आजारांचं फॅशन - 5 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 5

सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास अनिलचे डोळे उघडले, अनिल छातीला हात लावूनच उठला, आता ही नुसती दुखण्याची भीती असेल किंवा कदाचित छातीत दुखतही असेल, रात्रीची दारू आणि अबरचबर खाणं ह्या मुळे ऍसिडिटी तर होणारच ना, पण अनिलला साधी ऍसिडिटी देखील सिरीयस हार्ट अटॅक आहे असे वाटणे म्हणजे त्याच्या स्वभावाचा एक अविभाज्य घटक, अनिल बेड वरून उठला सरळ बाथरूम मध्ये गेला आणि दहा बारा मिनिटांमध्येच अंघोळ वैगेरे आटपून बाहेर आला, देव्हाऱ्या समोर जाऊन पूजा केली, आपल्या विशिष्ट शैलीत देवाच्या पाया पडला आणि सरळ पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेला, अनिलने असे कुठे तरी ऐकले होते की अंघोळ केल्या नंतर पाणी पिल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, म्हणून अंघोळ झाल्या झाल्या पाणी पिणे हा त्याचा नेहमीच नित्त्यक्रम.

सविता किचन मधेच होती, अनिलने गुपचूप पाण्याची बॉटल घेतली चार पाच घोट पाणी पिला आणि, सविता जवळ जाऊन हळूच बोलला

"गुड मॉर्निंग सविता डार्लिंग"

सविताने ऐकून न ऐकल्या सारखे केले आणि अनिलकडे लक्ष न देता आपलं काम करण सुरु ठेवलं.

सविताचा थंड प्रतिसाद बघून अनिल केविलवाण्या स्वरात बोलला

"असं काय करती ग, बोललो ना सॉरी, आज पासून जर परत पिलो तर बोल तू, जे झालं ते सोड ना, आता काय आयुष्य भर बोलणार नई का?

"हा नईच बोलणार, तुम्हाला प्रेमाने समजावून बघितलं, रागावून बघितलं पण तुम्ही काय सुधरत नई, तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही, मी पण आता गुपचूप आपलं काम करणार आणि माझ्या लेकरांकडं लक्ष देणार, तुमच्याशी काही देणं घेणं नई मला"

सविताचा आवाज रात्री पेक्षा खूप हळुवार आणि गंभीर होता.

"तुझी इच्छा पण मी तुला वचन देतो आज पासून नई पिणार अजिबात, जाऊदे चाललो मी गॅरेज वर, संध्याकाळी मी लवकर येतो पोरांला घेऊन पाणी पुरी खायला जाऊ, तयारी करून राहा"

एवढे बोलून अनिलने पाठ फिरवली आणि किचन च्या बाहेर पडणार तेवढ्यात सविता ओरडली.

"हे एवढं जेवण काय फेकून देण्या साठी केलय का, गपचूप खाऊन घ्या अन मग जा"

अनिलने पाठी वळून न बघता एक स्मित हास्य दिल आणि मागे न बघताच

"वाढ मग थोडं" बोलत बाहेर जाऊन नाश्ता करायला बसला.

सविताने ताट वाढून अनिल समोर आणून ठेवले, कालच्या आणि आजच्या सवितामध्ये खूप फरक होता.

अनिल नाश्ता करून मुलांना टाटा करून गॅरेज वर जायला निघाला, गॅरेज घरापासून केवळ दहा ते बारा मिनिटांच्या अंतरावर होत, बाईकने येणे जाणे हा त्याचा रोजचा नित्यक्रम, रस्त्यात चहाची टपरी आणि टपरीवरचे मित्र, त्यांना कधी लांबूनच हात दाखवून जाणे किंवा कधी थांबून एक कटिंग चहा पिणे हा त्याच्या प्रवासाचा एक भागच होता.

आज मात्र टपरीवर अनिलचा एकही मित्र दिसला नाही, कालची उतरली नसेल कदाचित आणि म्हणून अजून बिछ्यान्यातच लोळत पडले असतील, तसे अनिलचे मित्र बघावे असे काही खूप मोठ्या काम धंद्यात नव्हते, शार्दूल गोळे छोटे मोठे एल आई सी चे कामे करायचा, घोरणे पप्याला राजकारणाचं भूत, विलास पगारे पेशाने वकील पण वकिली पेक्षा इतर उलाढालीतच त्यांना मोठा रस, बहिरे निक्याला मुलांना शाळेत सोडवणे आणणे आणि उरलेल्या वेळेत व्हाट्स अप वरच्या वीस पंचवीस ग्रुपचा कारभार संभाळणे आणि फेसबुक वरती चोवीस तास बॉर्डर वर नजर ठेवल्या सारखी पाळत ठेवण्याचे महान काम करण्यात वेळ पुरत नसायचा, सुनील घरात नावाचे आणखी एक थोडेशे वयस्कर व्यक्तिमत्त्व देखील मित्रांच्या यादीत होते, त्यांची सकाळ दुपारी दोन च्या सुमारास व्हायची आणि तीन वाजे नंतर नाक्यावर येऊन पेपर वरचे कोडे सोडवणे आणि संध्याकाळ होण्याची वाट बघणे, संध्याकाळची वाट अशासाठी कि रात्र झाली कि कुठूनतरी एक दीड क्वाटरची सोय करायची आणि तराट होऊन झोपायच अशी त्यांची दिनचर्या, तसे अनिलचे खूप मित्र होते पण हे काही खास रोजच्या उठण्या बसण्यातले.