आघात - एक प्रेम कथा - 18 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 18

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(18)

तिघांचेही अगदी चेहरे आनंदाने फुलले होते. हाच सुरेश उन्हाळयाच्यासुट्टीत यानं मला पत्र लिहिलं होतं आणि त्याला मी नको नको ते बोललो होतो पण तो ढासळला नाही की खचला नाही. माझ्यासाठी त्यानं नक्की त्रास घेतला होता. त्यांच्याच नाही तर इतर मित्रांसमोरही आज मान वर करून उभारण्याची हिंमत नव्हती.

इकडे ते तिघेही आनंदाने न्हाऊन गेले होते. तर माझं इकडे रडणं सुरु झालं होतं.

‘‘प्रशांत रडू नको, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता तुला एका जीवनाच्या नवीन टप्प्यावर कलाटणी मिळाली आहे. तुला तुझ्या आजीआजोबांच्या आशाअपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. जे घडलंय ते सारं विसरून जा असे माझं स्पष्ट मत आहे. या सर्वांतून अलिप्त रहा. आमच्यात सुद्धा तू मिसळू नको. एकटे राहून ७ ते ८ महिने तू अभ्यास करू. तुला आम्ही कोणतीही अडचण येऊ देणार नाही. तुला ज्या ज्या वेळी अडचण येईल त्या त्या वेळी आम्ही आहोतच. तुला एक नवं ध्येय, लक्ष्य गाठायचं आहे. वेळ कमी आहे. लाग कामाला.’’

किती आश्वासक वाटतं होतं, संदिपचं हे शब्द नवी उभारी देणारं,उमेद देणारं तेव्हापासून ठरविलं, या घडीला मौजमजा, गप्पाटप्पा सारं काही बंद करून अभ्यासाला लागायचं. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायचं मनाशी पक्कं ठरविलं होतं. समजून आलं होतं, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. त्याप्रमाणे मीही फसलो होतो. एका जाळयात अडकलो होतो. पण गुंता वाढायच्या आत त्यातून निसटलो होतो ते माझ्या जिवलग मित्रांमुळेच.

दररोज कॉलेजला जाणं, कॉलेज सुटल्यानंतर कुठंही गप्पाटप्पा मारत न थांबता सरळ हॉस्टेलचा रस्ता कातरणं, मधल्या सुट्टीत ग्रंथालयात जाऊन वाचत बसणं हा नित्यक्रम ठरलेला होता. हे माझं थोडं वेगळं राहणं, वेगळं वागणं हळूहळू सगळयांच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकानं विचारायला सुरुवात केली पण माझं एकच उत्तर होतं. शेवटचं वर्ष माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे.

ग्रंथालयात अभ्यास करत होतो. सुमैया तिथे आली. मी पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि वाचन सुरु ठेवलं तसं ती मुद्दामहून समोरून फेऱ्या मारू लागली. कारण होतं की मी तिला बोलवावं. पण मी काही बोलवलंच नाही. शेवटी तिच्या फेऱ्या बंद झाल्या.

‘‘प्रशांत, इतका राग आला काय माझा?’’

‘‘हे बघ सुमैया, पुन्हा माझ्याशी बोलण्याचा

प्रयत्न करू नको.”

“अरे पण का?”

‘‘मी तुला राखी नाही बांधली म्हणून. त्याचं कारण तुझ्या या भोळयाभाबड्या मनाला कदाचित समजलं असेलच. पण मीही तुला पत्राद्वारे कळविणार होतेच.’’

‘‘काहीच कळवायची गरज नाही. मला तुझं खरं रूप काय आहे ते मला समजलंय.”

“अरे प्रशांत काय बोलतोयस हे?”

‘‘तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या मुलीला तसेच बोलणं योग्य वाटतंय, विश्वासघातकी आहेस. तू विश्वासघातकी आहेस. मित्रत्वाच्या नात्याला तू कलंक लावला आहेस लक्षात ठेव. पुन्हा माझ्या वाटेवर जावू नको. मला शिकायचं आहे, शिकू दे. बड्या घरची असली तरी तुझ्या घरात, तुम्हा मोठ्या लोकांना माणुसकी कळत नाही. ही गोष्ट खरी आहे, तुम्ही पैशांचे भुकेले असता, पैशाचे भुकेले.’’

माझं हे तडकाफडकी बोलणं, सगळया मुलांच्यासमोर झालेला तिचा अपमान तिला सहन झाला नाही. तिला वाईट वाटलं ती तशीच रडत गेली. मला वाटलं वर्गात जाऊन बसली असणार, पण पाहतो तर ती वर्गात नव्हती. घरी गेली असणार असं वाटलं आणि मी तासाला बसलो, पण पुन्हा तिचाच विचार मनात आला. कदाचित रागाने घरी जाण्याऐवजी दुसरीकडेच कुठंतरी ती जाणार नाही ना? काहीतरी बरंवाईट करून घेणार नाहीना? या प्रश्नांचं थैमान माझ्या मनात माजलं होतं पण मी मन घट्ट केलं. काय व्हायचं ते होऊ दे म्हणून मनातून तिचा विचार काढून टाकला.

दोन दिवस कॉलेजवर दिसली नाही, पण तिच्याबद्दल काही बरीवाईट बातमीही कानावर पडली नाही. त्यामुळे निर्धास्त होतो. पण तिसऱ्या दिवशी मात्र कॉलेजवर आली. चेहरा सुमारलेला होता. ‘फ्रेंडशिप डे’मध्ये सारे कॉलेजचे तरुण तरुणी गुंतून गेले होते. मित्रमैत्रिणी एकमेकांच्या मनगटाला लाल, हिरव्या,निळया पट्‌ट्या बांधून फ्रेंडशिप डे साजरा करीत होते. मी अलिप्त राहणं पसंद केलं होतं. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे हा डे साजरा करणे वगैरें मध्ये विशेष रस अगर इच्छा नव्हती. मी सरळ ग्रंथालय गाठलं, शेवटचाएक तास फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी ठेवला होता. त्यामुळे तो एक तास संपल्यानंतर कॉलज सुटणारच होतं. एक तासभर ग्रंथालयात वाचत बसलो. कॉलेज सुटल्यानंतर वर्गात आलो. बॅग घेतली आणि सरळ हॉस्टेलवर आलो.

संध्याकाळी पुस्तक उघडून वाचायला गेलो. पाहतो तर कसलीतरी चिठ्ठी आढळून आली. ती उघडली आणि वाचू लागलो.

प्रिय प्रशांत,

प्रथम मला क्षमा कर. माझ्या मनातलं तुला मी सांगण्याचं धाडस कधीच करू शकले नाही आणि ते तुझ्या भोळयाभाबड्या मनालाही कधीच समजलं नाही. तुला माझं प्रेम समजावं म्हणून मी कित्येक युक्त्या लढविल्या. तुला वाढदिवसाला घरी थांबवून घेणं, सहलीला पैसे भरणं, तू गावी जाताना मी भावूक होऊन तुझ्याशी बोलणं, हॉस्पिटलमध्ये येऊन वारंवार तुझ्या तब्येतीची चौकशी करणं, तुला त्रास देणाऱ्या मुलांना सक्त ताकीद देणं, तुला पत्र लिहून सरिताबद्दल खोटं सांगणं. खरं तर सरिता तुझ्याबरोबर बोलते हे मला सहन होत नव्हतं म्हणून, अडचण आली की वारंवार मदतीचं आश्वासन देणं, आपुलकीने चौकशी करणं, माझं गीत गॅदरींगला म्हणण्याचा तुला आग्रह करणं हे काय होतं तर ही माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाचे इशारे होते. पण तुझ्या भोळया मनाला कधी माझं प्रेम समजलंच नाही. शेवटी समजलं ते मी तुला राखी बांधली नाही म्हणून. तुझ्या मित्रांनी माझ्यापासून दूर राहण्याचा तुला सल्ला दिला होता. हे मला माहीत आहे पण तरीही तू त्यांचं बोलणं टाळून त्यांचं न ऐकता माझ्यावर इतका विश्वास ठेवलास पण मी तुझ्या विश्वासाला पात्र ठरले नाही, याची मला क्षमा कर. पण काय करणार, तुझ्याबद्दल माझ्या मनात सतत आकर्षण वाटू लागलं होतं. तुझ्या हुशारकीचा मला हेवा वाटत होता पण तुला मागे खेचण्याचा अथवा तुझं वाईट व्हावं असं मी कधीच चिंतलं नाही किंवा तू गरीब आहेस म्हणून मी तुला कधी वाईट लेखलंही नाही कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं आणि ते असेच राहिल. तुझ्या साध्या भोळया स्वभावानं माझ्या मनावर भुरळ घातली आहे. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी पूर्णपणे तुझ्या प्रेमात बुडून गेली आहे. आता मला कोणीही रोखू शकत नाही. मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे. पण माझ्या या खऱ्या प्रेमाला तु नाकारू नकोस. मला विश्वास आहे तू इतका कठोर वागणार नाहीस. मात्र हेही माहीत आहे की तुला तुझ्या आजीआजोबांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. तुला परीक्षेत यश मिळवून चांगली नोकरी करायची आहे. हे सारं तू करं. माझा तुला पाठिंबा आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती माझा तुला आधार आहे पण तुझ्या आधाराची भीक मी तुझ्याजवळ मागते आहे. तुझ्या कोणत्याही गोष्टी मीआडवी येणार नाही. अगर तुझ्या मनाविरुद्ध वागणार नाही. मला तू नाकारु नकोस. तुझी परिस्थिती गरीबीची आहे. याची मला कल्पना आहे. पण मला तुझी परिस्थिती बघायची नाही. मला फक्त तू हवा आहेस.

मग भले मला कितीही कष्ट सोसावं, दु:ख झेलावं लागलं तरी मी ते झेलण्यास समर्थ आहे.संकटाला तोंड देण्यास तयार आहे.

पण तरीही ही गोष्ट तुला मान्य नसेल तर फक्त माझी एकच शेवटची इच्छा तू पुरी कर. रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास.तू माझ्या घरी ये. मी तुझी वाट पाहिन. नक्की ये. अन्यथा पुन्हा ही मैत्रीण तुला या जगात कधीच दिसणार नाही.

फक्त तुझीच

सुमैया

*****