरी. जर ते चांगले शिकलेले असते, चांगली नोकरी किंवा धंदा करीत असते तर तिला हे दिवस पाहावे लागले नसते. तिला इतर मुलींच्या बाबांचा हेवा वाटे. आपण त्यांच्या घरात जन्माला आलो असतो तर?

कालच तिने तिची जिवाभावाची मैत्रीण सारिकाला सांगून तिच्या ऑफिस मध्ये नोकरी साठी अर्ज केला होता. योगायोगाने सारिकाच्या ऑफिस मध्ये सेक्रेटरीची जागा रिकामी झाली होती. सारिकानेच तिला अर्ज करायला सांगितला होता. नलीनीकडे चांगले कपडे नव्हते. तिने तिची कॉलेजची मैत्रीण रोझी कडून स्कर्ट-टॉप आणि उंच टाचांचे सॅंडल मागून आणले होते. ते आई बाबांपासून लपवून तिच्या बॅग मध्ये ठेवले होते. आज तिला इंटरव्यूव्ह साठी जायचे होते. ती लवकर उठली, अंघोळ-पांघोळ करून आईकडे नाश्ता मागायला गेली. निदान चहा चपाती जरी खाल्ली तरी अंगात थोडा जोर राहील म्हणून तिला खाणे गरजेचे होते. शिवाय ऑफिस पर्यंत चालत जायचे होते. गाडीभाड्यासाठी पैसे नव्हते. ती तिचे बाबा कामाला जाईपर्यंत बाहेरच बसून राहिली.

तिचे बाबा कामाला जाण्यासाठी निघाले. बाहेर बसलेल्या नलिनी कडे डोळे भरून पहिले. डोळ्यांनीच तिला 'येतो मी' असा निरोप दिला. नलीनीने चेहरा फिरवून घेतला. तिला त्यांचे तोंड ही पाहायची इच्छा नव्हती. तिच्या मनात त्यांच्या विषयी प्रचंड संताप भरलेला होता. तो तिच्या नजरेतून व्यक्त होत होता.

"नलू ..बेटा घरात ये", तिच्या आईने तिला प्रेमाने हाक मारली.

नलिनी उठली. तावातावाने घरात गेली. आपला राग आईवर व्यक्त केला.

"नलू, बेटा इतका राग बरा नाही. मुलीच्या जातीला इतका राग नसावा. तुला लोकांच्या घरी नांदायला जायचे आहे", नलीनीच्या आईने तिला समजावयाचा प्रयत्न केला.

"हे घे, चहा चपाती खाऊन घे, देवाला नमस्कार कर आणि जा इंटरव्यूव्हला...परमेश्वर तुला यश देईल"

"तूच पड पाया देवाच्या...नोकरी देवाच्या कृपेने नाही स्वतःच्या टॅलेंटने मिळते"

"नलू, अगं असं बोलू नये"

नलीनीला आपल्या आईची शिकवण म्हणजे वेडे पणा वाटला. तिने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत चहा चपाती खाल्ली आणि घरा बाहेर पडली. झपाझप पाऊले टाकीत ऑफिसच्या दिशेने धावू लागली. ऑफिसच्या इमारतीखाली येऊन सावलीत उभी राहिली. जरा शांत झाल्यावर आणि घामाच्या धारा थांबल्यावर ती इमारतीत शिरली. गेटकिपरला ऑफिसचे नाव सांगितले. भेटण्याचे कारण सांगितले. तिथल्या रजिस्टर वर नाव पत्ता टाकून सोळाव्या मजल्यावर असलेल्या ऑफिस मध्ये पोहचली. स्वागत कक्षात सारिका बसलेली होती. तिने पाणी दिले आणि बसायला सांगितले. नलीनीच्या अगोदर तिथे दोन मुली बसलेल्या होत्या. त्या दोघी नलीनीकडे कुचेष्टेने पाहू लागल्या. त्या दोघी भलत्याच आत्मविश्वासू दिसत होत्या. जसे काही नोकरी त्यांनाच मिळणार होती. नलिनी मात्र फार बैचेन आणि अस्वस्थ झाली होती. काळजाचे ठोके वाढले होते. घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. सारिकाने इशाऱ्याने तिला जवळ बोलावून घेतले.

"अगं, या दोघी मॅनेजर साहेबांच्या वशिल्याने आल्या आहेत. बहुतेक यांनाच नोकरी मिळेल. तुला परत जावे लागेल. सॉरी यार"

"मग आता मी काय करू? मी किती आशेने आले होते. तू मला अगोदरच सांगायला हवे होते."

"सॉरी यार मला माहित नव्हते. मी तुझ्यासाठी दुसरीकडे ट्राय करते."

नलिनी आपल्या जागेवर जाऊन बसली. तिला फार दुःख झाले. तिने काय काय स्वप्न पहिले होते. तिच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले होते. तिला वाटले तिच्या मैत्रिणीने तिच्या परिस्थितीची मस्करी उडवली होती. जर तिला माहित होते कि नोकरी नाही मिळणार तर तिने अगोदर सांगायला पाहिजे होते. आपल्याला का बोलावले? तिला सारिकाचा खूप राग आला. तिला रडू कोसळले. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती आई बाबांना काय तोंड दाखविणार? तिला घरची परिस्थिती आठवली. तिच्या काळजात धस्स झाले. शेजारी बसलेल्या मुली तिच्याकडे बघून हसत होत्या. तिच्या कपड्याकडे, तुटलेल्या आणि शिवलेल्या चपलेकडे बघून हसत होत्या. नलिनी अचानक उठली. डोळे पुसले. सारिकाकडे जाऊन वॉशरूम कुठे आहे विचारले. तिने बोटानेच ते दाखविले. चेहऱ्यावर मला फार दुःख होत आहे असा भाव आणला. नलीनीच्या हातातवर हात ठेवून म्हणाली, "सगळे ठीक होईल काळजी करू नकोस". नलीनीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. सोबत आणलेली बॅग घेऊन वॉशरूम मध्ये गेली.

नलिनी वॉशरूम मध्ये गेली आणि कंपनीच्या मालकाने प्रवेश केला. श्री. अनिल कुमार चम्पकलाल. फार मोठी असामी. देखणा, रुबाबदार, चालण्याची एक विशिष्ट ढब, भारदस्त व्यक्तिमत्व, अमाप सम्पत्तीचा मालक पण पुत्रहीन. वयाची पन्नाशी पार केलेला. पण स्वतःला मेंटेन करून अगदी तिशीतला वाटावा अशी शरीराची ठेवण, राहणीमान अगदी उच्चं दर्जाचे. लग्नाला वीस वर्ष उलटून गेले होते पण काही मुलबाळ नव्हते. त्यांच्या पत्नीने तर आशाच सोडली होती. त्यांनी कित्येकदा अनिल कुमारांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता. पण अनिल कुमारने दुसरे लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आतून मात्र पुत्र सुखासाठी तळमळत होते. आतून भयंकर दुखी असून देखील चेहऱ्यावर कायम स्मित हास्य ठेवीत. ते ऑफिस मध्ये आले. सारिकाने आणि इंटरव्यूव्ह साठी आलेल्या त्या दोघी मुलींनी उभे राहून अभिवादन केले. अनिल कुमार ऑफिस मध्ये जाऊन बसले. बेल वाजवून सारिकाला आत बोलावले. सारिका आत गेली.

"किती मुली आल्यात इंटरव्यूव्ह साठी?"

"दोन", सारिकाने थोडेसे गडबडून उत्तर दिले.

"ठीक आहे त्यांना थोड्या वेळाने आत पाठवा", अनिल कुमार आपली डायरी उघडीत म्हणाले.

"ओके सर", सारिकाने जरासे घाबरत उत्तर दिले. पण तिला खूप अपराध्यासारखे वाटले. तिला वाटले साहेबांना सांगून टाकावे. पण तिची हिम्मत नाही झाली. ती बाहेर येऊन आपल्या जागेवर बसली. .

वॉशरूमचा दरवाजा उघडला. नलीनीने आपला उजवा पाय बाहेर टाकला. उंच टाचांच्या सॅन्डलमध्ये तिचा पाय खूपच आकर्षक आणि दिलखेच वाटत होता. सारिका जागीच उभी राहली. इतर दोघी आ वासून बघतच राहिल्या. नलिनी बाहेर आली. लाल रंगाचा शॉर्ट स्कर्ट, सफेद रंगाचा टॉप, काळ्या रंगाचे हाई हिल सॅन्डल, मोकळे सोडलेले केस, मोठ्या इयररिंग्स, डार्क लाल रंगाची लिपस्टिक. ती एखाद्या विदेशी अभिनेत्री सारखी भासत होती.

सारिका तिच्या ह्या रुपाकडे पाहून आश्चर्यचकित झाली. नलिनी बाहेर येऊन सोफ्यावर बसली. त्या दोघी जणीना जणू काही साप शिवून गेला होता. तिघी जणी नलीनीच्या नव्या अवताराने भांबावून गेल्या होत्या. इंटरकॉमची बेल वाजली. सारिकाने रिसिव्हर उचलला.

"हॅलो"

"हुज दॅट लेडी?", अनिल कुमार ने सीसीटीव्ही मध्ये बघत विचारले

"अं..अं दॅट .."

"सेंड हर इन्साईड"

"अं ..ओके सर", सारिकाने नजरेने नलीनीला आत जायला सांगितले. नलिनीचे लक्ष तिच्याकडेच होते. जसे काही ती जाणून होती कि हा कॉल तिच्या साठीच होता. नलीनीने केसातून हात फिरवला. टॉप चे वरचे बटन उघडले. हातातली बॅग सोफ्यावर ठेवली. सोफ्यापासून केबिनच्या दारापर्यंत कॅट वॉक करीत गेली. सारिकाचे डोळे दिपून गेले. तिने नलीनीच्या टॉप कडे बघून नलीनीला मान हलवून 'नाही' असा इशारा केला. नलीनीने तिच्याकडे बघून एक धुत्कार टाकला. दरवाज्यावर बोटातल्या अंगठीने टकटक असा आवाज केला. दरवाजा किंचित उघडून, आत डोकावून मंजुळ आवाजात विचारले

"मे आय कमी इन सर?"

"ओह ..यस, प्लिज कम", अनिल कुमार खुर्चीत सावरून बसले.

"थँक्यू", नलिनी मादक आदेने आत आली, चेहऱ्यावर खोटे बनावटी हसू झळकत होते.

"प्लिज हॅव अ सीट"

"थँक्यू", नलिनी पायावरपाय ठेवून तिरकी बसली. अनिल कुमार तिच्या रूपाने, मादक आदेने फिदा झाले होते. ते तिला आपल्या नजरेत भरवू पाहत होते. नलिनी मात्र त्यांची नजर न्याहाळीत होती. तिने त्यांना पहिल्याच नजरेत जिंकले होते. तिच्या चेहऱ्यावर विजेते भाव दिसू लागले होते.

"कसे येणे केले?", अनिल कुमार ने विचारले

"इंटरव्यूव्ह साठी"

"काय? इंटरव्यूव्ह साठी? पण मला सारिकाने सांगितले कि दोनच मुली आल्या आहेत."

"बहुतेक तिची इच्छा नसावी", नलीनीने सॅंडल नीट करण्याच्या बहाण्याने खाली झुकत उत्तर दिले.

तिच्या अशा झुकण्यामुळे अनिल कुमारला तिच्या सौंदर्याची झलक मिळाली. ते भान हरपून गेले.

"अं , असं कस? तिने मला सांगायला पाहिजे होते", अनिल कुमार काहीसे चिडून म्हणाले.

त्यांनी इंटरकॉम करून सारिकाला आत बोलावले.

"यस सर?", सारिकाचे हातपाय थरथरू लागले.

"तुम्ही मला सांगितले का नाही कि ह्या मॅडम इंटरव्यूव्ह साठी आल्या आहेत?', अनिल कुमार ने ओरडून विचारले

"सर, मॅनेजर साहेबांनी सांगितले कि तुम्हाला सांगू नको म्हणून"

"का?..का सांगू नको?"

"सर ही नोकरी त्यांनी बोलावलेल्या मुलींनाच मिळावी म्हणून", सारिकाने खुलासा केला

"म्हणजे या ऑफिस मध्ये तुमचे मॅनेजर निर्णय घेतील?, काय करायचे…काय नाही करायचे ते ठरवतील? मालक ते आहेत का मी?", अनिल कुमार फार चिडले होते.

"नाही सर, पण"

"काय पण ? तुम्हाला पगार ते देतात कि मी देतो?, बोलवा त्यांना"

"अं .."

"बोलवा त्यांना", अनिल कुमार ओरडून टेबलावर हात आपटून म्हणाले.

सारिका बाहेर पळाली. अनिल कुमार रागाने लालबुंद झाले होते.

नलीनीने संधीचा फायदा घेतला. ती अनिल कुमार जवळ गेली. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन लाडिक पणे म्हणाली,

"काम डाऊन...इतके रागावू नका..घ्या पाणी प्या"

"तसे नाही पण बघ ना...माझ्या ऑफिस मध्ये येऊन मलाच सांगणार नाही?'

"जाऊ द्या ना..अशा नालायक लोकांकडे लक्ष नका देऊ... तुमचा मड ठीक करा पाहू", असे म्हणून नलिनी अनिल कुमारच्या केसातून हात फिरवीत त्यांच्या खुर्चीच्या हॅण्डल वर बसली. अनिल कुमार शांत झाले. एका तरुण आणि सुंदर स्त्री कडून आपले असे लाड बघून तिच्यावर पुरेपूर फिदा झाले. तिच्या मोहपाशात अडकले. त्यांनी आपले डोळे बंद करून घेतले. त्या सुखद अनुभवाचा आनंद लुटू लागले. नलीनीने परिस्थिती ओळखली. ती अलगद त्यांच्या मांडीवर बसली. त्यांचे केस कुरवाळू लागली. अनिल कुमार मात्र निपचित पडून होते. सारिकाने दरवाजा वाजविला आणि आत आली. समोरचे दृश्य बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. आपली मैत्रीण चक्क आपल्या मालकाच्या मांडीवर??

तिला खूप शरमल्यासारखे झाले. तिच्या पाठोपाठ मॅनेजर साहेब पण होते. समोरचे दृश्य बघून ते मागच्या मागे थांबले. सारिका परत जाण्यासाठी वळली. तर अनिल कुमार ऐवजी नलिनीनेच तिला थांबविले.

"थांब...आत ये. त्यांना पण बोलवं", नलीनीने तिला ऑर्डर केली.

सारिका एक क्षण थक्क झाली. तिला काही समजेना. आपला मालक काही बोलत नाही आहे आणि आपली जिवाभावाची मैत्रीण जी फक्त १५ मिनिटांपूर्वी आत आली होती, ती आपल्याला ऑर्डर करीत आहे.

नलिनी आपल्या जागेवर येऊन बसली. सारिका आणि मॅनेजर आत आले.

"आमच्या ऑफिसला तुमची गरज नाहीये...तुम्ही जाऊ शकता", अनिल कुमार मॅनेजर साहेबांना म्हणाले.

"पण सर… काय चुकी झाली? मला काढण्याचे कारण कळेल का?", मॅनेजर साहेबांनी पुढे येत विचारले.

"सारिकाने मला कळविले आहे कि ऑफिसचे सर्व निर्णय तुम्ही स्वतः घेत आहात. आणि काही गोष्टी माझ्या पासून लपवून ठेवीत आहात"

"सारिका तू असे सांगितले?... का?", मॅनेजर साहेबांनी सारिकाकडे बघत विचारले.

सारिका काही बोलली नाही. गपचूप खाली मान घालून उभी राहिली. तिला काही समजेना काय उत्तर देऊ. हो म्हणाली तर मॅनेजरचा रोष आणि नाही म्हणाली तर मालकाच्या विरोधात बोलल्या सारखे होऊन नोकरी जायची. म्हणून ती गपच राहिली.

"ठीक आहे", असे म्हणून मॅनेजर साहेब निघून गेले.

"सारिका मॅनेजरचे टर्मिनेशन लेटर बनवून आण आणि दोन कॉफी सांग", अनिल कुमार ने ऑर्डर केली.

"ओके सर", असे बोलून सारिका बाहेर आली. तिला खूप रडू आले. ती आपल्या जागेवर बसून दोन्ही हातांनी चेहरा लपवून रडू लागली. बाहेर बसलेल्या मुलींना काही समजेना. तितक्यात इंटरकॉमची रिंग वाजली. सारिकाने रिसिव्हर उचलला.

"हॅलो, यस सर? ओके सर", सारिकाने रिसिव्हर खाली ठेवला. समोर बसलेल्या मुलींना जायला सांगितले. त्या दोघी उठल्या. सारिका जवळ आल्या. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या,

"इट्स ओके..आम्ही समजू शकतो काय झालं ते...काळजी घे"

सारिकाला आणखी रडू कोसळले. त्या दोघी गेल्या. पाठोपाठ मॅनेजर साहेब पण गेले. शिपाई कॉफी घेऊन आत गेला.

"घे कॉफी घे", अनिल कुमार ने नलीनीला कॉफी ऑफर करीत म्हटले.

"थँक्यू"

"मग कधी जॉईन करू शकतेस?", अनिल कुमारने कॉफीचा घोट घेत विचारले.

"सारिकाला टर्मिनेशन लेटर दिल्यावर", नलीनीने आपली इच्छा दर्शविली.

"अगं पण ती फार जुनी आहे, शिवाय ती सर्व कामे व्यवस्थित करते. तिला काढणे शक्य नाही".

"कामाची काळजी करू नका, मी करेन सर्व", नलीनीने पर्याय दिला

"अगं पण तू नवीन आहेस, तुला जमेल का ते? तुला त्रास होईल", अनिल कुमार ने चिंता व्यक्त केली.

"ठीक आहे, जशी तुमची मर्जी", नलिनी कॉफीचा कप खाली ठेवीत म्हणाली.

"अवघड आहे"

"विचार करा, ती पाहिजे का मी? हा माझा फोन नम्बर आहे, विचार बदलला तर फोन करा", नलिनी अनिल कुमार जवळ जात म्हणाली. तिने हाताच्या बोटांनी त्यांचे केस व्यवस्थित केले.

"अगं पण", अनिल कुमार पुढचे काही बोलायच्या आत नलिनी दरवाज्या पर्यंत पोहचली होती. तिने दार उघडले. मागे वळून पहिले. एक मादक हास्य केले आणि बाहेर आली.

सारिकाने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण नलिनी काही बोलली नाही. सोफ्यावर ठेवलेली बॅग घेतली आणि वॉशरूम मध्ये गेली. कपडे बदलून आली. सारिकाकडे पाहिले आणि ऑफिसच्या बाहेर पडली.

इकडे अनिल कुमार विचारात पडले. त्यांना सारिकाला कामावरून काढणे परवडण्या सारखे नव्हते पण त्यांना नलीनीला गमवायचे नव्हते. त्यांनी खूप विचार केला आणि शेवटी निर्णय घेतला.

इकडे नलिनी घरी पोहचली. आई घरात नव्हती. घरात खाण्यासाठी फक्त शिळा भात होता. तिला तिच्या आईचा खूप राग आला. काहीच कसे बनवून ठेवले नाही. तिने घरात शोधाशोध केली. पण काहीच नव्हते. शेवटी तिने भातावर लाल तिखट टाकून खाल्ला. पोट भरले. पण मन अशांत होते.

संध्याकाळी सात वाजता तिची आई घरी आली. दिवा लावला. पाहते तर नलिनी खाली गोधडीवर निपचित पडलेली होती.

"नलू, अगं कधी आलीस? आणि दिवा का नाही लावला? काळोखात झोपायची काय गरज आहे?, आणि इंटरव्यूव्हचं काय झालं?", तिच्या आईने पाठोपाठ प्रश्न विचारले.

नलिनी काहीच बोलली नाही.

"नलू, काय विचारते आहे मी?, काही बोलशील का? काय झालं?"

"थोडा वेळ थांब, एक तासाभरात कळेल", नलीनीने उत्तर दिले. तिच्या उत्तरात एक प्रकारचा रोष होता.

"मला तर बाई काही समजत नाही तुझं, उठ गोधडी उचलू दे, दिवाबत्तीची वेळ झाली आहे, अशी झोपून राहू नको", आईने पसारा आवरित म्हटले.

तितक्यात नलीनीच्या फोनची रिंग वाजली. फोन अनिल कुमारचा होता.

"हॅलो, मिस नलिनी, मी अनिल कुमार बोलतोय. कुठे आहेत तुम्ही?"

"ओह, हाय अनिल...हाऊ आर यु"

"आयम गुड... कुठे आहात तुम्ही? मला तुम्हाला भेटायचे आहे"

"मी लिओपोल्ड कॅफे मध्ये आहे, कुलाबा येथे", नलिनीने थाप मारली.

"ठीक आहे, मी येतो तिथे"

"नाही मी निघेन आता...बऱ्याच वेळेपासून आहे इथे, काही खास काम होत का?", नलीनीने काहीच माहित नसल्याचा आव आणला

"तुम्हाला भेटायचे होते. तुम्ही म्हटल्या प्रमाणे मी तयार आहे त्या गोष्टीला, पण असे नको आपण भेटून बोलूया..ओके?"

"ठीक आहे तुम्ही अर्ध्या तासात रिगल सिनेमा जवळ या, मी येते"

"ओके, येतो", असे बोलून अनिल कुमारने फोन कट केला.

नलिनीची आई सगळे ऐकत होती. तिला समजेना काय चाललंय ते.

तिने नलीनीला विचारले,"नलू अगं काय चाललंय? कुणाचा फोन होता?"

"आई, माझ्या नशिबाचा फोन होता. आता लवकरच आपले भिकाचे दिवस जातील. आता बघ तुझी नलू काय करते ते"

नलिनी घरा बाहेर पडणार तितक्यात सारिका दारात आली. रडून रडून डोळे सुजलेले होते. तिच्या हातात एक लिफाफा होता. तो नलीनीच्या तोंडावर फेकून ती रडत रडत म्हणाली,

"चांडाळणी काय मिळवलंस? तुझं कधी बरं नाही होणार... हा माझा श्राप आहे". सारिका रडत रडत तिच्या घराकडे पळाली.

नलीनीने कुचेष्टेने हसत हसत तो लिफाफा उचलला. उघडून पहिला. त्यात सारिकाचे टरमीशन लेटर होते.

नलिनीची आई पार गोंधळून गेली. काय चालले आहे ते तिला कळेनासे झाले.

तिने नलीनीच्या हातून ते लेटर घेतले. पण ते इंग्लिश मध्ये असल्यामुळे तिला काही वाचता येईना. तिने नलीनीला विचारले, "नलू काय आहे हे? सारिका का रडत होती ? तुझं बरं होणार नाही असं का म्हणाली?"

"काही नाही आई, हि माझी यशाची पहिली पायरी होती. खूप सहन केलं आहे मी. आता माझी वेळ आली आहे".

"बेटा काही चुकीचं काम तर नाही करीत आहेस ना? आपल्याला पैशापेक्षा आपली अब्रू प्यारी हे विसरू नकोस बरं, काही चुकीचं काम करण्या अगोदर माझा आणि बाबांचा विचार कर"

"आई तू चूप बस, तुला काही समजत नाही. काही तरी मिळवण्यासाठी काही तरी गमवावे लागते. तू आता माझ्यावर सोड...मी आपले दिवस पालटणार", असे बोलून नलिनी घरा बाहेर पडली.

ठरल्या प्रमाणे रिगल सिनेमा जवळ जाऊन उभी राहिली. ताबोडतोब तिच्या जवळ एक आलिशान गाडी येऊन उभी राहिली. गाडीचा दरवाजा उघडला. गाडीमध्ये अनिल कुमार बसलेले होते. त्यांनी नलीनीला गाडीत बसायला सांगितले. नलिनी गाडीत बसली.

"थँक्यू"

"कशाबद्दल?", अनिल कुमारने विचारले.

"माझी पहिली अट पूर्ण केल्या बद्दल", नलीनीने अनिल कुमारचा हात हातात घेऊन म्हटले.

अनिल कुमार काहीच बोलले नाही. फक्त एक स्मितहास्य केले.

गाडी मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावरून मलबार हिलकडे धावू लागली.

"आपण कुठे चाललो आहोत?", नलीनीने घाबरून विचारले

"माझ्या घरी, तुला कुणाला तरी भेटवायचे आहे"

"घरी? कुणाला भेटवायचं आहे?", नलीनीने परत विचारले.

"घाबरू नकोस लवकरच कळेल सगळं, तू एक नवीन जग बघणार आहेस"

"नवीन जग? म्हणजे? अनिल असं कोड्यात बोलू नकोस, मला भीती वाटते आहे"

"नलिनी, मी म्हटलो ना काळजी करू नकोस. मी लवकरच परत आणून सोडील तुला".

नलिनी मात्र पार घाबरून गेली होती. गाडीत एसी चालू असून सुद्धा तिला घाम सुटला होता. घरी का नेत असावेत? आपले काही बरे वाईट झाले तर? फक्त एक दिवसाच्या ओळखीवर आपण त्याच्या घरी जात आहोत. कुणाला सांगितलेले नाही. कुठे चाललो आहोत ते माहित नाही. घरी कोण असणार? अशा अनेक प्रश्नाने तिला ग्रस्त केले. अनिल कुमारने तिची मनस्थिती ओळखली. तिच्या डोक्यावरून हात फिरवून ते तिला म्हणाले,"रिलॅक्स, डोन्ट वरी". नलीनीने खोटे अवसान आणून हसण्याचा प्रयत्न केला. पण विचारांचे काहूर काही शमले नव्हते. गाडी मलबार हिल येथील एका आलिशान बंगल्यासमोर उभी राहिली. ड्राइव्हरने धावत येऊन दरवाजा उघडला. नलिनी गाडीतून उतरली. दुसऱ्या बाजूने अनिल कुमार उतरले. दोघेही बंगल्यात शिरले.

इतका आलिशान बंगला नलीनीने कधी स्वप्नात देखील बघितला नव्हता. एखाद्या मॉल च्या इमारती प्रमाणे भव्य आकार. मोठं मोठे झुंबर. पाण्याचा कारंजा. वाघ, हरीण इत्यादींचे मुखवटे, आलिशान गालिचे, भव्य सुदर सोफे, जसे सिनेमात दाखवितात त्या प्रमाणे हवेली होती. भिंतीच्या दोन्ही बाजूने वर जाणारे जिने. लाकडी कोरीव काम केलेले जिने बघून त्यांना हात लावून बघण्याचा मोह नलिनी टाळू शकली नाही. ती सर्वत्र नजर फिरवून बघू लागली. तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. एवढे महागडे गालिचे खराब होऊ नये म्हणून तिने सॅंडल हातात काढून घेतले. अनिल कुमार पुढे आले. तिच्या हातून सॅंडल घेतले. नोकराच्या हातात दिले. नलीनीला बसायला सांगितले. नलिनी भानावर नव्हती. त्यांनी तिच्या खांद्यांना धरून सोफयावर बसविले. सोफ्यावर बसल्यामुळे जवळ जवळ सहा इंच सोफा खाली दाबला गेला. नलीनीला अवघडल्या प्रमाणे वाटले. नलीनीला सोफ्यावर बसवून अनिल कुमार जिना चढून वरच्या खोलीत गेले. दरवाजा बंद झाला. नोकर आला. नलीनीला सरबत दिले. नलीनीने सरबताचा एक घोट घेतला. वाह ! मन तृप्त झाले. नोकराने तिच्या समोर असलेल्या मेजवर विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, मिठाया, फळे, पेय आणून ठेवले. ते बघून नलिनीला स्वर्गात आल्या सारखे वाटले. तिने विचार केला. आपले जीवन आणि या लोकांचे जीवन किती फरक ! किती सुख-सोइ ! कुठे तो आपला सुखा मिर्चटलेला भात आणि कुठे हे राजेशाही भोजन.

अनिल कुमार गेले होते तो दरवाजा उघडला. नलीनीने हातातला पदार्थ खाली ठेवला आणि उभी राहिली. अनिल कुमार बाहेर आले. त्यांच्या हातात एक ब्रिफकेस होती. त्यांच्या पाठी मागून एक पन्नाशीतली बाई बाहेर आली. अगदी सिनेमात दाखवितात त्या प्रमाणे त्या हवेलीची मालकीण. भरजरी साडी, अंगभर दागिने, डोक्यापासून पायापर्यंत नटलेली. चालताना तिच्या अंगावरील दागिन्यांचा आवाज खालपर्यंत येत होता. छुन-छुन...छुन-छुन. अनिल कुमार पुढे चालत होते आणि ती बाई मागून येत होती. नलीनीला वाटले ती त्यांची आई असावी. ते दोघे खाली आले. समोरच्या सोफ्यावर बसले. नलीनीला बसायला सांगितले. नलीनीच्या हृदयाचे ठोके वाढले. तिच्या तोंडून शब्द फुटेना. कसा-बसा त्यांना नमस्कार केला. तिने अनिल कुमार कडे पाहिले. अनिल कुमारने तिला रिलॅक्स होण्याचा इशारा केला. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता निर्माण झाली होती. नलीनीला वाटले अनिल कुमार तिला त्यांच्या आईला भेटवायला घेऊन आले असावेत. आणि आता त्यांच्या लग्नाची वार्ता करणार असावेत. या विचाराने ती चमकून उठली. त्याच बरोबर तिला खूप लाज वाटली. ती खाली जमिनीकडे बघू लागली.

"हि माझी पत्नी तारामती चंपकलाल", अनिल कुमारने त्या बाईची ओळख करून दिली.

नलिनी जागीच उभी राहिली. तिला दरदरून घाम फुटला. बाप रे! आपण या माणसाशी असे वागलो आणि हा आपल्यला त्याच्या बायको समोर घेऊन आला. आता आपले काही खरे नाही. नलीनीला वाटले तिथून पळून जावे.

"हे घे, यात एक लाख रुपये आहेत", अनिल कुमारने हातातली ब्रिफकेस नलिनी समोर उघडून दाखवीत म्हटले.

"एक लाख? क...का...कश्यासाठी?"

"सांगतो, सगळं सांगतो. तू आधी शांत हो पाहू", अनिल कुमारने तिला शांत करायचा प्रयत्न केला.

नलीनीने इतके पैशे कधीच पाहिले नव्हते. ती त्या नोटांकडे अधाश्यासारखी डोळे विस्फारून पाहू लागली.

"घे तुझेच आहेत, आणखी मिळतील"

"माझे?"

"हो हो तुझे, हे सर्व पैशे तुझे आहेत. आम्ही तुला एक करोड देऊ"

"एक करोड ....!!", नलीनीच्या तोंडून आश्चर्याची किंकाळी फुटली. डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.

"हो एक करोड, पण तुला आमच्या साठी एक छोटंसं काम करावं लागेल"

"काम? कोणतं काम?"

"काम अगदी सोपं आहे, तुला काही करावं लागणार नाही. फक्त चांगलं-चुंगलं खायचं, आराम करायचा, नवनवीन कपडे घालायचे, अगदी आरामात राहायचं, तुझ्या हाताखाली नोकरचाकर असणार. तुला एक काडी देखील उचलावी लागणार नाही".

आता मात्र नलिनी पूर्णपणे चक्रावून गेली. तिला समजेना असे कोणते काम असणार?

"म्हणजे मला नक्की काय करावं लागेल?" नलीनीने न राहवून विचारलेच

"तुला आमच्या साठी मूल जन्माला घालावे लागेल"

"काय?", नलीनीचे कान सुन्न झाले. हातपाय, ओठ थरथरू लागले. सर्वांगाला घाम सुटला.

"होय, तुला आमच्या साठी मूल जन्माला घालावं लागेल आणि या कामासाठी आम्ही तुला एक करोड रुपये देऊ", इतका वेळ शांत बसलेल्या अनिल कुमारच्या बायकोने खुलासा केला.

"मला काही समजत नाहीये", नलिनी अगदी भांबावून गेली होती.

"हे बघ नलिनी, मी आज जेव्हा तुला ऑफिस मध्ये बघितले तेव्हाच तुला पसंद केले होते. आम्ही ज्या स्त्रीच्या शोधात होतो. ती स्त्री मला तुझ्यात दिसली. आमच्या लग्नाला आज वीस वर्ष झालीत पण आम्हाला काही मुलबाळ नाही. आमच्या नंतर हि सर्व मालमत्ता वाया जाईल. आमची कुणाला दत्तक घ्यायची इच्छा नाही. कुणाला काय म्हणून द्यायचं? आम्हाला टेस्टटूब बेबी पण नको आहे. आम्हाला आमचा स्वतःचा वारीस पाहिजे. बाईसाहेबांना मूल होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला एखाद्या स्त्रीचे गर्भाशय भाड्याने हवे आहे, आणि आम्ही तुझी निवड केली आहे", अनिल कुमार ने मनातली इच्छा व्यक्त केली.

अनिल कुमार पुढे सांगू लागले,"तू ऑफिस मधून बाहेर पडल्यावर सारिकाने तुझ्या घरची परिस्थिती सांगितली. फार दुःख झाले मला. तुझे वडील या वयात लिफ्टमनचे काम करतात. आई चार घरची धुणीभांडी करते. घरात अठराविश्व् दारिद्र्य. त्यात तुझ्या इच्छा, तुला अंगभर कपडे नाहीत, आणि आज जे कपडे तू घालून आली आहेस ना, ते सुद्धा तुझ्या एका ख्रिस्ती मैत्रिणीकडून मागून आणलेले आहेस".

नलीनीला रडू कोसळले. रोझी कडून आणलेल्या त्या कापडूयात सुद्धा तिला नागवेपणाची जाण झाली. अंगावर कपडे असून देखील तिला आपण या लोकांसमोर नागडेच बसलो आहोत असे वाटले. तिला सारिकाचा प्रचंड राग आला. ती ढसढसा रडू लागली. अनिल कुमारची पत्नी जागेवरून उठून तिच्या कडे आली. तिच्या शेजारी बसली. तिला आपल्या मिठीत घेतले. एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे तिचे डोळे पुसले. तिला शांत राहायला सांगितले. स्वतःच्या हाताने नलीनीला पाणी पाजले.

"हे घे पैसे, जा मजा कर, वाटेल ते खरीदी कर, हि एक मोठ्या बहिणीकडून धाकट्या बहिणीला दिलेली भेट समज. जा बेटा, जग आपले जीवन", ती नलीनीच्या हातात पैसे देत म्हणाली.

नलीनीने पैसे घेतले. परत तारामतीला मिठी मारली. डोळे पुसले. दोन्ही हात जोडले.

"मी ड्राइव्हरला सांगतो, तो तुला बाजारात घेऊन जाईल. चांगले कपडे घे. आईसाठी साड्या घे, बाबांसाठी कपडे घे, खाण्या पिण्याच्या वस्तू घे, हे एक लाख रुपये वाटेल तसे खर्च कर, ह्याचा हिशोब द्यायचा नाही, हे तुझ्या बहिणीने तुला भेट दिले आहेत, आणि हो ऑफिसला यायची गरज नाही. मी दोन दिवसांनी तुला फोन करीन, तो पर्यंत मज्जा कर आणि चांगला विचार कर, आलेली संधी सोडू नकोस", अनिल कुमार ने तिला मोहिनी घातली.

नलिनीने ब्रिफकेस घेतली, त्या दोघांचा निरोप घेतला आणि बाहेर पडली. बाहेर ड्रॉयव्हर उभाच होता. नलिनी जवळ आल्याबरोबर त्याने अदबीने दरवाजा उघडला. नलिनी गाडीत बसली. गाडी मॉलकडे घ्यायला सांगितली.

गाडी दारात येऊन उभी राहिली. नलिनी गाडीतून बाहेर आली. अंगावर नवे कपडे, नवे बूट, महागडा परफ्युम मारलेला होता. ब्रेक मारल्या मुळे टायर घसरल्याच्या आवाजाने वस्तीतले सर्वजण त्या गाडीकडे पाहू लागले. नलिनीची आई घाबरून बाहेर आली. तिचे बाबा समोरच्या झाडाखाली बिडी पीत बसले होते. आपल्या नलूला गाडीतून उतरताना बघून आश्चर्यचकित झाले. नलिनीची आई तर कावरीबावरी झाली. शेजारी पाजारी जमा झाले. टक लावून पाहू लागले.

नलिनी पुढे होत ड्रॉयव्हरला म्हणाली, "रामसिंग सब सामान लेके आव"

"जी मेमसाब", ड्रॉयव्हरने सर्व सामान गाडीतून बाहेर काढले आणि नलीनीच्या घरात नेऊन ठेवले.

"जी मेमसाब मै जाऊ?", ड्रॉयव्हरने परवानगी मागितली.

"हा, आप जा सकते हो, कल सुबह जल्दी आना", असे म्हणून नलीनीने त्याला पाचशे रुपये टीप दिली.

"जी मेमसाब, जल्दी आऊंगा", त्याने पैसे माथ्याला लावीत उत्तर दिले आणि गाडी घेऊन निघून गेला.

नलिनी घरात आली. तिचे आई-बाबा पण तिच्या पाठोपाठ घरात आले.

तिच्या आईने तिला विचारले, "नलू हे सर्व काय आहे बेटा?"

"आई तू बस, बाबा तुम्ही पण बसा, मी सर्व सांगते. आई मी कुठलेही वाईट काम केले नाही. ही नशिबाने दिलेली संधी आहे आणि मला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आता आपले भिकाचे दिवस संपले म्हणून समजा. यापुढे तुला कुणाच्या समोर हात पसरावा लागणार नाही, आणि बाबांना पण लिफ्ट चालवायला जायची गरज नाही. या बॅगमध्ये एक लाख रुपये होते. त्यातले विस हजार रुपये मी खर्च केले आहेत. आता यामध्ये ऐंशी हजार रुपये आहेत. यापुढे आपल्याला पैशाची चणचण भासणार नाही".

"नलू, अगं पण असे काय काम करते आहे ते तरी कळेल का?"

"आई, तुला सांगितले ना की मी कोणतेही वाईट काम करीत नाही. नशिबाने मला एक संधी दिली आहे पैसे कमवायची. तू बस बघत जा तुझी नलू काय करते"

" पण बेटा इतके सगळे पैसे कोणत्याही चांगल्या कामासाठी दिले जात नाहीत, मी जग बघितले आहे", तिचे बाबा तिला म्हणाले.

" मला ठाऊक आहे बाबा, पण या जगात पैसे कमवायचे असतील, सुखदायक जीवन जगायचे असेल तर काहीतरी उलाढाल करावीच लागते. मेहनत मजुरी करून इतके पैसे मिळत नसतात, हे मलाही ठाऊक आहे, पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते हे तुम्हाला मान्य असेल"

" ते खरे आहे बेटा पण आम्हाला तुझ्या जीवाची काळजी आहे, तुझ्यापेक्षा आम्हाला पैसा मोठा नाही. आम्ही असेच गरीबीत दिवस काढू पण तुला सुखात ठेवू. तू आमच्यासाठी काही वाईट काम करू नकोस".

" ठीक आहे नाही करणार, पण आधी मी जे आणले आहे ते खाऊन घ्या. आई हे बघ मी तुझ्यासाठी किती छान साड्या आणल्या आहेत.. बाबा हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसेल. एकदा घालून बघा"

" ते ठीक आहे बेटा पण आम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे"

" आता पुरे करा", नलिनी काहीशी चिडून बोलली. त्यामुळे आई-बाबा शांत झाले आणि आणलेले जेवण शांतपणे खाऊ लागले. खरंच आज त्या जेवणाची त्यांना गरज होती कारण घरामध्ये बनवून खाण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते. त्यांनी परमेश्वराचे आभार मानले आणि जेवण पुरे केले. जेवण झाल्यावर नलिनी आपल्या आईला घराबाहेर घेऊन गेली. घरापासून दूर गेल्यावर रस्त्याने चालत चालत नलीनीने तिला अनिल कुमारने सांगितलेले काम वर्णन केले. ते ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला भोवळ आली. ती मटकन खाली बसली.

" नलिनी, अग काय बोलते आहेस? तू भानावर आहेस का? दुसऱ्यासाठी मुल जन्माला घालणे इतके सोपे वाटले का? हे शक्य नाही तू त्यांचे पैसे परत कर. त्यांची माफी माग. हे काम करू नको बेटा, तुला नंतर खूप पश्चाताप होईल, मी तुझी आई आहे. आई होणे आणि आपल्या मुलाचा त्याग करणे ही किती मोठी गोष्ट आहे, हे तू नाही समजू शकत. आईपासून मुल हिरावून घेणे हे खूप मोठे पाप आहे. एक आई आपल्या मुलाला स्वत:पासून दूर करू शकत नाही. अग मुलाला जन्माला घालणे आणि दुसऱ्याला देऊन टाकणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. मुलाला जन्माला घालणे म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो तो. तुला आता नाही समजणार, आता तुझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी आहे. बेटा, एवढी मोठी वाईट गोष्ट तू अगदी सहजपणे कशी काय सांगू शकते?"

" आई, रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे नाही का? अग किती दिवस आपण कसे हलाखीचे दिवस काढायचे? कधी आपली परिस्थिती सुधारणार? ही परमेश्वराने दिलेली संधी आहे, तिचे आपण सोने करायला पाहिजे"

" नाही बेटा, हा निर्णय चुकीचा आहे. तुझे पोटचे मुल देताना तुला किती वेदना होतील याची तुला कणभर ही कल्पना नाही. आपला निर्णय बदल बेटा, नको करूस असे काही. एक आई आपल्या मुलीला कळकळीची विनंती करीत आहे. माझे ऐक. उद्या तुझे अश्रू पुसण्यासाठी आम्ही या जगात असणार नाही. तुला जीवन जगणे जड होईल"

"ते काही नाही आई, मी ठरवले आहे आणि ते मी करणारच, बस मला काही ऐकायचे नाही. तुला काय समजायचे ते समज, चल परत जाऊ या"

त्या दोघी परत आल्या. सारिका दारात उभी होती. तिने नलिनीशी बोलायचा प्रयत्न केला. तिला काही तरी सांगायचा प्रयत्न केला, पण नलीनीने तिला प्रतिसाद दिला नाही. दरवाजा बंद करून घेतला. आज त्यांच्या जवळ पैसे होते. पोटभर जेवण केले होते पण त्या तिघांपैकी कोणीच झोपू शकले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रॉयव्हर गाडी घेऊन आला. गाडी नलीनीच्या घरासमोर उभी केली. हॉर्न वाजविला. नलिनी बाहेर आली. गाडी आलेली बघून तिला आनंद झाला. तिने ड्रॉयव्हरला थांबायला सांगितले. सारिका दारात उभी होती. तिची नोकरी गेली होती. तिने नलीनीला हात करून थांबायला सांगितले. नलिनी थांबली. सारिका जवळ आली.

"नलू तुला काही सांगायचे आहे", तिने नलीनीचा हात धरीत म्हटले.

"माझ्याकडे वेळ नाही तुझ्या फालतू गोष्टींसाठी. मला माझ्या आईबाबाना शॉपिंगला न्यायचे आहे"

"नलू अशी नको वागू. थोडी बाजूला ये. मी सांगते सगळं", सारिकाने तिचा हात धरून तिला एकांतात न्यायचा प्रयत्न केला. नलीनीने तिच्या हातून आपला हात सोडवून म्हटले,

"मला माहित आहे तुला काय म्हणायचे आहे ते. तू माझी माफी माग, तरच मी तुझी नोकरी मिळवून देईल परत", नलीनीचा तोरा वाढला होता.

"नलिनी .. मी तुझ्याकडे भीक मागायला नव्हते आले. तुला काही तरी सांगायचे होते म्हणून आले होते, पण तू घमंडीच नाही तर मूर्ख देखील आहेस, तुला सांगण्यात काही अर्थ नाही"

"अगं जा खूप बघितल्या तुझ्या सारख्या"

"जाते पण एक लक्षात ठेव तू पस्तावशील पण तो पर्यंत वेळ गेलेली असणार"

नलीनीने मानेला एक झटका दिला आणि घरात निघून गेली. सारिका तिच्या घरी परत गेली. तिच्या आईने सगळे पहिले होते. ती सारिकाला म्हणाली, "कशाला जातेस अशा घमंडी मुलीकडे?"

"आई तुला नाही माहित ती ज्या वाटेवर चालली आहे तिथे तिचा अंत होणार आहे. कितीही केले तरी ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. तिला समजावणे हे माझे कर्तव्य आहे".

नलिनी तिच्या आई बाबांसोबत बाहेर आली. गाडीत बसली आणि त्यांना शॉपिंगला घेऊन गेली. आज कित्येक वर्ष्यां नंतर नलिनीची आई खरेदी करायला गेली होती. एकीकडे त्यांना या गोष्टीचा आनंद होत होता. आणि दुसरीकडे त्यांना आपल्या मुलीची काळजी भेडसावीत होती. पण त्यांनी या शॉपिंगची पुरेपूर मज्जा लुटली. नलिनी त्यांना मॉल मध्ये घेऊन गेली. त्यांच्या आवडीचे कपडे- लत्ते घेऊन दिले. चांगल्या हॉटेल मध्ये नेऊन खाऊ घातले. सिनेमा हॉल मध्ये घेऊन गेली. आज कित्येक वर्ष्यां नंतर त्या दोघांनी थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पहिला होता. नाहीतर शेजारच्या घरी जाऊन टीव्ही बघावा लागत होता. आज त्यांनी खूप धमाल केली. संघ्याकाळी ड्राइवरने त्यांना घरी सोडले. शेजारी पाजारी बघतच राहिले. आपापसात कुजबुज करू लागले. नलीनीला मात्र या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता.

दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल कुमारचा फोन आला. त्यांनी नलीनीला घरी बोलवले. नलीनीने त्यांना गाडी पाठवायला सांगितली. अर्ध्या-एक तासाने ड्राइवर गाडी घेऊ आला. नलिनी गाडीत बसली. गाडी मलबार हिलच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात ती अनिल कुमारच्या घरी पोहोचली. अनिल कुमार आणि त्यांची बायको खालीच सोफ्यावर बसलेले होते. नलिनीला बघून दोघे हि उभे राहिले. नलिनीचे हसत स्वागत केले. नलिनी आत गेली. तारामतीने तिला आपल्या जवळ बसविले. तिला स्वतःच्या हाताने सरबताचा ग्लास दिला. नलिनी खूप खुश झाली. आज पहिल्यांदाच तिला इतका मान आणि प्रेम मिळाले होते.

अनिल कुमारने तिला एक ब्रिफकेस दिली.

"यात पन्नास लाख रुपये आहेत, मोजून घे"

इतके सगळे पैसे बघून नलिनी थक्क झाली. फक्त एक लाख रुपयांनी आपण इतकी धमाल करू शकलो. इतके पैसे खर्च करून देखील आपल्याकडे बरेच पैसे उरलेले आहेत. इथे तर पन्नास लाख आहेत. तिला वाटले आपण आयुष्य भर बसून खाऊ शकतो. तिने पैसे मोजले नाहीत. तशीच ब्रिफकेस बंद करून ठेवली.

"अगं पैसे मोजून घे"

"नको, ठीक आहे. असतील पन्नास लाख"

"ठीक आहे, जशी तुझी मर्जी, आता आपण कामाचे बोलूया", अनिल कुमार म्हणाले.

"ठीक आहे", नलिनी ब्रिफकेस व्यवस्थित ठेवीत म्हणाली. पण तिचे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तिच्या डोळ्यांसमोर नोटा नाचत होत्या. आई-बाबांचे हसरे चेहरे नाचत होते. अनिल कुमारने काही ऍग्रिमेंट्स तिच्या समोर ठेवले. तिने ते न वाचताच अनिल कुमार सांगतील तिथे सह्या केल्या.

अनिल कुमार पुढील प्लॅन सांगू लागले.

"तुला माझ्या लोणावळ्याच्या बंगल्यात राहावे लागेल. तुझी सर्व सोय केली जाईल. सर्व सुविधा पुरविल्या जातील. कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तुला माझ्यापासून गर्भधारणा करून घ्यावी लागेल. बाळंतपणा पर्यंत तुला कुठेही जाता येणार नाही. मुलाचा जन्म झाल्यावर मूल आमच्या स्वाधीन करून तूला हे शहर सोडून इतरत्र राहावयास जावे लागेल. तू पुन्हा या शहरात येता कामा नये. मूल आमच्या स्वाधीन केल्यावर तुझा मुलावर कसलाही अधिकार राहणार नाही. तू परत कधीही त्याच्या आयुष्यात येणार नाहीस. त्याला तुझी ओळख सांगणार नाहीस. आणि जर तू तसे काही केले तर आम्ही तुझ्यावर खटला भरू. या ऍग्रिमेंट्स मध्ये हेच सर्व लिहिले आहे. जर तुला पाहिजे असेल तर एक प्रत मिळेल. बाकीचे पन्नास लाख मूल आमच्या ताब्यात दिल्यावर मिळतील. ठीक आहे?"

"हो ठीक आहे. मला सर्व काही मंजूर आहे", नलीनीने होकार दिला.

"ठीक आहे. पुढच्या आठवड्यात जावे लागेल, ओके?"

"ओके", नलीनीला पैसे घरी घेऊन जायची घाई झाली होती. तिच्या उरलेल्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या.

"ओके, ड्राइव्हर तुम्हाला सोडून येईल, बाय, सी यु सून"

"स्योर", असे म्हणून नलिनी बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसली.

ड्राइव्हरने तिला घरी सोडले.

"आई बाबा, हे घ्या आणखी पन्नास लाख रुपये. बाकी पन्नास लाख मला एक वर्ष्यां नंतर मिळतील. तो पर्यंत धमाल करा", नलीनीने ब्रिफकेस आई बाबांच्या हाती दिली.

तिच्या बाबांनी ब्रिफकेस उघडून बघितली. इतके पैसे? त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते. त्यांनी एक दोन बंडल बाहेर काढले. नाकाशी धरून त्या नोटांच्या बंडलचा वास घेतला. एका वेगळ्याच नशेचा अनुभव झाला. संपूर्ण आयुष्य भर जरी काम केले असते तरी इतके पैसे एकत्र बघायला मिळाले नसते. त्यांनी नलीनीला छातीशी धरले. तिच्या माथ्यावर चुंबन घेतले. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी केल्या बद्दल तिला अनेक धन्यवाद दिले. नलीनीच्या आईला मात्र ती गोष्ट खटकली. एक क्षण तिला असे वाटले जणू काही तीची लाडकी लेक हजारो पाऊले दूर गेली. तिचे काळीज तुटले. भविष्यकाळातील अनंत वेदना तिला जाणवल्या. नलिनी आणि तिच्या बाबाना लोभाच्या सागरात डुंबताना पाहून तिला फार दुःख झाले. ती हळहळली. आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेत म्हणाली,

"बेटा नलू, हे बरे नव्हे. हे पैसे परत कर, आपल्याला नको ते फुकटचे धन. आपण कष्ट करून जी भाकरी खातो त्यात आनंद आहे. ह्या पैशातून खरेदी केलेली भाकर आपल्याला पचणार नाही. काही नसून देखील आपण सुखी आहोत. एकत्र आहोत. हे पैसे आपल्याला तोडतील. जा परत दे बेटा. माझे ऐक"

"काय? परत दे? मूर्ख आहेस का तू? नशिबाने आपल्याला संधी दिली आहे आणि तू त्याला लात मारायला सांगते आहेस?", नलिनीचे बाबा पैशाचे बंडल छातीशी कवटाळून म्हणाले.

"अहो तुम्हाला समजत कसे नाही? पैसा आज आहे उद्या नाही, पण आपल्या नलूचे आयुष्य उध्वस्त होईल त्याचे काय? तुम्ही तिला समजवायच्या ऐवजी उलट तिला बढावा देत आहात, शरम वाटायला पाहिजे".

"शरम? कसली शरम? माझी मुलगी कुठे भीक मागायला गेली नव्हती. संधी स्वतः चालून अली आहे. तिचे नशीब बलवत्तर म्हणूल तिला हि संधी मिळाली. आपल्या वस्तीत इतर मुली पण राहतात, त्यांना का नाही मिळाली हि संधी? परत कर म्हणे, चुप्प बस. एक शब्द ही बोलू नकोस, तुम्हा बायकांना अक्कल नसते", नलीनीच्या बाबांनी तिच्या आईला निरुत्तर केले. ती बिचारी काही बोलू शकली नाही. पतीच्या आणि मुलीच्या हट्टापुढे तिचे काही चालू शकले नाही. तिने आपले अश्रू निमूटपणे गिळून घेतले.

शेवटी नलिनीचा जायचा दिवस उजाडला. तिची आई भल्या पहाटे उठली. तिच्या लाडक्या लेकीचे आवडते पदार्थ बनविले. तिचे सर्व कपडे बॅगमध्ये भरले. नलिनीचे आवडीचे स्वतःच्या हाताने बनविलेले लोणचे आठवणीने बॅगमध्ये ठेवले. नलीनीच्या अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले. तिच्या डोळ्यांतले अश्रू मात्र थांबत नव्हते. रडून रडून डोळे सुजले होते. तिच्या गडबडीने नलिनीचे बाबा जागे झाले. तिला रडताना बघून त्यांना पण भरून आले. त्यांनी कपाटातून महागड्या दारूची बाटली काढली आणि घटाघटा पिऊ लागले. नलिनीची आई काहीच बोलली नाही. पैसे मिळाल्यापासून त्यांचे हे रोजचे झाले होते. दारू पिण्या साठी काळवेळ उरला नव्हता. चार मित्र सतत सोबत करू लागले होते. रोज दारू, सिगारेट, पत्ते-जुगार, खाणे-पिणे यावर हजारो रुपये उधळले जात होते. नलिनीची आई काही बोलत नसे. आज पण ती काहीच बोलली नाही. ती ओल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या लेकीची झोपेतून उठण्याची वाट पाहू लागली.

सकाळचे नऊ वाजले. नलिनीची सर्व तयारी झाली होती. तिच्या आईने स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरवला. डोळ्यांतले पाणी काही थांबत नव्हते. तिच्या पदराने तिने नलिनीचे तोंड पुसले. संपूर्ण एक वर्ष्या साठी तिची मुलगी तिच्या पासून दुरावणार होती. त्या वेदना तीच समजू शकत होती. नलिनीचे बाबा दारूच्या नशेत धुंद झाले होते. बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि आईने हंबरडा फोडला.

"नलू ...!!"

"आई नको ग रडू, किती रडशील?"

"नलू ..नलू ...हे बदलू नाही शकणार का? नको जाऊ ना"

"आई नको ग थांबवू, मी त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत. करार केला आहे"

"परत करू आपण त्यांचे पैसे, मी फेडीन त्यांचे सगळे पैसे, माझ्या रक्ताचा एकएक थेम्ब विकावा लागला तरी चालेल, पण तू जाऊ नको बेटा"

"आई आता काही होऊ शकणार नाही, मी त्यांच्याशी करार केला आहे, मला जावेच लागेल"

"ठीक आहे मला फासावर द्या म्हणावं, पण तू जाऊ नकोस, मी बोलते त्यांच्याशी"

"नाही आई, मला गेलंच पाहिजे", असे म्हणून नलू बाहेर पडली. ड्रॉयव्हरला सामान गाडीत ठेवायला सांगितले. ड्रॉयव्हरने सगळे सामान गाडीत ठेवले. सारिका बाहेर उभी होती. ती जवळ आली. तिने एक चिट्ठी नलीनीच्या हातात दिली.

"वेळ मिळाला तर वाच"

"सारिका, मला माफ कर ग, काही चुकले असेल तर लहान बहीण समजून माफ कर, माझ्या आई बाबांची काळजी घे, येते मी", नलिनी गाडीत बसली.

गाडी चालू झाली. नलीनीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते लपविण्यासाठी तिने काळ्या रंगाचा चष्मा लावला. गाडीचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली. नलीनीने तिला पहिले आणि ड्रॉयव्हर ला म्हणाली, "चलो ड्रॉयव्हर".

तिची आई बाहेर येऊन गाडी मागे वेड्यागत धावू लागली. गाडीने वेग धरला.

"नलू ...नलू" आई ओरडली. तिचा आवाज नलिनी पर्यंत पोहोचलाच नाही. गाडी मागे धावता धावता ती सपकन पडली. सारिकाने धावत जाऊन तिला उचलले.

"काकू, सावरा स्वतःला"

"सारिका, माझी नलू गेली ग, माझी नलू गेली"

"काकू काळजी घ्या, सांभाळा स्वतःला, मी आहे ना, मी नाही का तुमची मुलगी?".

"सारिका", आई सारिकाच्या गळ्यात पडून रडू लागली.

इकडे गाडी लोणावळ्याच्या दिशेने धावू लागली. नलीनीने डोळे पुसले. हातातली चिट्ठी उघडून बघितली.

'प्रिय मैत्रीण नलिनी

माझ्या हातून घडलेल्या अपराधाची मी क्षमा मागते.

मला माहित आहे, तुझे मन खूप मोठे आहे, तू मला नक्की माफ करशील.

आता पर्यंत केले देखील असशील.

नलिनी, मी खूप प्रयत्न केले तुला भेटण्याचे, पण दुर्दैवाने भेटू नाही शकले.

मला तुला काही सांगायचे होते. तेव्हा सांगू नाही शकले, म्हणून ही चिट्ठी लिहीत आहे.

अनिल सरांनी जी ऑफर तुला केली आहे ना, तीच ऑफर त्यांनी मला देखील केली होती.

पण मी ती साफ नाकारली होती. माझी हिम्मतच नाही झाली, अशी काही गोष्ट स्वीकारायची.

तुझ्यात हिम्मत आहे, ती गोष्ट तू स्वीकारलीस. पण जरा विचार कर, याचे होणारे भयंकर परिणाम तू सहन करू शकशील का?

परमेश्वर तुला शक्ती देवो.

तू आई बाबांची काळजी करू नकोस. त्यांची एक मुलगी गेली म्हणून काय झाले, दुसरी मुलगी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. तुझी कमतरता मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करिन.

सुखी राहा

तुझी मैत्रीण

सारिका’

"सारिका, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले", नलिनी चिट्ठी छातीशी कवटाळीत हुंदके देऊ लागली. तिला अनिल कुमारचा भयंकर राग आला. ती नशिबाला दोष देऊ लागली. पण आता वेळ निघून गेली होती. फार उशीर झाला होता.

गाडी लोणावळ्याच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. अनिल कुमार अगोदरच तिथे पोहचले होते. त्यांनी पुढे येऊन हसत मुखाने नलिनीचे स्वागत केले. नलीनीला मात्र वाटले कि त्यांच्या थोबाडात एक सणसणीत चपराक द्यावी. पण तिने स्वतःला आवरले. त्यांना नमस्कार केला, त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. अनिल कुमारने तिला संपूर्ण बंगला दाखविला. गार्डन दाखविले. तिथे सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. पण बंगल्याच्या बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. चारही बाजूने भक्कम भिंतींचे कुंपण होते. कुणीही सहजा सहजी आत-बाहेर करू शकत नव्हता. ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. अतिशय कडक सुरक्षेची व्यवस्था केलेली होती. अनिल कुमारच्या परवानगी शिवाय एक सुई पण बाहेर नेता येत नव्हती. अनिल कुमारने नलिनीचा मोबाईल फोन घेऊन टाकला. तिला एक नवा फोन दिला. अनिल कुमार तिथे पंधरा दिवस राहिले. नलीनीच्या सगळ्या मेडिकल तपासण्या करण्यात आल्या. विविध औषधे देण्यात आले. नलीनीने मुकाट्याने आपले शरीर त्यांच्या स्वाधीन केले. नलिनी शरीराने तिथे होती. पण मन मात्र आईबाबांपाशी होते.

नलीनीच्या आईने अंथरूण धरले. तिला अन्नपाणी गोड लागेना. सारिका तिची रात्रदिवस सेवा करीत होती. डॉक्टरांना घरी बोलावले जाऊ लागले. औषधपाणी अंगी लागेना. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली. तिच्या बाबांचे दारूचे व्यसन अधिकच वाढले. ते सतत नशेत राहू लागले. त्यांना आपली चूक समजली. त्यांना प्रचंड पश्च्याताप झाला. ते मानसिक त्रास सहन करू शकले नाही. त्यामुळे अधिकाधिक दारू पिऊ लागले. सारिकाला त्यांची परिस्थिती बघवेना. तिने नलीनीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. शेवटी अनिल कुमारला भेटायला ऑफिसमध्ये गेली. त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी तिला सांगितले कि नलिनी त्यांच्याकडे आलीच नाही. त्यांचा आणि तिचा काहीही संबंध नाही. ते तिला ओळखत नाही. सारिका हताशपणे घरी परत आली. आजारपण जास्त बळावल्याने नलिनीची आई जास्त दिवस जगू शकणार नाही असे दिसू लागले. पत्नीची अशी अवस्था बघून तिच्या बाबांना खूप दुःख झाले. या परिस्थितीला ते स्वतःला जबाबदार धरू लागले. मुलीचा विरह, पत्नीचे आजारपण या मानसिक त्रासाला कंटाळून ते दारूच्या नशेत रेल्वेच्या रुळावर जाऊन झोपले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून नलीनीच्या आईने जागीच प्राण सोडले. लोभापायी संपूर्ण घरादाराची राखरांगोळी झाली.

तीन महिने उलटून गेले होते. नलीनीच्या पोटाने आकार घ्यायला सुरुवात केली होती. आता तिचे मळमळणे कमी झाले होते. थकवा पण कमी झाला होता. तिची भूक वाढू लागली होती. तिच्या आईने आठवणीने दिलेली लोणच्याची बरणी संपत आली होती. तिला आईची खूप आठवण येऊ लागली. पण तिचा नंबर तिच्याकडे नव्हता. अनिल कुमार वरचेवर फोन करीत होते, भेट देत होते. ती त्यांच्या पाशी आई बाबांची चौकशी करीत असे. ते तिला नेहमी सांगत कि मी वरचेवर त्यांच्याकडे जातो. त्यांना काय हवे, काय नको ते विचारतो. ते खूप आनंदात आहेत. ते ऐकून तिला फार आनंद होई. ती त्यांचे आभार मानी.

सातवा महिना लागला. नलीनीच्या पोटाचा आकार आणखीन वाढला. कंबरेमध्ये कळा वाढल्या. हातपाय गळून जाऊ लागले. हातापायांवर सूज चढू लागली. अनिल कुमारच्या भेटी वाढल्या. ते तिची खूप काळजी घेऊ लागले. नको नको म्हटले तरी स्वतःच्या हाताने भरवू लागले. नलिनीवरून जीव ओवाळून टाकू लागले. तिला काय हवे, काय नको ते विचारू लागले. तिचा शब्द खाली पडू देईनात. तिने बंगल्या शेजारी असलेल्या गार्डन मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे संध्याकाळी इतर गरोदर असलेल्या स्त्रिया येत असत. तिच्या बंगल्यामधून तिला ते गार्डन अगदी स्पष्ट दिसत असे. तिला वाटले आपण त्या स्त्रियांबरोबर बोलावे, आपले अनुभव सांगावे, त्यांचे ऐकावे म्हणून तिने अनिल कुमारला आपली इच्छा बोलून दाखविली. अनिल कुमारने इच्छा नसतानाही तिची इच्छा पूर्ण केली. असे ही हातापायांना सूज आल्यामुळे डॉक्टरांनी तिला चालण्याचा सल्ला दिला होता. तिला अनिल कुमारची परवानगी मिळाली. तिला खूप आनंद झाला.

ती बंगल्याच्या दाराशी आली. द्वारपालाने मुख्य दरवाजा उघडला. नलीनीने बाहेर पाऊल टाकले. आज जवळ जवळ दहा महिन्यानंतर तिने बाहेरच्या जगात पाऊल टाकले होते. तिला फार आनंद झाला. क्षणभर वाटले, इथून थेट पळून जावे. आईबाबांना भेटून काळ लोटला होता. तिला त्यांची फार आठवण येऊ लागली. पण आता पळणे शक्य नव्हते. शरीर साथ देण्याच्या परिस्थितीत नव्हते. तिला एक एक पाऊल उचलणे जड झाले होते. पळणे तर दूरच होते.

ती गार्डन मध्ये पोहचली. तिथे अगोदरच काही स्त्रिया बसलेल्या होत्या. ती त्यांच्या जवळ असलेल्या एका बाकावर बसली. त्यांच्या कडे बघून एक स्मित हास्य केले. त्या स्त्रियांनी देखील हसून प्रतिसाद दिला. ओळख पाळख झाली. तितक्यात गार्डन मध्ये खेळणाऱ्या एका लहान मुलाने हातातला फुगा फोडला. मोठा आवाज झाला. नलीनीच्या पोटात अचानक मोठी हालचाल झाली. ती घाबरली. कावरी बावरी झाली. पोटात दुखायला लागले. बाळ हालचाल करू लागले होते. तिला काही समजेना. ती रडू लागली. तिची परिस्थिती ओळखून गार्डन मधल्या स्त्रियांनी तिला समजावले. सहाव्या - सातव्या महिन्यात असे होत असते. घाबरू नकोस. हे सर्व सामान्य आहे. आम्हाला पण असच होतं. तिला हसू आले. तिच्या बाळाची हालचाल तिला आवडू लागली. तिने हळुवार पोटावर हात ठेवला. तिला वाटले बाळाने पोटाच्या आतून तिच्या हाताला हात लावून मी आहे अशी जाणीव करून दिली. तिला तो क्षण फार सुखद वाटला. अंधार पडू लागल्याने ती बंगल्यावर परत आली. तिला वाटले. ही बातमी आई बाबाना सांगायला पाहिजे. तिने अनिल कुमारला फोन करून निरोप दिला. त्यांनी ओके बोलून फोन ठेवला. रात्रीचे जेवण करून नलिनी झोपायला गेली. आता तिला पोटाच्या वाढत्या आकारामुळे झोपणे अवघड वाटू लागले होते. पण तिला त्याचे काही एक वाटत नव्हते. रात्री झोपेत अचानक बाळ लाथ मारी, ती दचकून उठून बसे. कित्येकदा तिला झोपच लागत नसे. कित्येक रात्री तिने जागूनच काढल्या होत्या. दिवसेंदिवस पोटातल्या, कंबरेच्या कळा वाढतच होत्या. तळपाय, पोटऱ्या दुखत होत्या. पण ते सर्व ती सहन करीत होती. आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी सहन करीत होती. एक एक दिवस मोजीत होती. त्याच्या आगमनाची वाट पाहत होती.

नऊ महिने पूर्ण झाले. नलिनीची बैचेनी वाढली. तळमळ वाढली. तिला फार अस्वस्थ वाटू लागले. बाळ जास्तच हालचाल करू लागले होते. एके रात्री तिला नुकताच डोळा लागला आणि तिची आई तिच्या स्वप्नात आली. नलिनी तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारू लागली. आई तिला वारंवार काळजी घ्यायला सांगत होती. डोक्यावरून हात फिरवीत होती. तिला आपल्या कुशीत घेऊन झोपली. तितक्यात नलीनीला तिच्या आतून आवाज आला,

"मी नाही झोपू शकणार ना असा तुझ्या कुशीत?"

"कोण? कोण आहे?"

"मी, तुझा बाळ"

"बाळ? माझा बाळ?"

"हो, तुझा बाळ"

"माझा बाळ? तू माझ्याशी बोलत आहेस?"

"हो, मी तुझ्याशीच बोलत आहे, मी नाही झोपू शकणार ना तुझ्या कुशीत असा?"

"कोण म्हटलं? नक्कीच झोपणार, तू माझा लाडका बाळ आहेस".

"नाही, तू मला जन्माला येण्या अगोदरच विकून टाकलेस".

"नाही बाळा, मी तुला नाही विकले"

नलिनी घाबरून जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला. प्रस्तुतीच्या कळा वाढल्या. डॉक्टर, नर्स आल्या, अनिल कुमारला फोन करून बोलवून घेण्यात आले. अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नी ताबोडतोब निघून आले. नलीनीने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला. नर्सने ते बाळ नलीनीच्या कुशीत दिले. नलीनीने त्या नवजात शिशूचे असंख्य मुके घेतले. त्याला आपल्या हृदयाशी कवटाळले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नी तिथे पोहचले. अनिल कुमारने बाळाला हातात उचलून घेतले. डॉक्टरांना, नर्सला हजारो रुपये बक्षीस दिले. सगळ्यांना मिठाई वाटली. नलीनीला अनेक धन्यवाद दिले. त्यांची पत्नी तारामती मात्र एक शब्द देखील बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर किंचितही हसू नव्हते. नलीनीला फार नवल वाटले. काही महिन्यांपूर्वी जी तारामती तिला लहान बहीण बोलली होती. ती अचानक अशी परक्यासारखी वागली. रात्री मुक्काम करून दोघे जण परत मुंबईला निघून गेले.

नलिनीचे दिवस तिच्या लाडक्या बाळाचे संगोपन करण्यात जात होते. तिला बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. आई बाबांचा विसर पडला होता. ती आणि तिचे बाळ इतकेच तिचे जग बनले होते. तिला कुणाशी काही घेणेदेणे उरले नाही. तिला आता या जगात काहीच नको होते. तिचे बाळच तिची संपत्ती होती. तिची पैशाची हाव मिटली होती.

दोन आठवडे झाले. अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नी तारामती आले. अनिल कुमारने पन्नास लाख रुपयांनी भरलेली ब्रिफकेस नलिनी समोर ठेवली. तारामतीने नलिनी समोरून बाळाला उचलून घेतले. बाळ रडू लागले. नलिनी बाळाला घ्यायला धावली. अनिल कुमारने तिला अडविले.

"अहो असं काय करता? माझे बाळ द्या, ते रडत आहे"

"तुझे बाळ होते, आता ते आमचे बाळ आहे", तारामतीने बाळाचे चुंबन घेत म्हटले.

"नाही नाही, ते माझे बाळ आहे, द्या ते मला"

"आपला करार विसरलीस वाटत?", अनिल कुमारने तिला आठवण करून दिली.

"कोणता करार? मला नाही आठवत. द्या ते बाळ माझ्या कडे"

बाळ खूपच रडू लागले. नलिनी त्याला घ्यायला धावली.

"मिस नलिनी शुद्धीवर या, कराराप्रमाणे हे पैसे घ्या आणि चालत्या पडा", अनिल कुमार ओरडलेच.

"नाही नाही मला पैसे नको, मला पैसे नको, मला माझा बाळ परत द्या"

"बाळावर तुमचा कोणताही अधिकार नाहीये, तुम्ही अग्रीमेंट साइन केले आहे, विसरू नका, नाहीतर मला पोलिसांना बोलवावे लागेल"

"ठीक आहे, बोलवा पोलीस, पण मी माझे बाळ देणार नाही".

"मिस नलिनी आम्हाला माहित होते, म्हणून आम्ही अगोदरच पोलिसांना घेऊन आलो आहोत', अनिल कुमार म्हणाले.

"नका नका, असे नका करू, मी तुमच्या पाया पडते", नलीनीने अनिल कुमारचे पाय धरले.

अनिल कुमारने पोलिसांना आत बोलावले. पोलीस आले, नलीनीच्या हाताला धरून तिला बाहेर खेचू लागले. नलिनी सर्व ताकद एकवटून त्यांचा प्रतिकार करू लागली. पण एक स्त्री चार पोलिसांचा कसा काय प्रतिकार करू शकते? तिची ताकद कमी पडू लागली. बाळ अधिकच रडत होते. तारामती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. पण ते रडायचे काही थांबत नव्हते. नलिनी काकुळतीला आली.

"थांबा थांबा, मी जाते, पण एकदा मला माझ्या बाळाला दूध पाजू द्या, माझी छाती तुटते आहे", नलिनीला पान्हा फुटला. अंगावरील दुधाने तिचे कपडे ओले झाले. पण कोणाला तिची दया आली नाही. पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आणि बळजबरीने तिला गाडीत बसविले. तिला आईचे शब्द आठवले. ती धाय मोकलून रडू लागली. विनवण्या करू लागली. पण तिचे ऐकणारं तिथे कोणीच नव्हतं.

पोलीस सरळ तिला महिला सुधारगृहात घेऊन गेले. तिथे एका खोलीत तिला बंद करून ठेवले. ती रात्रभर ओरडत राहिली, रडत राहिली, विनवण्या करीत राहिली. पण कुणालाही तिची दया आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आकरा वाजता पोलीस तिला घ्यायला आले. तो पर्यंत अनिल कुमार आपल्या कुटुंबासहित परदेशी निघून गेले होते. पोलिसांनी नलीनीला तिच्या घरी सोडले. घरी कुणीच नव्हते. घराला कुलूप होते. ती दारात बसून राहिली. तिला बघून हळूहळू शेजारी पाजारी जमा होऊ लागले. कुणीतरी जाऊन सारिकाला निरोप दिला. ती पळत आली. आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडू लागली. दोघी ओकसाबोकसी रडू लागल्या.

"आई बाबा कुठे आहेत?", नलीनीने विचारले

"आई बाबा नाही राहिले "

"म्हणजे?"

"तू गेल्या नंतर एका महिन्यातच दोघांनी या जगाचा निरोप घेतला"

"आई…..बाबा", नलिनी खाली कोसळली.

सारिकाने आणि जमलेल्या लोकांनी तिला उचलून बसविले. पाणी प्यायला दिले. थोडी सावध झाल्यावर तिने विचारले,"तू मला कळविले का नाही?"

"तुझा नंबर बंद होता आणि मी अनिल सरांच्या ऑफिस मध्ये गेले होते. त्यांनी सांगितले कि तू त्यांच्याकडे गेलीच नव्हतीस म्हणून"

"खोटं बोलले ते", नलीनीने आपले डोळे पुसत सांगितले.

"काल अनिल कुमार आले होते इथे, त्यांनी एक बॅग दिली आहे तुझ्या साठी, थांब मी आणते"

सारिका बॅग घेऊन आली. नलीनीने बॅग उघडून बघितली. त्यात नोटांचे बंडल होते. वरती एक पत्र होते.

नलिनी पत्र वाचू लागली.

'मिस नलिनी,

या बॅग मध्ये पूर्ण एक करोड रुपये आहेत. मला माहित होते कि तू पैसे घेणार नाहीस. म्हणून मुद्दाम हे पैसे तुझ्या मैत्रिणी कडे ठेवीत आहे. या पैशाने एक नवीन जीवन सुरु कर. जेव्हा हे पत्र तू वाचीत असशील तेव्हा आम्ही या देशातून, तुझ्या आयुष्यातून खूप दूर निघून गेलो असणार. आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नकोस.

काळजी घे.

अनिल कुमार'

नलीनीने पत्र वाचले आणि वेड्यागत हसू लागली. तिने बॅग घेतली आणि सरळ एका लहान मुलांच्या अनाथ आश्रमात गेली. ते पैसे त्या आश्रमाला दान केले आणि त्यांच्याकडे परिचारिका म्हणून नोकरी करू लागली. उर्वरित आयुष्य तिने लहान अनाथ मुलांची सेवा करण्यातच घालवले.

- प्रदीप बर्जे

इतर रसदार पर्याय