Aajaranch Fashion - 2 books and stories free download online pdf in Marathi

आजारांचं फॅशन - 2

अनिलच्या घरापासून मनोज कापडणेचे घर फार फार तर २०० ते ३०० मीटर अंतरावर आणि मधे नाका, जिथे मित्र मंडळी जमून चहाच्या टपरीवर स्वतःच्या घरातल्या तेल मिठा पासून ते डोनाल्ड ट्रम्प च्या घराच्या विटापर्यँत जेवढ्या शक्य तेवढ्या गप्पा मारत बसायचे.

अनिल नाक्याजवळ पोहोचला आणि पहिली गोष्ट त्याच्या नजरेला पडली ती म्हणजे १० बाय १५ फुटाचा एक मोठा मनोज कापडणेचा हसरा फोटो लावलेला श्रद्धांजलीचा बॅनर,

'भावा सारखा मित्र हरपला, असा कसा हसता हसता सोडून गेलास, भावा तू परत ये'

'मनोज कापडणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली'

बॅनर वरचा मनोजचा हसरा चेहरा आणि लिहिलेले काळे अक्षर वाचून अनिलचा चेहरा पांढरा ठप्प पडला.

"ये आन्या"

अनिल च्या कानावर लांबून शब्द धडकले आणि अनिलने भानावर येत मान आवाजाच्या दिशेने फिरवली, शार्दूल चहाच्या टपरीवरून अनिलला हात हालवून बोलवत होता.

चहाच्या टपरीवर पाच सहा जण अगोदरच जमा झालेले होते, अनिल टपरीवर पोहोचतोय तोच घोरणे पप्या जरा चेष्टेच्या स्वरात बोलला,

"काय गोरे साहेब काय चाललंय, चेहरा पडलेला दिसतोय, काय दुखतंय बिकतंय का काय, सध्या काय सुरुहे?

तेवढ्यात बहिरे निक्या जोरात हसत बोलला,

"अरे ते काय फॅशन हे का, सध्या काय सुरु हे, दुखत त्याला खरंच, तुला काय वाटत तो काय नाटक करतो काय"

"अरे मी कुठं बोललो तो नाटक करतो, तेच सारख कधी ह्याव दुखतंय कधी त्याव दुखतंय करत डॉक्टर कड पळत सुटत, म्हणून मी आपलं काळजी पोटी विचारलं"

"ये घोरण्या तू तुझा शहाणपणा राहूदे, माहित हे मला लई काळजी हे तुला माझी"

चिडलेला अनिल पप्या घोरणेवर गुरगुरला

अनिलचा रागीट आवाज ऐकून सगळे जण चिडीचुप्प झाले आणि तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यातून ऍम्बुलन्सचा घुंग घुंग आवाज सगळ्यांच्या कानावर पडला आणि तश्या सगळ्यांच्या माना त्या दिशेनी फिरल्या आणि पावले आपोआप मनोज कापडनेच्या घराकडे लगबगीने चालू लागले.

मनोज कापडनेच्या घराजवळ खूप गर्दी जमली होती, एखादा चाळिशीतला माणूस जर आकस्मित गेला तर गर्दी होणे स्वाभाविकच आहे, आणि जमलेल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने मनोज किती सज्जन आणि मदतनीस होता हे एकमेकांसोबत हळू हळू कुजबुजत होते, मरणाचं हे एक चांगलं असतं, सगळे तीर्थ करून आलो, गंगा नाहुन आलो, अष्टविनायक केले, वेलंकनीला जाऊन आलो किंवा मक्का मदिनाला जाऊन आल्यावर देखील माणूस जेवढा शुद्ध आणि सज्जन होत नाही किंवा त्याचे पाप धुवून निघत नाहीत, तेवढे मरणाने निघतात, मेलेला प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, त्याने नेहमी अडलेल्या नडलेल्याची मदत केलेली असते, त्याला कधीच कसली घमेंड नसते, पैशाने जरी नाही तरी मनाने तो राजाच असतो, सगळ्या नातेवाईकांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याने आवर्जुन हजेरी लावलेली असते, प्रत्येक कामात पुढाकार घेतलेला असतो आणि प्रत्येकाच्या हाकेला रात्री अपरात्री धावून गेलेला असतो, वैगेरे वैगेरे..

जवळचे नातेवाईक, आई वडील, भाऊ बहिणी, बायको मुलांची शोकांकित वेदनीय होती, आई, बहीण, बायको आपल्या आपल्या वेदना रडण्यातून शब्दाने गात होत्या, मनोजला हाक मारून मारून परत बोलवत होत्या.

अनिल एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळे गंभीर पणे बघत होता आणि चेहऱ्यावरचे हाव भाव असे होते जणू त्याच्या मनात असे विचार येत होते कि मी पण लवकरच मरणार आणि मी मेल्यावर पण लोक असेच बोलणार, माझी बायको आणि नातेवाईक असेच रडणार, अनिल पूर्ण पणे विचारांच्या दरीत कोसळून पडला होता आणि त्याचा आघात मेंदूवर आणि मनावर तीव्र व्रण सोडत होते, त्याचा हात राहून राहून छाती कडे जात होता आणि तो मध्ये मध्ये मनगटावर अंगठा ठेवून हृदयाचे ठोके देखील मोजत होता.

शेवटी मनोज कापडणेची अंत यात्रा निघाली, स्मशानात पोहचली आणि काही वेळाने अंत विधी आटपून, स्मशानात असलेल्या एकमेव नळाखाली त्यातील येणाऱ्या करंगळी एवढ्या पाण्याने तोंड, हात, धुवायला गर्दी करून हात पाय धुवून लोक स्मशान बाहेर पडायला लागले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED