डॉमिनंट
भाग बारा
भाग अकरापासून पुढे--------
काहीश्या सामसूम झालेल्या त्या वस्तीच्या बाहेर रोडवर मनूने बाईक थांबवली. आरीफ आणि मंदार चटकन उतरले आणि तिथल्याच एका गल्लीत घुसले. मनू बाईक स्टार्ट करून पुढच्या रस्त्याने तिच्या घराकडे वळली. ठरवल्याप्रमाणे तिला एकटीलाच पुढे जायचे होते. आणि वेळ पडल्यासच आरीफ आणि मंदार समोर येणार होते.
काही क्षणांतच मनूने मुख्य वस्तीपासून थोड्या बाजूला असलेल्या आपल्या घराजवळ बाईक साईडला लावली आणि ती घराचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणून पुढे गेली. तिकडे आरीफ आणि मंदार देखिल मनूची घराबाहेरील हालचाल दिसू शकेल अश्या अंतरावर येऊन थांबले होते.
"क्या कहते हो मंदार भाय... कौन रहेगा इस सब के पीछे..." आरीफने दबक्या आवाजात मंदारला विचारले.
"ह्मम... कोई शातीर खिलाडी ही रहेगा.." मंदार आवाजात गुढपणा दाखवत म्हणाला. त्याच्या नजरेत एकप्रकारची विशिष्ठ चमक आली होती. कदाचित त्याला या अगोदरच हिंट मिळाली होती. पण तरीही मंदार गप्पच होता. का कुणास ठाऊक.. पण त्याने अजून तरी मनू वा आरीफ कुणाला काहीच सांगितले नव्हते.
मनू ने उघडा दरवाजा पाहताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दोन पावलं आत जाताच तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेहजबीनला पाहीले आणि मनू तिथंच थबकली. तिच्या चेहर्यावर थोडे का होईना पण भितीचे सावट उमटलेच होते. एकवार आसपास संपूर्ण बारकाईने नजर फिरवत तिने घरातल्या एकेका गोष्टीचा आढावा घेतला. कुठेच काही तोडफोड वगैरे नव्हती. खुनी खुपच चलाख आणि तिच्या घरासंबंधी संपूर्ण माहीती असलेला होता. शिवाय मेहजबीनने सांगितल्याप्रमाणे त्याला अगोदरही तिने आपल्यासोबत पाहीले होते.
मनू हळूहळू मागे एकएक पाऊल टाकत घराबाहेर आली. अजूनही तिच्या हालचालीत कमालीचा तणाव जाणवत होता. जणू तिला त्या प्रसंगात काय करावे हे सुचत नव्हते. समोर खुप मोठा प्रश्न उभा ठाकला होता आणि जेवढे त्याच्या उत्तराजवळ जाण्याचा मनू प्रयत्न करत होती तेवढाच तो प्रश्न अधिक किचकट होत चालला होता.
"मंदार भाय.. मामला ठिक नहीं लग रहा है..." मनूला उलट्या पावली मागे येताना पाहत आरीफ सावध होत म्हणाला.
मंदारनेही त्याच्या इशार्याने सावध पवित्रा घेतला आणि तो हळूहळु मनूच्या दिशेने निघाला. त्याच्या मागोमाग आरीफही निघाला.
मागून आलेल्या चाहुलीने मनूने मागे वळून पाहीले. मंदारला पाहत तिने काहीच प्रतिक्रिया न देता पुन्हा नजर वळवत उघड्या दारातून आत पाहू लागली.
काहीतरी बिनसल्याची जाणीव मंदारला झाली आणि समोर थोडं पुढे येताच त्याला खाली पडलेली मेहजबीन दिसली. आरीफही तितक्यात जवळ आलाच होता. ते दृश्य पाहून त्याचा तर भितीने थरकापच उडाला.
"य....ये क्या... कैस्से... हो गया..." थरथरत्या आवाजात आरीफ पुटपुटला. डोळे फाडून तो नजारा पाहताना त्याच्या दृश्यपटलावर येणार्या संकटाच्या असंख्य शक्यता स्पष्ट दिसत होत्या. मनूही अजून स्तब्ध उभी होती. परंतु मंदार मात्र शांत होता. जणू जे झाले त्याने त्याच्यावर काहीच फरक पडला नव्हता वा त्याच्यासाठी ही गोष्ट फारशी लक्षात घेण्यासारखी नसावी.
"ये यहा पर आनेवाली है, ये बात उस तक कैसे पहुंची.." मनूने आरीफकडे पाहत विचारले.
"पता नहीं.. पर सवाल ये है के वो है कौन... आखिर चाहता क्या है..." आरीफने संभ्रमावस्थेतच उत्तर दिले.
"मनू..." मंदारने तोंड उघडले. मनूकडे पाहत त्याने एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला.
"कदाचित तो तुझ्यासाठी इथं आला असावा.. (खाली मेहजबीनकडे पाहत) हीच्यासाठी नाही.. पण ती आयत्या मिळालेल्या संधीप्रमाणे त्याला समोर दिसली आणि त्याच्या कचाट्यात सापडली.." मंदार म्हणाला.
"व्हॉट् डू यू मीन्.. माझ्यासाठी..." मनू रागाने मंदारकडे पाहत त्वेषात बोलून थांबली, मंदारने तिच्याकडे पाहत मानेला तीस अंशात हलवत भुवया एकदा ऊंचावून खाली घेतल्या, त्याचे ओठही त्याच क्षणी एकमेकांवर दाबले होते.
त्या हावभावांनी मनूच्या डोक्यात प्रकाश पडला.
"ओह्.. हो.. हो... माझ्यासाठी... इतका साधा विचार माझ्या मनात पूर्वीच का आला नाही.. एकच तर व्यक्ती राहीली होती जी इतक्या दिवसांत समोर आली नव्हती. त्याच्याबद्दल तर मी विसरूनच गेले होते. तरीच त्याला माझे घर माहीत होते.. तो पहील्यापासूनच दीदीला ओळखत होता.." मनू भरभर एकेक आठवत बोलत होती.
मंदार गांभिर्याने तिचं म्हणणं ऐकत होता. तर आरीफ अजूनही कोडं न उलगडल्यासारखा प्रश्नार्थक नजरेने लक्षपूर्वक मनूकडे पाहत होता.
"तो दीदीला ओळखत असल्याने आणि दिदीला कामानिमित्ताने भेटण्यासाठी तो बर्याचदा घरी यायचा. एकदा संध्याकाळी मी बाहेरून घरी आली तेव्हा नेमका दीदीने त्याच्या कानाखाली मारल्याचे मी पाहीले होते. शिवाय त्यावेळी दीदीने माझ्या नावाचा उल्लेखही केला होता. म्हणजेच त्यावेळी त्याने माझ्याबद्दल तिच्याकडे विषय काढला असणार. मी दीदीला विचारलेही होते त्याबद्दल पण तिने नेहमीच मला सांगायचे टाळले. शिवाय त्या दिवसापासून तो पुन्हा कधी घरी आला नव्हता. पण दीदीला काही काम सांगायचे असल्यास तो फोन करून बाहेर भेटायचा. हरामी साला.. तो नक्कीच तो प्रसंग विसरला नसणार.. त्यासाठीच त्याने मौसम दीदीला मारण्याचा प्लॅन आखला असणार. आणि आता तो त्याचा मूळ उद्देश सफल करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.. ओह् माय्... इतकी प्लॅनिंग त्याच्यासारखा भुक्कड गुंड करू शकतो विश्वासच नाही बसत."
"मदन..." आरीफ एकदम क्लिक झाल्यासारखा ओरडला.
"हो... मदनच.. या गेममध्ये त्याच्याशिवाय अजून तरी कुणी खुनी असेल असं वाटत नाही.." मनू आत्मविश्वासाने म्हणाली.
मंदारलाही काहीतरी बोलायचे होते पण त्याने ते टाळले. मनूच्या घारीसारख्या नजरेतून मंदारची ती अवस्था सुटली नाही. मनूने सुरूवातीपासून सर्व आठवायला सुरूवात केली.
'मौसमचा खुन.. मंदारच्या रूममध्ये.. मदन आणि मंदार दोघांचं तिथं असणं.. मंदारचं तिचे पैसे घेऊन पळून जाणं.. नसीरचा खुन.. तो झाला तेव्हाही मंदारची आणि मदनची तिथं उपस्थिती होती.. मंदारला पोलिस पकडून नेतात.. त्यानंतर डिग्रीचा खुन.. कदाचित डिग्रीला अगोदरच्या खुनाचं रहस्य कळालं असावं. म्हणून त्याचाही खुन.. पण यात मंदार सहभागी नव्हताच.. शिवाय मेहजबीनचा खुन्.. यातही मंदार सहभागी नाही.. कारण तो तर आमच्यासोबतच आहे.. एक मिनिट्.. काहीतरी गल्लत होत आहे.. मनू डोक्याला जोर लावून विचार करू लागली..
'त्या रूममध्ये मौसमच्या बॅगेतले पैसे असे डायरेक्ट मंदार चेक करूच शकत नव्हता. मौसम पैश्याची बॅग समोर ठेवून मंदारच्या नजरेआड जाऊच शकत नव्हती. म्हणजेच मौसमच्या बॅगेत रोकड असल्याचे अगोदरच मंदारला माहीत होते. आणि मौसमला जखमी केल्याशिवाय त्यांना हात लावणं मंदारला जमलंच नसतं.. याशिवाय मदन एकटा खुनी असेल तर नसीरचा खुन ज्यापद्धतीने झालाय, तर त्याची हाडं तोडण्याइतपत ताकद मदनकडे तर नक्कीच नाही. म्हणजेच नसीरच्या खुनामागे मदनशिवाय आणखी कुणीतरी असणारच.. आणि तो व्यक्ती मंदारच असू शकतो. कारण साफ आहे, मदन सुरा काढल्याशिवाय काम करणार नाही. आणि मंदार आपल्या ताकदीच्या गर्वात राहून कोणतेही हत्यार वापरणार नाही.. येस्स्.. असंच असू शकतं.. खुनी एक नाही, तर दोन आहेत.. मदन आणि त्याला साथ देणारा मंदार..'
'आता राहीली फायद्याची गोष्ट.. तर मदनला मी हवीय.. पण मंदार.. त्याला काय हवं असेल.. फक्त पैश्यासाठी तो हे करेल असे वाटत नाही.. मंदार.. मंदार... ओह्हह.... विक्रम.. विक्रमच.. मंदारला विक्रमपर्यंत पोहोचणं अवघड जात असणार.. म्हणूच मदन त्याला या कामात मदत करू शकत होता. विक्रमला मारून त्याच्या सर्व धंद्यावर मंदार कंट्रोल घेऊ शकत होता. आणि स्वतःला विक्रमजवळ जाणं शक्य नाही म्हटद्यावर तो मदनला इरफान भायच्या संबंधातून विक्रमपर्यंत पोहोचवणार आणि विक्रम संपला की आपसुकच मंदारचा बदला आणि विक्रमचा पैसा.. दोन्ही टारगेट पूर्ण झालेच असते.'
मनू आपल्याच मनात संबंधित प्रकरणाची उकल करत होती. चित्र आता हळूहळु क्लिअर होत चालले होते.
"पण त्यात त्याच्या मित्रांचीही हत्या म्हणजेच मला वाटतेय त्याचा उद्देश फक्त मी नाही.. अजूनही काहीतरी आहे.." मनूने मंदारकडे पाहत अंदाज वर्तवला. आणि ती मंदारच्या उत्तराची प्रतिक्षा करू लागली.
"अ..अह्... हा.. हो..हो.. अजून काहीतरी नक्कीच असणार त्याच्या मनात.." मंदार पहील्यांदाच क्लीन बोल्ड झाला होता.
आणि त्याला गुगली टाकणारी मनू गालात क्षणभरच हसली आणि पुढच्या डिलीव्हरीसाठी सज्जदेखिल झाली. आरीफसाठी ते सर्व बाऊन्सरच होते, म्हणून तो फक्त वेट अॅन्ड वॉच भुमिका निभावत होता.
"आपल्याला इथुन लवकर निघायला हवं.. दुपारच्या प्रकरणानंतर पोलिस आपला शोध घेण्यासाठी इथं कधीही पोहचू शकतात.." मंदारने सावरत वेळ मारून नेली.
"हा मनू.. हमें जल्द से जल्द वापस अपनी नयी जगह जाना चाहीये.." आरीफनेही मंदारच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
"निकलना तो हमें है ही आरीफ भाय.. वो भी जल्द से जल्द.. पर अब किसी और जगह जाना होगा हमें.." मनू आवाजातून गुढता दर्शवीत म्हणाली.
"किसी और जगह..?" आरीफने पटकन प्रश्न केला.
"आता दुसरीकडे कुठे जायचं आहे..?" मंदारनेही आश्चर्य व्यक्त करत तोच प्रश्न विचारला.
"चला.. बसा मागे.." मनू बाईकला किक् मारत एवढेच म्हणाली आणि तिने बाईक स्टार्ट केली.
आरीफ मंदारकडे पाहत मनूच्या मागे बसला. मंदारही त्याच्यापाठी विराजला आणि सायलेन्सरचा फट्फट् आवाज करत बाईक सुसाट निघाली.
मुख्य रस्त्यावरून बाईक भरधाव हाकताना मनूची नजर मध्येच मिररमधल्या मंदारच्या चेहर्यावर जात होती. मंदारचे मात्र विशेष तिकडे ध्यान नव्हते. त्याच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत असल्यासारखे चालू होते. आणि मनू तेच टिपण्याचा प्रयत्न करत होती. मध्ये बसलेला आरीफ मात्र बाईकच्या स्पीडबरोबर समोरून उलट्या बाजूने बोचणार्या वार्याशी जपून वागत होता. कानात सूऽऽ... सूऽऽ... करत लागणारा तो वारा देखिल त्याला अस्वस्थ करत होता. कुणाचं काय.. तर कुणाचं काय... आरीफचं नशिब चांगलं की तो मध्ये बसला होता. पण एक नक्की त्या तिघांच्याही डोक्यात सद्यपरिस्थितीत भिन्न भिन्न विचारचक्र दौडत होती.
मनूला अचानक काय गवलसलेय, ती आपल्याला नेमके कुठे घेऊन जात आहे या प्रश्नात आरीफ अडकला होता. तर मंदार त्याच्याही पुढे जाऊन निर्माण होणार्या शक्यतांवर रीअॅक्ट कसं करायचं याचा अंदाज बांधत होता. मनू काहीशी निश्चल होती, कदाचित तिने मनात बांधलेले ठोकताळे तंतोतत जुळणार होते.
************
मेहजबीनला मारल्यानंतर मदन तिथून तडक निघाला. खरेतर त्याचा मनूच्या घरी येण्याचा उद्देश निराळाच होता. पण मेहजबीनच्या तिथे असण्याने तसेच डिग्रीचा खुन झालेला तिने पाहीलेला असल्याने तिला संपवून टाकणे त्याला त्यावेळी सोईचे वाटले.
मनूशी जवळीक साधण्यासाठी आता मदनच्या रस्त्यात कुणीही आडवे येणारे राहीले नव्हते, एक व्यक्ती सोडून. हो... मदनने त्या रात्री मनू आणि विक्रमला सोबत जाताना पाहीले होते. विक्रम मनूच्या प्रेमात पडला असणार यात शंकाच नव्हती. विक्रमला मारल्यावर मनू आपल्या हातातून जाण्याचा धोका तर टळेलच शिवाय विक्रमचे धंदे, पैसा यांकडे जाणारा मंदारचा रस्ता साफ होईल. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मदनचा डाव चालला होता.
मदनच्या डोळ्यासमोर विक्रमचा चेहरा आठवताच मदन रागाने लाल होऊ लागला. मनू त्याच्या कारमध्ये बसतानाचा प्रसंगही लगोलग डोळ्यांसमोर तरळल्याने नकळत तो दातओठ खाऊ लागला. मदनचा त्यावेळचा चेहरा पाहून कुणीही त्याला सायको म्हणूनच ओळखू शकले असते.
विक्रमला संपवायचे बास्स्.... बाकी काही माहीत नाही. पण साला तावडीत येईल तरी कसा.. त्याचा ठिकाणा तर इरफान भाय शिवाय कुणाला माहीत नसनार. आणि इरफान भायला आपला गेम कळल्यावर तो मला सोडणार नाही. न्हाय.. न्हाय.. न्हाय.. मदन्या.. ह्याच्या मधली वाट शोधावीच लागेल. कसं..
मदनच्या आत दडलेला विकृत सैतान पुन्हा जागा होऊ पाहत होता. डोळे गरगर फिरवत त्यानं आपला उजवा हात कपाळावरून घासत खाली दाढीपर्यंत आणला आणि दाढी खाजवू लागला. अचानक त्यानं हालचाल थांबवली आणि त्या विकृत चेहर्यावर छद्मी हास्य पसरलं. होय.. त्याला मधली वाट गवसली होती. चटकन् पॅन्टच्या खिश्यातून मोबाईल बाहेर काढत त्याने इरफान भायला फोन लावला. एक रींग वाजेपर्यंतचा अवकाशही त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. तिकडून इरफान भाईने फोन उचलला.
"हॅलो... भाय.." मदन उताविळ होऊन बोलू लागला पण भायने त्याला मध्येच टोकले.
"रूक्.. है किधर तू... डिग्री और तू साथ में थे, तो उसको किसने मारा..?" भायने विचारले.
"भाय.. उस शाम डिग्री का खुन होते हुये मैंने देखा था.. इसिलिये दो दिन से मैं उस खुनी की खबरें निकालने में लगा हुं..." मदनने अतिशय साळसूदपणे इरफान भायची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
"तू फोन कर के बता नहीं सकता था क्या ये..? और खुद का फोन भी बंद है.." भाय ओरडला.
"भाय फोन बंद पडा था.. जैसे चालू हुआ मैंने आपको फोन किया है.. सुनो भाय.. विक्रम की जान को खतरा है.. उसके घर पे ही उसपे हमला होनेवाला है.." मदनने इरफान भायवर जाळे टाकायला सुरूवात केली होती.
"क्याऽऽ.. तुझे कैसे पता.. और विक्रम को तू कबसे जानने लगा.." भायने आश्चर्य व्यक्त करत विचारले.
"भाय वो सब बताने का टाईम नहीं है.. फिलहाल आप ये समझ लो के खुनी की अगली चाल मैं जान चुका हुं.. और अब विक्रम की बारी हैं.." मदनने शक्य तसं भायला गुंडाळण्याचा प्रयत्न केला.
"ये कैसे हो सकता... एक्.. एक.. मिनिटं.. मदन.. तू पता समझ ले और मुझे वही पे जल्द से जल्द मिल.." असं म्हणत बावचळलेल्या भायने मदनला विक्रमच्या फ्लॅटचा पत्ता सांगितला.
विक्रम शक्यतो गुमनाम राहत असल्याने त्याचा पत्ता फारसा कोणाला माहीत नव्हता. फक्त या केस मध्ये गुंतलेला मुख्य व्यक्ती म्हणजे भाय आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मनू ज्यांना विक्रमने आपला फ्लॅट दाखवला होता. बाकी विक्रमच्या खास माणसांनाच तेवढी तिकडची माहीती होती. शिवाय विक्रमने अगदी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कुणी बॉडीगार्ड ठेवला नव्हता. त्याला पहील्यासारखी चुक करून पुन्हा दुसरा मंदार जन्माला घालायचाच नव्हता.
मदनने विक्रमचा पत्ता जसा भायने सांगितला तशी घोकंपट्टी करत आपली पाऊले तिकडे वळवली सुद्धा.. तिकडून इरफान भायही चंदूला घेऊन विक्रमच्या घरी जाण्यास निघण्याची तयारी करू लागला. इरफान भायने बाहेर पडून आपली गाडी स्टार्ट केली. त्याने फर्स्ट गिअर टाकून क्लच सोडला आणि गाडी काहीशीच जागेवरून हलली पण पुढच्याच क्षणाला त्याला कच्चकरून ब्रेक मारावा लागला. समोरून आलेल्या पोलिसांच्या गाडीकडे अचंबित होत पाहत इरफान भायने चंदूकडे पाहीले. चंदू ही पोलिसांना पाहून तितकाच संभ्रमावस्थेतच होता.
आता काय.. या विचारात असतानाच समोरून एक इन्सपेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल खाली उतरले. इरफान भायही खाली उतरला. चौकशीचे कारण देत पोलिसांनी इरफान भाय आणि चंदूला थांबण्यास सांगितले. नाईलाज होता.. हताशतेने इरफान भाय त्यांना घेऊन पुन्हा घरात आला. मदनने जबरदस्त खेळी करत इरफान भाय कडून विक्रमचा पत्ता ही मिळवला आणि भाय तिकडे पोहोचणार नाही याचीही तजवीज करून ठेवली होती.
काही वेळातच मदन विक्रमच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर होता. एकवार आसपासच्या सर्व कोपर्यात नजर फिरवत त्याने काम झाल्यावर तिथून गपगुमान बाहेर पडण्याचा मार्ग पडताळला. हुश्श.. आता त्याने सावध पवित्रा घेत सुरा बाहेर काढला आणि बाहेर दरवाज्यापासून काहीस अंतर ठेवून बेल वाजवली.
आतून विक्रमने प्रतिक्रिया द्यायला काहीसा वेळ घेतला म्हणून मदनने पुन्हा बेल वाजवली.
यावेळी आतून दरवाज्याजवळ काहीशी हालचाल जाणवली. मदनला माहीत होते, विक्रम बाहेर कोण आहे याची चाचपणी केल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही. म्हणूनच त्याने चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत हातातला सुरा पाठीमागे लपवला.
आतमधून विक्रमने बाहेर मदनला पाहीले. मदन इरफान भाईचा माणूस असल्याचे त्याला माहीत होते. पण हा माझ्या घरापर्यंत कसा पोहचू शकतो याच गोष्टीचे त्याला नवल वाटत होते. कदाचित त्याला इरफान भायने काही महत्वपूर्ण कामासाठी पाठवले असावे, पण डोअर उघडल्याशिवाय ते जाणणे शक्य नव्हते. म्हणूनच नाईलाजाने विक्रमने आतला दरवाजा उघडला, सेफ्टी डोअर अजूनही आतून बंदच होता.
"काय्.. रे... काय काम आहे...?" विक्रमने त्रासिक भावात विचारले.
"विक्रम भाय.... इरफान भायने पाठवलेय... खुनी कोन आहे, हे त्यांना माहीत पडलेय.. आणि तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांनी मला इथे पाठवलेय.." मदन गडबडीत असल्यासारखे धडाधड बोलून मोकळा झाला.
"व्हॉट्... म्.. माझ्या जीवाला धोका.. कोण आहे खुनी... मंदारच असणार... (बोलत बोलत विक्रम सेफ्टी डोअर उघडत मागे फिरला.. आणि एकक्षण विचार करत) ...पण ही बातमी इरफान भाय मला फोनवर देखिल सांगू शकला असता.."
विक्रम पुन्हा मदनकडे वळण्यासाठी फिरला पण तोपर्यंत भस्सकन त्याच्या पोटात सुरा घुसला होता. मदनच्या चेहर्यावर पुन्हा विकृतीची छाया पसरली होती, त्याचे डोळे लालसर झाले होते. विक्रम पोटाजवळ होणारी वेदना सहन करत अजून शांतच होता. एक छोटीशी हालचाल आणि त्यापुढे होणारा वेदनादायक त्रास त्याला अनुभवायचा नव्हता. पण मदनला ते पाहवलं नाही. त्याने विक्रमच्या पोटात घुसवलेला सुरा निर्दयीपणे बाहेर काढत पुन्हा घुसवला. एक्.... दोन्.... तीन्... चार्..... पाच्... सपासप विक्रमच्या पोटात वार झाले आणि भडाभड रक्त बाहेर येऊ लागले. विक्रम हतबल होऊन ते वार झेलत होता. त्याच्या अंगात त्राणच उरले नव्हते ना प्रतिकार करण्याचे ना ओरडण्याचे..
त्या रक्ताचे काही शिंतोडे मदनच्या शर्टावरही उडाले. त्याची पर्वा न करता मदन दरवाज्याजवळ जाऊन उभा राहीला. तिथून तो बाहेरील आणि आतील दोन्ही ठिकाणी वॉच ठेवू लागला. विक्रम काहीकाळ तडफडला आणि त्याने प्राण सोडला. मदनने एकदा त्याच्याकडे पाहत मान हलवली आणि तिथून बाहेरच्या दिशेने प्रस्थान केले. जाताना विक्रमच्या फ्लॅटचा दरवाजा आणि सेफ्टी डोअर बाहेरून बंद करायला तो विसरला नाही.
************
मनूची बाईक खडकपाड्यातल्या रस्त्याकडे वळत काही वेळातच विक्रम राहत असलेल्या बिल्डींगच्या पार्किंग मध्ये जाऊन थांबली. बाईक तिथं पार्क करत मनू समोरच्या लिफ्टकडे वळाली, मागोमाग आरीफ आणि मंदारही आले. थोड्याच वेळात ते तिघे विक्रमच्या फ्लॅटच्या बाहेर होते. तिथे त्याचा दरवाजा बाहेरून बंद होता. मनूने इकडेतिकडे पाहत तो उघडला.
आतले दृश्य पाहण्यासारखे नव्हतेच.. तिने जितक्या तत्परतेने तो दरवाजा उघडला होता तितक्याच वेगात तो बाहेरून घट्ट बंद करून घेतला. एक अवकाश ती दरवाज्याची कडी तशीच हातात घट्ट धरून उभी राहीली आणि तीने आपले डोळे बंद करून घेतले. तिच्या मागे असलेले मंदार आणि आरीफ 'ती नक्की काय करतेय' याचाच अंदाज घेत होते. तिथं त्या क्षणाला काहीसा सन्नाटा पसरला होता.
आतमधला प्रसंग ओळखून फुशारकी मारण्यासाठी आणि न राहवून ती शांतता भंग करण्याच्या उद्देशाने का होईना मंदार बोलता झाला.
"काय मनू.. इथे येण्याचे कारण तु आम्हांला अगोदरही सांगू शकली असतीस.. पण तु तसे केले नाहीस.. कदाचित तुला वाटले असावे.. खुनी आमच्यापैकी कुणी असू शकतो.. हो.. ना...?.. बॅडलक... तो तुझ्यापेक्षा फास्टर आणि स्मार्ट निघाला..." मंदारने मनूला टोमणा मारला.
मनूला खरंतर तो टोमणा जिव्हारी लागला होता. पण तिनं शांत राहणं पसंत केलं. ज्याअर्थी मंदार बोलून पुढचं मोकळा झाला याच अर्थ आतमध्ये काय झालेय याचा त्याला अंदाज आला असणार. मनू अजूनही डोळे मिटून दरवाज्याकडे तोंड करून आरीफ आणि मंदारला पाठमोरी होती. आज पहील्यांदाच ती त्या खुनी व्यक्तीच्या जवळ पोहचली होती. तो हातातून निसटला होता तरी एक बाब समाधानाची होती की आता मनू त्याच्या चाली ओळखु लागली होती. तिने जसा विचार केला अगदी तसेच घडले आणि यापुढे जर त्या खुनी व्यक्तीला पकडायचे असेल तर त्याच्या चाली बदलने अत्यावश्यक होते.
माणूस जेव्हा प्लॅनप्रमाणे चाली खेळतो तेव्हा तो समोरील बाबी मनात गृहीत ठेवूनच प्लॅन करतो. पण जर का त्या बाबींमध्ये अल्पसा जरी बदल झाला तर माणसाला पूर्ण प्लॅन बदलावा लागतो.
मनूने मनोमन विचार पक्का केला. आणि मागे वळून तीने मंदारकडे पाहीले. मंदारला तिच्याकडून रोष अपेक्षित होता. पण तीच्या नजरेत त्याला त्याच्याविषयी प्रेम दिसू लागले होते. अगदी तसेच जसे त्या दिवशी दोघे घरात एकटेच असताना दिसत होते. त्या दिवशी त्या वेळेस मंदारच्या वडीलांचा फोन आला आणि पुढे काहीच घडू शकले नाही. मंदार तिच्या डोळ्यांत स्वतःचा चेहरा अभिमानाने पाहत होता. आरीफने मात्र त्या दोघांकडे पाहुन दुसरीकडे वळवली.
"मंदार.. तु भेटल्याच्या दिवसापासूनच मला तुझ्यामध्ये एक वेगळाच स्पार्क जाणवला होता. काय.. माहीत नाही पण तु सोबत असताना मला माझ्या सुरक्षिततेची चिंताच वाटत नाही.. मला माफ कर.. खरंतर इथं येण्यासंबंधी मला तुला सांगायला हवं होतं. किंवा तशी पूर्वकल्पना द्यायला हवी होती.." मनू अतिशय शांत आणि प्रेमळ आवाजात बोलत होती.
मंदारच काय आरीफही तिचं असं रूप पहील्यांदाच अनुभवत होता.
"जे झालं ते विसरून जा.. आता पुढे काय करायचं ते ठरवू.." मंदार स्वतःशीच खुश होत म्हणाला.
"पुढे काय... मी विचार केलाय.. बस्स्.. झालं आता हे.. सगळं शोधणं.. बास्स्.. एकदम्.. आता आपण लग्न करायचं.." मनूने मंदारचा हात हातात घेत बोलत त्याच्या खांद्यावर आपले डोकं ठेवलं..
खल्लास्सस्.. मंदार अक्षरशः आतून पाघळला.. मनू आपल्या इतक्या जवळ येऊन लग्नाचा विषय काढते याहुन दुसरा आनंद तो काय..
"म.. मनू.. आर्.. यु.. शुअर्..." मंदारने कसंबसं विचारले.
"ऑफकोर्स.. आय्.. ॲम्.. यु.. डम्बो..." मनू प्रेमाने त्याच्या गळ्यात पडली.
मंदार त्या घडीला उल्हासित होऊन तो प्रेमळ क्षण उपभोगू लागला. तेव्हा त्याने बाकी सार्या बाबींना फाट्यावर मारत मनूला मिठी मारली. खुन.. डिटेक्टीव्हगिरी.. विक्रम.. सारंसारं.. सगळ्या गोष्टींचा त्याला विसर पडला.
वरच्या मजल्याच्या पायर्यांवर दबा धरून बसलेला मदन हे सर्व ऐकत होता. तो दिसत नसला तरी त्याची सावली समोरच्या भिंतीवर स्पष्ट पडत होती.
त्या भिंतीला सामोरी असल्याने मनूला ती सावली केव्हाचीच दिसली होती. म्हणूनच तर तिने पुढचा तर्क लावत मंदारला जाळ्यात ओढले होते.
"तुम लोग यहीं पर प्रेमलीला शुरू करलो.. मैं अंदर जाकर बैठता हुं.." आरीफने वैतागत म्हटले आणि तो विक्रमच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून आत जाऊ लागला. आत शिरल्यावर तिथं विक्रमचा मृतदेह पाहून तो घाबरून मागं फिरणारच होता की मनू आणि मंदारही आत आले. ते आत येताच आरीफला जरा हायसं वाटलं.
"आरीफ.. तुम यहीं ठहरो.. हम जरा अंदर जाकर कुछ सबूत मिलता है तो ढुंड लेते है.." मनूने मंदारला आत बेडरूमच्या दिशेने खुणवत बाहेर आवाज ऐकायला जाईल इतक्या मोठ्याने आरीफला सांगितले.
"हा.. मै सब समझता हुं.. तुम लोग सबुत के बहाने क्या करने जा रहे हो.. मैं भी टॉयलेट में थोडा हलका होने जाता हुं..." आरीफने तितक्याच मोठ्याने ओरडत मनूला सांगितले. खरंतर आता त्याला मनूचा राग आला होता. पण तो डायरेक्टली तिच्यावर काढू शकत नव्हता.
मंदार पुढे होऊन बेडरूमच्या दिशेने जायला निघाला. आरीफ तितक्यात दरवाजा बंद करण्यासाठी त्या दिशेने वळाला पण मनूने मंदारच्या नकळत बोटांनीच आरीफला इशारा करत थांबवले. आरीफ चक्रावला आणि थांबला. मनूने आपला अंगठा आणि तर्जनी वापरत आरीफला पुढची खुण म्हणून हवेत काही नंबर काढून दाखवले. आरीफला चटकन् ते नंबर उमगले.. त्याने स्वतःचा अंगठा उंचावून तिला प्रतिक्रिया दिली. आरीफ आता समजून चुकला की मनू मघापासून नाटक करत होती. दरवाजा उघडाच ठेवत मनू बेडरूमच्या दिशेने आणि आरीफ टॉयलेटकडे वळाले.
बेडरूममध्ये प्रवेश करताना मनूला मंदारच्या मनातील उतावीळपणाचा अंदाज येत होता. मनू सारखं डॅशिंग कॅरेक्टर असं बाईल नखर्यात त्याच्यासमोर येणं म्हणजे एकप्रकारचा चमत्कारच होता. आणि त्याचाच मनसोक्त आनंद लुटण्यासाठी मंदार तयार झाला होता.
तो मनोमन विचार करू लागला.. 'खरंच एखादी कडक स्वभावाची बाई जेव्हा बेडवरच्या त्या क्षणांत मधाळ बनते तेव्हा तिच्या सहवासातील व्यक्तीलाही त्याचं अप्रूप वाटतंच. आणि मग त्या प्रणयाचा आनंदही द्विगुणीत होऊन जातो. मिळमिळीत आणि सौम्यभावाच्या स्त्रीया तितकंस सौख्य देऊ शकत नाहीत.'
मंदार आपल्याच विचारांत मनूला वरूनखाली न्याहाळू लागला. आणि ती लाजेनं त्याच्या समोरून हटत मागे येऊन उभी राहीली. तिचा हात हातात घेत मंदार पुढची क्रिया करावयास जाणार इतक्यात त्याला मागे बेडरूमच्या दरवाज्यात कुणाचीतरी चाहूल लागली. मागे वळून पाहावे तोच...
"गद्दार... हरामखोर.. शेवटी पलटलास ना..." बेडरूमच्या दरवाज्यात चवताळलेला मदन होता.
त्याला पाहताच मंदारची भंबेरी उडाली पण मनूने मागे सरकत सावध पवित्रा घेतला.
मंदारने एकवार मनूकडे पाहीले.. आणि मदनकडे पाहत बोलू लागला..
"तू... तू इथं कसा.." मंदार.
"मी इथून गेलोच नव्हतो.. भिक्कार**..." मदन शिव्या मंदारला घालत मनूकडे पाहू लागला. "या.. या.. हरामीसोबत तू झोपायला तयार झालीस्... अग् यानंच तर मौसमला..."
मदन आपलं वाक्य पूर्ण करेपर्यंत मंदार त्याच्यावर तुटून पडला. दोघांमध्ये तुंबळ मारामारी सुरू झाली. पण पाचएक मिनिटांतच मंदार मदनवर भारी पडू लागला. पुढच्या क्षणी खाली पडलेल्या मदनवर मंदार वरून लाथांचा प्रहार करत होता. मदनने मार खात खात आपला उजवा हात सफाईने पॅन्टच्या खिश्यापर्यंत पोहचवला होता. शेवटचा घाव म्हणून मंदार त्याला जीव खाऊन लाथ मारायच्या प्रयत्नात असतानाच सप्प्.. करून मदनने त्याच्या पोटावर धावता वार केला.
वार फारसा खोलवर गेला नव्हता पण मंदारला एक पाऊल मागे जाण्यास मदनने प्रवृत्त केले होते. तसाच मंदारच्या पोटात लाथ घालून मदनने उठण्याचा प्रयत्न केला. पोटाजवळून येणार्या रक्ताने पिसाळलेला मंदार पुन्हा मदनवर हल्ला करण्यासाठी सरसावला पण यावेळी मदन सावध होता. त्याने मंदारचा ठोसा चुकवत खाली वाकत मंदारच्या पायावर त्याच सुर्याने वार केला. मंदार सावरेपर्यंत पुन्हा मदनने त्याच्या डाव्या हातावर सुरा फिरवला.
मदनचा उद्देश एकच होता.. त्याला मंदारच्या शरीरावर जिथे भेटेल तिथे वार करून त्याला जखमी करायचे होते. कारण मंदारच्या ताकदीपुढे फारकाळ आपण तग धरून राहू शकत नाही हे मदनला चांगलेच माहीत होते. सरतेशेवटी मदनने केलेले लहानसहान पाचसहा वार मंदारला गुडघ्यावर बसवण्यास यशस्वी ठरले. आता सुत्र मदनच्या हातात होती, आणि पुढचा वार मंदारच्या मानेवरच होणार होता पण तितक्यात मनूने मदनवर झेप घेतली.
इतकावेळ मनूने दूर राहणेच पसंद केले होते. पण आता एका क्षणाचा विलंब झाला असता तर आणखी एक खुन तिथे झाला असता. म्हणूनच न राहवून ती मध्ये पडली. आरीफदेखिल मघापासून सगळा प्रकार बेडरूमच्या दरवाज्यात उभा राहून पाहत होता. पण आत जाण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती.
त्या अनपेक्षित हल्ल्याने मदन हडबडला आणि भेलकांडत जाऊन बाजूला पडला. त्या गडबडीत त्याचा सुराही त्याच्यापासून दूर होऊन मंदारच्या पुढ्यात पडला. मनूने मोर्चा सांभाळत मदनला मारण्यास सुरूवात केली. मदनला वर उठण्याची संधीही ती देत नव्हती. तिकडून मंदारनेही कसंबसं सावरत उठून समोर पडलेला सुरा उचलला. जखमी अवस्थेत त्यानं अंगातली सारी ताकद पणाला लावली आणि तो मदनला मारण्यासाठी धावला. मंदारने मदनवर वार करायला सुरा हवेत उचललाच होता पण मनूने त्वेषात उठत मंदारच्या पोटावर मुसंडी मारली.
आता खरंतर मंदारला हा धक्का पचवणं अवघड झालं होतं. मनू मंदारवरही तुटून पडली आणि जमेल तितक्या ताकदीनं तीने त्याला खाली पाडून वरून बुक्क्यांचा मार देऊ लागली. मंदार अगोदरच जबर जखमी होता त्यामुळे तो फारसा प्रतिकार करू शकत नव्हता. पण तो हार मानायला तयार नव्हता. मनूवर त्याने हात उचण्याचे प्रयत्न करून पाहीले, पण त्याच्या हालचालीत आता वेग नव्हता. आणि त्याचाच फायदा घेत मनू मंदारचा प्रत्येक वार चुकवत त्याला त्या बदल्यात ठोसा लगावत होती.
चांगले दहाबारा मजबूत प्रहार मंदारच्या तोंडावर झाल्यावर मंदार हळूहळू प्रतिसाद देण्याचा थांबला. पण तोपर्यंत तिकडे मदन उठला होता आणि तो मनूच्या अंगावर धावून जायला सज्ज झाला होता. मदनने आसपास पाहीले.. जवळच त्याचा सुरा पडला होता. त्याने वेळ न दवडता सुरा उचलला आणि मनूच्या पाठीत भोकसणारच होता की आरीफने दरवाज्यातून जोरात ओरडत मनूला साद घातली.
मदनच्या हातातला सुरा वर हवेत उंचावून पुन्हा खाली येणारच होता की आरीफच्या इशार्याने सावध झालेली मनू चपळाईने बाजूला झाली. पण वार तर झालाच.. मदनच्या हातातला सुरा वेगाने मंदारच्या छातीत घुसला.. आणि त्याच वेगात मदनने तो सुरा पुन्हा बाहेर काढला. त्याचसरशी मंदारच्या रक्ताचे शिंतोडे बाजूला पडलेल्या मनूच्या चेहर्यावर उडाले.
मदनचा चेहरा पुन्हा सायको किलर सारखाच भासत होता. तो रक्ताने माखलेला सुरा तसाच आपल्या दाढीवरून एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे फिरवत मदन डोळे मोठे करून मनूकडे पाहत बोलू लागला.
"तुला मारण्याची मनापासून इच्छा नाही.. पण तु आज जो उत्पाद माजवलायस.. त्यावरून एक निश्चित आहे.. तू कधीच माझी होऊ शकत नाहीस.. हा.. पण मरतानाही मी तुझं रक्त या भड*च्या रक्तात मिसळू देणार नाही.. तुझी कुठलीच गोष्ट माझ्याशिवाय कुणालाच मिळणार नाही... कुणालाच नाही..."
इतक्या जवळून प्रत्यक्ष खुन होताना पाहणं, हा मनूला अकस्मात् जाणवलेला धक्का होता. आणि त्यात मदनचं विकृतासारखं बोलणं आणि त्याचा तो किळसवाणा चेहरा यांमुळे तिची अवस्था आता काहीशी भेदरल्यासारखी झाली होती. पण तरीही मनातल्या कुठल्यातरी एका कोपर्यातून तिला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजण्यासाठी आवाज ऐकू आला.
मदनने तिला मारण्यासाठी पुन्हा सुरा हवेत नेऊ लागला. खाली पडलेल्या मनूला बचावाचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. तिने हात फिरवत बेडखाली चापचून पाहीले. तिथे काहीच हाती लागले नाही, पुन्हा काही भेटतंय का या उद्देशाने शक्य तितकं हात लांबवत तिने अंदाज घेतला. आणि तिला लाकडाचे काहीतरी सापडलेच. मदनचा उंचावलेला हात खाली येतच होता की आरीफने बाहेरून धावत येत टी-पॉयची ग्लास् त्याच्या डोक्यात घातली.
छळ्..ळं..छळ्..ळं करत त्या काचेचे तुकडे विखुरण्याच्या आतच मनूच्या हातातल्या लाकडी फळकुटण्याने मदनच्या चेहर्याच्या डाव्या बाजूचा वेध घेतला. क्षणाचीही उसंत न घेता एकामागोमाग एक दणके भेटताच मदन हत्यारं गाळल्याप्रमाणं गलितगात्र झाला. तो आरीफच्या पहील्याच घावात गार झाला होता.. त्यात मनूने घातलेला दुसरा घाव तो सहन करूच शकला नाही.
त्याच क्षणाला पोलिसही तिथं हजर झाले. मनूने बेडरूममध्ये येण्याच्या आधीच आरीफला इशारा करून पोलिसांना तिथं बोलावण्यास सांगितले होते. मनू झटक्यात तिथून उठून बेडवर शांत बसली. कॉन्स्टेबल शेलार पुढे येऊन मदनला घट्ट पकडून उभं करू लागले. मदन त्यांचा आधार घेत धडपडत उभा राहीला. मनूने मंदारकडे पाहीले. अजूनही तो जिवंत होता. मनूने त्याला लगबगीने उठवून बेडला टेकवत बसवले. मंदारने छातीवर हात ठेवत मोठ्या कष्टाने मनूकडे पाहत विचारले..
"तुला कसे माहीत झाले.."
"सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील.. कसं हायं.. आपल्याकडं बराच टाईम आहे.. म्हंजी तू जिवंत हाईस तोपर्यंत.." कॉन्स्टेबल शेलार मंदारला म्हणाले. पुढे त्यांनी पुष्टी जोडत इन्स्पेक्टरकडे पाहीले आणि बोलू लागले..
"सायब, मी सांगतो ह्यास्नी हीथंच तडफडू दे.. सगळं प्रकरण हीथंच जाणून घेऊ.. चार खुन केल्याती.. ह्या हरामजाद्यांनी.. कश्याला फुका आता स्टेशनाच्या आणि कोर्टाच्या पायर्या झिजवा.. ते बी ह्यांच्यापायी.."
"आयडीया अगदी उत्तम आहे.. चला मग करा सुरूवात दोघांनी.. मौसमच्या खुनापासून.." इन्सपेक्टरनेही तुटक आवाजात कॉन्स्टेबल शेलारच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तसेच त्यांनी दुसर्या हवालदाराला रेकॉर्डर सुरू करण्याचा इशारा दिला.
मौसमचे नाव ऐकताच मनूच्या डोळ्यात पाणी तरळले. मंदार आणि मदनची नजरानजर झाली. मनू आपल्याला मिळणार नाही हे नक्की झाल्यावर मदनने बचावाचा प्रयत्नही केला नाही तो भडाभडा बोलू लागला.
"भायकडून आम्हांला विक्रमच्या प्लॅनबद्दल कळाले होते. खरंतर विक्रमने जोर देत किन्नरच पाहीजे असं सांगितलं होतं. किन्नर म्हटलं की माझ्यापुढं फक्त मौसमच यायची. कारणच तसं होतं.. मला मनूशी लग्न करायचं होतं पण मौसम सदानकदा आडवी यायची. विक्रमच्या प्लॅनमध्ये कुणाचा खुन न करण्याची ताकीद होती. पण मी विचार केला जर का प्लॅन थोडासा वाकवला किंवा एखादी चाल एक्स्ट्रा खेळली तर एका दगडात दोन पक्षी मरतील.. मौसम मंदारला भेटण्याअगोदरच मी मंदारला गाठलं. आणि मौसमला अर्धमेलं करण्यासाठी पैसे देऊ केले..."
"तेव्हा हा हरामखोर मला म्हणाला की पन्नास हजार रूपये मिळतील, ते ही फक्त तिला फटकवायचे.. मला काय मग.. तशीहीती मला फसवणार्यांसोबत मिळाली होती.. मी त्या रात्री तिला जमेल तसं उपभोगलं आणि ती दमल्यावर तोंड दाबून दोन-चार तडाख्यांत तीचा प्रतिकार मोडून काढला. पण नंतर यानं रूममध्ये येऊन तीचा खुन केला. हा.. म्हणजे आमच्यात थोडीफार झटापट झाली पण ती फक्त याच्या मित्रांना दाखवण्यापुरती होती.." मंदार म्हणाला.
"तिचा खुन मला माझ्याच हाताने करायचा होता.. अगोदर मी बरेचसे हाल्फ मर्डर केले होते.. पण खुन करण्याची ती माझी पहीलीच वेळ होती. म्हणूनच मी मंदारला तिच्याच पैश्यांचं आमिष दिलं. आणि तिला मरणाच्या उंबरठ्यावर आणून सोडायला सांगितलं. मंदारने आपलं काम चोख केलं. आम्ही तिथं गेलो तेव्हा मौसम निपचित पडून राहिली होती. मग सुरू झालेल्या गडबडगोंधळाचा फायदा उचलत मी मौसमच्या पाठीत चाकू मारला. मनू आणि माझ्यामध्ये येणारा काटा मी मंदारच्या मदतीने कायमचा दूर केला..."
"मग मंदार तिथून पळून का गेला.. खुन त्यानं केला नव्हता तर..." इन्सपेक्टरने विचारले.
"त्याला मी पैसे उचलून पळायला अगोदरच सांगितले होते.. त्याला मी पहीलेच म्हटलेले की तुला नाही त्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन आहे.. तू इथून नीघ बाकीचं मी सांभाळून घेतो.. पण हा चू**.. डिटेक्टीव्ह बनायला गेला.. याच्यामागं कोण आहे ते शोधायचा प्रयत्न करू लागला.." मदन रागाने मंदारकडे पाहत म्हणाला.
"माझ्यावर मौसमच्या खुनाचा आळ आल्याचं मला काहीच टेन्शन नव्हते, मला फक्त हे सर्व कोण घडवून आणतेय याचाच छडा लावायचा होता.." छातीतल्या कळा सोसत मंदार कसाबसा बोलला.
"हा.. लावलास ना छडा मग्.. साला नाही त्या पंचायती करत मग एकेकाला गोष्टी कळत गेल्या.. आणि आज आपण असे आहोत.." मदन जवळजवळ ओरडलाच.
"अय्.. गपय्.. पुढं सांग.. नसीरचा खुन.." कॉन्स्टेबल शेलार मदनवर डाफरले.
"नसीरने ओळखले होते.. सुरा फेकून मारण्यात मी तरबेज होतो.. बाकी कुणाच्या ध्यानी ही बाब लवकर आली नाही पण नसीरने मला त्याबद्दल विचारले. माझा नाईलाज होता.. मी त्याला मारू शकलो असतो.. पण डिग्री सारखा माझ्यासोबतच असायचा.. म्हणून मी पुन्हा मंदारची मदत घेतली.." मदन शांत होत म्हणाला.
"आरीफला जेव्हा लैला बारची इन्फॉर्मेशन मिळाली आणि आम्ही तिकडे गेलो. त्..तेव्हा रस्त्यात असतानाच मदनचा मला मॅसेज आला होता. नसीरच्या खुनाच्या बदल्यात तो मला आणखी प..न्ना...स हजार देत होता.. मला तसंही या सगळ्यांना धडा शिकवायचाच होता.. म्हणून मी लगेच तयार झालो... अह्..हह.. नसीरचा खुन मी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले... ॲह्..ह.. लैला बारमधल्या टॉयलेटमध्ये पडलेले दोन हातभर लांबीचे पाईप त्याची हाडं मोडायला कामी आले.." मंदार खोकत खोकत म्हणाला. त्याचे डोळे हळूहळू जड होऊ लागले होते, पण कमालीच्या झुंजारू वृत्तीमूळे मंदार अजूनही तग धरून होता.
"फिर डिग्री को क्युं मारा.." आरीफने कुतुहल दाखवत विचारले.
"मौसमला मारल्यावर खुन करण्यातली मजा मी अनुभवली होती. एखाद्याचा जीव घेताना लागणारे कष्ट आणि जीव घेतल्यानंतर मिळणारं सुख.. आस्सस... वेगळंच थ्रील असतं ते.. हाहा.. नसीरच्या खुनाबद्दल डिग्री माझ्यावर संशय असल्याचं इरफान भायला सांगणार होता. म्हणून त्याला सोडणं पण मला परवडणार नव्हतं.. मंदारलाही पोलिस घेऊन गेले होते. म्हणून मीच डिग्रीच्या मागं मागं गेलो आणि त्याचापण खेळ खल्लास केला.." विकृत मदन चेहर्यावर हास्य आणत म्हणाला.
त्याच्याकडे पाहून मनू, कॉन्स्टेबल शेलार आणि आरीफसहीत इन्स्पेक्टरलाही त्याची घृणा वाटू लागली. कॉन्स्टेबल शेलारने तर पुढे सरसावत फाट्कन् मदनच्या कानसुडात लगावून दिली. पण त्याचा मदनवर काही परीणाम झाला नाही.. तो हसत सुटला.. आणि हसत हसत पुढे बोलू लागला..
"आणि त्यात ती रां*... हाह्...हाहा... ती मनूच्या घरी भेटली.. च्या.. मायला... मी तर.. हाहहाहह्..... मी तर मनूला लग्नाची मागणी घालायला गेलो होतो.. तर ही बया.. तिथंच भेटली.. डिग्रीच्या खुनाचा पुरावा.. हाहाहा... दोन दिवस तिला शोधलं कुठंच नाही दिसली.. आन्.. नेमकं तिनं मनूच्या घरीच आयतं भेटावं.. केलं मग तिचं पण काम तमाम.." आपलं हसु दाबण्याचा प्रयत्न करत मदनने केलेल्या गुन्ह्यांची कबूली दिली.
"विक्रमने काय केले होते मग्.. तो तर तुमच्या गेममध्ये नव्हताच.. मग त्याचा जीव का घेतलास्..?" इन्स्पेक्टरने विचारले.
मदन त्याच्या प्रश्नाने शांत झाला.
पण मनू बोलू लागली. तिने अगोदरच लावलेला तर्क योग्यच होता.
"ती या दोघांमधली एक डील होती. मदनला मनू भेटावी म्हणून मंदार मदत करेल, तर मंदारला विक्रमशी बदला घेता यावा यासाठी मदन मदत करेल. दोघे या कडीने एकमेकांशी बांधले गेले. पण मंदार मनूच्या प्रेमात पडला आणि शेवटी दोघे एका मनूसाठी आपआपसांत झगडले.." मनूने स्पष्ट केले.
"पण फायदा काय झाला हरामखोर... विनाकारण तुम्ही दोघांनी खुन केलेत.. आणि आता मंदारही इथंच संपणार आहे.. मग बस एकटाच जेलमध्ये पुढचं आयुष्य कसं घालवायचं त्याचा प्लॅन करत.." कॉन्स्टेबल शेलार मदनला ओरडत मंदारकडे पाहू लागले.
पण मंदार... मंदारने केव्हाच डोळे मिटले होते.. कॉन्स्टेबल शेलारने मंदारला हलवण्याचा प्रयत्न करताच तो खाली आडवा झाला. मंदारच्या रूपाने मदनच्या खात्यात आणखी एका खुनाची भर पडली.
"तु सुरूवातीपासूनच ॲक्टींग सुरेख केलीस पण ऐन टाईमिंगवरती तू चूकलास... मदनचे नाव पुढे करण्याच्या प्रयत्नात तू त्याच्यासोबत स्वतःचा सहभागही नकळत माझ्यासमक्ष आणलास.." मनू मंदारच्या मृत शरीराकडे पाहत पुटपुटली.
"साला.. विक्रम तर गेलाच पण मनूच्या प्रेमात पडून त्याची जागा घ्यायला तू जिवंत राहीला नाहीस्.. गद्दार.." मदन आपला राग व्यक्त करू लागला.
"शेलार उचलून जीपमध्ये घाला याला.." इन्स्पेक्टरने आदेश दिला तसं तयारीतच असलेला कॉन्स्टेबल शेलार मदनला बकोटीला घेत नेऊ लागला.
"तुम्हालासुद्धा जबानीसाठी पोलिस स्टेशनला यावं लागेल.." इन्स्पेक्टर मनू आणि आरीफकडे पाहत म्हणाला.
"हा.. हा.. क्यू नहीं..?" आरीफने सहमती दर्शवली.
खाली जाताना आरीफ आणि मनू आपल्याच विचारांत हळूहळू चालत होते.
"मनू.. तुमने पहले से मंदार को पहचान लिया था..?" आरीफने उत्सुकतेने विचारले.
"शुरूवात से नहीं.. पर हा नसीर का खुन हुआ उस वक्त मेरा शक उसपें ही जाकर रूका.. फिर डिग्री का खुन हुआ तो मैं समझ गई के खुनी एक नहीं दो है.. और जैसे के विक्रम और मंदार की दुश्मनी मेरे सामने आई थी.. मुझे इस बात का भी एहसास हो गया था के विक्रम की जान को खतरा है.." मनूने आत्मविश्वासाने सांगितले.
"फिर तुमने विक्रम को बताने की कोशिश क्यूं नहीं की.." आरीफने पुन्हा प्रश्न केला.
"मैं चाहती थी के वो तीनों आपस में लडकर मरें.. और जो आखिर में बचेगा उसे मैं खत्म करूंगी.." मनूचा आवाज बोलता बोलता कठोर होऊ लागला.
"पर.. मदन तो जिंदा है..." आरीफ.
"हम्म्... अभी जिंदा है.. क्या पता अगले पल क्या होगा.." मनूने आरीफचं लक्ष सोसायटीतून बाहेर पडून रस्त्यावर पोलिसांसोबत असलेल्या मदनवर वेधलं.
कॉन्स्टेबल शेलार रस्त्यावरच डाव्या बाजूला मदनला बेड्या चढवून मागे फिरले. मदनला क्षणभर काय चाललेय कळालेच नाही. मागून आलेल्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाजाच्या दिशेने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला.. पण तो पूर्णपणे मागे वळण्याआधीच भरधाव वेगाने आलेला ट्रक सुर्रकन.. त्याला उडवून निघून गेला.
कॉन्स्टेबल शेलारने जीपच्या मागे ठेवलेल्या मंदारच्या बॅगेकडे पाहून मनूला स्माईल दिली.
मनू आणि आरीफ आले तसेच तिथून बाहेर पडले.
"कुछ भी बोल मनू.. मंदार था ही डॅशिंग.. साला गाव से आकर सबपे भारी पड रहा था.. कई जगह पर उसने जो दिमाग लगाया वो काबील-ऐ-तारीफ था.. बोलू तो एकदम डॉमिनंट.." आरीफने मंदारची स्तुती करत म्हटले.
"हा.. आरीफभाय.. कुछ जगह वो हमपरभी भारी पड गया था.. पर आखिर में जो जीत गया.. वहीं असली डॉमिनंट..."
"तुम्हारे कहने का मतलब.. कहीं मैं तो वो डॉमिनंट नहीं हुं.." आरीफने हसत हसत मनूला पंच मारला.
ते ऐकून मनूही हसु लागली.
दुसर्या दिवशी शहरातील मुख्य वर्तमानपत्रांत बातमी आली.
"पोलिसांनी अटक केलेल्या खतरनाक सायको सिरीअल किलरचा पळून जाताना भरधाव ट्रक खाली येऊन अपघाती मृत्यू.."
समाप्त