Aaghat - Ek Pramkatha - 22 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 22

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(22)

सगळयांच्या मनातून मी उतरायचा तो उतरलोच आहे. मग आता तिच्यापासून दूर राहिलो काय आणि जवळ राहिलो काय. जे व्हायचं तेच होणार. जे जग बोलायचं तेच बोलणार, चांगलं बोललं काय आणि वाईट बोललं काय सारखंच. काय व्हायचं ते होऊ दे पण आता तिच्याशिवाय राहणं अशक्य आहे.

कॉलेज सुटलं आणि तिला जाऊन भेटलो. मैत्रिणी बरोबर होत्या. बोलणं थोडं अवघड होतं पण मला राहवलंच नाही.

‘‘सुमैया मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे.’’

‘‘थोडं थांबशील काय आपण दुसरीकडे जाऊन बोलू.”

ती थांबली, बाकीच्या मुली पुढे गेल्या.

‘‘आणखीन काय राहिलयं? मग का आलास परत.’’

‘‘सुमैया असं बोलू नकोस, तुझ्याविना जगणं मला अशक्य आहे. त्याची अनुभूती मला आली आहे. हवं तर मला माफ कर, साऱ्यांनी मला नाकारलंय, सुमैया तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही. तू मला नाकारू नकोस. तुच माझा एकमेव आधार आहेस. प्लीज सुमैया, प्लीज.’’

‘‘ठीक आहे! तर मग उशिरा का असेना माझं महत्त्व पटलं तर तुला, पण तू हॉस्टेल सोडायला हवंस.’’

“हो सुमैया, आजच जाऊन सरांशी बोलतो मी.’’

त्या दिवशी संध्याकाळी हॉस्टेलवर आलो. इतकी वर्षे हॉस्टेलवर राहिलो. या हॉस्टेलनं मायेची ऊब दिली. या हॉस्टेलच्या चार भिंतीत बसून मी पहिला नंबर मिळविला होता. इथंच मी रात्री जागविल्या होत्या. अभ्यासासाठी उमेद निर्माण झाली होती. ती अंगात भिनली होती. एक नवं नावं जडलं होतं, निर्माण झालं होतं. इथले मित्र, इथल्या जेवण करणाऱ्या मावश्या, कांबळे सर, त्यांची पत्नी एक नवं नातं प्रेमाचं, आपुलकीचं, माया-ममता आणि जिव्हाळयाचं नातं, सुखदु:खात धावून येणारे मित्र, सरांचं वरचेवर कानावर पडणारे उपदेशपर बोल, अभ्यासाचं मार्गदर्शन, परिस्थितीची वरचेवर जाणीव करून देणं, प्रत्येक अडचणीच्यावेळी पाठीवर पहिला प्रेमळ हात पडायचा तो कांबळेसरांचा. इथल्या मायेच्या उबेत मी वाढलो होतो. इथंच माझ्या पंखांना बळ आलं होतं. भरारी घेण्यास सज्ज झालो होतो. खूप काही चांगली तत्व, विचार मला या हॉस्टेलनं दिली होती. त्यांच्या आधारावर मी उभा होतो. बळं दिलं होतं,जगण्याला आणि संकटाला सामोरे जाण्यास, अंगाला शिस्त लागली होती. कोणतेही काम करण्यास न लाजण्याची सवय लागली होती. प्रामाणिकपणा रुजला होता तो इथेच.

हे सर्व दिलं होतं मला या हॉस्टेलनं. हे सर्व मला कळत होतं, पण पाय मात्र त्याच्या विरुद्ध दिशेने पडत होते. माझ्या मनाची द्विधा मन:स्थिती झाली होती. भावनिक सुखाला, क्षणिक हव्यासाला बळी पडत होतो. जे व्हायचं तेच झाले. सरांना भेटायचं आणि एकदाचं सांगून टाकायचं हे ठरविलं. मनात भीती तर होतीच. सरांना ही गोष्ट सांगण्यासाठी म्हणून मी त्यांच्या खोलीसमोरून फेऱ्या मारत होतो. सर आत होते. सरांना समजले. सर पटकन बाहेर आले.

‘‘अरे, प्रशांत काय काम होतं का? सारखं फेऱ्या मारायला लागलायसं. मला बोलवायचं तर.”

‘‘काय नाही सर, थोडं बोलायचं होतं.’’

‘‘अरे मग बोल की.’’

‘‘सर, मी...’’

‘‘अरे, बोल की असं घाबरलास का?’’

‘‘सर, मला हॉस्टेल सोडायचं आहे.’’

असे म्हणताच सरांचा चेहरा गंभीर झाला.

‘‘अरे असं अचानक कॉलेज संपायला तीन-चार महिने राहिलेत आणि आता कुठे राहणार तू?’’

‘‘सर मी बाहेर खोली घेऊन राहणार आहे.’’

‘‘अरे, पैसे कोण देणार? तुझी तर परिस्थिती अशी.’’

‘‘काढ थोडे दिवस. बघता बघता तीन- चार महिने संपतील.”

‘‘नाही, सर मला इथं अभ्यास होत नाही.’’

‘‘काय? इतकी वर्षे अभ्यास झाला आता का होत नाही? आणि स्पेशल खोली देऊनसुद्धा! तुझी काय लायकी आहे ते कळाली आता. याच्या अगोदर मला समजलीच होती पण आता मात्र पक्की कळाली. अरे, त्या दीडदमडीच्या पोरीच्या सांगण्यावरुन तिच्या नादी लागून हे हॉस्टेल तू सोडायला लागलायस होय, पुन्हा या हॉस्टेलची दारे आयुष्यभर तुझ्यासाठी बंद राहतील लक्षात ठेव. अरे तुला काय समजलो होतो. आणि काय निघालास, अरे त्या बिचाऱ्या तुझ्या मित्रांनी प्रत्येक वेळी तुझी चूक झाकण्याचा प्रयत्न केला. तुझ्यासाठी त्यांनी माझ्याकडून नको ते बोलून घेतलं. मीही असू दे गरीब आहे, कष्ट करतंय, पोरगं हुशार आहे, म्हणून तुझी प्रत्येक चूक पदरात घालून घेतली. का तर एखाद्याला दुखवलं तर त्याच्या मनाचं खच्चीकरण होतं म्हणून आणि हे वर्ष महत्त्वाचं म्हणूनकुणाला दुखवायचं नाही, समजावून सांगणं एवढंच ठरवलं होतं, पण आमच्या या स्वभावाचा तू गैरफायदा घेतलास. कॉलेज सुटल्यानंतर एक दिवस या वर्षात वेळेत आला नाहीस. पण आम्ही समजून घेतलं का तर तू अभ्यासाचं कारणं सांगत होतास. अभ्यासाला थांबलो म्हणायचास म्हणून पण करावयाचा तिसराच उद्योग. तुझं संध्याकाळचं नऊ-साडेनऊ वाजता येणं असायचं. अरे कुणाच्या घरीसुद्धा हे चाललं नसतं. ते तू एका हॉस्टेलमध्ये वागत होतास, ते सारं आम्ही खपवून घेत होतो. पण तू तर एक नंबरचा हरामखोर निघालास. आमच्या असाह्यतेचा फायदा घेतलास. अरे, आमची नाही त्या म्हाताऱ्या-म्हातारीच्या कष्टाची तरी जाणीव ठेव. बिचारे सुखी स्वप्नं पाहत ती जीवनाचा अखेरचा श्वास घेत असतील, पण त्या भोळया मायबापाला काय माहीत त्यांचा नातू इथं काय दिवे लावतोय ते. तू जे करायला लागलायस ही खूप मोठी चूक आहे. लक्षात ठेव. पण ती चूक तुला आता कळणार नाही. ती चूक तुला कळेल त्यावेळी खूप उशीर झालेला असेल.’’

‘‘मला आता शंका वाटायला लागलीय तूच काय तो आदर्श विद्यार्थी? फाटक्या चपलातला आजोबांना घेऊन हात जोडून विनवण्या करणारा? परीक्षेत पहिला नंबर आल्यावर हात जोडून अगोदर माझ्याकडे येऊन डोकं टेकवून नमस्कार करणारा? जिद्द, ध्येय आणि काहीतरी मोठा होणार अशी इच्छा बाळगणारा? आजी-आजोबांना सुखात ठेवायचं स्वप्न बघणारा? तूच का तो? हा प्रश्न माझ्या मनाला पडलाय, किती बदललास रे तू इतक्या कमी कालावधीत? काय ताकद असेल त्या मुलीत? कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू? अशी तुझी अवस्था झाली आहे. काय आशाअपेक्षा करायची, आता तुझ्याकडून त्या म्हातारा-म्हातारीने? त्यांची तुझ्याबद्दलची तळमळ,धडपड, प्रेम पाहिलं की मन हेलावून जातं. पण तू त्या पात्रतेचा राहिला नाहीस. तूच का तो आज्ञाधारी विद्यार्थी? कुणाची आशा करायची त्यांनी? तू बिन आई-बाबाचा होतास, ज्यावेळी तुला या साऱ्या जगानं नाकारलं होतं, तेव्हा त्यांनी तुला स्वीकारलं होतं, पण काय दिलंस त्याच्या बदल्यात त्यांना? त्याचवेळी त्यांनी तुला पदरात घेतलं नसतं तर बरं झालं असतं. त्यांच्या आणखीन दु:खी कष्टी जीणं वाट्याला आलं नसतं. माफ कर, मी आज खूप बोललो. कारण आता तुला बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही. तू आता आमचा राहिला नाहीस, आमचा होतास त्यावेळी आम्हाला तुला बोलण्याचा, बरंवाईट सांगण्याचा अधिकार होता. पण आता आमचा तुझ्यावर हक्क नाही. तुझ्या जे मनाला वाटतंय, पटतंय तसं कर.तुला जायचं असेल तर उद्या सकाळी अर्ज लिहून माझ्याकडे दे आणि मग खुशाल जा.”

रात्री नऊ वाजता सरांचं आणि माझं बोलणं सुरू झालं होतं. ते बरोबर पावणेबाराच्या सुमारास संपले. सर बेभान होऊन बोलत होते. इतके दिवस काळजात साठलेलं सगळं बाहेर आलं. मी दु:खी होऊ नये, मला दुखवू नये म्हणून सर काही बोलले नव्हते. पण सरांनी आज मात्र काहीच बोलायचं सोडलं नव्हतं. एवढं सरांचं माझ्यावर प्रेम होतं, जिव्हाळा होता, पण माझं मन थोडंच मानणार होतं त्यांच्या दिलेल्या उपदेशाला. मला सुमैया साद घालीत होती. कुणी किती जरी तत्त्वज्ञान सांगितलं तरी ते माझ्या मनी उतरणं शक्य नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल, सुरेश आणि संदिप तिघेही माझ्याकडे आले. माझ्याशी बोलत नव्हते, तरीही हॉस्टेल सोडू नको म्हणून मला विनंती करू लागले. उरल्यासुरल्या विश्वासालाही तडा जाऊ देऊ नको. थोडे दिवस राहिलेत, वाईटपणा विनाकारण घेऊ नको, असे सांगत होते. पण भल्याभल्यांचा शब्द मी ठोकरून दिला होता. मी कुणाचंच मानलं नव्हतं, ऐकलं नव्हतं मग त्यांचं थोडंचं ऐकणार होतो. शेवटी हॉस्टेल सोडलं आणि सुमैयाच्या जुन्या घरात जे तिच्या घरापासून एक ते दीड किमी अंतरावर होतं तिथं जाऊन राहू लागलो. मी हॉस्टेल सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी कॉलेजवर पसरली.

******

इतर रसदार पर्याय