Aaghat - Ek Pramkatha - 14 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 14

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(14)

ऑफिसमध्ये जाताच आजोबांनी प्राचार्यांचे पाय धरले आणि रडू लागले. प्राचार्यांना विनवण्या करू लागले.

‘‘साहेब, बिनं आईबाचं पोर हाय. ह्याला लहानपणापासून मोठ्या कष्टानं आम्ही सांभाळलंय. आमचं हातावरचं पोट आहे. साहेब पोराला कॉलेजमध्ये घ्या. माझ्या पोरावर माझा विश्वास हाय. साहेब पोरं तसं वागणार नाही.’’

‘‘माझ्याकडं बघून साहेब पोराला कॉलेजात घ्या, साहेब.’’

‘‘हे बघा, आजोबा तु चा नातू सर्वात हुशार विद्यार्थी आहे. त्याचं वागणंही चांगलं आह. पण या प्रकरणामध्ये तो सापडल्यामुळे तो पूर्णपणे आमच्या मनातून उतरलेला आहे.’’

‘‘साहेब आसं बोलू नका. माझ्या नातवावर इश्वास ठेवा.”

‘‘अहो, आजोबा कसा विश्वास ठेवणार. ज्यांनी तपास केलाय ती लोक खोटं बोलणार आहेत काय?’’

‘‘होय साहेब, जाणूनबुजूनही काही लोक असं करू शकतात.’’ कांबळे सर म्हणाले.

‘‘तसं कसं शक्य आहे,

‘‘शक्य असू शकतं सर, कारण प्रशांत हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या बाबतीत जाणूनबुजूनही अशी वाईट गोष्ट कोणीतरी घडवून आणू शकतो, सर.’’

‘‘व्हय साहेब, माझ्या नातवाच्या बाबतीत मुद्दाम कोणीही अशी गोष्ट घडवून आणू शकतो.”

‘‘सर माझी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे. कृपा करून या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला हवी.’’

‘‘ठीक आहे! कांबळे सर आपण म्हणताय तर बघू करून पुन्हा एकदा चौकशी. आजोबा आपण येवू शकता. तुम्ही म्हणताय तसं करू.”

पंधरा दिवसातच सखोल चौकशी होऊन निकाल हाती आला. माझ्याबरोबर कितीतरी विद्यार्थी निर्दोष निघाले आणि जे खरोखर गुंडगिरी करणारी गुंड मुलं, जी मोकळेपणाने आम्ही काहीच केलेलं नाही या अविर्भावात होते तेच दोषी निघाले. अखेर सत्याचा विजय झाला. एका मोठ्या संकटातून वाचलो होतो. दोष नसताना फार मोठा त्रास झाला होता. या प्रकरणातून एक गोष्ट शिकलो होतो, ती म्हणून आपल्याला इथून पुढे सावधपणे जपून राहायला हवं.

या प्रकरणामुळं माझ्याबरोबर आजोबा आणि कांबळे सरांना विनाकारण त्रासाला सामोरे जावं लागलं होतं. पण जे झालं ते विसरून जायचं हे ठरविलं. पुन्हा पुन्हा कटू आठवणी जागविल्यास आपल्या मनावर विपरित परिणाम होतो. मी या प्रकरणात निर्दोष असल्याचं निष्पन्न झाल्याची बातमी आजोबांना कळविली. आजोबांनी समाधान व्यक्त केलं. ते निर्धास्त झाले. कांबळे सरांनाही आनंद व्यक्त केला. माझ्या मित्रांनाही आनंद होणे साहजिकच होते. माझ्यासाठी तिघेही कॉलेजला आठ दिवस गेले नव्हते.

पुन्हा एकदा नव्या जोमाने कॉलेजला जाणं सुरू झालं. मी मोकळा श्वास घेतला. कॉलेजचं दुसरं वर्षही संपत आलं होतं. तीन ते चार महिने राहिले होते. त्यानंतर शेवटचं वर्ष सुरू होणार आणि बघता बघता संपणार. उर्वरित दीड वर्षे हसत-मजेत आनंदात घालवायचं असं मनाला वारंवार वाटत होतं. पण मोकळया मनानं कधी जगता आलं नाही. सतत काहीतरी विचारप्रक्रिया चालू असायची. परिस्थितीने मजबूर झालेलो होतो. मला बेफिकीर वागून चालणार नव्हतं.

कॉलेजला जाणं चालू झालं. अलिकडच्या दोन दिवसात न राहवून एका व्यक्तीची उणीव जाणवत होती. मी कॉलेजवर दाखल झाल्यापासून ती दिसत नव्हती.

‘‘शबाना, सुमैया कुठे दिसत नाही?’’

‘‘ती आठ ते दहा दिवस झाले कॉलेजला आली नाही.’’

‘‘घरचा वगैरे काही तरी प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘नाही तसं काही नाही.”

‘‘याचंही मला नेमकं काय ते कारण माहीत नाही.’’

‘‘कसं शक्य आहे एवढी जवळची शेजारी असूनसुद्धा!’’ मी आश्चर्याने बोललो.

‘‘अरे प्रशांत, खरंच माहीत नाही.’’

‘‘हे बघ ती आजारी सुद्धा नाही, घरचाही प्रॉब्लेम नाही,मग कशी काय आलेली नाही ती?”

‘‘अरे हाच प्रश्न मलाही आहे ना!’’

‘‘ठीक आहे! विषय स्टॉप!’’

‘‘नाही, प्रशांत मी थोडं मनातलं बोलू का?’’

‘‘बोल ना!’’

‘‘प्रशांत मला वाटतं की ती तुझ्यामुळेच राहिली आहे.’’

‘‘छे! माझा आणि तिच्या राहण्याचा काय संबंध!”

“संबंध आहे ! प्रशांत.”

‘‘शबाना आज काय बोलतेस तू असे कोड्यात टाकल्यासारखे. स्पष्ट काय ते सांग.’’

‘‘प्रशांत, ती तुझ्यावर प्रेम करते.’’

‘‘शबाना, तू काय बोलतेस हे.’’

‘‘होय प्रशांत खरं आहे. खूप दिवस झाले. तुझ्याशी या विषयावरती बोलावं म्हणत होती. पण सुमैयाच्या मैत्रीखातर मी बोलू शकली नाही. तिचंही तुला बोलण्याचं धाडस होतं नाही. तुलाही तिचं एकतर्फी प्रेम कधी कळलंच नाही.’’

‘‘तिचे आणि एकतर्फी प्रेम! शबाना मला नाही पटत.’’

‘‘अरे कसं पटवून सांगू तुला.” तू आठ दिवस नव्हतास म्हणून तिनंही आठ दिवस कॉलेजमध्ये पाय ठेवला नाही. तुला जर कॉलेजमध्ये घेतलं नसतं ना तर तीही कॉलेज सोडणार होती, हेही मी सांगते.’’

माझे तिघेही मित्र जे बोलत होते ते खरं आहे असं वाटायला लागलं. पण तरीही मला कुणाचं असं वरवरचं बोलणं पटणार नव्हतं. मात्र या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे असं वाटत हातं. तिला या गोष्टीबाबत अजाण ठेवून तिच्या मनाचा शोध मला घ्यायचा होता. आता मात्र मी मनावर घेतलं होतं. ही गोष्ट सुमैयाला कळू न देण्याचं वचन मी शबानाकडून घेतलं. मला कॉलेजमध्ये घेतल्याची बातमी सुमैयाला शबानाकडून सांगितली. मी आल्याची बातमी समजताच दुसऱ्या दिवसापासून सुमैयाही कॉलेजवर दाखल झाली. मला प्रत्यक्षात जाणून घ्यायचं होतं. तिचं माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे काय? तो शोध चालू होता.

कॉलेज सुटलं आणि स्नेहल माझ्याकडे धावत आली. मी गडबडीने जात होतो. इतक्यात...

‘‘प्रशांत तुला सुमैयाने बोलविलं आहे.”

‘‘का? कशासाठी?’’

‘‘नाही माहीत, पण तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणत होती.’’

‘‘ठीक आहे. कुठे आहे ती?’’

‘‘शबाना आणि ती कॅन्टीमध्ये बसली आहे.’’

सुमैयावर असलेला माझा अगाध विश्वास तिच्याबद्दल असलेल्या संशयावर मात करायचा. मी कॅन्टीनमध्ये गेलो. सुमैया थोडी भावूक दिसत होती. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला आतुरतेने आणि भावूकतेने पाहतो त्या चेहऱ्याने सुमैयाही माझ्याकडे पाहत होती. अगदी डोळे भरून....

“शबाना”

“काय?”

“मी आलेच, तोपर्यंत तू आणि स्नेहल पुढे जाता का?”

“हो जातो आम्ही.”

‘‘अरे प्रशांत, असा का थांबलायस अनोळख्यासारखं ये इकडे.’’

‘‘नको, मला जायला हवं.’’

‘‘तुझी नेहमीच गडबड असते. थोडादेखील वेळ मिळत नाही तुला माझ्यासाठी?’’

‘‘कधी समजणार रे तुला माणसे? कोण कुणासाठी तळमळत,मर-मर मरतं तर कोण नुसतंच जगतं सुटतं ना भान असतं ना जाण!’’

‘‘बरं ठीक आहे! आजचा दिवस तुझ्यासाठी.’’

‘‘खरंच प्रशांत!’’

‘‘चल आपण आज मस्तपैकी पिक्चर बघायला जाऊ.’’

‘‘नको, आपण इथेच बसू. गप्पागोष्टी करू. पण पिक्चर नको. लोकांचा गैरसमज होईल.”

‘‘अरे, लोकांची कशाला फिकीर करतोस. आपलं नातं शुद्ध मैत्रीचं आहे.’’

पुन्हा एकदा तिचा मित्रत्वाबाबतचा विश्वास, शुद्ध मैत्रीचं शब्द कानावर आदळले तसं शबानानं आणि माझ्या मित्रांनी तिच्याबाबत सांगितलेल्या गोष्टी मला निरर्थक वाटून गेल्या.

‘‘चल आपण निवांत बागेत बसू बोलत.’’

‘‘ठीक आहे, चल जाऊ.’’

‘‘ए प्रशांत, पोट भरून जेवतोस ना! की अर्धपोटीच असतोस?’’

‘‘हो जेवतो ना!’’

‘‘मग असा उदास आणि पडलेला चेहरा का सतत असतो तुझा? कोणती काळजी करतोस इतकी?”

‘‘हे असे काय बोलतेस तू सुमैया?’’

‘‘होय प्रशांत खरे तेच बोलतेय मी. अरे मोकळया मनानं हसत आनंदाने या जगात कधी वावरणार तू? तुझी गरीबी आहे म्हणून! दु:खाच्या छायेत मन मारून किती दिवस जगणार? अरे बिनधास्त मनापासून हास, गप्पा मार, फिर,जो आनंद लुटायचा आहे तो लुट. अरे! हे जीवन पुन्हा पुन्हा येणार आहे काय?’’

‘‘तू म्हणतेस ते सुमैया बरोबर आहे. पण आम्हाला मर्यादा सोडून बेदरकारपणे वागून

चालणारं नाही. कारण आम्ही परिस्थितीने मेलेली माणसं आहोत. आमचं जीवन आम्हाला घडवायचे आहे. त्यामुळे आम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही.’’

‘‘अरे! कष्ट तर घेतलेच पाहिजे. तुझ्या खडतर परिस्थितीला तर ते घेतलेच पाहिजेच. पण पोट मारू नको. काळजी वगैरे काही करू नको. बिनधास्त रहा. हसत खेळत रहा. तू बिनधास्त तर आम्ही बिनधास्त. नाराज राहू नको. आम्ही आहोत ना! तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही मी. कुणास ठाऊक पण प्रशांत तुझ्याबाबत मला खूप आपलेपणं वाटतं. तुझ्याकडूनही तितकंच आपलेपण मलाही मिळायला हवं हं!’’

*****

इतर रसदार पर्याय