निर्णय - भाग ७ Vrushali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्णय - भाग ७

निर्णय - भाग ७

" हजार वेळा सांगून झाली माझं... मला कुठेही जायचं नाही " ती वैतागली. ' आधीच माझ्या आयुष्याचे बारा वाजले असताना, ह्या लोकांना फिरायचं सुचतय.' ती मनातच चरफडली. ' तो तसा आणि हे... हद्द झालीय.' वैतागून पाय आपटत ती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली.

" का ग छळते तू तिला..?" मगापासून तीच डोकं खाणाऱ्या तिच्या चुलत बहिणीवर आई जरा चिडलीच. " माहितेय ना तुला..." आईचा स्वर गदगदला. काळजातली धग आवंढा बनून गळ्यात दाटली.

" म्हणूनच तर तिला बाहेर न्यायचं म्हणतेय... जरा बर वाटेल ना. नुसती कोशात गुरफटून बसलीय..... मला नाही बघवत अस तिला " आईची अवस्था बघून बहिणीच अवसानच गळल. चुलत असल्या तरीही सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणी होत्या. त्याच गुपित तर हिलाच पहिलं सांगितलं होतं तिने. तासनतास त्याचे गुणगान ऐकणारी हीच. त्याच्याशी अर्धा तास बोलल्यावर उरला वेळ त्याबद्दल बोलून बोलून हिचेच कान खाणार ती. बरं आपली लाडकी बहीण कोणाच्यातरी प्रेमात आहे म्हणून ही देखील खुश. पण आता.... आता मात्र सतत मस्ती करत असणारी, सतत चिवचिवत असणारी ती अशी गप्प बसलेली बघून घरच्यांचं काळीज हेलावत होत. मस्ती मध्येही कोणाचं वाईट न चिंतनाऱ्या तिची नियतीने मात्र क्रूर थट्टा केली होती.

" अग काकू, तू तरी थोडं तिला मनवायला मदत कर ना...." बहिनीची पुन्हा तिच्या काकीला कळकळून विनंती होती. आईलाही दोघींची अवस्था समजत होती.

तशी ती आधीपासूनच खूप हळवी. जगाला आपण कणखर आहोत हे दाखवायचा प्रयत्न असला तरी आतून काही तिचा स्वभाव बदलत नव्हता. त्यात हा प्रसंग अगदीच तिच्या मनाला लागलेला. तिच्या मनस्थितीची कल्पना सर्वानाच होती परंतु भूतकाळातील प्रसंग उराशी बाळगून आयुष्य काढता नाही येत ना. भलेही वाईट स्वप्न समजून विसरून जाण्याइतका सोपा प्रसंग नव्हता पण तरीही...….

ती बेडरूममध्ये बसून रडून रडून हैराण झाली. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी ती रडतच तर होती. कधी त्याच्या विचारांमध्ये तर कधी स्वतःच्या हतबलतेवर. ना तिची चुक होती ना तीच प्रेम त्याला चूक ठरवत होतं. प्रेम पण कस असत ना. माणसाला किती हतबल करून टाकत. किती दिवस ती असच शोक बाळगून राहणार. कधी न कधी सगळं विसरून नवीन आयुष्य सुरुवात तर करावं लागेल. त्याच्यासाठी ती घरच्यांना मात्र दुखवत होती. ज्याचा तिला काहीच अधिकार नव्हता...... विचार करून मनावर थकव्याची जळमट चढताना तिला बाजूला बहीण बसल्याच जाणवलं. बबहिणीच्या तशा रोखून धरलेल्या नजरेला नजर मिळवणं तिच्यासाठी अशक्यच होत. तीही तशीच बसून कोणीतरी कोंडी फोडायची वाट बघत होती.

" आपल शोक पाळणं संपलं नाही का अजून??" इति तिची बहीण.

तिने थोड्या घुश्श्यातच बहिणीकडे बघीतलं. आता ही अजून किती आणि काय बोलणार ह्याचा विचार करतच ती मनातच दात ओठ खात होती.

" तू येतेयस.... मी विचारात नाहीये.…. सांगतेय " तिच्यावर बोंबलतच तिची बहीण निघाली. चला आता काही पर्याय नाहीच उरला. वैतागतच का होईना पण तिने आपली बॅग भरायला घेतली. आता भलेही कितीही कंटाळा येवो नाहीतर आणखी काही, ही बया तर घेऊन जाणारच.

तिच्या डोळ्यासमोर तो दिवस तरळू लागला. त्याने किती मस्त सरप्राईज दिल होत. उशिरा रात्री तिच्या स्वप्नात तिच्यावर प्रेम करणारा तो अचानक पहाटे तिच्या समोर उभा होता. तिला तर अजूनही स्वप्नच वाटत होतं. स्वप्नासारखाच होत सगळं. आणि आता...... त्याच ठिकाणी पुन्हा.... जिथे स्वप्नांची माळ गुंफण चालू झालेलं. परतून तिथेच जायचं भकास डोळ्यांनी आणि रित्या मनाने....आणि त्याच्या आठवणींचं काय...

सगळ्या विचारांनीच तिची झोप कधीच उडून गेली होती. पहाटेचा अलार्म वाजला तशी ती यंत्रवत उठली. खरंतर सारं अंग जडावलेलं. मन आणि शरीर दोन्ही तिच्या कृतीला साथ देत नव्हत. पण तिच्यासमोर काही चालणार नाही म्हणूनच ती मनाविरुद्ध तयार होत होती. साधारण अर्ध्या तासात बहीण तयार होऊन तिच्या रूममध्ये आली. ही मात्र बेडवर तशीच अर्धवट तयार होऊन बसून होती.

" काय हे यार अजून तयार नाही झालीस..." बहीण वैतागलीच.

" जाणं गरजेच आहे आणि ते ही..." तिने आवंढा गिळला. तिच्या बहिणीच्या नजरेतून ते सुटलं नाही पण तिने दुर्लक्ष करत तिची बॅग हातात घेतली.

" पाच मिनिटात निघतोय आपण... तू बाहेर ये "

सगळेच पर्याय संपले होते. हरलेल्या योध्याप्रमाणे झुकलेल्या खांद्यांनीच बाहेर येऊन ती गाडीच बसली. जाताना आईला साधं बाय करायचही ध्यानात नव्हतं. तिच्या बहिणीने हळूच तिच्या आईकडे बघून डोळे झुकवले. तिला बाय करून गाडी स्टार्ट केली.

तिने कारची विंडो ओपन केली. तसही तिला ए सी आवडायचाच नाही. खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळुकच जास्त गार आणि मुलायम असते हा तिनेच लावलेला शोध. विंडो वर डोकं टेकवून बाहेरून स्पर्शून जाणारा वारा नेहमीच तिला सुखावत असे. आताही तो थंडगार झुळुझुळू वाहणारा वारा तिला त्याची आठवण करून देत होता. कितीही त्याच्या आठवणीपासून पळायचा प्रयत्न केला तरीही ती फिरून तिथेच यायची. आताही पुन्हा पुन्हा त्याच्याच आठवणीभोवती पतंगासारख्या गिरक्या घेत होती. कसलं एवढं नात होत देव जाणे, जे तोडूनही तुटत मात्र नव्हतं. रात्रभराच्या त्याच्या आठवणींचं जागरण हळू हळू तिच्या डोळ्यांवर पसरायला लागलं. आपण बहिणीसोबत कुठेतरी चाललोय हे आता तिच्या गावीही नव्हतं. मिटलेल्या डोळ्यांआडून खुनावणाऱ्या त्याला भेटायला ती कधीच स्वप्नांच्या दुनियेत पोचली होती.