डॉक्टरने एक्सरेची चिट्ठी अनिलच्या हातात देत अनिलला यायला आणि फी बाहेर द्यायला सांगितले.
अनिल क्लीनिकच्या बाहेर येऊन केमिस्ट शॉप वर औषध घेण्यासाठी गेला, औषध घेता घेता तो कसला तरी विचार करत होता, कोण जाणे त्याच्या मनात काय आले आणि अचानक त्याने औषध देणाऱ्या मुलाला एक्सरे ची चिट्ठी दाखवत ते एक्सरे सेंटर कुठे आहे ते विचारलं
“ते काय समोरच्या बिल्डिंग मध्ये”
अनिलने मागचा पुढचा विचार न करता सरळ एक्सरे सेंटर वर गेला, डॉक्टरने जरी त्याला दोन दिवस खोकला कसा आहे हे बघायला सांगितले होते तरी एवढा धीर धरेल तर ते अनिलच डोकंच कसलं.
“एक्सरे काढायचंय”
अनिल हातातली चिट्ठी रिसेप्शन वर बसलेल्या मुलीला देत बोलला.
“चारशे रुपय होतील”
“चालेल पण रिपोर्ट कधी मिळेल?
अनिलने आतुरतेने विचारले
“फिल्म लगेच मिळते पण रिपोर्ट पाहिजेल तर दोन अडीच तास लागतील आणि पैसे पहिले द्यावे लागतील”
त्या मुलीने स्पष्ट सांगितले,
“ठीक आहे काढा”
अनिल पैसे देत बोलला आणि रिसेप्शन वरील मुलीच्या सांगण्या प्रमाणे आतमध्ये एक्सरे रूम मध्ये गेला. आतमधल्या टेक्निशियनने अनिलला शर्ट काढून छाती एका चौकोनी पाटीला चिटकवून उभं राहण्यास सांगितलं, काही सेकंदात खाट आवाज झाला आणि टेक्निशियनने झालं म्हणून सांगितलं आणि कंम्प्युटर वर अनिलचा एक्सरे बघू लागला.
“काय ओ कसा हे एक्सरे?
अनिलने शर्ट अंगावर चढवत चढवत विचारले
“डॉक्टर सांगतील, आम्हाला अलाऊड नाही काही सांगायचं”
“तरी पण ओ काही तरी सांगा”
अनिलने हळुवार पने विचारले
“मला तर नीटच वाटतंय पण डॉक्टरच सांगू शकतील नीट काय ते, दोन तासाने येऊन रिपोर्ट घ्या मग कळेलच तुम्हाला”
टेक्निशियन कंम्प्युटर वर काम करत करत बोलला.
अनिल तिथून बाहेर निघाला, पण मन आणि मेंदू मात्र एक्सरे जवळच राहिले होते, आता हे दोन तास काय करायचे ते कळेना, भितीतर शिगेला पोहचलेली होती, अचानक त्याच्या मनात एक खट्याळ विचार आला, काय झालं असेल ते असेल, दोन तास येड्यासारखं उभं राहण्यापेक्षा एक क्वार्टर पिऊन येवू तेवढीच भीती तरी मरेल.
अनिल सरळ जवळच्या बार वर गेला आणि आपला ब्रँड आणि शेंगदाणे मागवले, पहिला पेग पटकन संपवून दुसरा भरला, दुसरा पेग संपे पर्यंतर भीती देखील संपली होती, तिसऱ्या पेग नंतर अनिल वाघ झाला आणि मनातल्या मनात बोलला अशीपण एक झालीय अजून अर्धी मारलीतर काय होतंय.
“वेटर एक नायंट्टी आन नायंट्टी”
अनिल झिंगत बोलला.
वेटरने एका छोट्या ग्लासात अनिलची ऑर्डर आणून दिली, अनिलने उरलेली दारू हळू हळू संपवून बिल दिला आणि थेट एक्सरे सेंटर वर गेला, आधीच्या आणि आताच्या अनिल मध्ये एखाद्या केस उगवणाऱ्या तेलाच्या जाहिरातीतल्या फोटो मध्ये जसा बिफोर आणि आफ्टर मध्ये फरक असतो तसा फरक होता.
“झाला का ओ मॅडम रिपोर्ट तयार?
अनिलने कणखर आवाजात विचारलं
“हो काय नाव म्हणालात तुमचं?
“अनिल गोरे, अनिल गोरे”
अनिलने दोन वेळा आपले नाव सांगितलं
त्या मुलीने एक्सरेच्या गठ्ठया मधून अनिलच्या एक्सरे आणि रिपोर्टचे पाकीट काढून दिले, अनिलने ते घेऊन लगेच त्यातून रिपोर्टचा कागद बाहेर काढला आणि वाचायला लागला, रिपोर्टच्या पेपर वर सगळं काही नॉर्मल होत, नॉर्मल अक्षर वाचलं आणि अनिलची अर्धी दारू उतरली आणि अर्धा खोकलापण नीट झाला आणि चेहऱ्यावर एक आगळावेगळा तेज आणि आनंद आला.
ह्या सगळ्या गडबडीत मात्र एक गोष्ट त्याच्या लक्षातच नाही आली ती म्हणजे आपण दारू पिलोय आणि सविता घरी वाट बघतेय आणि आज परत घरात आणीबाणी लागू होणार आणि पुन्हा तेच झगडे भांडण आणि पुन्हा तीच रुसफुग घराचे वातावरण बिघडवून क्लेश निर्माण करणार.