काम करण्यात लाज कसली Na Sa Yeotikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काम करण्यात लाज कसली

काम करण्यात लाज कसली

कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालून सर्व जगात आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. तसा तो भारतात देखील अवतरला आणि संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेलं. कारखाने बंद झाली, उद्योगधंदे बंद झाली, बऱ्याच जणांना नोकरीला मुकावे लागले. पुण्या मुंबईतील काम करून पोट भरणारी सर्व मंडळी आपापल्या गावी परतू लागले. याच कचाट्यात सापडलेला रमेश देखील होता. लॉकडाऊन होण्यापूर्वी तो मुलगी पाहण्यासाठी म्हणून गावाकडे आला होता. रमेश पुण्यात एका कंपनीत काम करत होता, त्याला वीस-पंचवीस हजार रुपयांचा पगार होता. त्यामुळे चांगलं स्थळ चालून आलं म्हणून घरातले सारेचजण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवल्याचे कळविले होते म्हणून तो दहा दिवसापूर्वीच गावी आला होता. मुलगी पाहणे झाले, मुलगी त्याला पसंद आली होती आणि दुसऱ्या दिवशी परत तो पुण्याला जाणार होता. पण सरकारने लॉकडाऊन घोषित केले, वाहतुकीचे सारेच मार्ग बंद झाले होते. त्याचे पुण्याला जाणे अवघड बनले आणि तो गावातच अडकून बसला. रमेशची आई त्याला म्हणाली, " लेका, नोकरीपेक्षा जीव वाचविणे महत्वाचे आहे, ही महामारी संपेपर्यंत पुण्याला जाऊ नको, येथेच राहा." बातम्यातून कोरोना महामारीचे परिणाम बघून सारेच हैराण झाले होते. गावात बसून काय करावं ? रमेशच्या समोर प्रश्न पडला होता. रमेशला दोन एकर शेती होती ज्यात त्याचे आई-बाबा दिवसरात्र मेहनत करून आपला उदरनिर्वाह करत होते. रमेश लहानपणापासून दुःखच पाहत आला होता. एवढ्या कठीण परिस्थितीत त्याने कसे बसे आपले आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते. तो खूपच मेहनती, कष्टाळू आणि प्रामाणिक होता. कोणतेही काम करण्याची त्याला अजिबात लाज वाटत नव्हती. लहानपणापासून त्याने गावातील अनेक लोकांची कामे केली होती. शेतातली कामे तर तो करतच होता त्याशिवाय गवंडीच्या हाताखाली देखील त्याने काम केले होते, त्याचा ही त्याला अनुभव होता. गावात प्रत्येकांच्या कामात तो मदत करत असे. आपण पुण्याला नाही गेलो तरी येथे ही काम करून राहू शकतो याची खात्री होतीच. मुलगी पसंद असल्याचे निरोप मुलीच्या घरी पाठविण्यात आले मात्र या लॉकडाऊनमुळे पुण्याची नोकरी गेली हे त्यांना समजले असावे कदाचित त्यामुळे तिकडून कोणातच निरोप आला नाही. तेंव्हा तो खूपच नाराज झाला आणि घरात एकटा एकटा राहू लागला. आज या लॉकडाऊनने त्याला घरातच बंदिस्त करून टाकले होते आणि काय काम करावं हे त्याला काही सुचत नव्हते. घरात बसून खूपच कंटाळवाणे झालंय म्हणून असाच एके दिवशी तो आपल्या आई-बाबा सोबत शेतात गेला. दुपारची वेळ झाली होती आणि त्याच्या शेजारच्या शेतात एक बोअरवेलची मशीन आली होती. शेजारच्या शेतवाल्याने ते बोलावलं होतं. त्याला बऱ्यापैकी पाणी लागलं. हे पाहून त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्याही शेतात बोअर मारावं अशी तो आपल्या वडिलांना म्हणाला. पण वडिलांकडे तेवढी जमापुंजी नव्हती म्हणून ते नकार देऊ लागले. तेंव्हा त्याने आपल्या बँकेच्या खात्यात काही रक्कम आहे त्याचा वापर करू पण बोअर मारू म्हणून हट्ट धरला. हा-ना करता करता वडील तयार झाले आणि शेतात बोअर मारलं, त्याला देखील चांगलं पाणी लागलं. रमेश खुश झाला. त्या रात्री त्याने मनात एक प्लॅन तयार केला आणि त्यादिशेने काम करायला सुरुवात केली. आता शेतातच काम करायचा असा त्याने पक्का निर्धार केला. भल्या पहाटे उठून सायकलवर सवार झाला आणि जवळच्या शहरात गेला. एका फर्टिलायझरच्या दुकानातून त्याने भाजीपाल्याची काही बियाणे घेतले आणि घरी आला. आई-बाबा शेतात गेले म्हणून तो ही शेतात गेला. बाबाला त्याने आपला प्लॅन सांगितलं आणि शेतात ती सर्व बियाणे टाकून भाजीपाला घेण्याचा विचार व्यक्त केला. एक-दोन महिन्यात येणारी ती बियाणे म्हणजे सर्व प्रकारचा भाजीपाला होता, ज्यात अनेक प्रकार होते. त्यापद्धतीने त्याने शेत तयार केला आणि ती सर्व बियाणे शेतात लावून टाकली. रोज शेतात जाऊन त्या बियाण्याच्या देखरेखीकडे लक्ष देऊ लागला. काही दिवसांत त्याच्या शेतात सर्वत्र हिरवेगार दिसू लागले. एक-दीड महिन्यात भाजीपाला येण्यास सुरुवात झाली याची विक्री कोठे करावी हा ही प्रश्न त्याने सोडविला. सर्व प्रकारचा भाजीपाला असल्याने गावातच विक्री होऊ शकते याचा अंदाज त्याने पूर्वीच बांधला होता आणि तो अंदाज यशस्वी देखील झाला. त्याचा पूर्ण भाजीपाला गावातच विक्री होऊ लागला. हळूहळू लॉकडाऊन उठलं आणि त्याने आपला भाजीपाला शहरात नेण्यास सुरुवात केली. त्याला चांगले पैसे मिळू लागले. रमेशची कोणतेही काम करण्यात लाज कसली ह्या वृत्तीमुळे त्याला पुण्यातील नोकरीपेक्षा गावातल्या शेतीत जास्त इन्कम मिळू लागला होता. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने अगोदर पाहिलेल्या मुलींच्या वडिलांची समजूत काढण्यात आली. रमेश कष्टाळू आणि मेहनती आहे, तो आपल्या मुलीला नक्की सुखात ठेवील अशी मुलींच्या वडिलांची मनधरणी केली तेंव्हा ते लग्नासाठी तयार झाले. कोरोना विषाणूमुळे वाजतगाजत लग्न करण्यास बंदी टाकण्यात आली होती त्यामुळे वीस-पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लग्न सोहळा पार पडला. आता रमेश, त्याची बायको आणि आई-बाबा शेतात काम करत होते आणि अगदी आनंदात जीवन जगत होते. रमेशच्या एकट्याच्या वृत्तीमुळे त्याच्या घरात एवढा फरक पडला होता.

- नासा येवतीकर, 9423625769