आघात - एक प्रेम कथा - 17 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 17

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(17)

पण मला त्यांना एका शब्दानेही विचारता आले नाही. ही खूप मोठी खेदाची गोष्ट होती. भले ते आले नसते पण विचारण्याची एक पद्धत होती. मी चुकत होतो कुठेतरी, त्यांचं जितकं माझ्यावर प्रेम आहे.तितकंचं माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम कमी आहे का? गेल्या गेल्या त्या तिघांची माफी मागितली.

‘‘माफीची काही गरज नाही. प्रशांत, एक गोष्ट बोलायची आहे मला.’’

‘‘बोल ना!’’

‘‘आम्ही तुला आजपर्यंत सुमैयाचा ना सोड, तिची मैत्री सोड म्हणून सांगितले. भले तुला ते वाईट वाटलं असेल. तुझ्या मते, आम्ही तिच्याबद्दल खूप वाईट बोललो असेन, वाईट मत व्यक्त केले असेल पण तुझी असलेली तिच्याशी मैत्री आणि तिच्यावर असलेला विश्वास यामुळे आमच्या वरवरच्या बोलण्यावर तुझा विश्वास बसला नाही. आमचं सांगणं तुला तथ्यहिन वाटलं पण चारच दिवसात रक्षाबंधन आहे. मैत्रिण ही दुसरी बहिणच असते. मैत्रीण बहिणीसमानच असते हे तरी तू मानतोसच. पण आम्हा सगळयांचं तुला एक चॅलेंज आहे.’’

‘‘कोणतं चॅलेंज?’’

‘‘तीन जर तुला राखी बांधली तर तू सांगेल ते करायला आणि मानायलातयार आहे आणि तीनं जर राखी बांधली नाही तर आम्ही जे सांगेन ते तुला करावं लागेल. आहे मंजूर?’’

‘‘हो आहे. संदिप, हे आव्हान मी स्विकारतो म्हणून समज. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती नक्की मला राखी बांधेल आणि तिच्यावर असलेला माझा विश्वास खरा ठरवेल.’’

‘‘बघूया घोडं मैदान काही लांब नाही.’’संदिप हसत म्हणाला.

रक्षाबंधनाची कॉलेजला सुट्टी नसायची. रक्षाबंधनाचा कार्यक्रम कॉलेजात साजरा केला जात होता. पहिल्यांदा कॉलेजवर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा व्हायचा. आणि मग हॉस्टेलवरही कॉलेजच्या मुली आम्हा सर्वांना राखी बांधायला यायच्या.

एकदाचा रक्षाबंधनाचा दिवस उजाडला. कॉलेजमध्ये मुली साड्या नेसून, साजशृंगार करून आल्या होत्या. प्रत्येकीच्या हातात निरनिराळया राख्या,चेहऱ्यावर हास्य आणि केसात माळलेल्या

गजऱ्यांचा सुगंधित पसरलेला वास यामुळे सगळं कॉलेज दरवळून गेलं होतं. माझं लक्ष होतं ते सुमैयाच्या वाटेवर ती कधी एकदा येणार आणि आपल्याला राखी बांधून एकदाचा प्रकरणावर पडदा पाडणार असं वाटत होतं.

एकदाची सुमैया आली. वर्ग गच्च भरला होता. राखी बांधायला मुलींनी सुरुवात केली होती. ज्या मुलांचं एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे अशी मुले मुलगी राखी बांधायला येत आहे असं वाटताच बगल काढून वर्गाबाहेर पळत होती. तर काही मुली मुद्दाम एखाद्या मुलाला राखी बांधायचं टाळत होत्या.मी उशिरापासून सुमैयाला न्याहाळत होतो. तिचं लक्ष नव्हतं. ती आपल्या मैत्रिणींच्यात गप्पा मारण्यात गुंतली होती आणि अचानक गप्पा मारता मारता तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. मी तिच्याकडे पाहतच होतो. मला पाहून तिनं एक हसरा कटाक्ष टाकला. मी ही स्मित हास्य केलं. तिनं मुलांना राखी बांधायला सुरुवात केली.

तिच्याबरोबर शबाना, स्नेहलही होतीच. कधी एकदा सुमैया मला राखी बांधते आणि प्रकरणावर पडदा पडतो आणि माझाही उरलासुरला थोडासा संशयही निघून जातो असं वाटतं होतं. मी हात पुढे पुढे करत होतो, पण सुमैया माझ्या धडपडीकडे काही लक्षच देत नव्हती. रागाने म्हणालो,

‘‘सुमैया मला अगोदर बांध मला. जायच आहे!’’

‘‘कुठे?’’

‘‘काम आहे. मी बाहेर जाणार आहे.’’

‘‘अशा वेळेला गडबडीत कुठं जायचं नाही. थोडा वेळ थांब.’’

पुन्हा थांबणं आलंच. सुमैयानं थांब म्हटलं तसं मला काळजात धस्सं झालं. मला फटकारल्यागत ती बोलली. पण मी थांबलो, राग न मानता. सुमैयानं सगळयांना राख्या बांधल्या. मला बांधायची वेळ आली. तसं ती माझ्यासमोर थबकून गप्पं उभी राहिली. सगळयांचं लक्ष आमच्याकडे होतं. मी सुमैयाला म्हणालो,

‘‘काय झालं, अशी गप्प का? बांध ना राखी.’’

‘‘सॉरी, प्रशांत राख्या संपल्या. पुन्हा आणाव्या लागतील.’’

‘‘मग घेऊन ये ना. मी इथेच आहे.’’

‘‘थोडा वेळ लागेल हं.’’

‘‘हो. लागू दे.’’

सुमैया राख्या आणायला गेली. मनातला संशय गडद होत होता. आजपर्यंत खंरच मी इतके दिवस अंधारात राहिलो. असा भास होत होता. तिघेही माझ्याजवळ आले. माझा पडलेला चेहरा पाहून अनिल म्हणाला,

‘‘काय प्रशांत, कुठे आहे राखी?’’

‘‘अरे अनिल, आणायला गेली आहे. तुला माहीत नाही काय?’’

“नाही येणार सुमैय्या आता. प्रशांत उघड आता तरी डोळे.”

‘‘सुरेश, असे नाही होणार.’’

‘‘अरे मग आम्हा पाच जणांना राखी बांधली आणि तुझ्या वेळेलाच कशी संपली राखी? कोणत्याही वेळेला पहिला मान तुला देणारी आम्हाला राखी बांधून गोड खाऊ प्रत्येकाच्या मुखात भरविली. मग तुला का नाही आज पहिला

मान दिला?’’

‘‘अजून वेळ संपलेली नाही सुरेश. माझा विश्वास आहे ती नक्की राखी घेऊन येईल?’’

‘‘ठीक आहे! तर बघ वाट पाहून.’’

सुरेश, अनिल, संदिप तिघेही माझ्याजवळून निघून गेले. वर्गातली वर्दळ कमी होत होती. स्नेहलने आणि शबानानं राखी बांधली. पण सुमैया मात्र राखी संपल्यामुळे गेली. अजूनही आली नव्हती. कार्यक्रम संपून कॉलेज सुटायची वेळ आली तरी सुमैयाचा काही यायचा पत्ता नव्हता. खूप वाट पाहिली. पण अखेरीस व्हायचं तेचं झालं. पण अजूनही एक तुटकसा विश्वास वाटत होता, तो म्हणजे सुमैया कदाचित हॉस्टेलवर येऊन राखी बांधेल. म्हणून मी कॉलेज सुटताच हॉस्टेलवर आलो. तिथेही तिचा पत्ता नाही. बाकीच्या वर्गमैत्रिणी राखी बांधून आल्या. मात्र सुमैया आली नव्हती. खूप खूप वाईट वाटलं. खोटं रूप घेऊन जगासमोर वावरणारी ही मुलगी खरंच वाटलं नव्हतं, असं माझ्याशी वागेल. त्या तिघा मित्रांच्यासमोर उभं राहिलाही मला लाज वाटत होती.

सुमैयामुळं खूप खूप नुकसान झालं होतं. हे सत्य नाकारता येण्यासारखं नव्हतं. माझ्या अभ्यासावर परिणाम झाला होताच. त्याचबरोबर मी हुशार आहे. सगळया शिक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला या प्रकरणात गोवलं गेलं होतं, हेही खरं आहेच, पण त्यात सुमैया आणि माझी वाढलेली जवळीकता मित्रत्वाच्या नात्याने का असेना दुसऱ्याचा दृष्टिकोन बदलणारी होती. त्यामुळे आजी-आजोबांनाही त्रास झाला होता.

सांस्कृतिक कार्यक्रमात गुंड प्रवृत्तीच्या वर्गमित्रांचा शब्द नाकारून तिच्या आवडीचं गाणं म्हणायला जावून खाल्लेला मार, तिच्या अंत:र्मनाचा शोध घेण्याची धडपडत, त्यात गेलेला वेळ, सहलीला जाणं, अभ्यास बुडवून मौजमजेत घालवणं, तिचं ते वरवरचं आपलेपणाचं बोल, तिच्या बोलण्यानं माझं पाघळणं ही अभ्यासाच्या किंवा प्रगतीच्या, अधोगतीची कारणेच म्हणावी लागतील. हे माझ्या खूप उशीरा आता लक्षात आलेली गोष्ट होती. माझा तिच्यावर असलेला अंध:विश्वास या साऱ्यावर आजपर्यंत मात करीत आलो. पण आता हे सत्य नाकारण्यासारखं नव्हतं. याचा जाब विचारायचं ठरविलं पण शेवटी उपयोग तर काय होणार होता म्हणा. जे घडायचं ते घडलं होतं पण एका गोष्टीचं वाईट वाटतं होतं. सुरुवातीपासून माझ्या मित्रांनी तिच्यापासून दूर राहण्यास सांगितलं पण मित्रांच्या मनाविरुद्ध जावून त्यांना नको नको ते बोललो, त्यांच्यापासून दूर राहिलो, त्यांना खुप दुखविलं. ते माझं वाईटच करीत आहेत असं वाटू लागलं. इतक्या चांगल्या मैत्रिणीवर नको नको ते आरोप करीत आहेत, त्यांना आमची मैत्री बघवत नाही, असं वाटून गेलं. प्रत्येकवेळी मी त्यांच्यापासून हटकूनच वागू

लागलो. ती मला मित्रांपेक्षाही जवळची वाटू लागली होती. तिचं मधुर आणि गोड बोलणं ऐकून. पण त्या गोड बोलण्यात तिचा स्वार्थ होता हे मला कळालंच नाही. तिची आणि माझी मैत्री वाढल्यापासून जवळच्या मित्रांना मी परकं मानायला लागलो होतो. पण त्यांच्या मनात स्वार्थ नव्हता. तर माझ्याबद्दल तळमळ होती. हे मला आता कळालं होतं. उदास चेहरा करून खोलीच्या एका कोपऱ्यात बसलो होतो.

‘‘प्रशांत पटलं काय, आतातरी आमचं बोलणं पण काहीतरी असो, एक ना एक दिवस सत्य बाहेर आलंच. अनिल, संदिप आपण जिंकलो. ही सत्याची लढाई जिंकलो. या महत्त्वाच्या वळणावर खाईत कोसळण्याअगोदर आम्ही त्याला सावरलं. एका वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत.’’ सुरेश आनंदी होवून बोलत होता.

*****