मुलीस पत्र - बाबाचे लाडक्या मुलीस पत्र Na Sa Yeotikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलीस पत्र - बाबाचे लाडक्या मुलीस पत्र

#पत्रलेखनातून संवाद

प्रिय बेटी,
आज मला तुला काही तरी बोलायचं आहे. मनातंल्या काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे. मात्र तुझ्या समक्ष उभे राहून बोलू शकत नाही. म्हणून या पत्राद्वारे माझ्या मनातील काही गोष्टी तुला सांगत आहे. मला खात्री आहे तू समजून घेशील आणि आई-बाबांचा समाजात जो मानसन्मान आहे ते टिकवून ठेवशील.
हे वय असंचअसतं, या वयात कुणावर तरी आपलं प्रेम असावं असे प्रत्येकांना वाटत असते. आपल्या स्वप्नातला राजकुमार कसं असावं आणि कसं दिसावं याची स्वप्न प्रत्येक मुलगी पाहत असते. स्वतःच्या मर्जीनुसार आपल्या साथीदारांची निवड करणे योग्य आहे यात यत्किंचित सुद्धा वाद नाही मात्र अनुभवाची कमतरता आणि माणसं ओळखू न येणे या कारणांनी धोका होऊ शकतो. लग्न हे जीवनातील असा एक प्रसंग आहे ज्यामुळे मुलींचा दुसरा जन्म समजल्या जातो. आईच्या गर्भातून घेतलेला पहिला जन्म आणि आईच्या घरातून नवऱ्याच्या घरात घेतलेला प्रवेश हा दुसरा जन्म. पहिला जन्म आई देते आणि सांभाळपण करते मात्र काही काळासाठी. हा दुसरा जन्म मात्र आयुष्यभर आपल्या सोबत असतो. आई बाबांसाठी मुलगी म्हणजे खूप काळजी करण्यासारखी बाब आहे. तु ही जेंव्हा एका मुलीची आई होशील ना त्यावेळी तुला नक्की कळेलच. या वळणावर घेतलेला एक निर्णय आयुष्य सुधारू ही शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. म्हणून या वयात निर्णय घेतांना शंभर वेळा विचार करणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण चित्रपटातील कहाणी पाहून किंवा कोणाच्या तरी गोष्टी ऐकून त्याला बळी पडतो. काही वर्षानंतर ते सर्व कळते मात्र फार उशीर झालेला असतो. सैराट प्रेम करून पाहतो. पण पळून जाऊन लग्न करणे किती त्रासदायक घडते याची परिचिती नागराज मंजुळे यांनी सैराट मध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चित्रपटांतुन आपण चांगले काही तरी शिकण्याच्या ऐवजी त्यातील परश्या आणि आर्चीचं प्रेम फक्त लक्षात घेतो. चित्रपटाचे कथानक ही वेगळी बाब आहे. त्याला प्रत्यक्षात जीवन जगतांना तेच करता येत नाही. हीर-रांझा किंवा लैला-मजनू यांच्या कथा वाचायला आणि पाहण्यापुरते सीमित ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक जीवन जगतांना बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. घरातील जे कोणी वाडवडील मंडळी असतील ते आपल्या हिताचे निर्णय घेतात. त्यांना असं वाटत नाही का ? आपली मुलगी दिल्या घरी सुखी रहावी. एकाच जातीत मुलां-मुलींचे लग्न झाल्यास समाजात सर्व बाबी सोईस्कर प्राप्त होतात. तेच जर आंतरजातीय लग्न होत असेल तर त्या जोडप्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. ही भारतातील सत्य परिस्थिती आहे. विदेशात ना जातआहे ना धर्म, त्याठिकाणी कुटुंब नावाची संस्था अस्तित्वात नाही. प्रेमप्रकरणातील लग्न विशेषतः भिन्न जातीच्या मुलांमुलींचे होतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. वरवरून दिसायला आकर्षक जरी दिसत असेल तरी यात लग्नानंतर खूप वेदना सहन करावे लागतात. प्रेम करणारे मुलांची स्थिती म्हणजे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. काही मुले निव्वळ मुलींची फसवणूक करतात. मला तर असे ही ऐकायला मिळाले आहे की काही मुले मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि हैद्राबाद, बंगळूर, मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरात नेऊन त्या मुलींना काही पैशात विकून टाकतात. त्यांचा तो धंदाच असतो. मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलींना ते काही दाखवू शकत नाहीत. सर्व काही नाटकं करता येतात मात्र पैशाचे नाटक करता येत नाही. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तो खरोखरच आपले पालनपोषण करण्यास योग्य आहे का याची खातरजमा करून कोणी प्रेम करत नाही. म्हणून ज्यांच्यावर आपण प्रेम करीत आहोत त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? स्वतःची कमाई करतो का बापाच्या पैशावर जगतो हे ही एकदा पडताळून पाहणे आवश्यक आहे. जे की तुम्ही पाहू शकत नाही. तुम्ही दोघे जवळपास समवयस्क असता त्यामुळे तुमची विचारधारा जुळेलच हे सांगता येत नाही. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची पूर्ण ओळख करून घ्यावी. त्याच्या चार मित्राकडून आणि चार नातेवाईकाकडून सर्व माहिती मिळवावी. आपल्या कुटुंबाला त्याची ओळख करून द्यावी. सर्व काही समन्वयक पद्धतीने केल्यास या प्रेमात खरा विजय मिळू शकतो. ज्या प्रेमात दोन्ही कुटुंबाची साथ असेल तेच प्रेम चिरकाल टिकून राहते आणि यशस्वी जीवन जगता येते. म्हणून हा निर्णय घेतांना शंभरदा नाही तर हजारदा विचार करावं असे मला वाटतं. त्याच सोबत शिकण्याच्या वयात असे प्रेम प्रकरणात अडकून पडणे योग्य नाही. त्याऐवजी आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून चार पैसे हातात आले तर स्वतःच्या जीवनाचे निर्णय नक्की घेता येऊ शकेल. अश्या वेळी तुझ्यात एवढी शक्ती निर्माण झालेली असते की कोणी तुझा विश्वासघात जरी केला तरी तुला समर्थपणे जीवन जगता येऊ शकते. मात्र तू कमावती नसशील आणि प्रेमात तुला धोका झाला तर तुझे जीवन बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम करण्यासाठी वय लागत नाही. पण तरुणपणातील प्रेमाला योग्य दिशा नसते हे एकदा कळायला हवं. उच्च शिक्षणाने तुला खूप काही ज्ञान मिळालेले असते, त्यावेळी त्याचा वापर करून तू निर्णय घेऊ शकतेस आणि तो निर्णय अर्थात चांगला असू शकतो. नाते तोडल्याने संसारात काही रस राहत नाही मात्र नाते जोडत गेल्यास जीवन पुन्हा पुन्हा जगावेसे वाटते. एक बाप म्हणून शेवटी मला एवढंच सांगावेसे वाटते की, बेटा आम्हांला तुझी खूप काळजी वाटते आणि आपलं लेकरू जीवनात मोठ्या उच्च शिखरावर पोहोचलेलं पाहावं वाटतं, एवढं विसरू नको म्हणजे झालं.

तुझाच बाप

– नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769