Aaghat - Ek Pramkatha - 31 - last part books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 31 - अंतिम भाग

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(31)

‘‘बरं ते जाऊ दे, आता जे झालंय तीच गोष्ट बोलत बसण्यात काहीच अर्थ नाही. पुढली दिशा काय ते ठरवं.’’

‘‘आता कुठली आलीया पुढची दिशा, माझ्या दिशांवर अंधार पसरलायण आता.’’

‘‘असं बोलून खचू नको काहीतरी हालचाल केल्याशिवाय तुला पर्याय नाही.

बघ प्रयत्न करू. तुम्हा दोघांमध्ये आणखी माझी अडचण नको. बसा बोलत तुम्ही. मी जाते, मला वेळ होतोय.’’

स्नेहल निघून गेली. आता होतो फक्त सुमैया आणि मी.

‘‘काय रे अभ्यास अजिबात केला नाहीस का? तू नापास होशील अशी कल्पनादेखील केली नव्हती. माझीही सगळी स्वप्न भंग केलीयस. पुढचं प्लॅनिंग सगळं विस्कटून टाकलंयस.’’

‘‘म्हणजे काय बोलतीस तू?’’

‘‘एखाद्या नापास झालेल्या मुलाशी संगत करणं आता मला नको वाटायला लागलंय. मी एवढी टॅलेंटेड असून तू मात्र शून्य निघालास.’’

‘‘अगं पण मी मुळात शून्य आहे काय सुमैया? हे कोणामुळे झालं सगळं?’’

‘‘कोणामुळे झालं?’’

‘‘तुझ्या प्रेमात पडल्यामुळे ना?’’

‘‘पण मी काय तुला अभ्यास सोड म्हटले होते काय?”

‘‘पण मी वेडावून गेलो तुझ्या त्या वाढत्या सहवासाने, जवळकीतेने.’’

‘‘हा दोष कोणाचा तुझा की माझा?’’

‘‘तुझ्यामुळेच ना झालं सगळं.’’

‘‘मग तुझ्या प्रेमात पडून मला का नाही झालं आसं?’’

‘‘ते काहीही असो पण मी माझ्या मनावर ताबा मिळवू शकलो नाही. ही माझी चुकी आहे. पण मला आता सुधारायचं आहे. नव्याने चांगला अभ्यास करून पुढची परीक्षा द्यायची आहे.’’

‘‘मग देना, परीक्षा दे, पास हो माझी काहीही हरकत नाही.”

‘‘पण तू असं तुटक तुटक का बोलतेस?’’

‘‘मला माहीत आहे, मी सुट्टी पडल्यानंतर परीक्षा संपल्यानंतर तुला काही कल्पना न देताच गावी गेलो. याचा राग तुझ्या मनात आहे ना. पण त्यावेळी झाले नेमके असे, मी शेवटचा पेपर देवून खोलीवर आलो. आवराआवरी करायची आणि तुला भेटायला जायचं असं ठरविलं होतं पण अचानक अनिल खोलीवर आला. आजी गंभीर आजारी असल्याची बातमी घेऊन. मी पटकन साहित्य घेतलं आणि गावी आलो पाहतो तर आजी मला कायमची सोडून गेली होती. मग तशा अवस्थेत मी तुला कसं कळवणार? दुसरी गोष्ट म्हणजे आजोबांना सांभाळायची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर येऊन पडली. घरामध्ये दु:खाचं वातावरण, त्यात तुझं पत्र येताच तुझ्या पत्राला उत्तर देऊन तुझा गैरसमज दूर करायचं ठरविलं. पत्र लिहिलंही पण पत्र लिहून झाल्यानंतर लक्षात आलं की पत्र पाठविल्यानंतर तुझ्या आईबाबांच्या हातात जर पत्र गेलं तर मोठा घोळ होईल. विनाकारण आपल्या दोघांना त्रास नको म्हणून मी पत्र पाठविलंच नाही.”

‘‘मला माफ कर माझी थोडीशी चूक झाल्याबद्दल, खरंतर

मला तुझी खूप आठवण आली. सतत बेचैन होतो तुझ्यासाठी पण काय करणार? मला माफ केलंस ना?’’

‘‘मी कोण आहे? तुझी? तुला माफ करणारी?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘जे समजायचं आहे ते समज.’’

‘‘स्पष्ट सांग सुमैया.’’

‘‘म्हणजे तुझा आणि माझा संबंध काय?’’

‘‘असे काय बोलतेस सुमैया? मी आज जो आहे तुझ्यामुळेच तुझ्या आधार व प्रेमामुळेच तुझ्याविना माझं जगणं अशक्य आहे.”

‘‘पुरे कर आता तुझं ते कायमचं वाक्य. कंटाळा आलाय मला त्या वाक्यांचा. तुझा मार्ग तू बघ. मला पुढं शिकायचं आहे.’’

‘‘अगं, मग मलाही शिकायचं आहेच ना?’’

‘‘मग शिक ना. तुला कोण नको म्हटलंय. पण माझ्याशी संपर्क तोडून टाक. पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नको.’’

‘‘अगं काय बोलतेस हे? आता माझी गरज संपली का?’’ ‘‘काय केलयसं रे तू माझ्यासाठी? गरज संपली म्हणायला? तुझ्या परीक्षेचे पैसे मी भरले. घरभाडे मी दिले. तुझ्या जेवणाची सोय मी केली. त्याचे पैसे मी दिले. काय दिलंस रे मला तू? गरजेपुरतं नुसता आलास उपभोग घेतलास निघून गेलास.’’

‘‘सुमैया असं बोलू नको. माझं प्रे खरं आहे. स्वार्थी नाही. मला मान्य आहे तू माझ्यासाठी खूप काही केलयसं पण तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही, असं तू बोलू नको. कारण तुझ्यासाठीही मी खूप गोष्टीचा त्याग केलाय. कित्येक वर्षांचे ऋणानुबंध असलेलं माझं हॉस्टेल, तुझ्या सांगण्यावरून सोडलं. तिथल्या सरांचं माझ्यावर असलेलं प्रेम,विश्वास एका क्षणात मी त्यांचं मन मोडलं.त्यांच्या प्रेम,विश्वासाला तडा घालविला. कुणामुळे तूच सांग? मी माझ्या जिवलग मित्रांना तुझ्यामुळे दुखविलं. त्यांच्याशी असलेली कित्येक वर्षाची मैत्री तोडली तेही तुझ्यामुळेच. महाविद्यालयातील सगळ्या शिक्षकांच्या मनातून उतरलो.

त्यांच्यापासून दुरावलो तुझ्यामुळेच. आजोबा आजारी असताना त्यांना सोडून मी इथपर्यंत आलो तुझ्यामुळेच.”

‘‘ते सगळं बरोबर आहे, पण आता आपण झालं गेलं विसरून जाऊया. मला नाही ह्या प्रेम वगैरे गोष्टीत पडायचं.’’

‘‘ठीक आहे, माझा वापर होतोय तोपर्यंत, वापर करत होतीस आणि आता मला वाऱ्यावार सोडतेस मी नापास झाल्याची तुला लाज वाटत आहे ना?’’

‘‘होय, सगळ्याचीच लाज वाटतेय. मला आता तुझीच लाज वाटू लागलीय. तू माझ्या मार्गात पुन्हा येऊ नको.’’

‘‘नाही सुमैया ते शक्य नाही. मी लग्न करेन तर तुझ्याशीच.’’

‘‘लग्नाची वगैरे खोटी स्वप्न पाहू नको. तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या भिकारड्याबरोबर लग्न करायला काय मी महामूर्ख नाही.’’

भिकारड्या हा शब्द माझ्या मनाला लागला. आजपर्यंत हीनं मला इतकं प्रेम , आपुलकी दिली, सुखदु:खात आधार दिला, पण आज माझा तिला तिरस्कार तर वाटतोय पण तिनं माझ्या कमतरतेची आणि गरीबीची भिकारड्या म्हणून जाणीव करून दिली होती. काळजाला छेदणारं हे वाक्य होतं. एकमेव आधार असणार माणूसच असं बोलत होतं. ज्या व्यक्तीचा आता उर्वरित आयुष्यात मोठा आधार वाटत होता, त्याचं व्यक्तीनं मला क्षणात नाकारलं होतं. तिला जगायचं होतं, नवं आयुष्य ज्या आयुष्यात मी नसेन. असतील नवे मित्रमैत्रिणी आणि नवी सारी दुनिया आमच्या सहवासात घडलेल्या घटनांचाही तिला तिरस्कार वाटत होता. परीक्षेतील यशानं तिला असामान्य मिळालं होतं. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्याबरोबर राहणं, वावरणं तिला योग्य वाटत नव्हतं. तिला हवा असेल कदाचित तिच्या सारखाच तिच्या टॅलेंटला शोभणारा कुणीतरी. आता तिच्या स्वभावात तर बदल झाला होताच, पण त्या अनुषंगानं माणसाची दोन रूपं अनुभविली, आतील आणि बाहेरील.

एकाकी अचानकपणे तिनं मला नाकारलं होतं. ही गोष्ट खूप दु:खदायक होती. तशी मी तिला मानत होतो, तशी ती नव्हती. हे या वाक्यांनी कठोर शब्दांनी सिद्ध झालं होतं. फार मोठी चूक करून मी फसलो होतो. फार मोठा पश्चात्ताप झाला होता.

तरीही त्यावेळी तिला मी खूप विनवण्या केल्या. तळमळीनं सांगितलं.

‘‘तुझ्यासाठी मी रात्र-दिवस राबेन पण तुला सुखात ठेवने. मला असं एकाएकी नाकारू नको सुमैया.’’

‘‘अरे, जो स्वत:चं पोट भरू शकत नाही, तो दुसऱ्याचं काय भरणार आहे?”

‘‘पण मग आपलं लग्न!’’

‘‘लग्न छे! मनातून हे काढून टाक. अंथरुण बघून पाय पसरावेत तू कुठे? आणि मी कुठे? स्वप्ने बघ पण तुझ्या आटोक्यातली बघ. फार मोठी नको पाहू स्वप्ने.’’

तिच्या या कठोर शब्दांनी घायाळ झालो होतो. सगळ्या दिशा अंधारमय झाल्या होत्या. आभाळ कोसळलं होतं. आता खरी एकटेपणाची जाणीव मला झाली होती.

मी काकुळतीला येवून तिला विनवण्या करीतच होतो.

‘‘तुझ्या सर्व अटी मला मान्य आहेत पण मला असं एकटं सोडू नकोस सुमैय्या.”

‘‘माझ्या काहीच अटी नाहीत, तू स्वतंत्र आहेस, तुझं आयुष्य तुला जगायचं आहे.’’

‘‘प्लीज मला विसरुन जा. मला माझं नवं आयुष्य जगायचं आहे. मला भुतकाळ विसरायचा आहे. तुही तुझं नवं आयुष्य जग. भुतकाळ विसरून जा.”

‘‘सुमैया भुतकाळ विसरायला तो काही भातुकलीचा खेळ होता काय? ती वचनं, त्या शपथा, तो सहवास त्या सुखी संसाराच्या गुजगोष्टी कस विसरणं शक्य आहे? ते जगणं आणि ते क्षण खोटे होते काय? एखाद्या जीवाशी खेळायला तो खेळ होता काय?”

“हवं तर तू त्याला खेळ म्हण,जीवाशी खेळणारा अथवा भातुकलीचा.” मला हे सर्व विसरणं शक्य आहे. तुही विसरून जा. मला माझं नवीन आयुष्य जगायचं आहे आणि प्लीज ओढून ताणून नाती जुळवण्यात काहीच अर्थ नसतो, माझ्या मनात नसताना देखील तू उगीच माझ्या मर्जीविरुद्ध का वागण्याचा प्रयत्न करतोयस? मी या क्षणाला तुझी कोणीही नाही, हे लक्षात ठेव. इथून पुढे माझ्या आयुष्यात तू ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नको अन्यथा त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ते कोणते परिणाम हे तुला माहीत आहेतच.ते अनुभवलाही आहेस ही भेट आपली शेवटची भेट असेल. तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!’’

‘‘सुमैया प्लीज माझं ऐक मला सोडून जाऊ नकोस. सुमैया मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. सुमैया थांब.’’

माझी आर्त हाक तिला आता ऐकायला जाणार नव्हती. क्षणात सारी स्वप्नं धुळीस मिळाली होती. मी फसलो होतो, एका मोहजाळात अडकून. ना परिस्थितीची जाण होती ना भान होतं. मनाला वाटेल तसं वागत गेलो होतो, त्याची शिक्षा मला आता मिळाली होती.

आजोबा या जगातून गेल्याची बातमी कानावर पडली आणि मी सुन्नच झालो. आभाळ कोसळलं होतं. सगळी स्वप्नं हवेत विरून गेली होती. नवं ध्येय, जिद्द, उमेद घेऊन आलेला मी. माझ्याबरोबर सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. ज्यांनी ज्यांनी मला उभं केलं होतं त्या साऱ्यांनाच तोडलं होतं. किंबहुना माझ्यापासून सारे दुरावले होते. माझी आजी माझं दुर्लक्ष झाल्यामुळे ती या जगातून निघून गेली होती. सुमैयाच्या सांगण्यावरून मी आजोबांना उतारवयात एकटं सोडून आलो. त्यांना माझ्या दुराव्याचं दु:ख सहन झालं नाही आणि तेही या जगातून गेले. तिचं नाकारणं, आजोबांचाही अनपेक्षितपणे मृत्यू या एका पाठोपाठ बसणाऱ्या आघातांनी मी मोडून पडलो होतो. या सर्व गोष्टींना सर्वस्वी मी जबाबदार होतो. मला मदत, उभं करणाऱ्या, आधार देणाऱ्या कित्येकांच्या काळजावर मी घाव घातले होते, आघात केले होते. त्यांच्या भावनेशी मी खेळलो होतो, त्यांचा गैरफायदा मी घेतला होता, माझ्या आजीआजोबांच्याही भावनेशी मी खेळलो. त्यांचा गैरफायदा घेतला होता, तरीही ते सारं सहन करत राहिले. परमेश्वरांन घाव-आघात झेलण्याचं सामर्थ्य त्यांना दिलं होतं.

आज माझ्यावर बसलेले घाव आणि झालेले आघात झेलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं. मी पुर्णपणे कोसळून गेलो होतो.

*******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED