मातेरा Pradeep Barje द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मातेरा

मातेरा !!

सकाळी सकाळी गंगूने सदाच्या हातात थैली दिली आणि म्हणाली, "सावकाराकडं जाऊन देखा कि पसाभर धान मिळतय का… लेकरं भुकानं याकूळ झालिया".

"अवं तुला म्हाहीती हाये ना.. सावकार मला दारात बी उभा नही करत... मागच्या येळला त्यानं मह्या अंगावर कुत्रं सोडलं व्हतं" सदा पायावरची जखम बघत म्हणाला.

"ते खरं हाये पर लेकरायच्या तोंडाकडं देखा कि वो...रातच्याला बी काही खाल्लं नाही लेकरांनी" गंगू डोळ्याला पदर लावून म्हणाली.

"बरं..जातो म्या… पातो काय भेटलं तर", असं म्हणून सदा हातात थैली घेऊन सावकाराच्या दुकानाकडे चालू लागला.

सावकाराच्या दुकानासमोर जाऊन.. हात जोडून विनवणी केली.

"मालक… काय काम- बीम हाये का?"

"अरे ! तु परत आलास? … तु काय काम करणार? मागच्या वेळी साखरेचं पोतं पाडून माझं नुकसान केलंस ना? ...आता परत नुकसान करणार का? बोलवू का माझ्या खंडूला? त्यांनी तोडलेला लचका विसरलास वाटत?"

"मालक असं नगा करू ...लेकरं उपाशी हायेत काल पासन.. कायतरी काम द्यावा कि ..आता नाय नुकसान करायचो"

"बरं बरं ठीक आहे… पण धान्य नाही देणार ..हवा तर मातेरा देईन… दिवसभरात जमा झालेला".

"बरं मालक, लै उपकार व्हतील आपलं"

"ठीक आहे...ते पोते लाव एका ओळीने आणि अगोदर झाडू मार सगळ्या अंगणात".

"बरं मालक", असे म्हणून सदा कामाला लागला. पोटात अन्नाचा कण नव्हता. पण मुलाबाळांचे चेहरे नजरे समोर फिरत होते. त्याला काम करणे भाग होते. भूक माणसाला लाचार बनविते आणि ती भूक जर पोटच्या मुलांची असेल तर माणूस कोणत्या थराला जाईल, हे तो परमेश्वर देखील सांगू शकणार नाही.

सदा बिचारा सावकार देईल ते काम करीत राहिला. उपाशी पोटी. संध्याकाळी त्याच्या लेकरांना पोटभर अन्न मिळणार या एका आशेवर. भूक अगदीच अनावर झाल्यावर दुकानासमोर असलेल्या हातपंपावर जाऊन अगदी पोटास तिडीस लागेपर्यंत पाणी पित होता. कुत्र्याने चावल्यामुळे झालेली जखम दुखत होती. त्या जखमेमुळे अंगात ताप भरला होता. जखमेत प्रचंड वेदना, पोटात भूक आणि अंगात भरलेला ताप सदाला काम करण्यापासून रोखू शकले नाही.

काम करता करता सदा स्वप्नात हरवून गेला. त्याचा डोळ्यासमोर त्याचे मुलं जेवत आहेत. जेवता जेवता हसणे, खेळणे चालू आहे. एकमेकांची कशी मस्करी करीत आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. हे सर्व सदा उघड्या डोळ्यांनी पाहत होता. मधेच आपण खरोखर त्यांच्या सोबत आहोत असा भास होऊन सदा स्वतःशीच काही बाही बोलत होता. मध्येच हसत होता. आपण सध्या कुठे आहोत हेच तो विसरला होता. सदा हा खूप हळव्या मनाचा माणूस होता. कुणाचेही दुःख त्याच्याकडून बघवत नव्हते. मुलांबाळांमध्ये तर त्याचा विशेष जीव होता.

सदा काम करता करता आपले भान हरपून बसला होता. स्वप्नात गढून गेला होता आणि अचानक… वरचा लाकडाचा ओंडका घसरला. तो सरळ सदाच्या जखमी पायावर येऊन आदळला.

"आई ग मेलो मेलो", सदा दुःखाने विव्हळला आणि जागीच कोसळला.

आजूबाजूचे लोक धावून आले. सदाला उठवून बिसविले. पाणी प्यायला दिले.

सावकार आला तसा सदावर खेकसला, "अरे हारामखोरा...केलंस ना परत नुकसान?".

"नही मालक... चुकून लाकूड सरकलं ...म्या करतो ठीक ...काळजी नगा करू ", सदाने मालकाची समजूत काढायचा प्रयत्न केला.

सावकाराने एक शिवी हासडली आणि परत दुकानात जाऊन बसला. सदा परत आपल्या कामाला लागला. आता त्याने ठरविले कि लक्ष देऊन काम करायचे. पण थोड्या वेळाने भुकेची जाणीव झाली. सावकार जेवायला बसला होता. त्याच्या जेवणाचा खमंग सुवास येत होता. त्यामुळे सदाला भूक अनावर झाली. आता फक्त पाणी पिऊन चालणार नव्हते. सदाने या समस्येवर देखील उपाय शोधून काढला. डोक्याची फडकी पाण्यात भिजवून पोटाभोवती घट्ट आवळली. भुकेची तीव्रता कमी झाली. सदा परत कामाला लागला.

बघता बघता संध्याकाळ झाली. दुकानात ग्राहकांची रेलचेल सुरु झाली. सदा मनोमनी खूप खुश झाला. देता-घेतांना जास्तीतजास्त अन्नधान्य सांडावेत म्हणून देवाची विनवणी करू लागला. कारण जितके धान्य खाली सांडेल तितका मातेरा जास्त मिळणार होता. जिथे माणूस अन्नधान्य खाली सांडू नये, पायंदळी तुडविले जाऊ नये म्हणून काळजी घेत असतो, तिथे सदा मात्र जास्तीतजास्त अन्नधान्य खाली सांडावे, पायंदळी तुडविले जावे हि अपेक्षा करीत होता.

दुकान बंद करायची वेळ झाली. सावकाराने पैसे मोजले. खाते वह्या पूर्ण केल्या. दिवस भरातील खरेदी-विक्रीची नोंद केली. तिजोरीला टाळा लावून दुकानाबाहेर जाऊन उभा राहिला. दुकानातील नोकरवर्ग पण बाहेर येऊन उभा राहिला. सदा हातात खराटा घेऊन तयारच होता. सावकाराने इशारा केल्याबरोबर तो दुकानात घुसला आणि झाडू लागला. दुकानाचा कानाकोपरा झाडून सर्व मातेरा जमा केला आणि आपल्या पिशवीत भरला. सदाने एकवार दुकानातील सर्व सामानावर नजर फिरविली. तिथल्या धान्न्याला एकवार स्पर्श करण्याचा मोह झाला. स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला आणि सावकाराने बाहेरून हाक मारली. तसा सदा भानावर आला. धान्न्याला मनभरून स्पर्श करायचा राहूनच गेला.

"आलो आलो मालक", सदा बाहेर येत म्हणाला

"काय रे ये हरामखोरा? इतका वेळ लागतो का तुला?", सावकार खेकसला

"नही मालक येतच होतो", सदाने हात जोडले

"दाखव ती पिशवी...काही चोरलं तर नाहीस ना?"

"नही मालक ... काय ब्या चोरलं नही .. हे देखा", असे म्हणून सदाने पिशवी खोलून दाखविली

सावकाराने नोकराकडे बघितले तसा नोकर पुढे झाला आणि सदाच्या पिशवीत हात घालून मातेरा ढवळून बघितला, सावकाराला मानेनेच 'नाही' म्हणून इशारा केला. सदा गरीब होता, पण इमानदार आणि प्रामाणिक होता. सावकाराच्या संशयाने तो दुखावला गेला. पण त्याचा नाईलाज होता.

"जा आता ...उद्या सकाळी लवकर ये", सावकाराने जायला परवानगी दिली, सोबत दुसऱ्या दिवसाच्या कामाची हंमी दिली.

सदा आनंदला. सावकाराच्या पायाला हात लावून, "बरं मालक ...लै उपकार झालं".

आता पर्यंत सदाचे अंग तापाने चांगलेच फणफणले होते. पण सदाचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याला असे झाले होते कि तो कधी एकदा घरी पोहचतो आणि बायको मुलांना बघतो. हातात मातेऱ्याची पिशवी घेऊन सदा घराकडे धावू लागला.

कडाक्याची थंडी पडलेली होती. अंगभर कपडे नव्हते. कमरेला एक पंचा, डोक्याला फडकी, दंडावर निंगोबाचा तावीत, कमरेला रूप्याची साखळी. एवढाच पोशाख. उघड्या अंगावर थंडी बोचत होती. पायात वहाण नसल्याने खाचखगळ्यात पाय गेल्यास, एखादा दगड- काटा पायाखाली आल्यास असहय वेदना होत, पण सदा अशा शुल्लक गोष्टींकडे लक्ष देत नसे. अनवाणी पायांनी सदा घराकडे धावत होता. खाली पायांना खडे काटे बोचत होते. पण सदाला त्याचे काही भानच नव्हते. तो आपला पायाखाली आलेली वाट मागे टाकत पळत होता. काळरात्रीचा भयंकर अंधार सदाची वाट चुकवू शकला नाही. जणू सदाला अंधारात सुद्धा दिसत होते. गावापासून सदाची आदिवासी वाडी बरीच दूर होती. गाव आणि वाडी दरम्यान घनदाट झाडी होती. काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी दिसत नव्हते. पण सदाला जणू ती पायवाट अंगवळणी पडली होती. एव्हाना अर्ध्या तासात संपणारी वाट आज मात्र संपत नव्हती. सदा प्राण पणाला लावून ती भयाण वाट पार करीत होता. मातेऱ्याची पिशवी घट छातीशी धरली होती.

दुरून वाडी दिसू लागली. वाडीवरील घरांमधील दिवे चमकत होते. जणू हजारो काजवे फेर धरून नाचत होते. सदाचे स्वागत करण्यास सज्ज्य झाले होते. सदाच्या जीवात जीव आला. सदाचा चालण्याचा वेग वाढला. वाडीकडे बघत सदा झपाझप चालत होता. अचानक एका मोठ्या दगडाला पाय अडखळून सदा खाली कोसळला. "आई ग !!" सदाच्या तोंडून किंकाळी निघाली. सदा समोर असलेल्या दगडावर कोसळला. दगड छातीत मधोमध लागला. दगड वर्मी लागला होता. मातेऱ्याची पिशवी मात्र हातून सुटली नव्हती. सदाला ते अन्न कोणत्याही परिस्थितीत मुलाबाळांपर्यंत पोहचवायचे होते. सदा धरपडत कसातरी उठला आणि पुन्हा चालू लागला. पण आता पहिल्या सारखे बळ राहिले नव्हते. पायाचे दुखणे भयंकर वाढले होते. तापाचा पारा चढला होता आणि आता हे छातीतले दुखणे. हाय रे दुर्दैव्य !! किती यातना .. किती दुःख !! जणू तो परमेश्वर सदाच्या नशिबी सुख लिहायचे विसरूनच गेला असावा.. पण हे सर्व सहन करीत दुखरे अंग खेचत खेचत सदा घराकडे चालत होता. सदा वाडीच्या वेशीवर पोहचला !

सदा वाडीची वेस ओलांडून वाडीत शिरला. दारात उभ्या असलेल्या मोठ्या मुलीने मंगीने सदाला पाहिले. तसे ती आनंदाने ओरडली.

"आये ! बा आला."

आता पर्यंत सदाच्या दोन्ही मुली संगी, जुई आणि गरोदर गंगू उपाशीपोटी झोपी गेल्या होत्या. मंगी ही मोठी मुलगी. तिचा बापावर फार जीव होता. सदाच्या कुशीत झोपल्या शिवाय तिला झोप येत नसे. सदा जरा नजरे आड झाला तरी मंगी कावरी-बावरी होत असे. सदाचा देखील मंगीवर विशेष जीव होता. निंगोबाच्या नवसाने झाली होती मंगी. मंगीच्या आगमनाने सदाचे जीवन मंगलमय झाले होते, म्हणूनच पहिल्या मुलीचे नाव त्याने मंगला ठेवले होते. मंगी दिवसभर आपल्या बापाची वाट पाहत होती. तिचे खेळण्यात लक्ष नव्हते. इतर मुलं खेळत असताना मंगी मात्र बापाच्या मार्गावर नजर ठेऊन होती. शेवटी रात्र झाली सर्वांना झोपा लागल्या. मंगी मात्र डोळ्यात प्राण आणून आपल्या बापाची वाट पाहत होती.

मंगीच्या आवाजाने सगळ्या जाग्या झाले.

" बा ..बा ... आला तू ? येवढा येळ केला? आम्हास्नी कवढी भूक लागली व्हुती", संगी आणि जुई बापाला बिलगल्या.

"व्हयरं माह्या लेकरायनो...मला समध ठाव हाय.. आज मला खरंच उशीर झाला.. उद्या पासन नाय व्हायचा..लवकरच यिन म्या"

मंगी मात्र जवळ आली नाही. दारात उभी राहून पायाकडे बघत उभी राहिली. उजव्या पायाच्या अंगठ्याने जमीन कोरत. सदाने तिचा रुसवा ओळखला. मातेऱ्याची थैली गंगूच्या हाती देत सदा मंगू जवळ गेला.

"आरं माझं कोकरू कश्याने फुगलं बा?'

मंगी आपली हुं नाही कि चूं नाही. एकटक जमिनीकडे बघत उभी.

"ये माह्या जिल्बीच्या तुकड्या .. बा शी नाय बोलणार? काय चुकी झाली असल तर पदरात घे बाप्पा"

"म्या नाय बोलणार जा"

"का बा ?"

"यव्हढा यळ का लावला यायला? मला तुझी किती आठोन आली", मंगीने इतका वेळ धरलेला अबोला सोडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. दोन्ही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. रडत रडत बापाला घट्ट मिठी मारली.

सदाच्या देखील डोळ्यात अश्रू तरारले

"आरं माह्या पिला ..मी तुम्हासाठी खायला आणाया गेलं थो ना बा...असं नग करू...बाला काय तरी कराया पाह्यजे ना"

"नग मला खायाला ..मला तूच पाह्यजे", मंगी बापाला कवटाळत म्हणाली

"हारं माह्या पिला मला समध ठाव हाय"

तो पर्यंत गंगूने मातेरा गोणपाटावर ओतला होता. संगी आणि जुई आई सोबत मातेरा निवडू लागल्या होत्या.

"तुमचं बापलेकीच कौतिक झालं असल तर इथं या निवडया", गंगूने हसत टोमणा मारला

"आलेव आये". मंगी मातेरा निवडायला गेली. सदा बिडी पेटवून खोपटीच्या भिंतीला टेकून बसला.

त्याचा दिवसभरातील शीण नाहीसा झाला होता. पायाचं, छातीचं दुखणं तो पार विसरून गेला होता. दिवसभरातील दगदग, त्रास, थकवा, अति काम केल्याने आलेली मरगळ हे सर्व आपल्या बायका-मुलांचे तोंड बघून कश्या प्रकारे नाहीसे होतात हे एक पिताच सांगू शकतो. म्हणतात ना कि आईची माया दिसून येते पण बापाचे कष्ट दिसून येत नाही. कारण तो ते दिसून देत नाही. प्रत्येक मुलाला-मुलीला आपला पिता एखाद्या सुपरमॅन सारखा वाटत असतो. परंतु त्या सुपरमॅनच्या मुखवट्यामागे असतं एक दुःखरं पण हळवं मन, एक दुःखरं शरीर जे अनेक पिडांनी त्रस्त असतं पण कधी जगजाहीर होत नसतं. अनेक प्रकारच्या पीडा, अवहेलना, अपमान, मानसिक तणाव सहन करीत ते झटत असतं आपल्या लेकरांच्या प्रत्येक सुखासाठी.

सदाच्या मुली मातेरा निवडू लागल्या होत्या. मातेऱ्यात पडलेली डाळ, तांदूळ, कडधान्य, साखर एका-एका बाजूला करीत होते. मधेच मिळालेला एखादा शेंगदाणा पटकन तोंडात टाकीत. मातेरा निवडता निवडता मिळालेला एखादा शेंगदाणा म्हणजे एखादी मौल्यवान चीजच जणू ! तो खाऊन त्यांना अतुलनीय आनंद होई. इतक्यात मंगीला एक काजूचा तुकडा मिळाला. तिने तो आपल्या दोन्ही बहिणेचे ध्यान भटकवून आपल्या हाताखाली दाबला. हलक्या हाताने तो मांडीखाली लपवला. तिच्या आईने मात्र ते बघतले. पण ती काही बोलली नाही. मंगी थोड्या वेळाने पाणी पिण्याच्या बहाण्याने उठली. सोबत मांडीखाली लपविलेला काजूचा तुकडा घेऊन. हळूच सदा जवळ गेली. त्याच्या पुढ्यात बसून म्हणाली..

"बा ये बा .. तोंड उघिड, मी तुझ्या साठी एक गंमत आणली हे".

"कायरं बाप्पा ? काय घिऊन आली माझ्यासाठी ? आं?"

"तू तोंड उघिड आंधी .. लै गंमत हाय"

"बरं बरं उघिडतो", सदाने तोंड उघडले. मंगीने त्याच्या तोंडात काजूचा तुकडा घातला.

"खा कि काजू हाय"

सदाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

"आरं माह्या सोन्या तू खायाचना पिल्ला", बोलतांना सदाचा कंठ दाटून आला

"नग तू खा", सदाचे डोळे पुसत मंगी म्हणाली

"बरं माह्या कड पण एक जादू हाय तुह्या साठी"

"दाखिव"

"असं नाय दावणार… आंधी 'डोल बंद कर"

"दाखिव ना.. दाखिव ना बा...जा मी नाय बोलणार तुह्यासंग", मंगीने खोटा खोटा राग दाखविला

"यां? .. मी कस 'डोल बंद केलं हुतं...आता तू कर"

आपल्या बा ने आपल्या सारखीच अट घातल्याने तिला एक वेगळीच गंमत वाटली

"बरं.. केलं देख", मंगी किलकिले डोळे करून बघायचा प्रयत्न करू लागली

"ये लबाडी नाय करायची बरं"

"नाय र बा ...नाय करत .. हे देख 'डोल बंद हाय"

सदाने हळूच आपल्या पंचाच्या पदरात बांधून ठेवलेली गोळी काढली. दुकानात झाडू मारता मारता त्याला सापडली होती. ती त्याने तशीच हातात दाबून ठेवली होती. नंतर दुकानापासून जरा दूर गेल्यावर ती त्याने आपल्या पंचाच्या पदरात बांधून ठेवली होती. आपल्या लाडक्या पिलासाठी.

सदाने गोळी आपल्या तळहातावर धरीत मंगीला डोळे उघडायला सांगितले

"देख हाय का नाय जादू?"

मंगीने चटकन गोळी उचलली. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हसू आले.

गंगू लांबून हे सर्व पाहत होती. बापलेकीचे प्रेम बघून तिचे डोळे दाटून येत होते. ती ते आपल्या पदराने हलकेच टिपीत होती.

थोड्या वेळाने मातेऱ्याची पेज शिजवून झाली होती. गंगूने सर्वांना पेज वाढली. आज दोन-दोन वाडगे भरून पेज प्यायला मिळाली होती. सर्व खूप आनंदात होते. पोट भरल्यामुळे संगी आणि जुई लवकर झोपी गेल्या. मंगी सदाच्या कुशीत येऊन पहुडली. तिला आपल्या बाच्या कुशीत छान झोप लागली.

गंगूने वाडगे, खापर विसळून टाकले. चूल विझवून पाण्याचा माठ सदा जवळ आणून ठेवला. खोपटीवर ठेवलेली चटई घेऊन मुलींकडे झोपायला जाऊ लागली. तशी सदाने तिला प्रेमाने हाक दिली.

"ये राणी"

आज कित्येक वर्षांनंतर 'राणी' हाक ऐकून गंगू चमकली. शरमली. त्या प्रेमळ हाकेने तिला गहिवरून सोडले.

सात वर्षांची होती तेव्हा गंगू सदाच्या आयुष्यात आली होती. सदा गंगूला खूप प्रेम करी. एकांतात तो तिला राणी म्हणूनच हाक मारी. आज कित्येक वर्षांनंतर सदाने राणी म्हटले आणि गंगू लाजून पाणी पाणी झाली. सदाजवळ बसत गंगूने त्याच्या केसातून हात फिरवून विचारले

"कायरं माझ्या राज्या..आज लै रंगात आल्या गत करू रायला"

"गंगे तू माही राणी हाय तवा नग बोलू काय?"

"असं नाय पर आज लै वरसान असं बोललं ना म्हून इचारलं"

"गंगे आज मला लै कस-स वाट्या लागलं देख"

"काय वाटतं"

"म्हादेव मला न्यायला आला वाटतं"

"असं नग बोलू...तू गेल्यावर लेकराचं काय हुईल?"

"तू हाय ना ... मला ठाव हाय माही राणी खंबीर हाय लेकराय्ची काळजी घ्याया"

"असं नग बोलू ...तुला काय बी व्हनार नाय ...म्हादेवाला मी सांगीन मला ने म्हून"

सदा मनोमनी हसला. त्या महादेवाने त्याला इतकी प्रेम करणारी बायको दिली होती.

गंगू तिथेच त्याच्या कुशीत झोपी गेली.

सकाळी कोंबडा आरवला.

मंगीला जाग आली. झोपेतून उठल्या बरोबर बापाचे तोंड बघायची सवय असल्याने डोळे उघडल्या बरोबर तिने सदाच्या तोंडाकडे पहिले.

"बा ..........................!"

मंगीच्या किंकाळीने गंगू, संगी, जुई जाग्या झाल्या.

सदा तोंडावर हात दाबून, डोळे उघडे, नाकातोंडातून रक्ताच्या धारा दाबलेल्या हातावरून ओघळून सुकून गेलेल्या अवस्थेत मृत्युमुखी पडलेला होता.

रात्रीतून खोकल्याची उबळ आली असावी. शेजारी झोपलेल्या गंगू आणि मंगीला त्याची जाणीव होऊ नये. त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने तोंडावर हात दाबून आतल्याआत ती उबळ दाबायचा प्रयत्न केला असावा, असे दिसून येत होते.

सदा संपला होता.

त्याचे सर्व स्वप्न, जबाबदाऱ्या अधुऱ्या सोडून त्याने या जगाचा निरोप घेतला होता.

गंगू, संगी आणि जुईच्या किंकाळ्यांनी संपूर्ण वाडी जागी झाली. वाडीतले ठाकर धावून आले. सर्वत्र एकच रडारड. दुःखाचे डोंगर कोसळले होते. संगी, जुई बापाच्या अंगाला बिलगून रडत होत्या. गंगू आपली छाती पिटून घेत होती. रात्री सदाने व्यक्त केलेले प्रेम आठवून धाय मोकलून रडत होती. मंगी मात्र शांत झाली होती. निशब्द. एकटक आपल्या बा च्या तोंडाकडे बघत होती. डोळ्यातून एक अश्रू ओघळेना. एकीकडे सदा निपचित पडलेला होता आणि दुसरी कडे मंगी. जणू तिच्या शरीरातून तिचे प्राण निघून गेले होते. बापा सोबत ती सुद्धा गेली असावी अशी.

गंगूने मंगीला पाहिले. सदा गेला होता. तिला मंगी ला गमवायचे नव्हते. ती मंगी जवळ गेली.

"मंगे ..बा गेला...मंगे ... ये माह्या लेकरा कायी बोलत का नाय? तुला काय व्हतंय?"

"अवं देखा ना .. माह्या मंगीला काय झालं ...मंगे"

"मंगे .. ये लेकरा ...तुहा बा गेला ... आता नाय उठायचा" वाडीतल्या लोकांनी मंगूला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला. पण मंगी थंडगार पडली होती.

"लेकीला बोलत कराया पाह्यजे ..रडाया पाह्यजे"

वाडीतले ठाकर आपापसात बोलू लागले.

"वाडीच्या भगताला बोलायला पाह्यजे", कुणीतरी सुचविले.

दोन वडीलधारे भगताला बोलवायला गेले.

पोटच्या पोरीची अशी दशा बघून गंगू घाबरून गेली. तिला सुचेना काय करू, काय नको

भगत घरी नव्हता. गेलेली माणसे परत आली. आजूबाजूच्या वाडीच्या लोकांना बोलावले.

सर्व जमा झाले. सदाला शेवटची आंघोळ घातली. नवा पंचा नेसवला. फुलहार घातले. तिरडी रचली.

तिरडी उचलली आणि गंगूने एकच हंबरडा फोडला

"सदा ..माह्या राजा"

मंगी अजूनही स्तब्धच होती. एकटक आपल्या बाच्या मृत देहाकडे बघत. ती आपल्या जागेवरून उठली. तिरडीच्या समोर गेली. तिरडी खाली ठेवायचा इशारा केला.

वडीलधारे म्हणाले, "एकदा उचलली तिरडी खाली ठेवता येत नाय"

मंगी तिथेच उभी राहिली. काहीच न बोलता.

गंगू धावत पुढे आली, "ठीवा ती तिरडी खाली...लेकीला दरसन घिऊ द्या सेवटच"

मंगीच्या डोळ्यात एक अश्रू नव्हता. डोळ्याची पापणी लवत नव्हती. वाडीतल्या लोकांना तिची दया आली. रीतिरिवाज सोडून तिरडी खाली ठेवली. मंगी सदाच्या जवळ गेली. सदाने रात्री दिलेली गोळी तिच्या हातात तशीच होती. ती गोळी तिने त्याच्या तोंडात घातली आणि बाजूला झाली.

तिचे असे वागणे बघून वाडीतल्या लोकांना रडू आवरणे कठीण झाले. गंगूचे तर हाल बघवेना. एकीकडे नवरा सोडून गेला आणि दुसरीकडे मुलीचे असे हाल, हे बघून ती पार हलून गेली. लोकांनी तिरडी उचलली आणि स्मशानाकडे चालू लागले. मंगी तिथेच उभी राहून आपल्या बाला जाताना बघत राहिली.

वाडीतले लोक सदाचे क्रियाकर्म करून परत आले. गंगूला चार शब्द समजावून सांगितले आणि आपापल्या घरी गेले. गंगू सदाच्या एकेक आठवणी आठवून अश्रू ढाळत बसली. मंगीने मात्र अंथरूण धरले. तीने खाणे-पिणे सोडले. बोलणे सोडले. रडली तर अजिबात नाही. त्या कोवळ्या जीवाला सदा गेल्याचा फार मोठा धक्का बसला. दोन दिवस झाले. मंगीची तब्बेत पार ढासळली. सदा गेल्या पासून तिने पापणी देखील झाकली नाही. एकटक त्याच्या वाटेकडे बघत राहिली. गंगूने मातेऱ्याची पेज बनवून तिला पाजण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ ठरला. मंगी अंथरुणावर पडून होती. गंगूने तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पाजलेले पाणी उलट बाहेर आले. आता मात्र गंगू पुरती घाबरून गेली. आजूबाजूच्या आयाबायांना बोलावले. सगळे जमा झाले. संगी, जुई आपल्या मोठ्या बहिणेचे असे हाल बघून कावऱ्याबावऱ्या झाल्या. काय होत आहे हे त्यांना कळेना. सदाच्या घरासमोर सगळी वाडी गोळा झाली. भगताला बोलावण्यात आले. भगत आला.

अंगारे धुपारे करण्यात आले.

भगत म्हणाला, "तिरडी खाली ठेवायला नग व्हती".

वाडीतले ठाकरं भगताच्या पाया पडले. त्याची माफी मागितली.

"काय चुकलं माकल असल तर माफी दे. लेकरायला पदरात घे. पर लेकीला वाचिव".

"म्या देखतो..काय व्हईल का...पर लै येळ झाला हाय"

भगताने मंगीवरून लिंबू उतरला. कोंबडा उतरला. तिच्या अंगावरून लिंबू कापून फेकला. कोंबड्याच्या बळी देऊन, मंगीच्या कपाळी रक्ताचा टिळा लावला.

"सदा लेकीला नेऊ नग ...तीचं अजून व्हायचं जायचं बाकी हाय...तुला कोंबडं दिलं हाये ते पावन करून घे", असे म्हणून भगत घुमू लागला.

"बा", मंगी आकाशाकडे बोट दाखवून म्हणाली. दोन दिवसांनंतर हा एकच शब्द तिच्या तोंडून निघाला होता.

गंगू धावत मंगीच्या जवळ गेली. मंगीने हसून तिच्या कडे पाहिले आणि डोळे मिटले.

मंगी सदाच्या पाठोपाठ गेली.

भगत काही करू शकला नाही.

गंगूवर जसे काही आभाळ कोसळले. संगी आणि जुईला छातीशी कवटाळून ती रडू लागली.

वाडीतल्या बायकांनी तीला धीर दिला. रडण्या पलीकडे, नशिबाला दोष देण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. नियतीचा खेळच अजब !!

चार-सहा दिवस उलटले होते. सदाने आणलेला मातेरा संपला होता. गंगूला संगी आणि जुईसाठी जगणे भाग होते. भाकर कमवून आणणे गरजेचे होते. आता तीला सदाची जागा चालवायची होती. तिने थैली घेतली आणि सावकाराच्या दुकानाकडे चालू लागली. परत मातेरा आणण्यासाठी !!

- प्रदीप बर्जे