प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 6 Subhash Mandale द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 6

क्रमशः-

६.
भाऊ- " तोंडातून आवाज येत नाही. पोट फुगलंय. गाडीत डोळे झाकून गप्प पडून आहेत. बर त्या मेडीकलवाल्या बाई आल्या आहेत. आता मेडीकल उघडायचं चाललंय. गोळ्या घेतो. आता ठेव फोन आणि काळजी करू नकोस. सगळं ठिक होईल. मी तुला घरी गेल्यावर फोन करतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री जेवण करायला बसलो होतो, ते जेवणाचं ताट तसंच पडून होतं. जेवनाचा खरकटा हात धुवायचं देखील भान विसरून गेलो होतो. पुन्हा जेवायची इच्छा नव्हती. दादांच्या काळजीनं पोटात सतत कालवाकालव होतं होती. मन शांत बसत नव्हतं. झोप तर केव्हाच उडाली होती. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने भाऊला फोन केला, पण आत्ता त्याचा फोन बंद लागायला लागला.

मला सुचायचंच बंद झालं. घाबऱ्या घुबऱ्या होऊन कसं बसं भावाला सतत फोन करून चौकशी करत होतो आणि तोही घाबरला होता. कदाचित मानसिक आधार मिळेल म्हणून त्याने मला फोन केला असेल, पण माझ्या सततच्या फोनमुळे तो त्रासला असेल. त्याला वाटलं असेल, 'हा काय पुण्यातून इथं मदतीला येणार नाही. आपलं आपल्यालाच सगळं निस्तारावं लागणार आहे. मग उगाच याला फोन करून सांगितले. त्यापेक्षा आपल्याला जसं सुचतंय तसं करायला पाहिजे होतं.'
डोक्यात एकाच विचाराचं थैमान सुरू होतं, 'दादा बरे असतील का ?' खरी स्थिती समजण्यासाठी मला कसल्याही परिस्थितीत गावी गेलं पाहिजे. माझ्याकडे पैसा आहे, पण दादांच्या दुखण्याला उपयोगी पडत नाही. याची हुरहूर मनात लागत होती. दादा फोनवर एकदाही बोलले नाहीत.आई देखील बोलली नाही आणि आत्ता या घडीला भाऊने फोन बंद करून ठेवला आहे. याची मनाला सतत बोचणी लागत होती. पहाट झाली, तरीही रूमवर इकडून तिकडे माझ्या येरझाऱ्या चालूच होत्या. पाच साडेपाच वाजता बैचेन अवस्थेत खुर्चीवर बसलो. बसल्या जागी कधी झोप लागली, ते माझं मलाच कळालं नाही."
सकाळचे सात वाजले असतील, बटन दाबल्यानंतर लाईट चालू व्हायला जितका वेळ लागतो, अगदी तितकाच वेळ मला जाग यायला आणि खुर्चीवरुन उठून उभा रहायला वेळ लागला. पटकन फोन हातात घेतला आणि गावी दादांच्या फोनवर फोन केला. रिंग होत होती. मी स्वतःलाच दोश देऊ लागलो, 'तिकडे दादा आजारी असतानाही माझी इतका वेळ झोप लागलीच कशी ? ' फोन उचलला. मी बोललो, " हॅलो !..दादा ! "
तिकडून आईचा आवाज आला, " हा...बोल." फोनवर पहिले दादा बोलायचे नंतर आई. पहिल्यांदाच असं घडत होतं, की फोनवर आई बोलत होती. तिचा सुरवातीला आवाज ऐकला आणि सनकन आंगावर काटा उभा राहिला. दादा फोनवर का बोलले नाहीत ?‌ या विचाराने माझ्या हृदयाची धडधड वाढली. अंग चपके मारायला लागलं. सर्वांगाला घाम फुटला. मला फोनवर बोलता येईना. माझी बोबडीच वळली होती. पुन्हा तिकडून आईचा आवाज आला, " त्यास्नी बरं हाय. आंघोळ करत्यातं म्हणून मी ‌उचलला." हे ऐकून थोडा जीवात जीव आला.
मी- " त्यांच्याकडं दे. " आईने दादांच्याकडे फोन दिला. दादा बोलले, " आत्ता बरं हाय , पण रात्री लय त्रास झाला. मध्यरात्रीपासून दुखायचं बंद झालंय."
मी - " काय झालं होतं ?"
दादा - " काल दुपारपासून लघवीला आलं नाही.त्यामुळं पोट फुगलं. काय बोलावं तर पोट फुटेल अशी अवस्था झाली होती. रात्री घरी आल्यानंतर लघवी झाली. लगेच फुगलेलं ओसारलं आन् पोट दुखायचंबी राहिलं."

मी- " दुखणं अंगावर काढू नका. पैसे लागले, तर सांगा. पण चांगल्या दवाखान्यात जावा."

दादा- " आमची काळजी करू नकोस. तु व्यवस्थित रहा. नुसतं काम काम करत बसू नकोस. तुला काय झालं, तर तो पैसा आमच्या कामाचा ? जीवाची लय तकतक करत बसू नकोस. आम्ही सगळे ठिक आहोत. तु ठिकठाक रहा." असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.

फोनवर दादांचा नुसता आवाज ऐकला आणि माझ्या हातावर मी माझं पेटतं काळीज काढून ठेवलंय आणि त्या पेटत्या काळजावर कुणीतरी थंड पाण्याचा शिडकावा करत आहे, असं वाटलं.


क्रमशः