आघात - एक प्रेम कथा - 30 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 30

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(30)

शेजारीपाजरी घरात सांगायला यायचे. आजोबा काकुळतीला आल्यागत सारं ऐकायचे. प्रत्येकाला माझी समजून काढायला लावायचे. पण मी हे सारं थोडंच मनावर घेणार होतो. मला फक्त डोळ्यासमोर दिसत होती सुमैया. एकेकदा वाटायचं माझी वाट बघून ती दुसरा कोणीतरी जोडीदार तरी निवडणार नाही ना? किंवा आईवडील घाईगडबडीने तिचे लग्न तर लावून देणार नाहीत ना? असं वरचेवर मनाला वाटायचे. खरंच आपण वेळ करता कामा नये. नाही तर एकदा वेळ गेली की आयुष्यभर पश्चाताप करत बसायची वेळ येईल ही भिती वाटायची.अगोदरचं पत्र पाठवून सुमैयानं आपली नाराजी व्यक्त केली होती. पण आता आपण सावध व्हायला हवं होतं की, ती याच्या पुढचं पाऊल टाकू नये म्हणून. रागाच्या भरात एखादेवेळी काहीतरी निर्णय घेईल आणि आपल्या एका चुकीचा आयुष्याभर पश्चात्ताप करायची वेळ येईल. काहीही होऊ दे. कितीही संकटाला तोंड द्यायला लागू दे. सुमैया आपल्यापासून अलग होता कामा नये. तिच्यासाठी आपण वाटेल ते करायचं. सर्वस्व पणाला लावायचं पण एकदाच लग्न उरकायचं म्हणजे उरकायचंच.शेवटी लोकांनी सांगितलेल्या गोष्टी मनावर न घेता मी कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला.त्यात आजोबांची अशी अवस्था बघवत नव्हती. तरी दुसरीकडं तिला भेटण्याची आतुरता सोसत नव्हती. शेवटी जो निर्णय घ्यायचा तोच मी घेतला. आजोबांचा विरोध डावलून त्यांना कल्पना न देताच निकालाच्या आदल्या दिवशी कोल्हापूर गाठलं. माझ्या खोलीवर गेलो. ठरविलं होतं तिथंच आता कायमचं राहायचं. निदान सुमैयाचं आणि माझं लग्न होईपर्यंत तरी. सगळं साहित्य घेऊन चांगल्या तयारीतच आलो होते. बॅगेतून साहित्य बाहेर काढले.कपडे, साबण, तेल वगैरे ते व्यवस्थित ज्या त्या जागी ठेवले. अंथरुण कॉटवर ठेवलं आणि पाठ टेकली. तशी उद्याच्या निकालाची धास्ती सुरू झाली. उद्याचा निकाल काय असेल आपला? कमी मार्क का असेनात पण मी पास असेन काय? जर आपला एखाद्या विषयात नापास झालो असेल तर सगळे मित्र आपल्याला काय बोलतील? आपल्याला नापास हा शब्द माहीतच नव्हता. मी फक्त पास आणि कितवा नंबर, पहिला की दुसरा! टक्केवारी किती पडली असेल? हाच विचार असायचा. माझे मित्र सुरेश, अनिल, संदिप तिघेही निकालाच्या आदल्या दिवशीच मला पेढे भरवायचे आणि हे घे पहिल्या नंबराचे पेढे असे म्हणून अभिनंदन करायचे. मी खूप आनंदून जायचो.

पण आज मात्र माझ्याजवळ कोणीचं नव्हते. सगळ्यांना तोडलं होतं मी एका व्यक्तीसाठी. दुसरा विचार डोक्यात होता तो, कसं समजून सांगायचं सुमैयाला? ती उद्याला नक्कीच आपल्यावर नाराज असणार तिची कशी मनधरणी करायची? तिला कसं पटवून सांगायचं? माझी काहीच चूक नाही याचं कारणही तिला सगळं पटवून सांगायचं होतं. त्याशिवाय तिचा गैरसमजही दूर होणार नव्हता. पण याचं काही एवढं विशेष वाटत नव्हतं पण यापेक्षा निकालचं मला महत्त्वाचा वाटू लागला होता. जर आपण नापास झालो तर आपल्याला सगळीचं दूर करतील, नाकारतील कोणीच जवळ करणार नाही. सुमैया आपल्याला दूर करणार नाही ना? हाही प्रश्न पडायचा. बेचैन वाटायचं. पण आपण जरी नापास झालो तरीही सुमैया मला दूर करणार नाही. त्या दु:खात तीच माझा एकमेव आधार असेल तरीही सुमैया मला दूर करणार नाही. त्या दु:खात तीच माझा एकमेव आधार असेल तिचं मला आधार देईल. माझी समजूत काढेल. पण आपण नापास होण्याचा का विचार करतोय. मी तर पास होणार म्हणजे होणारच.

अखेर निकालाचा दिवस उजाडला. निकालासाठी म्हणून लवकरच कॉलेजात हजर झालो. निकालाच्या टेन्शनमध्ये सुद्धा सुमैया कुठे दिसते का हे पाहत होतो. पण ती मला कुठे दिसलीच नाही. सुरेश, संदिप आणि अनिलही लवकर आले होते. ते मला दिसले. त्यांनीही मला पाहिलं, पण त्यांनी माझ्याशी बोलले नाही की विचारपूसही केली नाही. एवढ्यात महाविद्यालयाच्या आवारात ब्लॅक बोर्ड आणण्यात आला आणि तो महाविद्यालयाच्या आवारात मध्यभागी लावण्यात आला. अभिनंदनाचा बोर्ड होता तो. गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावं वाचण्यासाठी माझी मोठी धडपड होती. मी पळत गर्दीतून वाट काढत गेलो.पाहतो तर प्रथम सुमैया जाधव, द्वितीय क्रमांक संतोष पाटील, तृतीय क्रमांक सपना पोवार. प्रत्येक वर्षी त्या काळ्या बोर्डवर माझं नाव असायचं. पण पहिल्यांदाच असं होत होतं. ते पाहून खूप वाईट वाटलं. केविलवाण्या नजरेने त्या बोर्डाकडे पाहात होतो. मलाही अंदाज होताच की आपला यावेळेला नंबर येणार नाही.पास

होण्याची भीती वाटत होती मला. तर नंबराच राहिलं बाजूलाच. मी आपला अधाशासारखा नंबर आलेल्यांची नाव पाहत बसलो होतो. सुमैयाचा पहिला नंबर आल्याचे पाहून मला आश्चर्यच वाटतं होतं. ही तर आपल्याबरोबर कायम आसायची. दिवस दिवसभर आम्ही गप्पाटप्पात रंगायचो. हिने अभ्यास कधी केला? हिचा पहिला नंबर कसा आला? हे रहस्यचं वाटत होतं. अजबच वाटतं होतं. मी या विचारातच तिथं उभा होतो. एवढ्यात आमच्या वर्गातली दोन-तीन मुलं आली. आणि म्हणाली,

‘‘अरे, प्रशांत निकाल घेतलास की नाही?’’

‘‘नाही अजून.’’

‘‘अरे, मग घे जा की.’’

‘‘अजून द्यायला चालू केला नाही.’’

‘‘हे काय आम्ही घेऊन आलो नव्हे.’’

राज आणि शेखरने घेऊन आलेले निकालपत्र दाखविले.

“होय जातो आता.”

असं म्हणून निकालपत्र घ्यायला गेलो. एवढ्यात समोर स्नेहल.

‘‘प्रशांत निकाल घेतलास काय? पास आहेस नव्हं?’’

‘‘म्हणजे तुला काय शंका वाटते?’’

‘‘काही नाही तुझ्याबद्दल ऑफिसमध्ये काहीतरी चर्चा चालू होती.’’

‘‘काय चालू होती सांग ना?’’

‘‘काय मी लक्ष दिलं नाही. पण तुझे नाव घेतलेलं मी दोन-तीन वेळा ऐकलं होतं. बरं ते जाऊ दे. पण प्रशांत काय रे यावेळी नंबर नाही आला?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘आता काय सांगू तुला?

‘‘मग तुला एवढं तिच्यात गुंतायची काय गरज होती? ती तुझ्यात न गुंतता तुला झुलवत राहिली आणि तू मात्र झुलत राहिलास सारं विसरून आणि मग मारली बाजी तिनं.’’

‘‘होय, स्नेहल बरोबर हाय तुझं.’’

‘‘बरं, पहिला ऑफिसमध्ये जा आणि निकाल घेऊन ये.’’

‘‘हो. मी निकाल घेऊन येतो, पण मला सुमैया कुठे आहे ते पहिलं सांग.’’

‘‘मी सांगेन कुठं आहे ते. पहिला निकाल घेऊन ये. सुमैया आणि मी शेजारच्या बागेत आहे, तिथे ये तू.”

‘‘पण आता कुठे आहे ती?’’

‘‘तू ये पहिला आम्ही आहे शेजारच्या बागेतच.’’

मी पटकन कार्यालयात गेलो. मनाची धगधग वाढलेली होती. ऑफिसमध्ये जाताच सगळेपण संशयित नजरेने माझ्याकडे पाहू लागले. मला काहीच कळत नव्हतं. क्लार्ककडे जाऊन निकालपत्राचा मागणी केली. निकालपत्र घेतले आणि आतुरतेनं पाहू लागलो. तोच इंग्रजीच्या विषयात ५ मार्काने नापास झालो होतो. डोक्यावरती आभाळ कोसळल्याचा भास झाला. डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं. पण सावरलो, निकालपत्रक पाहत असताना इंग्रजीचे प्राध्यापक शहापूरे सर आले आणि मला म्हणाले,

‘‘काय झालं चेहरा उदास करायला? वर्षभर मजा करताना कळलं नाही. जरा मोडक्या परिस्थितीची तरी जाणीव ठेवली असतीस तर अशी वेळ आली नसती तुझ्यावर. पण तू भुललास वरलिया रंगा आता कर हमालीचा धंदा. सुखाच्या क्षणाला सगळी असतात. आता कोणी येत नाही. या दु:खाच्या क्षणी येईल अनुभव तुला. सुधरा आता तरी. बघ सुटतोय काय विषय पुढच्या वेळेला? नाहीतर वाऱ्या करत बस.’’

मला माझ्या चुकीची आता पूर्ण खात्री झाली होती. मी फार मोठी चूक केली होती. ती चूक कधीच भरून निघण्यासारखी नव्हती. आता समोर तर अंधार होता. पुढचा मार्गच शिल्लक राहिला नव्हता. काय करायचं? कुठं जायचं? प्रत्येकाच्या प्रश्नांचं उत्तर काय द्यायचं? मोठा प्रश्न पडला होता. तशा अवस्थेत माझा पडलेला चेहरा घेऊन जवळच्या बागेत गेलो.

तिथं सुमैया आणि स्नेहलने माझा पडलेला चेहरा पाहून स्नेहलनं विचारलं,

‘‘कोणता विषय गेला?’’

‘‘इंग्रजी.’’

‘‘खरंच आमच्या कल्पनेपलिकडची गोष्ट झाली म्हणायची. ज्या मुलीचा नंबर येणार नाही असं वाटत होतं तिच मुलगी प्रथम क्रमांकाने पास होते. ज्या मुलाचा प्रथम क्रमांक येणार जो चांगल्या गुणांनी पास होणारा असा तो चक्क नापास होतो. किती मोठं आश्चर्य आहे हे!’’

******