Trushna ajunahi atrupt - 22 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २२

काही करून तिला रोखायला हवं. त्याला हातातील मंतरलेल्या राखेची आठवण झाली.क्षणासाठी आपला श्वास रोखून तो सावध होत पवित्रा घेतला. ती जवळ यायच्या आत त्याने पोतडीतील मुठभर राख तिच्या दिशेने उधळली. राखेचा स्पर्श होताच ती जागीच थबकली. तिच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. असह्य वेदनेने की ओरडू लागली. तिला अनयवर हल्ला करायचा होता मात्र एकच जागी खिळली गेल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू तिच्यावर भारी असलेला करालचा प्रभाव क्षीण होत होता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव किंबहुना वेदनेमुळे अजुन तीव्र झाले होते. तिला क्षणाचीही उसंत न देता त्याने लगबगीने तिच्याभोवती राखेच रिंगण रेखाटलं. हवेत राखेची धूळ अजुनही असल्याने ती फक्त गुरागुरण्याशिवाय अजुन काहीच करू शकत नव्हती. राखेच्या रिंगणात तिला एखाद्या बळीच्या बकऱ्यासारखी पडलेली पाहून त्याच्या काळजाला चरे पडत होते. मात्र काही इलाज नव्हता. ही वेळ भावनेच्या भरात वाहून जायची नव्हती. अजुन पूर्ण घराचं रिंगण बाकी होत... बाकी सर्व दैवाच्या हातात टाकून तो पळतच बाहेर निघाला...

अचानक त्याला काहीतरी आठवल... तो जागीच थबकला... जड मनाने पुन्हा तिच्या दिशेने आला... ती जमिनीवर शरीरातील त्राण संपल्यासारखी निर्जीवपणे पसरली होती. साडीचा पदर घसरून पोटावरून खाली पडला होता. कित्येक वेळ आरशासमोर उभ राहून सुबकपणे बांधलेले केस सैलावून चेहऱ्यावर पसरले होते. हात जोरात आपटल्याने तिच्या आवडत्या गुलाबी सोनेरी बांगड्या फुटून त्यांच्या काचा सर्वत्र विखुरल्या होत्या. तिला अश्या अवस्थेत पाहून पुन्हा त्याच काळीज हेलावल. आपल्या थरथरत्या हाताने त्याने तिच्या गुलाबी गालांना स्पर्श केला. तिला स्पर्श करताच त्याला स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. एका हाताने उगाचच त्याने आसू पुसायचा प्रयत्न केला. त्याच्या आसव पुसण्याच्या प्रयत्नाला न जुमानता एक आसू नकळत तिच्या कपाळावर विसावला. त्यानेही पुन्हा त्याला पुसायचा प्रयत्न केला नाही. कापऱ्या हातांनी बटव्यातील चिमुटभर राख त्याने तिच्या कपाळाला लावली. विस्कटलेल्या बटांना दोन्ही हातानी सावरत तिच्या चेहऱ्यावरून दूर सारल. घसरून खाली पडलेला पदर पुन्हा उचलून पुन्हा तिच्या अंगावर लपेटला. व एकवार तिच्याकडे पाणीभरल्या डोळ्यांनी पाहत पुन्हा खिडकीच्या दिशेने निघाला. एव्हाना बाहेरच वातावरण बरच बदललं होत. असह्य थंडीची जीवघेणी लाट पसरली होती. अंधारभरल्या परिसरातून थंडगार हवेचे झोत खिडकीवर आदळत होते. स्वतःच्या मनाला समजावत त्याने पुढे पाऊल टाकलं मात्र चुकून मगाशी तुटलेल्या काचांवर त्याचा पाय पडला. अचानक वेदना झाल्याने कळवळत त्याने पाय पकडला. परंतु त्या नादात त्याचा तोल जाऊन तो खिडकीवर आदळला. खिडकीची अर्धवट तुटलेली काच अगदी वाट पाहत असल्यासारखी भसकन त्याच्या पोटात घुसली. बाहेरून जोराची किंचाळी ऐकताच मागचा पुढचा विचार न करताच असह्य वेदना होत असतानाही त्याने स्वतःला खिडकीतून झोकून दिलं. पोटातला काचेसहित साचलेल्या बर्फाच्या कुशीत तो अलगद सामावून गेला.
----------------------------------------------------------------------
" बाबा.." आवाजासरशी सर्वांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने वळल्या. दचकून ती तंद्रीतून बाहेर आली. एखाद्या चित्रपटासारखं अगदी वेळेत काहीतरी घडल होत. बाबा व गुरुजींचा डोळ्यांवर विश्वास बसेना. दरवाजात अनय त्याची तीच चार्मिंग स्माईल लेवून उभा होता. एक हात पोटावर घेत दुसऱ्या हाताने दरवाजा पकडून तो शांतपणे हसत होता.

इतका वेळ धडधडत्या काळजाने बाबांचे शब्द ऐकायला कान टवकारलेल्या तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो तिच्यासोबत असावा असं वाटणार मन त्याला समोर पाहून अजुनच खजील झाला. अंग अस हॉस्पिटलमधल्या बेडवर जखडलेल नसत तर अत्यंत शरमेने कदाचित ती तिथून पळून गेली असती.

" कसं वाटतंय..." तिला अस हतबल पडलेलं पाहून काळजीने त्याच्या पापण्यांत पाणी तरळल. त्याच्या पाणीदार डोळ्यात आजही तिच्यासाठी तेवढच प्रेम होत.

तिचेही डोळे भरून आले होते. इतकं काही घडून गेल्यावरही त्याने तितक्याच प्रेमाने तिची काळजी करावी... कसल्या मातीचा बनलाय हा माणूस... काळीज दगडाच असेल त्याच... नाहीतर इतके घाव देवून कधीच तुटून गेलं असतं... तिच्या मनातील विचार हुंदका बनून तिच्या गळ्याशी दाटले होते... तिला मनापासून माफी मागायची होती पण बोलणंच सुचेना. त्याला तिची अवस्था समजली असावी कदाचित.. काहीही न बोलता तो चुपचाप तिच्या उशाशी जाऊन बसला. आपल्या हाताने हळुवार तिचे केस कुरवाळत त्याने आपले मऊ ओठ तिच्या रुक्ष पडलेल्या कपाळावर टेकवले. ती स्तब्ध झाली.... हाच तो स्पर्श होता जो तो सगळीकडे शोधत होती... प्रचंड आपुलकीने ओथंबलेला... सर्व काही तिच्या जवळ होतं...तिच्या मालकीचं... ती हुंदके देऊ लागली.. स्वतःच्या कपाळ करंटेपणाचा तिला मनस्वी राग येत होता.

" आय एम सॉरी..." स्फुंदत स्फुंदत तिने माफी मागायचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमतच होत नव्हती. आपले डोळे तिने घट्ट मिटून घेतले. पापणीच्या रेघांमधून फक्त पाणी ओघळत होते.

" श..... झाल ते झाल... विसरून जा सगळ.." अनय प्रेमभराने तिचा चेहरा न्याहाळत होता. रोज गुलाबासारखा टवटवीत फुललेला तिचा चेहरा आयुष्याच्या वणव्यात पार होरपळून निघाला होता. तिला अस कोमेजलेल पाहून त्याच्या हृदयात कससच होत होत. आणि तिच्या मनात साचलेल सगळ मळभ अश्रुंवाटे वाहून जात होत.

तिच्या डोळ्यांतून आसू थांबत नव्हते. तिने किलकिल्या डोळ्यांनी अनयला पाहिलं. कपाळापासून हातापायाला सगळीकडे काही ना काही लागलं होत. पायांना मोठाल बँडेज बांधलं होत. पोटालाही जखम झाली असावी कारण आल्यापासून त्याने पोटावरून हात काही बाजूला घेतला नव्हता. एवढं सगळं होऊनही आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे त्याच्या जीवाची होत असलेली तगमग लपवण्यात तो बराच यशस्वी झाला होता. मात्र आसवांनी डबडबलेले डोळे त्याला धोका देऊन गेले. त्याच्या मनातील कळकळ त्याच्या डोळ्यांनी व्यक्त केली. आपल्याला वाचवण्यासाठी हे सगळे किती व कसे लढले असतील ह्याची त्यांच्या अवतारावरून तिला कल्पना आलीच होती. मात्र तरीही तिला अजिबात जाणून घ्यायचं नव्हतं न जाणो पुन्हा त्या शक्तीला आवाहन केलं गेलं तर...

" अनय.." तिला पुन्हा हुंदका फुटला. सारे प्रयत्न करूनही तिला स्वतःला आवरण जमेना. थकली होती ती विचार करून.. रडून... ती अलगद त्याच्याजवळ सरकली.

त्याने आपला एक हात तिच्या हातात गुंफला. आपल्या ओठांनी हळुवार तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली. प्रेमाच्या गारव्याने ती शहारली. तिने हळूच डोळे उघडून अनयला पाहिलं. तो अजुनही गोड हसत पाणीभरल्या डोळ्यांनी तिला पाहत होता. तिचे टपोरे तांबूस तपकिरी डोळे त्याची माफी मागत होते. " अनय.." तिला काहीतरी बोलायचं होत.

" हं..." तिच्यावरील नजर जराही न हटवता त्याने हुंकार भरला.

" माहित नाही ही वेळ आहे की नाही बोलायची पण... मी खरंच तुझ्या प्रेमात पडलीय.." लाजून तिला पुढे बोलणं जमेना. तिच्या पांढऱ्या पडलेल्या गालांवर नकळत गुलाबी चढली. तिचे निस्तेज पडलेले ओठ प्रेमाच्या जाणिवेने थरथरू लागले. नकळत तिने आपल्या बोटांची गुंफण अजुनच घट्ट केली. तिच्या हृदयाची धडधड त्यालाही ऐकु येत होती. तो काय बोलतोय ते ऐकायला तिचे कान अधीर झाले.

त्याला तर काहीच सुचेना. जे ऐकायला तो इतके दिवस तरसत होता तेच आज अनपेक्षितरित्या ती कबुल करत होती. त्याच्या चेहऱ्यावरच हास्य अजुनच खुलल. तो अविश्र्वासाने तिला पाहतच राहिला. खरंतर त्याला नाचायचं होत पण तो इथे काहीच करू शकत नव्हता. " मी तर कधीचाच प्रेमात आहे... फक्त तुझ्या उत्तराची वाट पाहत होतो.. "

-----------------------------------------------------------------------

आपल्या सोनेरी केसांना बाजूला करत ती अलगद त्याच्या मिठीत शिरली. अनयने आपल्या दोन्ही बाहूंच्या कवेत तिला घट्ट पकडल. त्याचे हात तिच्या मऊशार पाठीवर रेंगाळत होते. तिच्या सर्वांगावर हलका हलका शहरा फुलत होता. त्याच्या स्पर्शाने ती हळुवार त्याच्या मिठीत विरघळून जात होती. कितीतरी वेळ त्यांची अनावृत्त शरीरे एकमेकांशी संवाद साधत होती. प्रणयाचा भर ओसरल्यावर आपले श्वास आवरत ते पुन्हा पलंगावर विसावले. तिने प्रेमभरल्या नजरेने त्याला पाहिलं. तो ब्लँकेट नीट अंगावर घेण्यात व्यस्त होता. त्याला ब्लँकेटसोबत झटापट करताना पाहून ती खुदकन हसली. झाल्या प्रकारानंतर अनय तिला स्वीकारेल ह्याची बिलकुल खात्री नव्हती. बरच काही घडून गेलं होत आयुष्यात. नियतीने खूप न सुटणारे प्रश्न निर्माण केले होते आणि अनयच्या रुपात त्याची उत्तरही तिला दिली होती. अनयने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. चढत जाणारी रात्र त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होती.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED