मायेची ओढ
कमला दहा वर्षाची पोर. तिला घरातील लोकांसोबत इतर गोष्टीवर देखील खूप प्रेम होतं. तिचे वडील शेतकरी होते तर आई सुद्धा वडिलांसोबत शेतात काम करत असे. तिला एक छोटा भाऊ देखील होता. या सर्वांसोबत घरात एक चार-पाच कोंबड्या, मांजर, कुत्रा, गाय, बैल असे प्राणी देखील होते. त्या सर्व प्राण्यांवर कमलाचा खूप जीव होता. विशेष करून हंमा गायीवर तिचे खूप प्रेम होते. कारण हंमा ही तिची दुसरी आईच होती. जेंव्हा तिचा जन्म झाला होता. तेंव्हा हंमा घरात आली होती आपल्या लहान पिलासह. कारण ही तसेच होते. कमलाच्या जन्मावेळी तिची आई खूपच आजारी असायची त्यामुळे कमलाचे पोट भरत नसे. तिची दुधाची तहान भागावी म्हणून बाबाने हंमाला घेऊन आले होते. हंमा घरात आल्यापासून कमलाचे रडणे देखील थांबले. ती आजही रोज हंमाचे एक ग्लास दूध पिल्याशिवाय शाळेला जात नाही. तिचा आणि हंमाचा असा जुना संबंध होता. कमला चौथ्या वर्गात शिकत होती आणि हुशार देखील होती. ती शाळेला जातांना सर्वाना बाय करून जात होती. ती शाळेला गेल्यानंतर तिचे आई-बाबा शेताला जात असत. कुत्रा घराची रखवाली करत घरी थांबत असे आणि बैलगाडी सोबत गायीला बांधून ते शेताला जात असत. पुन्हा सायंकाळी सर्व एकत्र भेटत असत. ही त्यांची दिनचर्या होती. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी हंमाने एका गोंडस वासरूला जन्म दिला होता.कमलाला तर खूप आनंद झाला कारण तिच्यासोबत खेळायला अजून एक साथीदार आला होता. ते वासरू दिसायला हंमासारखेच होते म्हणून त्याचे नाव चिम्मा असे ठेवले. कमलाच्या शाळेला सुट्या लागल्या होत्या. म्हणून ती दिवसभर घरी राहत असे आणि तिचे आई-बाबा सकाळच्या वेळी दोन-तीन तास काम करून परत येत असत. हंमा घरी आले की चिम्माकडे जात आणि त्याला दूध पाजत पाजत तिला चाटत असे. हे दृश्य पाहून कमला आनंदी होऊन जात असे. उन्हाळा संपत आला होता. काही दिवसांत पाऊस पडणार म्हणून शेतीची उरलेली कामे करून घेण्याची घाई कमलाच्या आई-बाबाला पडली होती. सकाळी रेडिओवर सूचना देण्यात आली होती की, निसर्ग वादळ आज धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणी ही घराबाहेर पडू नका. ही सूचना ऐकून कमलाने आई-बाबाला शेताला जाऊ नका असे सांगत होती. तरी एक-दोन तासांत काम करून परत येऊ म्हणून तिचे आई-बाबा बैलगाडी घेऊन सोबतीला हंमाला घेऊन गेले. कमला चिम्मा सोबत खेळत होती, तिला कुरवाळत होती. थोड्या वेळात आकाशाचा रंग बदलू लागला. भक्क उजेडच्या जागी काळाकुट्ट अंधार पसरू लागला. सर्वत्र काळे ढग जमा झाले आणि काही क्षणात जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाले. कमलाला आई-बाबा आणि हंमाची काळजी वाटू लागली. तिकडे शेतात आई-बाबा शेतात काड्या वेचून शेत साफ करत होते. बैलगाडी शेताच्या कडेला सोडून तिथेच बैल बांधली होती. तर हंमाला एका झाडाखाली बांधून तिच्यासमोर चारा टाकून ठेवला होता. तिघेजण तीन दिशेला होते. त्याचवेळी वादळ आणि पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊ लागला. आई-बाबाला कमलाची काळजी लागली. एवढ्या पावसात घरी परतण्याचा विचार त्यांनी केला पण वारा खूप जोरात होता. एक मोठी वीज चमकली आणि कानठळ्या बसावे असा आवाज झाला. कमलाच्या आई-बाबाचे डोळे दिपून जावे असा प्रकाश पसरला आणि काही कळायच्या आत हंमा गाईवर वीज कोसळली. हंमा जागच्या जागी ठार झाली. त्या लख्ख उजेडाने ते दोघे ही बेशुद्ध झाले होते. शेजारच्यानी त्यांना शुद्धीवर आणलं. हंमा गाय सर्वाना सोडून गेली याचं त्यांना खूप दुःख वाटलं. ही बातमी कमलाला कशी सांगावी ? ती तर किती रडेल आता ? याचा ते विचार करू लागले. काळजावर दगड ठेवून कमलाला ही बातमी सांगितली तेंव्हा तिने वासरा सारखा हंबरडा फोडला. तिचे पिल्लू चिम्मा दीड दोन महिन्याचे झाले होते. सर्वजण आले पण माझी आई दिसत नाही म्हणून चिम्मा रस्त्याकडे डोळे लावून हंबरत होती. तिला कसं सांगणार की तिची आई हंमा आता येणार नाही म्हणून. त्यादिवशी रात्री कोणालाच डोळ्याला डोळा लागला नाही, चिम्मा देखील. सकाळ झाली, कमलाने रडत रडत आपल्या बाबाला म्हणाली, ' माझ्यासाठी तुम्ही हंमा आणली होती ना, आता चिम्मासाठी तसाच एक हंमा आणा.' कमलाचे वडील लगेच उठले आणि दुसरा एक हंमा आणला खास करून चिम्मासाठी. मायेची ओढ पूर्ण झाली तरच जीवन जगण्यात आनंद वाटतो. आज ही आकाशात काळे ढग जमा झाले आणि वादळ सुटलं की कमलाला हंमाची आठवण येतच येते आणि तिचा जीव कासावीस होतो.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769